Lord Krishna

ज्ञानेश्वरी अध्याय 6

(Dnyaneshwari Adhyay 6)

Sant Dnyaneshwar

Also known as Dnyaneshwari · Jnaneshwari · Jnaneshwari adhyay 6

Dnyaneshwari Adhyay 6. The Dnyaneshwari — Sant Dnyaneshwar's commentary on the Bhagavad Gita, composed at Nevasa in 1290 when he was in his teens. Its proper name is Bhavarthadipika, and it is the work that made Marathi a language of scripture: the Gita's Sanskrit opened out into ovis of extraordinary beauty, image piled on image, for listeners who knew no Sanskrit at all.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 542
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।
कृष्ण सागंती जो । योगरुप ॥ १॥
सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें ।
की तेचि अवसरी पाहुणे । पातलों आम्ही ॥ २॥
कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे ।
कीं तेंचि चवी करुनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥ ३॥
तैसे आम्हां तुम्हां जाहले । जें आडमुठी तत्व फावलें ।
तंव धृतराष्ट्रे म्हणितलें । हें न पुसों तूंते ॥ ४॥
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें ।
जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ।। ५ ॥
हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला ।
एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं ये ॥ ६ ॥
परि तैं तैसें कैसेनि होईल । जात्यंधा कैसें पाहेल ।
तेवींचि येरु से घेईल । म्हणौनि बिहे ॥ ७ ॥
परि आपण चित्तीं आपुलां । निकियापरि संतोषला ।
जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥ ८ ॥
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें ।
आतां आदरेंसी बोलणें । घडेल तया ॥ ९॥
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा ।
जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥ १० ॥
तैसें गीतार्थाचें सार । जे विवेकसिंधूचे पार ।
नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥ ११ ॥
जें आदिप्रकृतीचें विसवणें । जे शब्दब्रह्मासि न बोलणें ।
जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥ १२ ॥
तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा ।
सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥ १३ ॥
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ १४ ॥
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥ १५ ॥
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥ १६ ॥
सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥ १७ ॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ॥ १८ ॥
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलु भुजाहि आविष्करें । आलिंगावया ॥ १९ ॥
ऐशी इंद्रिये आपुललिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी ।
जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥ २० ॥
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥ २१ ॥
हें असोतु या बोलाचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।
ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥ २२ ॥
आता आत्मप्रभा नीच नवी । तेचि करुनी ठाणदिवी ।
जो इंद्रियांतें चोरुनि जेवी । तयासीचि फावे ॥ २३ ॥
येथ श्रवणाचेनि पांगे- । वीण श्रोतयां होआवें लागे ।
हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥ २४ ॥
आहाच बोलाचि वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे ।
मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचिमाजीं ॥ २५ ॥
ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाइल ।
एरव्हीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥ २६ ॥
परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांते कडसावें ।
जे एथ अधिकारिये स्वभावें । निष्कामकामु ॥ २७ ॥
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराचि कुरोंडी ।
ते वांचुनी एथींची गोडी । नेणती आणिक ॥ २८ ॥
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे ।
आणि तो हिमांशुचि जेवि खाजें । चकोराचें ॥ २९ ॥
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गांवो ।
म्हणौनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं ॥ ३० ॥
परी अनुवादलो मी प्रसंगे । तें सज्जनी उपसाहावें लागे ।
आतां सांगेन काय श्रीरंगे । निरोपिलें जें ॥ ३१ ॥
ते बुध्दीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे |
परि निवृत्तिकृपादीपउजियेडें । देखेन मी ॥ ३२ ॥
जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे ।
जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥ ३३ ॥
ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सापडे ।
जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥ ३४ ॥
तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।
म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ ३५ ॥
तेणें कारणें मी बोलेन । बोली अरुपाचे रुप दावीन ।
अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥ ३७ ॥
म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु ।
तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होई आतां ॥ ३८ ॥
श्रीभगवानुवाचः अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १ ॥
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानी ।
एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥ ३९ ॥
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु ।
पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु । दोहींमाजीं ॥ ४० ॥
जैसें नामाचेनि अनारिसपणें । एका पुरुषाते बोलावणें ।
कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया ॥ ४१ ॥
नातरी एकचि उदक सहजें । परी सिनानां घटीं भरिजें ।
तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥ ४२ ॥
आइकें सकळ संमते जगीं । अर्जुना गा तोचि योगी ।
जो कर्में करुनि रागी । नोहेचि फळीं ॥ ४३ ॥
जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुध्दीवीण सहजें ।
आणि तेथींची तियें बीजें । अपेक्षीना ॥ ४४ ॥
तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।
जें जेणें अवसरें । करणें पावे ॥ ४५ ॥
तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं ।
आणि बुध्दीही करोनि फळवेरीं । जायेचिना ॥ ४६ ॥
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं ।
तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥ ४७ ॥
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडीन बध्दक ।
तरी टांकोटांकी आणिक । मांडिचि तो ॥ ४८ ॥
जैसा क्षाळुनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु ।
तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥ ४९ ॥
गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळी आधींच आहे सहजें ।
की तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥ ५० ॥
म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां ।
आहे योगसुख स्वभावता । आपणापांचि ॥ ५१ ॥
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विध्दि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवनि कश्चन ॥ २ ॥
ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे ।
ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥ ५३ ॥
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥
आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था ।
तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ॥ ५४ ॥
येणें यमनियमाचेनि तळवटें । रिगे असनाचिये पाउलवाटें ।
येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥ ५५ ॥
मग प्रत्याहाराचा आधाडा । बुध्दीचियाहि पाया निसरडा ।
जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥ ५६ ॥
तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें ।
नखी लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥ ५७ ॥
ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें ।
क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ॥ ५८ ॥
मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीचि हांव ।
जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥ ५९ ॥
जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।
ऐसिया सरिसीये भूमिके । समाधी राहे ॥ ६० ॥
येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु ।
तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन आइकें ॥ ६१ ॥
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसंकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते ॥ ४ ॥
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा ।
जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥ ६२ ॥
जयाचें सुखदुःखाचेनि आंगे । झगटलें मानस चेवो नेघे ।
विषय पासींही आलियां से न रिगे । हे काय म्हणउनि ॥ ६३ ॥
इंद्रियें कर्माच्या ठायी । वाढीनलीं परी कहीं ।
फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥ ६४ ॥
असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला ।
तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ॥ ६५ ॥
तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां ।
सांगे तया ऐसी योग्यता । कवणें दीजे ॥ ६६ ॥
उध्दरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत ।
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥
तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें ।
कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये ॥ ६७ ॥
पै व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रित होइजे ।
ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥ ६८ ॥
पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो ।
ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ॥ ६९ ॥
म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया ।
चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥ ७० ॥
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत ॥ ६ ॥
हा विचारुनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होइजे ।
तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥ ७१ ॥
एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी ।
जो आत्मबुध्दी शरीरीं । चारुस्थळी ॥ ७२ ॥
कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।
कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥ ७३ ॥
कां कवणु एकु भ्रमलेपणे । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे ।
ऐसा नाथिला छंद अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥ ७४ ॥
एऱ्हवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुध्दी तैशी नोहे ।
देखा स्वप्नींचेनि घायें । की मरे साचें ॥ ७५ ॥
जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥ ७६ ॥
वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी ।
टिटांतु नळी । धरुनि ठाके ॥ ७७ ॥
म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।
कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥ ७८ ॥
ऐसा काजेंवीण आतुंडला । तो सांग पां काय आणिकें बांधला ।
मग नोसंडी जऱ्ही नेला । तोडुनि अर्धा ॥ ७९ ॥
म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।
येर स्वंयबुध्दी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।
परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥ ८१ ॥
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरे तेंचि होये ।
तैसें जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपीं ॥ ८२ ॥
हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा ।
नलगे मिळो जाणें आकाशा । आना ठाया ॥ ८३ ॥
तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला ।
तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥ ८४ ॥
आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणीं ।
इयें न समाती कांही बोलणीं । मानापमानांची ।। ८५ ॥
जे जिये वाटा सुर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये ।
तैसे तया पावे तें आहे । तोचि म्हणऊनि ॥ ८६ ॥
देखैं मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा ।
तैशी शुभाशभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥ ८७ ॥
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः ॥ ८ ॥
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विचारितां जाहला वावो ।
मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ॥ ८८ ॥
आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी ।
ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥ ८९ ॥
ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके ।
जेणें जिंतलीं एके । इंद्रिये गा ॥ ९० ॥
तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे ।
जेणें सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ।। ९१ ॥
देखे सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ ।
आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥ ९२ ॥
पाहता पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें ।
देखें दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥ ९३ ॥
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुध्दिर्विशिष्यते ॥ ९ ॥
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु ।
हा भावभेद विचित्रु । कल्पुं कैंचा ॥ ९४ ॥
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।
मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥ ९५ ॥
मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी ।
काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ॥ ९६ ॥
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाचि बुध्दी चराचरीं ।
होय साम्याची उजरी । निरंतर ॥ ९७॥
जे ते विश्वाळंकाराचें विसुरे । जरी आहाती आनानें आकारें ।
तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में ॥ ९८ ॥
ऐसें जाणणें जें बरवें । ते फावलें तया आघवें ।
म्हणौनि आहाचवाहाचें न झकवे । येणे आकारचित्रें ॥ ९९ ॥
घापे पटामाजी दृष्टी । दिसे तंतूंचि सैंघ सृष्टी ।
परी तो एकवांचुनि गोठी । दुजी नाहीं ॥ १०० ॥
ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे ।
तोचि समबुध्दी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥ १०१ ॥
जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो ।
जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासी ॥ १०२ ॥
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिध्दितें विये ।
देखें स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥ १०३ ॥
विपायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता ।
हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥ १०४ ॥
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें ।
मग आपणपांचि आपण असे । अखंडित ॥ १०५ ॥
ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी ।
सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकी । तोचि म्हणऊनि ॥ १०६ ॥
ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें ।
आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले ॥ १०७ ॥
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु ।
जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥ १०८ ॥
प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें ।
तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥ १०९ ॥
जयाचेनि आंगीकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे ।
म्हणौनि जग हें वेसजे- । वीण असे तया ॥ ११० ॥
हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचे ।
गुण एकेक काय तयाचे । आकळशील तूं ॥ १११ ॥
म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणांची लक्षणें ।
दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥ ११२ ॥
ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी ।
तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥ ११३ ॥
म्हणोनि तें तैसे बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें ।
केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥ ११४ ॥
जया सोहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु ।
तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥ ११५ ॥
विपायें अंहभाव ययाचा जाईल । मी तेंचि हो जरी होईल ।
तरी मग काय कीजेल । एकलेया ॥ ११६ ॥
दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे ।
नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ॥ ११७ ॥
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं ।
ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥ ११८ ॥
इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें ।
बोलामाजि मन मनें । आलिंगुं सरले ॥ ११९ ॥
हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें ।
कृष्णसुखाचेंचि रुपडें । वोतलें गा ॥ १२० ॥
हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी ।
मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥ १२१ ॥
तैसें जाहले अनंता । ऐंसे तरी मी न म्हणतां ।
जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥ १२२ ॥
पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज ।
परी पुढें वालभाचे भोज । नाचत असे ॥ १२३ ॥
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।
पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ॥ १२४ ॥
म्हणउनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा ।
कीं सुखे श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥ १२५ ॥
यावरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।
तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥ १२६ ॥
हो का आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची ।
पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥ १२७ ॥
पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे ।
ऐसा अर्जुने तो सहजें । पढिये हरी ॥ १२८ ॥
पाहां पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे ।
ते पतीहून काय न वर्णिजे । पतिव्रता ॥ १२९ ॥
तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा ।
जे तो त्रिभुवनाचिया दैवां । एकायतनु जाहला ।। १३० ॥
जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे ।
पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥ १३१॥
तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव ।
काय नादातें हन बरव । जिणोनी आली ॥१३२॥
हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी ।
वाणें उमटताहे आकाशीं । साहित्यरंगाचें ॥१३३॥
कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार ।
हेचि श्लोकार्थकुमुदी तरी फार । साविया होती ॥१३४॥
चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी ।
तेणें विवळले अंतरी । तेथ डोलु आला ॥१३५॥
तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें ॥
नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥१३६॥
देवकीया उदरीं वाहिला। यशोदा सायासें पाळिला ॥
कीं शेखीं उपेगा गेला । पांडवासी ॥१३७॥
म्हणऊनि बहु दिवस वोगळावा । कां अवसरु पाहोनि विनवावा ।
हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥१३८॥
हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी ।
देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ॥१३९॥
एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा ।
परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥१४०॥
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होईजेल ।
काय जाहलें अभ्यासिजेल । सांगाल जे ॥ १४१ ॥
हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं ।
ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥ १४२ ॥
हें आंगे म्या होइजो का । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां ।
तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करुं म्हणती ॥ १४३ ॥
देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें ।
मग जोडलिया कवणीकडे । अपुरें असे ।। १४४ ॥
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें ।
परि कैंसा भारें आतला पिके । दैवाचेनि ॥ १४५ ॥
जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी ।
तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुहि न साहे ॥ १४६ ॥
मग ऐका जें पांडवें । म्हणितले ब्रह्म म्यां होआवें ।
तें अशेषही देवें । अवधारिलें ॥ १४७ ॥
तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले ।
परि उदरा वैराग्य आहे आलें । बुध्दीचिया ॥ १४८ ॥
एऱ्हवीं दिवस तरी अपुरे । परि वैराग्यवसंताचेनि भरें ।
जे सोंहभाव महुरें । मोडोनि आला ॥ १४९ ॥
म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लागेल आतां ।
हो विरक्तु ऐसा अंनता । भरंवसा जाहला ॥ १५० ॥
म्हणे जें जें हा अधिष्ठील। तें आरंभींच यया फळेल ।
म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥ १५१ ॥
ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं ।
अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥ १५२ ॥
तेथ प्रवृत्तितरुच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी ।
जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनि ॥ १५३ ॥
पैं योगवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं ।
कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला ॥ १५४ ॥
तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें ।
कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनियां ॥ १५५ ॥
पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिध्द जाहाले ।
आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥ १५६ ॥
हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे ।
रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥ १५७ ॥
चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे ।
आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥ १५८ ॥
निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा ।
निश्चळपणें धनुर्धरा । चालणें येथिंचें ॥ १५९ ॥
येणें मार्गें जया ठाया जाइजे । तो गांवो आपणचि होइजे ।
हें सांगो काय सहजें । जाणसी तूं ॥ १६० ॥
तेथ म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां ।
कां आर्तीसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥ १६१ ॥
तवं श्रीकृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें ।
आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिले तुवां ॥ १६२ ॥
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥
तरी विशेषे आतांचि बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल ।
म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पहावें ॥ १६३ ॥
जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे ।
वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें ॥ १६४ ॥
जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो ।
मना होय उत्सावो । धैर्याचा ॥ १६५ ॥
अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरि ।
ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥ १६६ ॥
जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा ।
पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥ १६७ ॥
स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां ।
तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥ १६८ ॥
ऐसेनि न राहतयातें राहावी । भ्रमतयातें बैसवी ।
थापटुनि चेववी । विरक्तीतें ॥ १६९ ॥
हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे ।
ऐसे शृंगारियांहि उपजे । देखतखेंवो ॥ १७० ॥
जें येणें मानें बरवंट । आणि तैसेच अतिचोखट ।
जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥ १७१ ॥
आणिकही एक पहावें । साधकीं वसतें होआवें ।
आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥ १७२ ॥
जेथ अमृताचेनि पाडें । मुळेहीसकट गोडें ।
जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥ १७३ ॥
पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें ।
निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ ॥ १७४ ॥
हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु ।
पवन अति निश्चळु । मंद झुळके ॥ १७५ ॥
बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद ।
शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥ १७६ ॥
पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।
कवणें एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥ १७७ ॥
निरंतर नाही । तरी आलीं गेलीं कांहीं ।
होतु कां मयुरेंही । आम्ही ना न म्हणों ॥ १७८ ॥
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥ १७९ ॥
दोहींमाजी आवडे तें । जें मानलें होय चित्तें ।
बहुतकरुनि एकांते । बैसिजे गा ॥ १८० ॥
म्हणोनि तैसें ते जाणावें । मन राहातें पाहावें ।
राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।। १८१ ॥
वरि चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।
तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥ १८२ ॥
सकोमळ सरिसे । सुबध्द राहती आपैसे ।
एकें पाडें तैसें । वोजा घाली ॥ १८३ ॥
परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल ।
नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥ १८४ ॥
म्हणौनि तैसें न करावें । समभावें धरावें ।
हें बहु असो होआवें । आसन ऐसें ॥ १८५ ॥
तत्रैकाग्नं मनः कृत्वा यतचित्तेद्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद योगमात्मविशुध्दये ॥ १२ ॥
मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण ।
करुनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥ १८६ ॥
तैसें स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्विकें भरे ।
जंव काठिणपण विरे । अहंभावाचे ॥ १८७ ॥
विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे ।
मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥ १८८ ॥
ऐसें ऐक्य हें सहजें । फावें तंव राहिजे ।
मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥ १८९ ॥
आतां आंगाते आंग करी । पवनातें पवनु धरी ।
ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥ १९० ॥
प्रवृत्ती माघौति मोहरे । समाधि ऐलाडि उतरे ।
आघवें अभ्यासु सरे । बैसतखेंवो ॥ १९१ ॥
मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।
तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं ॥ १९२ ॥
चरणतळें देव्हडी । आधारद्रुमाचा बुडीं ।
सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥ १९३ ॥
सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे ।
वरी बैसे तो सहजें । वामचरणु ॥ १९४ ॥
गुद मेंढ्राआंतौति । चारी अंगुळें निगुतीं ।
तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनियां ॥ १९५ ॥
माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तराभागें ।
नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि ॥ १९६ ॥
उचलिले कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे ।
गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥ १९७ ॥
मग शरीर संचु पार्था । अशेषुही सर्वथा ।
पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥ १९८ ॥
अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण ।
वज्रासन गौण । नाम यासी ॥ १९९ ॥
ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे ।
तेथ अपानु आंतलीकडे । वोहोंटो लागे ॥ २००॥
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ १३ ॥
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे ।
तंव बाहुमुळीं दिसे । थोरवी आली ॥ २०१ ॥
माजी उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें ।
नेत्रद्वारीची कवाडें । लागूं पहाती ॥ २०२ ॥
वरचिलें पाती ढळती । तळींची तळीं पुंजाळती ।
तेथ अर्धोन्मीलित स्थिती | उपजे तया ॥ २०३ ॥
दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें ।
ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥ २०४ ॥
ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे ।
म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥ २०५ ॥
आतां दिशांचि भेटी घ्यावी । कां रुपाची वाट पहावी ।
हे चाड सरे आघवी । आपैसया ॥ २०६ ॥
मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौति दाटे ।
ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥ २०७ ॥
माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे ।
तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥ २०८ ॥
नाभीवरी पोखे । उदर हें थोके ।
अंतरीं फांके । हृदयकोशु ॥ २०९ ॥
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभीस्थानातळवटीं ।
बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥ २१० ॥
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे ।
तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥ २११ ॥
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे ।
आंग मन विरमे । सावियाचि ॥ २१२॥
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली ।
हे आठवणही हारपली । न दिसे वेगां । २१३ ॥
जो मुळबंधे कोंडला । अपानु माघौता मुरडला ।
तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥ २१४ ॥
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे ।
मणिपुरेंसी झुंजे । राहोनियां ॥ २१५ ॥
मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी ।
बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥ २१६ ॥
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे ।
कफपित्ताचे थारे । उरों नेदी॥ २१७ ।।
धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी ।
आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥ २१८ ॥
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी ।
साधकांते भेडसावी । परि बिहावें ना ॥ २१९ ॥
व्याधीतें दावी । सवेंचि हरवी ।
आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥ २२० ॥
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।
शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥ २२१ ॥
नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें ।
वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥ २२२ ।।
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।
अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥ २२३ ॥
विद्युलतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी ।
पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥ २२४ ॥
तैसी सुबध्द आटली । पुटीं होती दाटली ।
तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥ २२५ ॥
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सुर्याचें आसन मोडलें ।
तेजाचे बीज विरुढलें । अंकुरेशीं ॥ २२६ ॥
तैशी वेढियातें सोडती । कवतिकें आंग मोडिती ।
कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥ २२७ ॥
सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविलीं तें होय मिष ।
मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥ २२८ ॥
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी ।
तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥ २२९ ॥
मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी ।
मांसाची वडवाळी ।आरोगुं लागे ॥ २३० ॥
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस ।
पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥ २३१ ॥
मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वीचे खंड भेदी ।
झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥ २३२ ॥
आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी ।
त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥ २३३ ॥
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे ।
तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची ॥ २३४ ॥
मग सप्तधांतूच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी ।
आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥ २३५ ॥
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा ।
तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली ॥ २३६ ॥
तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे ।
तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥ २३७ ॥
एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परि कुंडलिनी नावेकु दुश्चित्त होती ।
ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसीं एथें ॥ २३८ ॥
आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां काहीं नुरवी ।
आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ॥ २३९ ॥
ऐसी दोनी भुतें खाये । ते वेळी संपूर्ण धाये ।
मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥ २४० ॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें ।
तेणें तियेचेनि पीयूषे । प्राणु जिये ॥ २४१ ॥
तो अग्नि आंतूनि निघे । परि सबाह्य निववूंचि लागे ।
ते वेळी कसु बांधिती आंगे । सांडिला पुढती ॥ २४२ ॥
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचें ।
जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥ २४३ ॥
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।
साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥ २४४॥
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु ।
तो वातीवरी पवनु । गिवसितां न दिसे ॥ २४५ ॥
बुध्दीची पुळिका विरे । परिमळु घ्राणी उरे ।
तोही शक्तिसवें संचरे । मध्यमेमाजी ॥ २४६ ॥
तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें ।
कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ॥ २४७ ॥
तेणें नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे ।
जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥ २४८ ॥
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें ।
कोंदली राहे रसें । वोतलेनि ॥ २४९ ॥
तैसे पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे ।
वरी त्वचेचेनि पदरें । पांगुरली असे ॥ २५० ॥
जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती ।
मग फिटलिया दीप्ति । धरूं नये ॥ २५१ ॥
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा ।
तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥ २५२ ॥
मग काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ ।
अवयवकांतीचि भांब | तैसी दिसे ॥ २५३ ॥
नातरि संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग ।
की अंतर्जोतीचें लिंग । निर्वाळिलें ॥ २५४ ॥
कुंकुमाचे भरींव । सिध्दरसांचे वोतींव ।
मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥ २५५ ॥
तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप ।
कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें ॥ २५६ ॥
तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा ।
नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥ २५७ ॥
हो कां जे शारदियेचे वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें ।
कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥ २५८ ॥
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।
मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥ २५९ ॥
वृध्दाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे ।
लोपली उघडे । बाळदशा ॥ २६० ॥
वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवी बळाचा बळार्थु करी ।
धैर्याची थोरी । निरुपम ॥ २६१ ॥
कनकद्रुमाचां पालवीं । रत्नकळिका नित्य नवी ।
नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥ २६२ ॥
दांतही आन होती । परि अपाडें सानेजती ।
जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥ २६३ ॥
माणिकुलियांचिया कणिया । सावियाची अणुमानिया ।
तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचियां ॥ २६४ ॥
करचरणतळें । जैसीं कां रातोत्पळें ।
पाखाळीं होती डोळे । काय सांगो ॥ २६५ ॥
निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें ।
मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥ २६६ ॥
तैशीं पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे ।
आधिलीची परि होये । गगना कळिती ॥ २६७ ॥
आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें ।
जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥ २६८ ॥
मग समुद्रपैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके ।
मनोगत ओळखे । मुंगियेचे ।। २६९ ॥
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे ।
येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिध्दी ॥ २७० ॥
आइकें प्राणाचा हातु धरुनि । गगनाची पाउटी करुनी ।
मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥ २७१ ॥
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा ।
जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥ २७२ ॥
जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी ।
जे प्राणाची उघडी । जन्मभूमी ॥ २७३ ॥
हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली ।
तंव अनाहताचां बोलीं । चावळे ते ॥ २७४ ॥
शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें ।
तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥ २७५ ॥
घोषाच्या कुंडी । नादचित्रांची रुपडीं ।
प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥ २७६ ॥
हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परि कल्पितें कैचें आणिजे ।
तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥ २७७ ॥
विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाही पवना ।
तंव वाचा आथी गगना । म्हणोनि घुमे ॥ २७८ ॥
तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमों लागे ।
तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटलें सहजें ॥ २७९ ॥
आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें ।
जेथ चैतन्य आधातुरें । करुनि असिजे ॥ २८० ॥
तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनियां परमेश्वरी ।
तेजाची शिदोरी । विनियोगिली ।। २८१ ॥
बुध्दीचेनि शाकें । हातबोनें निकें ।
द्वैत जेथ न देखे । तैसें केलें ॥ २८२ ॥
ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली ।
ते वेळी कैसी गमली । म्हणावी पां ॥ २८३ ॥
हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी ।
ते फेडुनियां वेगळी । ठेवली तिया ॥ २८४ ॥
नातरी वारयाचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निमटली ।
कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥ २८५ ॥
तैशी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे सोनियाची जैशी सरी ।
नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥ २८६ ॥
मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे ।
तैसें शक्तीचे रुप मावळे । शक्तीचिमाजीं ।। २८७ ॥
तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवी तो प्राणु केवळ जाणिजे ।
आतां नाद बिंदु नेणिजे । कला ज्योती ॥ २८८ ॥
मनाचा हन मारु । कां पवनाचा धरु ।
ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥ २८९ ॥
हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी ।
हे महाभूतांची फुडी । आटणी देखां ॥ २९० ॥
पिंडे पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतीचा दंशु ।
परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ॥ २९१ ॥
तया ध्वनिताचें केणें सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी ।
उपलविली म्यां जाणुनि । ग्राहीक श्रोते ॥ २९२ ॥
युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियतमानसः ।
शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५ ॥
ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचे रुप हारपे ।
मग तो डोळ्यांमाजी लपे । जगाचिया ॥ २९३ ॥
एऱ्हवीं आधिलाची ऐसें । सावयव तरी दिसे ।
परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥ २९४ ॥
नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा ।
कां अवयवचि नभा । निवडला तो ॥ २९५ ॥
तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर ।
हें पद होतां चमत्कार । पिंडजनी ॥ २९६ ॥
देखें साधकु निघोनि जाय । मागां पाउलांची वोळ राहे ।
तेथ ठायी ठायी होये । हे अणिमादिक ॥ २९७ ॥
परि तेणें काय काज आपणयां । अवधारी ऐसा धनंजया ।
लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥ २९८ ॥
पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।
तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ।। २९९ ॥
पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें ।
मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥ ३०० ॥
ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये ।
परि शक्तीपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥ ३०१ ॥
मग जालंधर सांडी । ककारांत फोडी ।
गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥ ३०२ ॥
ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।
पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥ ३०३ ॥
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरी ।
भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥ ३०४ ॥
मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी । सोहंभावाच्या बाह्या पसरुनी ।
परमात्मलिंगा धांवोनि । आंगा घडे ॥ ३०५ ॥
तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें ।
तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥ ३०६ ॥
पैं मेघाचेनि मुखीं निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला ।
तो मागुता जैसा आला । आपणपेयां ॥ ३०७ ॥
तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।
तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥ ३०८ ॥
आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें ।
ऐशिये विवंचनपुरतें । उरेचिना ।। ३०९ ॥
गगनीं गगन लया जाये । ऐसें जे कांहीं आहे ।
तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥ ३१० ॥
म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु ।
जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥ ३११ ॥
अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा गर्वु धरी ।
ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥ ३१२ ॥
भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे ।
सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥ ३१३ ॥
पाठीं तेथेंचि तो भासळला । तंव शब्दाचा दिवो मावळला ।
मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥ ३१४ ॥
आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनसीचि ठावो नाहीं ।
तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ॥ ३१५ ॥
म्हणोनि आखरामाजीं सांपडे । कीं कानावरी जोडे ।
हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुध्दी गा ॥ ३१६ ॥
जैं कही दैवें । अनुभविलें फावे ।
तैं आपणचि हें ठाकावें । होऊनिया ॥ ३१७ ॥
पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि ।
बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥ ३१८ ॥
ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।
वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥ ३१९ ॥
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।
अनादि जें अगण्य । परमतत्व ॥ ३२० ॥
जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु ।
जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले ॥ ३२१ ॥
जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ ।
जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥ ३२२ ॥
जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज ।
एवं पार्था जें निज । स्वरुप माझें ॥ ३२३ ॥
ते हे चर्तुभुज कोंभेली । जयाची शोभा रुपा आली ।
देखोनि नास्तिकीं नोकिली । भक्तवृंदें ॥ ३२४ ॥
तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष ।
जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तीवेरीं ॥ ३२५ ॥
आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें ।
ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥ ३२६ ॥
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें ।
वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥ ३२७ ॥
कां जें आपण आतां देवो । हा बोलिलो जो उपावो ।
तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥ ३२९ ॥
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती ।
हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥ ३३० ॥
देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता ।
मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केंवी ॥ ३३१ ॥
म्हणऊनि एथ कांही । अनारिसें नाहीं ।
परि नावभरी चित्त देई । बोला एका ॥ ३३२ ॥
आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु ।
परि न शकें करुं पांगु । योग्यतेचा ॥ ३३३ ॥
सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिध्दि जाये ।
तरी हाचि मार्ग सुखोपायें । अभ्यासीन ॥ ३३४ ॥
नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल ।
तरी योग्यतेवीण होईल । तेचिं पुसों ॥ ३३५ ॥
जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण ।
मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥ ३३६ ॥
हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरुपिलें ।
तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ॥ ३३७ ॥
कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांही ।
तेथ कृष्णा म्हणती तरी काई । धनुर्धरा ।। ३३८ ॥
हें काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांही साधारण ।
तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिध्दि जाय ॥ ३३९ ॥
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे ।
कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभी फळें ॥ ३४० ॥
तरी तैसी एथ कांही । सावियाचि केणी नाहीं ।
आणि योग्यांची काई । खाणी असे ॥ ३४१ ॥
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मी नियतु ।
तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ॥ ३४२ ॥
येतुलालिये आयणीमाजि येवढें । योग्यपण तूतेंही जोडे ।
ऐसें प्रसंगे सांकडें । फेडिलें तयाचें ॥ ३४३ ॥
मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था ।
अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥
जो रसनेद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला ।
तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ॥ ३४५ ॥
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी ।
आहारातें तोडी । मारुनियां ॥ ३४६ ॥
निद्रेचिया वाटा न वचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे ।
तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥ ३४७ ॥
म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नव्हावा ।
कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ॥ ३४८ ॥
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥
आहार तरी सेविजे । परि युक्तीचेनि मापें मविजे ।
क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥ ३४९ ॥
मपितलां बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे ।
निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥ ३५० ॥
जागणें जरी जाहलें । तरी व्हावे तें मितलें ।
येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सुखें ॥ ३५१ ॥
ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे भातें ।
तै संतोषासी वाढतें । मनचि करी ॥ ३५२ ॥
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत सुख वाढे ।
तेथें सहजचि योगु घडे । नाभ्यासितां ॥ ३५३ ॥
जैसें भाग्याचिये भडसें । उद्यमाचेनि मिसें ।
मग समृध्दीजात आपैसें । घर रिघे ॥ ३५४ ॥
तैसा युक्तीमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके ।
आणि आत्मसिद्धीची पिके । अनुभवु तयाचा ॥ ३५५ ॥
म्हणोनि युक्ती हे पांडवा । घडे जया सदैवा ।
तो अपवर्गाचिये राणिवा । अळंकरिजे ॥ ३५६ ॥
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥
युक्ती योगाचे आंग पावे । ऐसें प्रयाग जें होय बरवें ।
तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥ ३५७ ॥
तयातें योगायुक्त म्हण । हेंही प्रसंगे जाण ।
तें दीपांचे उपलक्षण । निर्वातींचिया ॥ ३५८ ॥
आतां तुझें मनोगत जाणोनि । कांही एक आम्ही म्हणोनि ।
तें निकें चित्त देउनी । परिसावें गा ॥ ३५९ ॥
तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्ष नव्हसी ।
तें सांग पा काय बिहसी । दुवाडपणा ॥ ३६० ॥
तरी पार्था हें झणें । सायास घेशीं हो मनें ।
वायां बागूल इये दुर्जनें । इंद्रिये करिती ॥ ३६१ ॥
पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी ।
तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥ ३६२ ॥
ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इद्रिंयां दुःखे ।
एऱ्हवी सोपें योगासारिखें । कांही आहे ॥ ३६३ ॥
यत्रोपरमते चित्तं निरुध्दं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥
सुखमात्यन्तिकं यत् तद् बुध्दीग्राह्यमतीद्रिंय ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥
म्हणोनि आसनाचिया गाढीका । जो आम्ही अभ्यासु सांगितला निका ।
तेणे होईल तरी हो कां । निरोधु यया ॥ ३६४ ॥
एऱ्हवी तरी येणें योगें । जै इद्रिंया विंदाण लागे ।
तै चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥ ३६५ ॥
परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांते आपण देखे ।
देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व हें मी ॥ ३६६ ॥
तिये ओळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे ।
मग चित्तपण समरसें । विरोनि जाय ॥ ३६७ ॥
जयापरतें आणिक नाहीं । जयातें इद्रिंयें नेणती कहीं ।
तें आपणचि आपुलिया ठायीं । होऊनि ठाके ॥ ३६८ ॥
यं लब्धा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥
मग मेरुपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरे ।
दाटिजो पां परि भरें । चित्त न दटे ॥ ३६९ ॥
कां शस्त्रें वरी तोडिलिया । देह अग्निमाजीं पडलिया ।
चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥ ३७० ॥
ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे ।
आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥ ३७१ ॥
तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स् निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥
जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी ।
संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥ ३७२ ॥
जे योगाची बरव । संतोषाची राणीव ।
ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥ ३७३ ॥
तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागें ।
देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥ ३७४ ॥
संकल्पप्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेद्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥
तरि तोचि योगु बापा । एके परि आहे सोपा ।
जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥ ३७५ ॥
हा विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे ।
तरी हियें घालूनि मुके । जीवितांसी ॥ ३७६ ॥
ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी ।
सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धी नांदे ॥ ३७७ ॥
शनैः शनैरुपरमेत् बुध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥ २५ ॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥
बुद्धी धैया होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।
हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥ ३७८ ॥
याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं ।
हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥ ३७९ ॥
आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला ।
जैसा कृतनिश्चयाचिया बोला । बाहेरा नोहे ॥ ३८० ॥
जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें ।
नाही तरी घालावें । मोकलुनी ॥ ३८१ ॥
मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल ।
ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे ययां ॥ ३८२ ॥
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम् ॥ २७ ॥
पाठीं केतुलेनि एके वेळी । तया स्थैर्याचेनि मेळें ।
आत्मस्वरुपाजवळें । येईल सहजें ॥ ३८३ ॥
तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल ।
आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥ ३८४ ॥
आकाशीं दिसे दुसरें । ते अभ्र जैं विरे ।
तै गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥ ३८५ ॥
तैसे चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।
ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥ ३८६ ॥
युञ्जन्नेवं सदात्मनं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं ।
संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥ ३८७ ॥
तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें ।
तेथ लवण जैसें जळातें । सांडु नेणे ॥ ३८८ ॥
तैसें होय तिये मेळीं । मग साम्यरसाचिया राऊळीं ।
महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥ ३८९ ॥
ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी ।
हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥ ३९० ॥
सर्वभूस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३० ॥
तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं ।
आणि तैसेंति माझ्या ठायीं । सकळ असे ॥ ३९१ ॥
हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें ।
बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥ ३९२ ॥
एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना ।
सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥ ३९३ ॥
भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें ।
केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥ ३९४ ॥
मग तो एक हा मियां । बोलता दिसतसे वायां ।
एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहें ॥ ३९५ ॥
दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझ्या ठायी तैसा । मी तयामाजीं ॥ ३९६ ॥
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि माने अवकाशु ।
तैसा माझेनि रुपें रुपसु । पुरुष तो गा ॥ ३९७ ॥
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी ।
देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥ ३९८ ॥
कां स्वरुपें तरी बहुतें आहाती । परि तैसी सोनीं बहुवें न होती ।
ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥ ३९९ ॥
ना तरी वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं ।
ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥ ४०० ॥
तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे ।
जो प्रतीतीचेनि पाडें । मजसी तुके ॥ ४०१ ॥
माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें ।
तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ॥ ४०२ ॥
आतां शरीरीं तरी आहे । परि शरीराचा तो नोहे ।
ऐसें बोलवरी होये । तें करु ये काइ ॥ ४०३ ॥
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२ ॥
म्हणोनि असो तें विशेषें । आपणपेयांसारिखें ।
जो चराचर देखे । अखंडित ॥ ४०४ ॥
सुखदुःखादि वर्मे । कां शुभाशुभे कर्में ।
दोनी ऐसी मनोधर्में । नेणेचि जो ॥ ४०५ ॥
जें समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व ।
तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥ ४०६ ॥
हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें ।
मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥ ४०७ ॥
तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती ।
परि आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥ ४०८ ॥
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।
ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥ ४०९ ॥
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।
जे साम्यापरौति जगीं प्राप्ति नाहीं ।। ४१० ।।
अर्जुन उवाच
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थित्तिं स्थिराम् ॥ ३३ ॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ३४ ॥
अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा ।
परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥ ४११ ॥
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें ।
एऱ्हवी राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥ ४१२ ॥
म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल ।
कां राहा म्हणितलिया राहेल । महावातु ॥ ४१३ ॥
जें बुध्दीतें सळी । निश्चयाते टाळी ।
धैर्येसी हातफळी । मिळऊनि जाय ॥ ४१४ ॥
जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।
बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥ ४१५ ॥
जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो ।
तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ॥ ४१६ ॥
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य होईल ।
हें विशेषेंही न घडेल । तयालागीं ॥ ४१७ ॥
श्रीभगवानुवाच – असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५ ॥
तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि ।
यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥ ४१८ ॥
परि वैराग्यचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरि केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥ ४१९ ॥
कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिले गोडीचिया ठाया सोके ।
म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥ ४२० ॥
असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६ ॥
एऱ्हवीं विरक्ती जयांसि नाही । जे अभ्यासीं न रिघती कहीं ।
तयां नाकळे हें आम्हीही । न मनू कायी ॥ ४२१ ॥
परी यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे ।
केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देऊनी ॥ ४२२ ॥
या जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं ।
तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगे ॥ ४२३ ॥
म्हणोनि मनाचा निग्रह होये । ऐसा उपाय जो आहे ।
तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥ ४२४ ॥
तरी योगसाधन जितुकें । कें अवघेचि काय लटिकें ।
परि आपणयां अभ्यास न ठाके । हेंचि म्हण ॥ ४२५ ॥
आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।
काय महदादि हें सकळ । आपु नोहे ॥ ४२६ ॥
तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके ।
साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥ ४२७ ॥
तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिया याची मातुही नेणों ।
म्हणोनि मनातें जी म्हणों । अनावर ॥ ४२८ ॥
हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा ।
योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥ ४२९ ॥
अर्जन उवाच-अयतिः श्रध्दयोपेतो योगात् चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिध्दि कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७ ॥
कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणः पथि ॥ ३८ ॥
एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्दते ॥ ३९ ॥
परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया ।
तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥ ४३० ॥
म्हणोनि सांगे गोविंदा । कवण एकु मोक्षपदा ।
झोंबत होता श्रध्दा । उपायेंविण ॥ ४३१ ॥
इद्रिंयग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटा लागला ।
आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥ ४३२ ॥
तंव आत्मसिद्धी न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि ।
ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥ ४३३ ॥
जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ ।
विपायें आलें केवळ । वसे ना वर्से ॥ ४३४ ॥
तैसी दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली ।
आणि अप्राप्तीही सांडवली । श्रध्दा तया ॥ ४३५ ॥
ऐसा वोलांतरला काजीं । जो श्रध्देचांचि समाजीं ।
बुडाला तया हो जी । कवण गति ॥ ४३६ ॥
श्रीभगवानुवाच-पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥ ४० ॥
तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था ।
तया मोक्षावांचुनि अन्यथा । गती आहे गा ॥ ४३७ ॥
परि एतुलेंचि एक घडे । जें माझारी विसवावें पडे ।
तेंही परि ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥ ४३८ ॥
एऱ्हवी अभ्यासाचा उचलतां । पाउलीं जरी चालतां ।
तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिध्दीतें ॥ ४३९ ॥
परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि ।
पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥ ४४० ॥
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥
ऐसें कवतिक हें कैसें । जें शतमखा लोक सायासें ।
ते तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥ ४४१ ॥
मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग ।
भोगितांही सांग । कांटाळे मन ॥ ४४२ ॥
हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता ।
ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥ ४४३ ॥
पाठीं जन्मे संसारी । परि सकळ धर्माचिया माहेरीं ।
लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥ ४४४ ॥
जयातें नीतिपंथे चालिजे । सत्यधूत बोलिजे ।
देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टी ॥ ४४५ ॥
वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु ।
सारासारविचारु । मंत्री जयाते ॥ ४४६ ॥
जयाचा कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता ।
जयातें गृहदेवता । आदि ऋध्दि ॥ ४४७ ॥
ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी ।
तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ॥ ४४८ ॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदिदृश्यम् ।। ४२ ॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री ।
महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥ ४४९ ॥
जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं ।
जे कूंजते कोकिल वनीं । संतोषाचां ॥ ४५० ॥
जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं ।
तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥ ४५१ ॥
मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे ।
सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥ ४५२ ॥
तैसी दशेची वाट न पहातां । वयसेचिया गांवा न येतां ।
बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥ ४५३ ॥
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे ।
मग सकळ शास्त्रे स्वयंभें । निघती मुखें ॥ ४५४ ॥
ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम ।
स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥ ४५५ ॥
अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे ।
ऐसें जन्म पार्था गा जे । तें तो पावे ॥ ४५६ ॥
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि ।
मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ॥ ४५७ ॥
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां ।
मग देखे जैसीं अवलीळा । पाताळधनें ॥ ४५८ ॥
तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।
तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धी तयाची ॥ ४५९ ॥
बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना ।
पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥ ४६० ॥
ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।
समाधी घर पुसे । मानसाचें ।। ४६१ ॥
जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय आरंभरंभेचा गौरवु ।
की वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रुपा आला ॥ ४६२ ॥
हा संसारु उमाणितें माप । का अष्टांगसामग्रीचें द्वीप ।
जैसे परिमळेंचि धरिजे रुप । चंदनाचें ॥ ४६३ ॥
तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धिभांडारीहूनि काढिला ।
दिसे तेणें मानें रुढला । साधकदशे ॥ ४६४ ॥
प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ४५ ॥
जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी ।
लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥ ४६५ ॥
म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें ।
मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥ ४६६ ॥
पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां ।
मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ॥ ४६७ ॥
तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचे पवनपण सरे ।
आपणपां आपण मुरे । आकाशही ॥ ४६८ ॥
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।
म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ॥ ४६९ ॥
ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळां गतींसी गती ।
तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ॥ ४७० ॥
तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं ।
म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥ ४७१ ॥
आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभिन्न ।
जैसे लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ॥ ४७२ ॥
तैसें विश्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये ।
तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥ ४७३ ॥
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥ ४६ ॥
जया लाभाचिया आशा । करुनि धैर्यबाहूंचा भंरवसा ।
घालीत षट्कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ ॥ ४७४ ॥
कां जिये एकी वस्तुलांगी । बाणोनि ज्ञानाची व्रजांगी ।
झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥ ४७५ ॥
अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा ।
झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥ ४७६ ॥
जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य ।
एवं जें पूज्य । सकळां सदा ॥ ४७७ ॥
तेंचि तो आपण । स्वयं जाहला निर्वाण ।
जें साधकांचें कारण । सिद्ध तत्व ॥ ४७८ ॥
म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु ।
तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥ ४७९ ॥
पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहले मनोधर्मा ।
तो शरीरीचि परि महिमा । ऐसी पावे ॥ ४८० ॥
म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।
योगी होई अंतःकरणें । पंडुकुमरा ॥ ४८१ ॥
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७ ॥
अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे ।
आणि सुखसर्वस्व माझें । चैतन्य तो ॥ ४८२ ॥
जया भजता भजन भजावें । हे भक्तिसाधन जें आघवें ।
ते मीचि जाहलों अनुभवें । अखंडीत ॥ ४८३ ॥
मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरुप बोली निर्वचे ।
ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥ ४८४ ॥
तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा ।
तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥ ४८५ ॥
ऐसे भक्तचकोरचंद्रें । त्रिभुवनैकनरेंद्रे ।
बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ॥ ४८६ ॥
तेथ आदिलापासोनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था ।
दुणावली हें यदुनाथा । पावों सरले ॥ ४८७ ॥
कीं सावियाचि मनीं तोषला । जे बोला आरिसा जोडला ।
तेणें हरिखें आतां उपलवला । निरुपील ॥ ४८८ ॥
तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसे उघडा ।
तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ॥ ४८९ ॥
जें सात्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें ।
सहजें निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ॥ ४९० ॥
वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृतीसी ॥ ४९१ ॥
ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरुंनी केलें कोडें ।
माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ॥ ४९२ ॥
म्हणऊनि येणे मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचचि लागे ।
हें असो सांगों श्रीरंगे । बोलिले जें ॥ ४९३ ॥
परी ते मनाचा कानी ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावें ।
हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ॥ ४९४ ॥
अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयाआंतौते ।
हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ॥ ४९५ ॥
हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती ।
सुखाची वाहविती । लाखोली जीवां ॥ ४९६ ॥
आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदे । नागर बोलिजेल विनोदें ।
तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥ ४९७ ॥

Explore More