Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 23

(Purushottam Maas Katha Adhyay 23)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 23

Purushottam Maas Katha Adhyay 23. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 285
श्री गणेशाय नमः ॥
ऐका श्रोते संतसज्जन मलमहात्म पुण्याख्यान ॥
मागिले प्रसंगीचे निरूपण ॥ धरा आठवण मानसीं ॥ १ ॥
विप्रनंदाची भगिनी ॥ वेश्या गेलीसे घेऊनी ॥
ते वार्ता ऐकूनि कानीं ॥ बंधु शोकसदनीं पडियेला ॥ २ ॥
इतुका वृत्तांत मागें कथिला ॥ याउपरी पाहिजे ऐकिला ॥
अवधान दीजे श्रवणाला ॥ काय करिता जाला विप्रकुमर ॥ ३ ॥
शोक करितां तयातें ॥ नगरवासी सभोंवते ॥
समजावुनि तयातें ॥ गृह गेले आपुलिया ॥ ४ ॥
याउपरी तो विप्रकुमर ॥ नित्य सारीतसे गृहाचार ॥
तक्र विक्रय करून उदर ॥ निज हातें संपादितसे ॥ ५ ॥
तो येरीकडे नारायण ॥ यात्रा क्रमी वर्षे तीन ॥
म्हणे जावें माघारें परतोन ॥ लेंकुरें अज्ञान श्रीगुरूचीं ॥ ६ ॥
गुरुकन्या वेश्येने नेली जाणा ॥ हे वार्ता विदित नाहीं नारायणा ॥
परी अंतरसाक्ष जनार्दना ॥ फिरलें मन नारायणाचें ॥ ७ ॥
म्हणे गुरुगृहीं जावें आतां ॥ कवण तेथें सुखाची वार्ता ॥
हे तो सांगोन गेली देवता ॥ यक्षिणीदेवी पूर्वीच ॥ ८ ॥
एके तक्र विक्रय करावा ॥ एका जारत्वें निर्वाह व्हावा ॥
हा सौख्याचा तेथील ठेवा ॥ न देखवे देवा माझेनी ॥ ९ ॥
म्हणोन येत येत परतला ॥ पुनः मागुता तीर्था गेला ॥
वर्षे द्वादश क्रमिता झाला ॥ परी नाहीं मनाला स्थिरता ॥ १० ॥
कोमळ ह्रदय ब्राह्मणाचें ॥ वरी पुण्यवान शरीर त्याचें ॥
विशेष पुण्य गुरुसेवेचें ॥ म्हणोन नवनीताचें ह्रदय पैं ॥ ११ ॥
असो द्वादशवर्षा परतोनी ॥ नारायण पातला गुरुआश्रमस्थानीं ॥
येतां देखिला गुरुसुतें नयनीं ॥ परी त्याची वोळखी नीं न पुरें ॥ १२ ॥
मग नारायणें हास्य केलें ॥ म्हणे आम्ही तुवा वोळखिलें ॥
ऐसें वदतां तेचि वेळे ॥ पायीं ठेविलें मस्तक ॥ १३ ॥
आरडोनी पडिलासे गळा ॥ रडों लागला खळखळां ॥
म्हणे वनीं टाकुनी वत्सला ॥ आपण गेला यात्रेतें ॥ १४ ॥
म्हणे मज नाहीं माता पिता ॥ नाही बंधुभगिनी चुलता ॥
नाहीं कोणी पाळिता पोशिता ॥ अहा अनंता हें काय केलें ॥ १५ ॥
एक होती भगिनी मजलागुनी ॥ तेही वेश्येनें नेली चाळवूनी ॥
नेणों असे कवणे स्थानीं ॥ ते मजलागुनी ॥ विदित नसे ॥ १६ ॥
ऐसा साकल्य समाचार ऐकिला ॥ नारायण ह्रदयीं थकित झाला ॥
मग तयातें आश्वासिता झाला ॥ मधुरवचनें करूनीं ॥ १७ ॥
म्हणे बापा ऐक आतां ॥ होणार तें न चुके तत्वतां ॥
कोण टाळूं शके ब्रह्मलिखिता ॥ तयाची वार्ता अनुपम्य ॥ १८ ॥
ऐसें तयातें अश्वासुनी ॥ बैसता जाला निजआसनीं ॥
येरें मांडिलीसे साजणीं ॥ परवडी तया भोजनाची ॥ १९ ॥
गृहीं तो पदार्थ अनकूळ नाहीं ॥ म्हणोन कुसुमुसी ठायींचे ठायीं ॥
आहा देवा माझे दैवीं नाहीं ॥ आलिया समयीं अतिता ॥ २० ॥
हे नारायणें जाणितलें ॥ म्हणे बापा तुवां काय आरंभिलें ॥
माझे भोजन तंव असे जालें ॥ नाहीं उरली अपेक्षा कांहीं ॥ २१ ॥
मनीं विचारी नारायण ॥ रसविक्रयाचें न स्वीकारावें अन्न ॥
म्हणोनि मांडिलें निर्वाण ॥ वारिला जाण या हेतु ॥ २२ ॥
मग येरें गोदोहने केलें ॥ कांहीं उपहारातें सारिलें ॥
मग शयनातें आरंभिलें ॥ पाय चुरिलें तयातें ॥ २३ ॥
तंव नारायण विचारिता जाला ॥ म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय सांचिला ॥
तो सत्य निवेदीं मजला ॥ शंका या बोला न मानीं ॥ २४ ॥
येरू परमलज्जें करूनीं ॥ सांगता झाला तये क्षणीं ॥
म्हणे एकदशक रौप्य नाणें साचुनीं ॥ ठेविलें सदनीं आजवरी ॥ २५ ॥
या विरहित कांहीं नसे जाण ॥ पात्र तो मृन्मय भोजन ॥
वाहतों तव चरणाची आण ॥ सत्य जाण महाराजा ॥ २६ ॥
निर्मळ ह्रदयींचा पाहून ॥ चित्तीं द्रवला नारायण ॥
कांहीं उपाय करून ॥ लावावें साधन यालागीं ॥ २७ ॥
मग तयातें मधुर वचनीं ॥ बोलता जाला तत्क्षणीं ॥
म्हणे मी सांगेन जी करणी ॥ ते तूं निजमनीं धरसी कीं ॥ २८ ॥
येरू म्हणेजी तत्वतां ॥ असत्य न करीं वचनार्था ॥
सांगाल तें स्वीकारीन आतां ॥ नव्हे अन्यथा स्वामिया ॥ २९ ॥
मग श्लोकाधारें करून ॥ बोलता जाला वचन ॥
तोचि अवगत हों जाण ॥ तुम्हांलागून समस्ता ॥ ३० ॥
गोदाने नभवेल्लोको गवांलोम्नांहि संख्यया ॥
कल्पांतं ब्रह्मणोलोकः पापनाशप्रभावतः ॥ १ ॥
म्हणे या मलमासी निःशेष ॥ गोदान परम विशेष ॥
जे आचरती निर्दोष ॥ त्या पुण्यास पार नाहीं ॥ ३१ ॥
जितुके रोम धेनू आंगीं असती ॥ तितुके कल्प ब्रह्मलोकीं वस्ती ॥
समूळ होय पापाची शांति ॥ आचरे तयाप्रती हें पुण्य ॥ ३२ ॥
तरीं उदईक करून प्रातःस्नान ॥ ही धेनू करीं कृष्णार्पण ॥
वरी दक्षिणा संचित जें रौप्यनाणें ॥ करी अर्पण द्विजातें ॥ ३३ ॥
इतुकें वचन जरी मानिसी ॥ तरीं तूं अक्षयी सुखी राहासी ॥
येरु वदे त्या समयासी ॥ तथास्तु ऐसी अक्षरें ॥ ३४ ॥
परी विश्वास न वाटे नारायणा ॥ करील न करील गोदाना ॥
येवढीच तयातें उदरपोषणा ॥ म्हणोनि मना संशयो ॥ ३५ ॥
परी विप्रकुमर तो द्रवला ॥ आधींच होता तो त्रासला ॥
त्याहीवरी सद्‍गुरु भेटला ॥ उपदेश केला परमार्था ॥ ३६ ॥
मग भावार्था धरूनी सद्‍गुरुवचनी ॥ प्रातःकाळीं आला स्नान करूनीं ॥
एका विप्रातें बोलावूनीं ॥ गोपूजनीं अनुसरला ॥ ३७ ॥
दाना तें जो विप्र पाचारिला ॥ तो परम आश्चर्य मानिता झाला ॥
म्हणे आज काय आठवलें याला ॥ पुढें निर्वाहाला केविं होय ॥ ३८ ॥
असो आपणासीं काय कारण ॥ सांप्रत धेनु येतसे दान ॥
म्हणोन विधियुक्त संकल्प सांगून ॥ करी पूजन धेनूचें ॥ ३९ ॥
उपरि विप्रपूजा स्वयें करून ॥ ते धेनु असे दिधली दान ॥
मनीं भावार्थ गुरुवचनीं पूर्ण ॥ नसे जाण अन्य कांहीं ॥ ४० ॥
एका सद्भावावांचून कांहीं ॥ सद्‍गुरुची भेटी होणार नाहीं ॥
तयाविण सुटे न संदेहो ॥ जाणा सर्वही भाविकहो ॥ ४१ ॥
आधींच विप्रकुमर दरिद्री पाहीं ॥ मातापिता पाळिता दुजा नाहीं ॥
उदर निर्वाहाची धेनू तेही ॥ दिधली पाहीं दानाते ॥ ४२ ॥
एक दिनीचें भक्षावया अन्न ॥ तेंहीं किंचित गृहीं नसे जाण ॥
यापरी सर्वस्वें घडले दान ॥ तया विप्रकुमरा लागून ॥ ४३ ॥
ऐसें जालें ते दिवसी जाण ॥ परी प्राप्त झाला माध्यान ॥
विप्रकुमर तळमळें तेणें करून ॥ अन्न भक्षावया ॥ ४४ ॥
अंतरींच आपुल्या कुसमुसी ॥ कांहीच न बोले सद्‍गुरूसी ॥
ऐसें करितां अस्तमानासी ॥ संधी आपैसी होऊं आली ॥ ४५ ॥
तंव नारायणें काय केलें ॥ निवांत मनीं आसनीं बैसले ॥
स्नान संध्येतें मांडिलें ॥ आरंभिलें पूजानातें ॥ ४६ ॥
त्रैलोक्यनाथ चक्रपाणी ॥ उपोषित राहुं नेदीच कोणी ॥
कीटकपक्षी आदीकरूनी ॥ जो त्रिभुवनीं पाळीतसे ॥ ४७ ॥
तेथें विप्रकुमर क्षुधेनें पीडित ॥ हे तयातें न साहवेची मात ॥
तंव तो नारदमुनी अकस्मात् ॥ देखिलें तेथें कौतुकातें ॥ ४८ ॥
मग तैसाच त्वरे चालिला ॥ मुनी ब्रह्मलोकाप्रती आला ॥
सद्भावें नमस्कारिला पिता आपुला ॥ आणी समग्र निवेदिला वृत्तांतु ॥ ४९ ॥
म्हणे नवल देखिलें आजी स्वामि ॥ विप्रकुमराचीं अक्षरें लिहिली तुम्ही ॥
जे तक्रविक्रयें निर्वाह व्योमीं ॥ प्रतिदिनीं करावा ॥ ५०॥
ऐसें अक्षर स्वामीचें ॥ तें असत्य जालें साचे ॥
तयाने दान केले धेनूचे ॥ पुढे निर्वाहाचे कसे काय ॥ ५१ ॥
अस्ता होऊं आला दिनमान ॥ पुढे तयाची गती कवण ॥
असत्य जाले वचन ॥ ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया ॥ ५२ ॥
ऐकून नारदमुनीची वाणी ॥ चतुरानन दचकला मनीं ॥
निरखितां जाला जंव ध्यानीं ॥ तंव सत्यवाणी सर्वही ॥ ५३ ॥
म्हणे हे तो विपरीत जाले ॥ तयाते सर्वस्व दान घडले ॥
आतां उपायाते पाहिजे केले ॥ तरीच भले कर्म हे पैं ॥ ५४ ॥
येथे जे जे अर्पावे ॥ तया दशगुणी लागे पावावे ॥
हे जाणुनी ब्रह्मदेवे ॥ काय मांडिले विंदान ॥ ५५ ॥
सत्वर ब्राह्मण वेष नटला ॥ सवे दश गाईंचा मेळा ॥
घेऊन भूलोकीं आला ॥ त्वरे पावला विप्रसदन ॥ ५६ ॥
गाई उभ्या करून द्वारी ॥ विप्रकुमराते हाका मारी ॥
येरू पातला झडकरी ॥ सद्भावे नमस्कारी तयाते ॥ ५७ ॥
तंव चतुरानन बोले तयासी ॥ तुझियां पितरे आम्हापाशीं ॥
दश गौतम्या रक्षणासी ॥ ठेविल्या होत्या निर्धारे ॥ ५८ ॥
त्या तूं आपल्या अंगिकारीं आतां ॥ म्हणोनि जाला बोलता ॥
ऐसे वचन ऐकूनी तत्वतां ॥ येरू थांबा म्हणे तयाते ॥ ५९ ॥
मी आपुले गुरूसी पुसोन ॥ माघारा येतो परतुन ॥
ऐसे तयाते वदोन ॥ आला परतुन माघारा ॥ ६० ॥
मग गुरु बंधूतें म्हणे तेव्हां ॥ एक विप्र आलासे सदैवा ॥
तयानें आणिल्या दशधेनुवा ॥ अंगिकार मातें म्हणतसे ॥ ६१ ॥
म्हणे तुझिया बापें ठेविल्या पाहीं ॥ हे तो मातें विदित नाहीं ॥
काय उत्तर असे ते समयीं ॥ कृपा करून देई तयातें ॥ ६२ ॥
ऐसें ऐकून नारायण ॥ किंचित केलें हास्यवदन ॥
कळली अंतरीची खूण ॥ आला घेऊन विधाता ॥ ६३ ॥
येथें जैसे आपण द्यावें ॥ तया दशगुणी लागे पावावें ॥
म्हणोनियां ब्रह्मदेवें ॥ दशधेनू आणिल्या पैं ॥ ६४ ॥
मग तयातें आज्ञा देते अवसरीं ॥ धेनु आणिका गृहाभीतरी ॥
तया विप्रातें नमस्कारी ॥ जोडल्याकरीं सद्भावें ॥ ६५ ॥
येरें जाऊन तैसेंची केले ॥ धेनुका तें अंगिकारिले भले ॥
वरी रौप्य नाणें चांगले ॥ गणित भलें एकदशक ॥ ६६ ॥
ऐसें स्वीकारून ते वेळा ॥ नमस्कारूनि विप्र बोलाविला ॥
नारायणातें निवेदिता झाला ॥ वाडा भरला गोधनीं ॥ ६७ ॥
तंव तयाते वदे नारायण ॥ एक मोडीं आतां रौप्य नाणें ॥
धेनू लागीं घेऊन येई तृण ॥ आणि उदरा लागुनि तुझिया ॥ ६८ ॥
जे इच्छा असेल अंतरीं ॥ तेची तूं आजी स्वीकारी ॥
अर्ध नाणें तया माझारी ॥ असों दे पदरीं तुझीयां ॥ ६९ ॥
ऐसें आज्ञापितां तयातें ॥ येरू आज्ञा तैसीच वर्तत ॥
रौप्य नाणें नेऊन बाजारांत ॥ तृण आणित धेनुलागीं ॥ ७० ॥
मग गौ आणि आपली वासना ॥ तोची पदार्थ घेत आपणा ॥
अर्ध रौप्य नाणें समग्रहीं जाणा ॥ ठेविता झाला विप्रकुमार ॥ ७१ ॥
धेनुवेतें घालुनियां तृण ॥ स्वयें सारिलेंसे भोजन ॥
मग गुरुसेवेलागून ॥ तत्पर झाला यामिनीं ॥ ७२ ॥
तंव शिकवण देतसे नारायण ॥ म्हणे बापा ऎक एकवचन ॥
प्रातःकाळीं उठोन गंगास्नान ॥ येई करून झडकरी ॥ ७३ ॥
मग बोलावून विप्रमेळा ॥ दान देई धेनूसकळा ॥
स्वयें होई तूं तंव निराळा ॥ पाहिजे कशाला खटाटोप ॥ ७४ ॥
रौप्य नाणें तुझिया पदरीं ॥ गणती असे नऊद्वारीं ॥
एक अर्धरौप्य नाणें वरी ॥ असो साचारी जाणतां ॥ ७५ ॥
तरी दहा विप्र बोलावून ॥ दक्षिणे सहित देई गोदान ॥
झणी करिसी अनुमान ॥ वचना जाण माझिया ॥ ७६ ॥
ऐशी शिकवण देतां तयातें ॥ येरू अवश्य म्हणे त्यातें ॥
अमान्य स्वामी वचनातें ॥ न करीं जाण स्वामियां ॥ ७७ ॥
नंतर प्रातःकाळी उठोन ॥ करिता जाला गंगास्नान ॥
पाचारूनिया ब्राह्मण ॥ केलें संपूर्ण गोदान ॥ ७८ ॥
दान केसें सर्वही धन ॥ माध्यन्हिकातें नाहीं धान्य ॥
म्हणे हे भगवन् जनार्दन ॥ केवीं प्राक्तन माझें हें ॥ ७९ ॥
धन देखिलें नाहीं आजवरी ॥ तें चालत आलें निजमंदिरीं ॥
तेंहीं न राहावें कीं पदरीं ॥ जन्मवरी चुकेना ॥ ८० ॥
माझिये प्रारब्धीं हेंची पूर्ण ॥ तक्रविक्रयें उदरपोषण ॥
करावें परी तें धेनुही जाण ॥ दिधली दान गुरु आज्ञें ॥ ८१ ॥
ऐसा कुसमुसीं आपुले मनीं ॥ परी बोलून दाविना वदनीं ॥
तंव संधी प्राप्त जालीया वन्ही ॥ विप्रमनीं क्षुधित पैं ॥ ८२ ॥
तंव चित्रगुप्त वृत्तांतातें ॥ समूळ निवेदिलें ब्रह्मयातें ॥
काल दश धेनुवा दिधल्या ज्यातें ॥ त्यानें त्या द्विजातें अर्पिल्या ॥ ८३ ॥
समग्र धेनूचें केलें दान ॥ पदरीं नाहीं कांहीं अन्न ॥
तक्रविक्रय उदर पोषण ॥ करी उपोषण विप्रकुमार ॥ ८४ ॥
मग शत धेनूचा समुदावो ॥ घेऊन चालिला ब्रह्मदेवो ॥
द्वारदेशीं उभा राहून पहाहो ॥ पाहाता झाला विप्रकुमरा ॥ ८५ ॥
म्हणे महापुरुषा बाहेर येई ॥ हीं गोधनें सांभाळून घेई ॥
तुझिया बापाची हे ठेवी ॥ आजवरी पाहीं पाळिली मी ॥ ८६ ॥
ऐसी ऐकताची मात ॥ येरू आला धांवत धांवत ॥
पोटीं क्षुधानळ अति तप्त ॥ तों नयनीं देखता विप्ररावो ॥ ८७ ॥
देदीप्यमान सर्वशरीरीं ॥ भस्में चर्चित वस्त्र पाठारीं ॥
रुद्राक्ष माळां अतिसाजिरी ॥ कंठीं घाली परिपूर्ण ॥ ८८ ॥
सवें गोधनाचा कळप ॥ गणिता एक शत भरी माप ॥
मग परतला अति साक्षेप ॥ गुरुबंधु जवळिके ॥ ८९ ॥
सर्व वृत्तांत निवेदिला ॥ म्हणे द्वारीं एक विप्र असे आला ॥
सवें शत धेनूंचा मेळा सांभाळीं मजला म्हणतसे ॥ ९० ॥
विप्र परम दैदीप्यमान ॥ मुखीं बोलतसे वचन ॥
तुझिया वडिलांचीं हीं गोधनें ॥ वरी रौप्य नाणें शतवरी ॥ ९१ ॥
ऐसें तो वदतसे वचन ॥ सांगा आतां अज्ञाते कवण ॥
येरू बोलतसे हांसून ॥ सांभाळीं गोधन सर्वही ॥ ९२ ॥
गुरु आज्ञेनें तत्वता ॥ गोधनें जाला आणिता ॥
हातीं घेऊन द्रव्यशता ॥ पाहतां विप्र गुप्त झाला ॥ ९३ ॥
परी हें ब्राह्मण नेणें कांहीं ॥ हर्षयुक्त धेनु आणि सर्वही ॥
ही खूण नारायणातें ठावी ॥ इतरा काई अवगत ॥ ९४ ॥
मग गोधनें भरुनि गोठण ॥ घातलें तयालागीं तृण ॥
स्वयें भक्षी श्रेष्ठ अन्न ॥ आवडे पदार्थ तोची पैं ॥ ९५ ॥
ऐसी करूनी सारासारी ॥ मागुती गुरुसेवा अंगिकारी ॥
चरण चुरितां निर्धारी ॥ बोले ते अवसरीं नारायण ॥ ९६ ॥
म्हणे सख्या ऐक वचन ॥ गृहभरी दाटलें गोधन ॥
यासी सांभाळिसी कैसेन ॥ तरी सांगतों वचन तें ऐक ॥ ९७ ॥
एक धेनूतें पोसितां ॥ कंटाळा आलासे तत्वतां ॥
येथें शंभरांची वार्ता ॥ केवीं आतां घडूं शके ॥ ९८ ॥
तरी उदईक स्नान करूनी॥ पाचारी विप्रालागुनी ॥
संपूर्ण गोधनें दक्षिणादानीं ॥ विप्रा लागुनी अर्पावे ॥ ९९ ॥
संग्रहीं न ठेवीं एक अडका ॥ उतुकें कार्य आधीं करीं कां ॥
येरू तैसेंच करी देखा ॥ उठोनियां प्रातःकाळीं ॥ १०० ॥
स्नान सारिलें गंगाजळीं ॥ पाचारिली विप्रमंडळी ॥
समग्र गोधने एकच मेळीं ॥ पूजा केली गंधाक्षतें ॥ १ ॥
मग एक रौप्य गोधन ॥ अर्पिता झाला विप्रालागून ॥
ब्राह्मणाचे मनीं हर्ष पूर्ण ॥ नेता गोधनें बोलती ते ॥ २ ॥
म्हणे प्रतिदिनीं वांटितो गाई ॥ यासी तो एक दिनाचें भक्ष नाहीं ॥
ही तो दिसती अपूर्व नवाई ॥ किंवा शेषशायी तुष्टला ॥ ३ ॥
एक म्हणती कारण काय आपणातें ॥ आणू कोठून तरी परातें ॥
धेनू मिळाली एक आपणातें ॥ दक्षिणेसहीत निर्धारें ॥ ४ ॥
ऐसें बोलतां द्विजवर ॥ समस्त पातले निजमंदीर ॥
इकडे रडे विप्रकुमार ॥ होउनी स्थिर बैसलासे ॥ ५ ॥
म्हणे रात्रीं गृहभरी दाउनी ॥ वाडा भरलासे गोधनीं ॥
कैसी कर्माची काहणी ॥ न देखो नयनी पै एक ॥ ६ ॥
ऐसे म्हणोनि स्वस्थ बैसला ॥ तो दिनअस्त होऊं आला ॥
परी पाहूनिया कौतुकाला ॥ नारद गेला ब्रह्मलोका ॥ ७ ॥
नमुनियां चतुरानन निवेदिता जाला वर्तमान ॥
म्हणे आपण दिधलें गोधन ॥ ते दिधलें दान तयानें ॥ ८ ॥
तक्र विक्रयीं निर्वाहो ॥ ऐसा लिखिताचा भावो ॥
परी एकही धेनूतें न ठेवी हो ॥ पुढें निर्वाहो कैसेनी ॥ ९ ॥
होऊं आला अस्तमान ॥ उपोषित असे तो ब्राह्मण ॥
ऐकतां मुनिश्वराचें वचन ॥ हांस्य केलें कमळासनें॥ १० ॥
मागुती कमळासने उठोन ॥ सवें घेतलें सहस्र गोधन ॥
वरी सहस्र रौप्य नाणें घेऊन ॥ चतुरानन पातला ॥ ११ ॥
उभा राहून द्वारदेशी ॥ हांक मारी विप्रकुमरासी ॥
येरू धांवत आला वचनासरसी ॥ केला विप्रांसी नमस्कार ॥ १२ ॥
ब्रह्मा बोलतसे तेव्हां ॥ ह्या धेनू सांभाळी सदैवा ॥
वरी रौप्य नाणें ठेवा ॥ सहस्त्रवरी पैं असे ॥ १३ ॥
आतां तरी सांभाळीं समग्र पाहीं ॥ वदोन गुप्त जाला तेचि ठायीं ॥
देखतां चाकाटला निजह्रदयीं ॥ आला लवलाही भीतरी ॥ १४ ॥
समूळ वृत्तांत निवेदिला ॥ म्हणे सहस्र गोधनाचा मेळा ॥
घेऊनि रौप्य नाण्याला ॥ परी पाहतां गुप्त जाला नेणवे ॥ १५ ॥
ऐकून तोषला नारायण ॥ म्हणे लागलें हें साधन ॥
मग म्हणें तया लागून ॥ सांभाळीं कोण कळपा ॥ १६ ॥
तरी धेनूतें अर्पी तृण ॥ तूंही सारी कां भोजन॥
प्रातःकाळीं करूनियां स्नान ॥ आणी पाचारून विप्रातें ॥ १७ ॥
समस्त धेनु दक्षिणेसी ॥ दान देई कां ब्राह्मणासीं ॥
येरू हर्षयुक्त मानसीं ॥ तथास्तु ॥ वचनासीं बोलतसे ॥ १८ ॥
मग दुसरे दिनीं तैसाच प्रकार ॥ आचरता जाला विप्रकुमर ॥
पाचारुनियां धरामर ॥ धेनु समग्र वाटिल्या ॥ १९ ॥
दक्षिणेसहीत दिधलें दान ॥ नाहींसें केलें सहस्र नाणें ॥
न उरे दर्शना एकही जाण ॥ धेनु संपूर्ण निजगृहीं ॥ २०
ऐसें करितां तये वेळां ॥ वृत्तांत ब्रह्मयातें कळला ॥
म्हणे सहस्र गोधनें वांटिता जाला ॥ अहारे कपाळा हें काय ॥ 2१ ॥
आतां दहा सहस्र नेतां धेनु ॥ त्याही दान देईल ब्राह्मणु ॥
ऐसा प्रत्यही दशगुणित धेनु ॥ कोठुन आणु तयातें ॥ २२ ॥
तयातें आयुष्य शतभरी पूर्ण ॥ तो तंव प्रत्यहीं करील हेंचि कारण ॥
त्याचें रुचेल येथेंची मन ॥ तक्र विकून काय काज ॥ २३ ॥
कोण गुरु तयातें भेटला ॥ माझा मंत्र मज फळला ॥
उणें आणिलें ब्रह्माक्षराला ॥ हें तंव वेदाला विहित नसे ॥ २४ ॥
मग हंस विमान पाचारिलें ॥ तयातें निजमुखें निवेदिलें ॥
भूलोकी जाऊन ये वेळें ॥ घेऊन येई विप्रकुमारा ॥ २५ ॥
मग हंस विमान येऊन ॥ देदीप्यमान केला ब्रह्मनंदन ॥
येरे नारायणातें म्हणून ॥ म्हणे प्रसाद हा जाण पैं तुझा ॥ २६ ॥
पावन केलें गुरुराया ॥ निवारिली जन्म मरणाची छाया ॥
म्हणोन वारंवार लागे पायां ॥ भिती नाहीं भावार्था ॥ २७ ॥
स्तुति वादन करवेची जाण ॥ वाचेसीं पडिलें दृढ मौन ॥
न उगवतां त्रितीय दिन ॥ नेला उद्धरून ब्रह्मलोका ॥ २८ ॥
समग्रजन आश्चर्य करिती ॥ नारायणाचे चरणीं लागती ॥
धन्यधन्य श्रीगुरुमूर्ति ॥ यातायाती निवारिली ॥ २९ ॥
ऐसें हें गोदान प्रकरण ॥ विशद केलें श्रोतियां लागून ॥
न लागता त्रितीय दिन ॥ नेला उद्धरून विप्रकुमर ॥ ३० ॥
म्हणोनियां मळमासीं जाण ॥ अगत्य घडे गोपूजा वरदान ॥
त्याहीवरी संतसेवा पूर्ण ॥ न लागे आन साधन पैं ॥ ३१ ॥
श्रीगुरु चरणीं परम विश्वास ॥ तयाचा चुकें गर्भवास ॥
पुढती न लागेची सायास ॥ जन्मपंक्तीस भोगणें॥ ३२ ॥
प्रत्यय देखिया नयनीं ॥ विप्रकुमर गेला उद्धरोनीं ॥
अक्षई परब्रह्म भुवनीं ॥ नव्हे हानी कालत्रयीं ॥ ३३ ॥
म्हणोन प्रथम श्लोकाचा भावार्थ ॥ निवेदिला तुम्हां तें समस्त ॥
येथें धरूनियां शुद्ध भावार्थ ॥ आचरावें सतत व्रत हे ॥ ३४ ॥
गोदाने नभवेल्लोको गवांलोम्नांहि संख्यया ॥
कल्पांतं ब्रह्मणे लोकः पापनाशः प्रभावतः ॥ २ ॥
ऐसा हा प्रथम श्लोक भला ॥ त्यावरी कथाभाग वर्णिला ॥
जे आचरती गोदानाला ॥ तरी ब्रह्मलोकीं तयाला वास घडे ॥ ३५ ॥
जितुके रोम गौतमी वरी ॥ निवास तितुका कल्पवरी ॥
पापक्षाळण निर्धारी ॥ तात्काळीकें जाण पां ॥ ३६ ॥
विप्रकुमरें पुण्य केलें ॥ परी जन्मांतरीचें पाप गेलें ॥
तक्रविक्रयें ज्याचें खुंटलेलं ॥ गुरुसेवे फळलें भाग्य त्याणें ॥ ३७ ॥
म्हणोनियां भाविकजन ॥ सद्‍गुरूतें जावें अनन्य शरण ॥
गर्भवास चुके जेणें ॥ न लागे साधन आणिक कांहीं ॥ १३८ ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराण आणि स्कंद पुराणान्त ॥
संमत घेउन मनोहरसुत ॥ त्रयविंशतितमोऽध्याय संपूर्ण ॥ २३ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्या १३८ ॥ श्लोक २ ॥
॥ इति त्रयविंशंतितमोऽध्यायः ॥

Explore More