Shree Swami Samarth

श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 4

(Shri Swami Samarth Saptashati Adhyay 4)

Also known as Swami Samarth Saptashati · Swami Samarth Saptashati adhyay 4 · Shri Swami Samarth Saptashati 4

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 4. The Shri Swami Samarth Saptashati, seven hundred verses on Shri Swami Samarth of Akkalkot, arranged for parayana. It is read through in ten adhyays, commonly across a week, by those who keep the Swami's worship.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 72
श्री गणेशाय नमः ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥
राहोनी अक्कलकोटात । असंख्य सिध्द निर्मित ।
ऐसा महिमा अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांचा ॥१॥
असता स्वामी मोगलाईत । एका मुलासी योग देत ।
आणि शिर्डीसी पाठवीत । योगसाधना करावया ॥२॥
तेची श्री साई समर्थ । म्हणूनी पाहा होती प्रसिध्द ।
श्री गुरु स्वामी समर्थ । ऐसा महिमा तयांचा ॥३॥
श्री स्वामी समर्थ । प्रज्ञापुरी राहो लागत ।
शिष्य आनंदनाथ । म्हणोनी होते तेथवरी ॥४॥
तयांसी म्हणती समर्थ । शिर्डीसी जावोनी पाहा म्हणत ।
गुप्त खुणा सांगत । योगमार्गींच्या तयालागी ॥५॥
शिर्डीसी जाती आनंदनाथ । प्रेमे साई त्यांसी भेटत ।
आपुल्या आसनी बैसवीत । करिती गोष्टी त्यांसवे ॥६॥
समर्थांचे सारे निरोप । साईंसी आनंदनाथ देत ।
आणि ग्रामस्थांसी सांगत । श्रोते तुम्ही अवधारा ॥७॥
श्री साईबाबा योगीपुरुष । देवाचे लेकरु असत ।
वसती तुमच्या गावात । भाग्य उदेले तुमचे हो ॥८॥
हा आहे हिरा प्रखर । तेजे दिपेल जगदांतर ।
तुम्ही सेवा सत्वर । ऐसे सांगती लोकांना ॥९॥
ऐसे ग्रामस्था सांगोन । आनंदनाथ करिती प्रयाण ।
ते साईबाबा भगवान । आज जाहले जगताचे ॥१०॥
ऐसे महासमर्थ । असती पहा स्वामी समर्थ ।
त्यांच्या लीला अद्‍भुत । कोणी कैशा वर्णाव्या ॥११॥
जगदोध्दारा कारण । केले सिध्द निर्माण ।
ऐसे अगाध महिमान । असे स्वामी समर्थांचे ॥१२॥
शेगावीचे गजानन । येती समर्थांसी शरण ।
योग शिकवा म्हणून । प्रार्थना करिती समर्थांची ॥१३॥
समर्थ म्हणती गणूप्रत । येथे गर्दी खूप असत ।
तू जाई देव मामलेदारांप्रत । शिकवील सारे तुजला तो ॥१४॥
ऐसे तया सांगती । काही योगक्रिया दाविती ।
आणि पाठवून देती । सटाण्यासी तेधवा ॥१५॥
देव मालेदार महासिध्द । गजानन आले तेथ ।
राहोनी त्यांच्य़ा सहवासात । शिकले योगसाधना ते ॥१६॥
तीन मास राहोनी तेथ । मग आले अक्कलकोटात ।
वंदूनी श्री स्वामी समर्थ । सेवा करीत राहिले ते ॥१७॥
स्वामी गजाननासी म्हणत । जावोनी राही शेगावात ।
नाव नाही गाव नसत । अवधूत होऊनी राही तू ॥१८॥
ते गजानन महाराज शेगावात । आज जाहले प्रसिध्द ।
स्वामी समर्थ लोकोध्दारार्थ । ऐसे निर्मिती सिध्द ते ॥१९॥
ऐसे स्वामी समर्थ । प्रज्ञापुरी होते राहत ।
अनेक सिध्द निर्मित । जगदोध्दारा कारणे ॥२०॥
श्रीकृष्ण सरस्वती सिध्द । कोल्हापुरी असती प्रसिध्द ।
गुरु त्यांचे स्वामी समर्थ । ऐका नवल ती कथा ॥२१॥
ते राहती कोल्हापुरात । परी अंतरी तळमळत ।
कैसा होईल मोक्ष प्राप्त । साफल्य होईल जन्माचे ॥२२॥
मंगळसुळीचा खंडोबा दैवत । ते त्यांचे कुलदैवत ।
त्याचे यात्रेसी जात । उपाशी राहती तेथे ते ॥२३॥
खंडोबा होऊनी प्रसन्न । त्यार्ते देई वरदान ।
म्हणे दत्तात्रेय भगवान । प्रज्ञापुरी पाहे तू ॥२४॥
त्यासी जाई शरण । ते करतील दया पूर्ण ।
श्री अवधूत निरंजन । होवोनिया राहसी तू ॥२५॥
असो श्रीकृष्ण सरस्वती । अक्कलकोटी येवोनी राहती ।
स्वामीकृपा करिती । सिध्दावस्था पावले ते ॥२६॥
ऐसे स्वामी समर्थ । राहती लीला करीत ।
जगदोध्दारार्थ श्री दत्त । प्रज्ञापुरी राहिला ॥२७॥
सय्यद नामे भक्त । येई स्वामी दर्शनार्थ ।
अक्कलकोटी येवोनी पुसत । ‘ अक्कलकोट स्वामी कहाँ है ’ ॥२८॥
क्रोधे स्वामी म्हणत । अक्कलकोटमे स्वामी असत ।
यहाँ क्या देखत । ऐसे म्हणती तयाला ॥२९॥
ऐसे म्हणता अकस्मात । समाधी त्यासी लागत ।
आठ तास समाधित । बुडोनिया राहे तो ॥३०॥
मैंदर्गीचा जमादार । अलिखान भक्त थोर ।
भेटविला त्यासी ईश्वर । सिध्द केले तयांना ॥३१॥
अनेक हिंदूंना सिध्द केले । पारशी ख्रिश्चनही आले ।
शरण स्वामी समर्थांना ॥३२॥
सिध्द निर्मिले अनेक । असंख्य निर्मिले साधक ।
अनेक केले मुक्त । कृपाप्रसादे करोनिया ॥३३॥
वेंगुर्ल्याचे आनंदनाथ । मुंबईचे स्वामीसुत ।
पुण्याचे जंगलीनाथ । ऐसे शिष्य समर्थांचे ॥३४॥
काळ्बुवा नामे पुण्यात ।होते एक सिध्द राहत ।
वेडयासारखे वागत । मारिती दगड लोकांना ॥३५॥
काही समर्थ भक्त । जाती त्यांचे दर्शनार्थ ।
त्यांसी बैसवोनी समीपत । सांगती गोष्टी समर्थांच्या ॥३६॥
म्हणती श्री स्वामी समर्थ । ते दत्तप्रभू साक्षात ।
मी त्यांचा सेवक असत । ऐसे म्हणती भक्तांना ॥३७॥
त्यांनी मला केले सिध्द । आणि पाठविले पुण्यात ।
लोक उपद्रव टाळण्याप्रत । वेडा होऊनी राहिलो ॥३८॥
शंकर महाराज प्रसिध्द । समाधी असे पुण्यात ।
तेही समर्थांचे शिष्य । कथा त्यांची अवधारा ॥३९॥
शिकारीस जाती अरण्यात । एका पाडसा पाहत ।
गोळ्या त्यावरी झाडत । परी ते पळोनी जात असे ॥४०॥
त्यासी शोधीत । थोडे आणखी पुढे जात ।
एका शिळेवरी दिसत । स्वामी समर्थ बसलेले ॥४१॥
मांडीवरी पाडस असत । पाहूनी शंकर क्रोध येत ।
म्हणे शिकार मजप्रत । द्यावी म्हणूनी सांगतसे ॥४२॥
त्यासी म्हणती समर्थ । ‘ का मारिसी जीवांप्रत ’ ।
‘ जरी तू नाही निर्मित ’ । ‘का मारिसी तयांना ’ ॥४३॥
शंकरासी क्रोध येत । झाडी गोळ्या बहुत ।
परी त्या आरपार जात । काही न होई समर्थांना ॥४४॥
पाहोनी हा चमत्कार । मनात भ्याला शंकर ।
हा नर नव्हे ईश्वर ।ऐसे म्हणे मनामाजी ॥४५॥
करी साष्टांग नमस्कार । म्हणे मी आपुला चाकर ।
आपण साक्षात ईश्वर । क्षमा करावी मजलागी ॥४६॥
हेची शंकर महाराज । म्हणूनी होती पुढे प्रसिध्द ।
एकशे चाळीस वय असत । समाधी घॆती तेव्हा ते ॥४७॥
ऐसा दत्त दिगंबर । लीलाविग्राही अवतार ।
त्यांच्या लीला समग्र । कोणी कैशा वर्णाव्या ॥४८॥
वामनबुवा दत्तभक्त । होते पुण्यामाजी राहत ।
अंतरी सदा तळमळत । सद्‍गुरु भेटी कारणे ॥४९॥
ऐसे असता तळमळत । एक तेजस्वी व्दिज येत ।
म्हणे ‘जा ’ अक्कलकोटात । दत्त तेथे राहिला ॥५०॥
ऐसे ब्राह्मण म्हणत । आणि तेथेची होई गुप्त ।
वामनबुवा चकित । होऊनी पाहा जातसे ॥५१॥
परी विश्वास न होत । कारण असे पंडित ।
बुध्दिवादी बहुत । विश्वास मनाचा होईना ॥५२॥
शेवटी करोनी मनोबळ । म्हणे पाहू एक वेळ ।
ब्राह्मणाच्या गुरुचे खेळ । जावोनी एकदा पाहावे ॥५३॥
ऐसा अविश्वास करोन । अक्कलकोटी येवोन ।
घेई समर्थ दर्शन । वामन पंडित तेधवा ॥५४॥
का रे चेष्टा केलीस । आमच्या ब्राह्मणावरी अविश्वास ।
ऐसे म्हणोनी वामनास । खूण दाविली स्वामींनी ॥५५॥
वामनबुवा नमस्कार करीत । म्हणे मी अज्ञानी असत ।
आज काल समाजात । दत्त कोठे दिसेना ॥५६॥
कोण सत्या काय असत्य । हे न काही कळोन येत ।
गावोगावी अनेक सिध्द । दीक्षा देण्या बैसले ॥५७॥
म्हणौनी थोडी थट्टा केली । परी ती अंगासी आली ।
आपण दत्तात्रेय माऊली । क्षमा करावी म्हणत असे ॥५८॥
मज दीक्षा द्या म्हणत । स्वामी म्हणती तयाप्रत ।
राही सेवा करीत । ब्रह्मनिष्ठा होशील तू ॥५९॥
समर्थांची सेवा करीत । वामन काही दिवस राहत ।
तेथून मग गाणगापुरात । जाई सेवा करावया ॥६०॥
गाणगापुरी जावोन । केले गुरुचरित्र पारायण ।
सप्ताह होता पूर्ण । दृष्टांत होई तयालागी ॥६१॥
दत्तात्रेय भगवान । रात्री स्वप्नी येवोन ।
सांगती वामना लागोन । श्रोते तुम्ही अवधारा ॥६२॥
स्वप्नी सांगती श्री दत्त । मीच आहे अक्कलकोटात ।
स्वामी समर्थ रुपात । भक्तोध्दारा आलो मी ॥६३॥
ऐसा दृष्टांत होत । वामन अक्कलकोटासी येत ।
म्हणे श्री स्वामी समर्थ । साक्षात दत्त असती हो ॥६४॥
ऐसे लोकां सांगत । राहती सेवा करीत ।
ब्रह्मनिष्ठा वामनबुवा होत । समर्थकृपे करोनिया ॥६५॥
ऐसा महिमा अपार । तो लीलेचा सागर ।
त्यातील काही लहर। येथे आपण पाहतसो ॥६६॥
सरस्वती सोनार । समर्थांचा कृपाकर ।
लाभता जाहली सत्वर । परहंस योगिनी ती ॥६७॥
स्वामी होता क्रोधित । सरस्वतीसी आणिती भक्त ।
स्वामी शांत त्वरित । तीसी पाहता होती ते ॥६८॥
नाना रेखी पंडित । त्रिकालज्ञानी असत ।
ते म्हणती स्वामी समर्थ । सहस्र वर्षांचे असती हो ॥६९॥
शके दहाशे एकाहत्तर । स्वामींचे जन्म संवत्सर ।
ऐसा अगाध अपार । महिमा स्वामी समर्थांचा ॥७०॥
॥ अध्याय चौथा ॥ ॥ ओवी संख्या ७०॥

Explore More