Shree Swami Samarth

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 11

(Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 11)

Vishnubuva Brahmachari

Also known as Swami Samarth Charitra Saramrut · Shri Swami Charitra Saramrut · Shri Swami Charitra Saramrut adhyay 11

Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 11. Shri Swami Charitra Saramrut, the life of Shri Swami Samarth of Akkalkot in Marathi ovi. It gathers the leelas of the Swami — the people he healed, the pride he broke, the devotees he claimed — in the form in which they are read aloud at his mathas and in homes that keep his worship.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

॥ श्री गणेशाय नमः ॥
मागले अध्यायी वर्णिले । बाळाप्पा मुरगोडी आले ।
पुण्यस्थानी राहिले । तीन रात्री आनंदे ॥१॥
तेथे कळला वृतान्त । अक्कलकोटी साक्षात ।
यतिरुपे श्रीदत्त । वास्तव्य सांप्रत करिताती ॥२॥
तेथे आपुला मनोदय । सिद्धीस जाईल निःसंशय ।
फिटेल सर्वही संदेह । श्री सद़्गुरुकृपेने ॥३॥
परी मुरगोडीचे विप्र । बाळाप्पासी सांगत ।
गाणगापूर विख्यात । महाक्षेत्र भीमातीरी ॥४॥
तेथे आपण जावोनी । बैसावे हो अनुष्ठानी ।
श्रीगुरु स्वप्नी येवोनी । सांगती तैसे करावे ॥५॥
मानला तयासी विचार । निघाले तेथूनी सत्वर ।
जवळी केले गाणगापूर । परम पावन स्थान ते ॥६॥
कामना धरोनी चित्ती । सेवेकरी सेवा करिती ।
जेथे वाहे भीमा नदी । स्नान करिती भक्तजन ॥७॥
पुत्रकामना धरुनी चित्ती । आराधिती नृसिंहसरस्वती ।
दरिद्री धन इच्छिती । रोगीजन आरोग्य ॥८॥
कोणी घालिती प्रदक्षिणा । कोणी ब्राह्मणभोजना ।
कोणी करिती गंगास्नाना । कोणी घालिती नमस्कार ॥९॥
तेथील सर्व सेवेकरी । नित्य नियमे दोन प्रहरी ।
मागोनिया मधुकरी । निर्वाह करिती आपुला ॥१०॥
बाळाप्पा तेथे पातले । स्थान पाहोनी आनंदले ।
नृसिंहसरस्वती पाऊले । प्रेमभावे वंदिली ॥११॥
प्रातःकाळी उठोनी । संगमावरी स्नान करोनी ।
जप ध्यान आटपोनी । मागुनी येती गावात ॥१२॥
सेवेकऱ्यांबरोबरी । मागोनिया मधुकरी ।
भोजनोत्तर संगमावरी । परतोनि येती ते ॥१३॥
माध्यान्ह स्नान करोनी । पुन्हा बैसली जप ध्यानी ।
अस्ता जाता वासरमणी । संध्यास्नान करावे ॥१४॥
करोनिया संध्यावंदन । जप आणि नामस्मरण ।
रात्र पडता परतोन । ग्रामामाजी येती ते ॥१५॥
बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी । संतती संपत्ती सर्व सदनी ।
परान्न ठावे नसे स्वप्नी । सांप्रत भिक्षा मागती ॥१६॥
सद़्गुरुप्राप्तीकरिता । सोडूनी गृह-सुत-कांता ।
शीतोष्णाची पर्वा न करिता । आनंदवृत्ती राहती ॥१७॥
पंचपक्वान्ने सेविती घरी । येथे मागती मधुकरी ।
मिळती कोरड्या भाकरी । उदर पूर्ती न होय ॥१८॥
शीतोष्णाचा होय त्रास । अर्धपोटी उपवास ।
परी तयांचे मानस । कदा उदास नोहेची ॥१९॥
अय्याराम सेवेकरी । राहत होते गाणगापुरी ।
त्यांनी देखुनी ऐसीपरी । बाळाप्पासी बोलती ॥२०॥
तुम्ही भिक्षा घेवोनी । नित्य यावे आमुच्या सदनी ।
जे जे पडेल तुम्हांस कमी । ते ते आम्ही पुरवू जी ॥२१॥
बाळाप्पासी मानवले । दोन दिवस तैसे केले ।
पोटभरोनी जेवले । परी संकोच मानसी ॥२२॥
जाणे सोडिले त्यांचे घरी । मागोनिया मधुकरी ।
जावोनिया संगमावरी । झोळी उदकी बुडवावी ॥२३॥
आणोनिया बाहेरी । बैसोनी तिथे शिळेवरी ।
मग खाव्या भाकरी । ऐसा नेम चालविला ॥२४॥
ऐसे लोटले काही दिवस । सर्व शरीर झाले कृश ।
निशिदीनी चिंता चित्तास । सद़्गुरुप्राप्तीची लागली ॥२५॥
घरदार सोडिले । वनिता पुत्रा त्यागिले ।
अतितर कष्ट सोशिले । सद़्गुरुकृपा नोहेची ॥२६॥
हीन आपुले प्राक्तन । भोग भोगवी दारुण ।
पहावे सद़्गुरुचरण । ऐसे पुण्य नसेची ॥२७॥
ऐसे विचार निशिदीनी । येती बाळाप्पाचे मनी ।
तथापि कष्ट सोसोनी । नित्य नेम चालविला ॥२८॥
एक मास होता निश्चिती । स्वप्नी तीन यतिमूर्ती ।
येवोनिया दर्शन देती । बाळाप्पा चित्ती सुखावे ॥२९॥
पंधरा दिवस गेल्यावरी । निद्रिस्त असता एके रात्री ।
एक ब्राह्मण स्वप्नाभीतरी । येवोनिया आज्ञापी ॥३०॥
अक्कलकोटी श्रीदत्त । स्वामीरुपे नांदत ।
तेथे जाऊनी त्वरित । कार्य इच्छित साधावे ॥३१॥
पाहोनिया ऐसे स्वप्न । मनी पावले समाधान ।
म्हणती केले कष्ट दारुण । त्याचे फळ मिळेल की ॥३२॥
अक्कलकोटी त्वरीत । जावयाचा विचार करीत ।
तव तयासी एक पत्र । शय्येखाली सापडले ॥३३॥
त्यात लिहिली एक ओळी । करु नये उतावळी ।
ऐसे पाहूनी त्या वेळी । विचार केला मानसी ॥३४॥
आपण केले अनुष्ठान । परी ते जाहले अपूर्ण ।
आणखीही काही दिन । क्रम आपुला चालवावा ॥३५॥
मग कोणे एके दिवशी । बाळाप्पा आले संगमासी ।
वृक्षातळी ठेवून वस्त्रासी । गेले स्नान करावया ॥३६॥
परतले स्नान करोनि । सत्वर आले त्या स्थानी ।
वस्त्र उचलिता खालोनी । वृश्चिक एक निघाला ॥३७॥
तयासी त्यांनी न मारिले । नित्यकर्म आटोपिले ।
ग्रामामाजी परत आले । गेले भिक्षेकारणे ॥३८॥
त्या दिवशी ग्रामाभीतरी । पक्वान्न मिळाले घरोघरी ।
बाळाप्पा तोषले अंतरी । उत्तम दिन मानिला ॥३९॥
अक्कलकोटी जावयासी । निघाले मग त्याच दिवशी ।
उत्तम शकुन तयांसी । मार्गावरी जाहले ॥४०॥
चरण-चाली चालोनी । अक्कलकोटी दुसरे दिनी ।
बाळाप्पा पोचले येवोनी । नगरी रम्य देखिली ॥४१॥
जेथे नृसिंहसरस्वती । यतिरुपे वास करिती ।
तेथे सर्व सौख्ये नांदती । आनंद भरला सर्वत्र ॥४२॥
तया नगरीच्या नारी । कामधंदा करिता घरी ।
गीत गाउनी परोपरी । स्वामीमहिमा वर्णिती ॥४३॥
दूर देशीचे ब्राह्मण । वैश्यादिक इतर वर्ण ।
स्वामीमहिमा ऐकोन । दर्शनाते धावती ॥४४॥
तयांची जाहली गर्दी । यात्रा उतरे घरोघरी ।
नामघोषे ते नगरी । रात्रंदिन गजबजे ॥४५॥
राजे आणि पंडित । शास्त्री वेदांती येत ।
तैसे भिक्षुक गृहस्थ । स्वामीदर्शनाकारणे ॥४६॥
कानफाटे नाथपंथी । संन्यासी फकीर यती ।
रामदासी अघोरपंथी । दर्शना येती स्वामींच्या ॥४७॥
कोणी करिती कीर्तन । गायन आणि वादन ।
कोणी भजनी नाचोन । स्वामीमहिमा वर्णिती ॥४८॥
तया क्षेत्रीच महिमान । केवी वर्णू मी अज्ञान ।
प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन । स्वामीकृपेने जाहले ॥४९॥
पुण्यपावन देखोन नगरी । बाळाप्पा तोषले अंतरी ।
पूर्वपुण्य तयांचे पदरी । जन्मसार्थक जाहले ॥५०॥
बाळाप्पा होउनी सेवेकरी । स्वहस्ते करील श्रीचाकरी ।
ती मधुर कथा चतुरी । पुढील अध्यायी परिसावी ॥५१॥
जयाचा महिमा अगाध । जो केवळ सच्चिदानंद ।
विष्णूशंकरी अभेद । मित्रत्व ठेवो जन्मवरी ॥५२॥
इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।
श्रोते सदा परिसोत । एकादशोऽध्याय गोड हा ॥५३॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Explore More