The Guru

श्री गुरुस्तवन स्तोत्र

(Shree Gurustavan Stotra)

Also known as Shree Gurustavan Stotra Marathi · om namoji srigurunatha bhaktavatsala samartha

The Guru Stavana Stotra of Anandanath Maharaj, a Marathi praise of the guru as beyond quality and beyond stain, laying the head at his feet.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था ।
तव पदी ठेऊनि माथा । स्तवितो ताता तुजलागी ॥ १ ॥
तू नित्य निरंजन । तुज म्हणती निर्गुण ।
तूच जगाचे कारण । अहंभावे प्रगटलासि ॥ २ ॥
तुझी स्तुती करावया । शक्ति नसे हरिहर ब्रह्मया ।
परि अघटित तुझी माया । जी संशयभया निवारीत ॥ ३ ॥
मूळ मूळीचा आकारू । तुज म्हणती श्रीगुरू ।
सच्चित शक्तीचा आधारू । पुर्णाधारू ॐकारासी ॥ ४ ॥
ऐसा तू देवाधिदेव । हे विश्व तुझेचि लाघव ।
इच्छेचे वैभव । मूळब्रह्मी नटविले ॥ ५ ॥
ऐसा तू बा अपरंपारू । या अनंत ब्रह्माचा आधारू ।
चराचरीचा आकारू । पुर्णाधारू म्हणविले ॥ ६ ॥
ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती ।
तू जाणसि हे चित्ती । विश्वव्यापक म्हणवूनी ॥ ७ ॥
तरी देवा मतिदान । देणे तुझचि कारण ।
जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ॥ ८ ॥
अहा जी निर्गुणा । विश्वव्यापक सगुणा ।
सत्य निराकार निरंजना । भक्तांकारणे प्रगटलासी ॥ ९ ॥
रूप पहाता मनोहर । मूर्ति केवळ दिगंबर ।
कोटी मदन तेज निर्धार । ज्याच्या स्वरूपी नटले ॥ १० ॥
कर्ण कुंडलाकृती । वदन पाहता सुहास्य मूर्ति ।
भ्रुकुटी पहाता मना वेधती । भक्त भाविकांचे ॥ ११ ॥
भोवयांचा आकारू । जेथे भुले धनुर्धरु ।
ऐसे रूप निर्धारु । नाही नाही जगत्रयी ॥ १२ ॥
सरळ दंड जानु प्रमाण । आजानबाहु कर जाण ।
जो भक्तां वरद पूर्ण । ज्याचे स्मरणे भवनाश ॥ १३ ॥
ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्गुरू ।
मज दावुनि ब्रह्म चराचरू । बोलविला आधारू जगतासी ॥ १४ ॥
ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी ।
वेद श्वान होऊनी । सदा द्वारी तिष्ठती ॥ १५ ॥
तेथे मी लडिवाळ । खरे जाणिजे तुझे बाळ ।
म्हणवोनी पुरवि माझी आळ । माय कणवाळ म्हणविसी ॥ १६ ॥
मी अन्यायी नानापरी । कर्मे केली दुर्विचारी ।
ती क्षमा करोनि निर्धारी । मज तारी गुरुराया ॥ १७ ॥
मनाचिया वारे । जे उठवि पापांचे फवारे ।
तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवि फेरे भवाचे ॥ १८ ॥
कायिक वाचिक मानसिक । सर्व पापे झाली जी अनेक ।
ती क्षमा करुनी देख । मज तारी गुरुराया ॥ १९ ॥
माता उदरी तुम्ही तारिले । ते विस्मरण जिवासी पडिले ।
हे क्षमा करोनि वहिले । मज तारी गुरुराया ॥ २० ॥
पर उपकार विस्मरण । पापे केली अघटित कर्म ।
अहंभाव क्रोधा लागून । सदाचि गृही ठेवियले ॥ २१ ॥
हे क्षमा करोनि दातारा । मज तारावे लेकरा ।
तुजविण आसरा । नाही नाही जगत्रयी ॥ २२ ॥
मज न घडे नेम धर्म । न घडे उपासना कर्म ।
नाही अंतरी प्रेम । परी ब्रीदाकरण तारणे ॥ २३ ॥
नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही ।
ऐसे देती ग्वाही । संत सज्जन पुराणे ॥ २४ ॥
मागे बहुत तारिले । हे त्यांही अनुभविले ।
मज का अव्हेरिले । निष्ठुर केले मन किंनिमित्त ॥ २५ ॥
तू विश्वाकारु विश्वाधारू । त्वांचि रचिले चराचरू ।
तूचि बीज आधारू । व्यापक निर्धारु जगत्रयी ॥ २६ ॥
चार देहाच्या सूक्ष्मी । तूचि झुलविशी निज लगामी ।
हे ठेऊनी कारणी । अहंभाव तोडावया ॥ २७ ॥
जन्ममरणाच्या व्यापारी । जे भ्रमुनी पडले माया भरारी ।
ते सोडविशी जरी । निजनामे करुनिया ॥ २८ ॥
ऐसा तू अनादि आधारू । तुज म्हणती वेद्गुरू ।
परी हे व्यापुनी अंतरु । स्थिरचरी व्यापिले ॥ २९ ॥
भावभक्ती चोखट । करणे नेणे बिकट ।
नाम तुझे सुभट । तोडी घाट भवाचा ॥ ३० ॥
हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी ।
तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ॥ ३१ ॥
म्हणोनि मौन्यगती । तुज निजानंदी स्तविती ।
जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ॥ ३२ ॥
म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी ।
वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी जाणोनिया ॥ ३३ ॥
अहंभाव तुटोनि गेला । प्रेमभाव प्रगटला ।
देव तेथेचि राहिला । अनुभवशुद्धी खेळवी ॥ ३४ ॥
यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता ।
ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ॥ ३५ ॥
म्हणोनि सांगणे खूण । हा स्तव नित्य प्रेमे जाण ।
जो वाचील अनुप्रमाण । अकरा वेळा निर्धारे ॥ ३६ ॥
शुचिस्मित करूनि चित्ता । जो जपे प्रेमभरिता ।
पुरवि तयांच्या मनोरथा । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ३७ ॥
हे लघु स्तव स्तवन । तारक जगाच्या कारण ।
भक्तिभावे पूर्ण । चुके चुके भव फेरा ॥ ३८ ॥
जो हा स्तव करील पठण । त्या घरी आनंद प्रकटेल जाण ।
देवोनि भक्ता वरदान । तारक त्रिभुवनी करील ॥ ३९ ॥
हा स्तव नित्य वाचा । भाव धरुनि जीवाचा ।
फेरा चुकवा चौऱ्यांशीचा । गर्भवास पुन्हा नाही ॥ ४० ॥
हे जगा हितकारी । चुकवि चुकवि भ्रमफेरी ।
मृगजळ दाऊनि संसारी । मग तारी जीवाते ॥ ४१ ॥
हे आनंदनाथांची वाणी । जग तारक निशाणी ।
स्मरता झुलवी निरंजनी । योगी ध्यानी डुलविले ॥ ४२ ॥
ऐसा ऐकता गुरुस्तवन । जागे केले सच्चित गुरुकारण ।
केवळ तो हरि हर ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूर्ण ॥
गुरुहृदय भुवन व्यापिले ॥ ४३ ॥
तेणे होवुनि स्मरती । स्वये प्रगटली स्फूर्ती ।
नाभी नाभी आवरती । अवतार स्थिती बोलतो ॥ ४४ ॥
अयोनिसंभव अवतार । हिमालय उत्तरभागी निर्धार ।
होऊनी पूर्ण हंस दिगंबर । व्यापू चराचर निजलीले ॥ ४५ ॥
तेथून प्रगट भुवन । मग उद्धरु धरा जाण ।
धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे । ४६ ॥
ऐशी ध्वनी निर्धार । गर्जला गुरु दिगंबर ।
सर्व देवी केला नमस्कार । आनंद थोर प्रगटला ॥ ४७ ॥
शालिवाहन शके तिनशे चाळीस । शुद्धपक्ष पूर्ण चैत्र मास ।
अवतार घेतला द्वितीयेस । वटछायेसी दिगंबरु ॥ ४८ ॥
तै धरा आनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार ।
सेवा करीन निर्धार । पादकिंकरी होऊनिया ॥ ४९ ॥
ऐसी गर्जना प्रकट । आनंद बोधवी हितार्थ ।
गुह्य हे निजबोधार्थ । न बोलावे दांभिका ॥ ५० ॥
। श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ।

Explore More