Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 21

(Purushottam Maas Katha Adhyay 21)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 21

Purushottam Maas Katha Adhyay 21. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 203
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जयजयाजी सद्‍गुरु उदारा ॥ करुणार्णवा कृपासागरा ॥
तुजवीण मज आसरा ॥ नसे दुसरा कृपाळुवा ॥ १ ॥
कृपाकटाक्षे निरखावें ॥ भक्तजन प्रतिपाळावें ॥
अर्भकापरी पुरवावे ॥ लळे माझे स्वामियां ॥ २ ॥
जी जी आळ घेतसे बाळक ॥ ते ते पिता पुरवीत देख ॥
तेवीं मी रंकानुरंक ॥ घ्यावी भाक महाराजा ॥ ३ ॥
ऐका श्रोतेजन चतुर ॥ मलमहिमा परिकर ॥
जो ऐकतां भव दुस्तर ॥ निरसें साचार अनायासें ॥ ४ ॥
सायास न करितां अनायासें ॥ सांपडे निधीचा सारांश ॥
कवडी देऊनि सांपडे परिस ॥ केवीं अव्हेरावा चतुरें ॥ ५ ॥
तैसेंचि हें मलमहात्म जाण ॥ लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण ॥
अगाध येथींचे पुण्याचरण ॥ करा साधन येवढें ॥ ६ ॥
श्रीरुवाच ॥ वदब्राह्मणसेवायाः फलं किं स्याद्दयानिधे ॥
तस्सेवयाकस्य पुनः संजातं सम्यगीहितं ॥ १ ॥
लक्ष्मी वदे जी कृपावंता ॥ मागें निवेदिली जे कथा ॥
ते आकर्णिली श्रवणपंथा ॥ परी संशय तत्वता निरसिजे ॥ ७ ॥
ब्राह्मणसेवा केलियाचें फळ ॥ अथवा दान केलिया पुष्कळ ॥
याचें कवण असे हो फळ ॥ करिता सफळ कवण जाले ॥ ८ ॥
हें सविस्तर निवेदावें ॥ कृपाळुत्वें परिसवावें ॥
जेवीं बाळकालागीं स्वभावें ॥ मुखीं घाली कवळातें ॥ ९ ॥
ऐकून लक्ष्मीची वाणी ॥ बोलता जाला शारंगपाणी ॥
म्हणे ऐके हो चतुर भामिनी ॥ परोपकारणीं बोल तुझे ॥ १० ॥
विष्णुरुवाच ॥ श्रुणुसुंदरी वक्ष्यामि द्विजसेवा महोदयं ॥
इतिहासं महापुण्यं दुःखदारिद्र्यनाशनं ॥ २ ॥
ऐके हो सागर तनये ॥ द्विजसेवा पुण्यमहोदये ॥
जे आचरलिया पापक्षय ॥ तात्काळ होय शुभानने ॥ ११ ॥
अस्तिदेशो विराटख्यो महाधनजनावृतः ॥
पुण्यवज्जनपुण्यात्मा पुण्यतीर्थशतावृतः ॥ ३ ॥
न दुर्भिक्षं कदाप्यस्मिन्कस्यचिद्‌पुण्ययोगतः ॥
राजवर्यस्य देवस्य वरदानप्रभावतः ॥ ४ ॥
विराट देशाचिये ठायीं ॥ एक आश्चर्य वर्तलें पाही ॥
तें परिसवूं सर्वही ॥ श्रवण करीं एकभावें ॥ १२ ॥
हें सकळ श्रवण केलियाचें फळ ॥ दुःख नासुनि जाय सकळ ॥
तरी देशी एक नगर विशाळ माहुरनाम तयाचे ॥ १३ ॥
तेथील जन समस्त पाही ॥ स्वधर्माचारी सर्वही ॥
धनवान पुत्र कलत्र पाहीं ॥ व्याधी नाहीं तिळभरी ॥ १४ ॥
दुःख दरिद्र रोग चिंता ॥ नसे कोठें तयासीं वार्ता ॥
रिक्त हस्ते न दवडिती अतीथा ॥ कथावार्ता घरोघरी ॥ १५ ॥
तेथील देवी परम दारुण ॥ रेणुका तीते नामाभिधान ॥
परशुराम जननीपूर्ण ॥ ख्याती जाण त्रिभुवनीं ॥ १६ ॥
ते जमदग्नीची भार्या पाहीं ॥ जगत्रयीं पूजिती सर्वही ॥
कामना पुरवितसे तेही ॥ भक्तजनाची आदरें ॥ १७ ॥
अनसूयामाजी महासती ॥ तें स्थानीं वसे पुण्यमूर्ती ॥
जियेची कीर्ती वाखाणिती ॥ पुराणें गाती अद्‍भुत ॥ १८ ॥
तेथें वसती ऋषी समुदावो ॥ जे पापा वेगळे महानुभावो ॥
केवळ अपरसूर्य पाहो ॥ वसती ते ठायी सकलही ॥ १९ ॥
तंव तेथील शूद्र असे एक ॥ साधु परम भावार्थी निष्कपट देख ॥
धनवान परम धार्मिक ॥ विप्रसेवनीं देख सादरु ॥ २० ॥
प्रतिदिनी विप्रसेवा करी ॥ भावार्थे तयाचे चरण चुरी ॥
पादप्रक्षाळपणातें उष्ण वारी ॥ स्वकरें आणून ठेवीत ॥ २१ ॥
स्वकरें चर्ची चंदनातें ॥ आंग मर्दितसे भावार्थे ॥
पुष्पमाळा गुंफोनि हाते ॥ सुवासयुक्त घालीतसे ॥ २२ ॥
शय्यावस्त्रे अलंकार ॥ देऊन तोषवी धरामर ॥
कोणी आलिया दारासमोर ॥ रिक्त हस्तें दवडीना ॥ २३ ॥
आवडे तया तेंची भोजन ॥ षड्रस घृतासहित अन्न ॥
इच्छित पदार्थ पुरवी आणून ॥ परी कदा उद्दिग्न नोहेची ॥ २४ ॥
अतिथ आलिया द्वारीं ॥ श्वानापरी गुरगुरी ॥
भार्याही वर्ते तयाचि परी ॥ म्हणती लंडभिकारी केवढा हा ॥ २५ ॥
पाठ पुरविली मागणारी ॥ उसंत नाही क्षणभरी ॥
नित्यानित्य कोठून वारी ॥ घालावीं साचार तयातें ॥ २६ ॥
ऐसा तो नसेची शूद्र रावो ॥ धन पाळना मत याचें पाहाहो ॥
नांवासारखी करणी पाहावो ॥ नित्यानित्य आचरे ॥ २७ ॥
भार्या तयाची पतिव्रता ॥ एकोमय वर्तती उभयतां ॥
नुलंघी कधी पतिवचनार्था धर्मपंथातेही वर्ततसे ॥ २८ ॥
तेही स्वअंगें नित्यानित्य ॥ विप्र स्त्रियांची सेवा करित ॥
जे मागती प्रियवस्तू ती पुरवीत ॥ नाहीं न म्हणत कदापिही ॥ २९ ॥
ऐसीं दंपत्यें उभयतां ॥ विप्रकाजीं धन वेचितां ॥
वाचें नाणितीच सर्वथा ॥ अगर्विता दोघेही ॥ ३० ॥
सेवाकरितां दोघेंही ॥ खेद न मानितीच कांहीं ॥
उल्हासयुक्त सदांसर्वदांही ॥ गर्व नाहीं तिळभरी ॥ ३१ ॥
पदरीं असलिया धन ॥ जो अगर्वित सुखसंपन्न ॥
तो ईश्वरी अंश जाण ॥ म्हणती सज्ञान विवेकी ॥ ३२ ॥
विद्या असोन विनयता ॥ धन असूनि लीनता ॥
शक्ति असूनी गर्वरहितता ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३३ ॥
धन किती वेंचिले धर्मकार्या ॥ हें स्मरणची नाहीं तया ॥
सदां करी शास्त्रचर्चा ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३४ ॥
केलें सुकृत बोले वाचें ॥ भय मानिलें लोकनिंदेचें ॥
उणें बोले दुर्जनाचें ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३५ ॥
परोपकारीं लावी वयसा ॥ धर्मकारणीं वेचितसे पैसा ॥
संसार करी वैराग्यें ऐसा ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३६ ॥
परस्त्री देखतां अंधनयनीं ॥ परनिंदा बोलतां मुका वदनीं ॥
आत्मस्तुती ऐकतां बधीर कर्णी ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३७ ॥
गेलियाचा नाहीं खेद ॥ प्राप्त जाहलिया नाहीं आनंद ॥
झगटें नेदीं अष्टमद ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३८ ॥
ऐसिये चिन्हीं तो वर्तता ॥ शूद्र आणि त्याची कांता ॥
सन्मार्गे वर्तती उभयतां ॥ पुण्यवार्ता पूर्वीची ॥ ३९ ॥
तंव तेथें एक विपरीत ॥ वर्तलें श्रवण करीं यथार्थ ॥
शूद्राचे देहीं कुष्ट भरत ॥ अकस्मात दैवयोग ॥ ४० ॥
रक्त पू गळे रात्रंदिवस ॥ उदास झाले मानस ॥
म्हणे आचरतां स्वधर्मास ॥ केवी नाश शरीरीं ॥ ४१ ॥
आतां विप्रसेवा कैची मज ॥ क्षीणता प्राप्त जाली सहज ॥
जगीं जाली थोर काज ॥ कवण काज वांचलिया ॥ ४२ ॥
नेणों कवण पापाचा ठेवा ॥ आतां मरण दे गा देवा ॥
ऐसा उदास जाला जिवा ॥ परी आयुष्य ठेवा सरेना ॥ ४३ ॥
कैची सेवा तया विप्राची ॥ व्यथा अधिकाधिक त्याची ॥
तंव भार्या सगुण तयाची ॥ सत्य साची पतिव्रता ॥ ४४ ॥
एकदां प्रार्थी भ्रतारास ॥ म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस ॥
अधिक जाली तेणें मानस ॥ खेदरूप जाण सर्वदा ॥ ४५ ॥
तरी आतां प्राप्त झाला मलमास ॥ समग्र जाती तीर्थस्नानास ॥
तुम्हीं तों चित्तीं उदास ॥ सोडा आस प्रपंचाची ॥ ४६ ॥
धन्य तेची पतिव्रता ॥ उपदेशितसे तो भर्ता ॥
लावी मोक्षाचिया पंथा ॥ देह अवस्था जाणोनी ॥ ४७ ॥
नाहीं तरी इतर ज्या कांता ॥ रडती आपुल्या सुखस्वार्था ॥
म्हणती तुम्हीं मेलिया सर्वथा ॥ आमुची अवस्था केवी होय ॥ ४८ ॥
लेंकरेंबाळें धाकुटीं सकळ ॥ कोण करील यांचा प्रतिपाळ ॥
अहो देवा वोखटी वेळ ॥ फुटकें कपाळ आमुचें ॥ ४९ ॥
ऐसें म्हणूनी सकळ रडती ॥ परी तयाची न जाणती गति ॥
जिता द्रव्या नाश करिती ॥ मेल्या रडती सुख स्वार्था ॥ ५० ॥
हा तो अनुभव सकळांमागे ॥ अंती एकलें जाणे लागे ॥
कोणी न येती कोणा मागें ॥ प्रचीत आंगें पाहावीं ॥ ५१ ॥
तयाचें सार्थक करितां ॥ धन नवे चित्तीं सर्वथा ॥
म्हणती हे सरलिया आतां ॥ लेकुरें केउता जगती हे ॥ ५२ ॥
जन्मवरी जें धन सांचलें ॥ ते धर्मकाजीं नाहीं लविलें ॥
शेवटीही कामा नाहीं आलें ॥ सार्थकावीण गेले प्राणी ते ॥ ५३ ॥
सार्थकावीण प्राणियासि ॥ सुटका नाहीं मृत्युपुरीसी ॥
हें न जाणून मानसीं ॥ शेवटीं कासाविसी होताती ॥ ५४ ॥
यालागीं चतुर जे ज्ञानी ॥ सार्थकाविण वय न घालावें कोणी ॥
एका चक्रपाणीवांचुनी ॥ सोडविता नसे सर्वथा ॥ ५५ ॥
म्हणाल द्रव्याविण सार्थक न घडे ॥ तरीं शरीर झिजवावें रोकडें ॥
यासी तो नाहीं अवघड ॥ नामस्मरण घडे जिव्हेसीं ॥ ५६ ॥
नामस्मरणातें उसंत नाहीं ॥ रिकामीं बडबड सर्वांठायीं ॥
पुराणीं जातां अवसर नाहीं ॥ रिकामा ठाईं अनुसरत ॥ ५७ ॥
ऐसे जे व्यर्थ घालिती वय ॥ तयातें केउता तरुणोपाय ॥
कांहीं तरीं धरीं सोय ॥ आतां तूं या कर्माची ॥ ५८ ॥
दुर्लभ नरदेह लाधला ॥ बहुतां सुकृतें प्राप्त जाला ॥
तो कवडीचे बदला नाहीं आला ॥ घात केला आपुला आपण ॥ ५९ ॥
असो हा पाल्हाळ बहुसाळ ॥ श्रोते म्हणती उठलें कपाळ ॥
कथा टाकूनि पाल्हाळ ॥ व्यर्थ लाविला कवीनें ॥ ६० ॥
दृष्टांतीं बोलणें लागे ॥ म्हणोनि न याहो रागें ॥
कथा राहिली जी मागें ॥ परिसा आंगें सर्वही ॥ ६१ ॥
इतर स्त्रिया परियेसी ॥ ते शूद्र वनिता नव्हे तैसी ॥
उपदेशितसे भ्रतारासी ॥ जावें तीर्थासी म्हणोनी ॥ ६२॥
तयासीं मानलें उत्तर ॥ बुद्धीतव कर्मानुसार ॥
पूर्व सुकृत घडले साचार ॥ उभें ठाकलें येऊनी ॥ ६३ ॥
आजवरी विप्रसेवा केली ॥ तेची आतां कामा आली ॥
वासना तयाची फिरली ॥ वृत्ती मुरडली सुखस्वार्था ॥ ६४ ॥
यालागीं पहिलेंचि असावें दृढपण ॥ वेळेची कामा न पडे आठवण ॥
म्हणोनी नित्यानित्य मन ॥ व्हावें अनन्य भगवंतीं ॥ ६५ ॥
तंव तो शूद्र काय करिता जाला ॥ आकर्णोनि कांतेच्या बोला ॥
धनाचा संचय होता केला ॥ तो यथा भागें विभागिता जाला ॥ ६६ ॥
एक भाग कांतेंलागिं देत ॥ दो भाग स्वपुत्रातें देत ॥
एक आपणा पैं ठेवित ॥ तीर्थयात्रा निमित्य धर्मातें ॥ ६७ ॥
ऐसा सकळ धनाचा व्यय केला ॥ मग परिवारेंसीं निघतां जाला ॥
समागमें विप्रांचा मेळा ॥ सवें चालिला अपार ॥ ६८ ॥
मार्गी जातां सकळांचा ॥ सेवका हातीं समाचार त्यांचा ॥
घेतसे पदार्थांनी साचा ॥ करि स्वधनाचा व्यय पैं ॥ ६९ ॥
ऐसें करितां तयातें ॥ प्राप्त जाले गौतमी तें ॥
वास्तव्य केलें तेथें ॥ मास परियंत ते ठायीं ॥ ७० ॥
तंव तो पुरुषोत्तम मास ॥ सकळ जाणूनी जन जाती स्नानास ॥
आपणही उठत बैसत जातसे ॥ सर्वांमागे स्नानासीं ॥ ७१ ॥
आधींच गौतमी पवित्रता ॥ वरी मलमास प्राप्त होतां ॥
तें पुण्य न भूतो न भविष्यता ॥ वरी प्राप्तता सत्संग ॥ ७२ ॥
एक गंगाबिंदु झगटतां शरीरीं ॥ तात्काळ होय पापाची बोहरी ॥
संत ब्राह्मण सेवा तयावरी ॥ हे तो अधिकाधिक होय पैं ॥ ७३ ॥
एतत्तालतमालसलसरलव्यालोलवल्लीलता ॥
छन्नं सूरकरप्रतापरहितं शंखेंदु कुंदोज्वलं ॥ ५ ॥
गंधर्वामर सिद्धकिन्नरवधूतुंगस्तनस्फालितं ॥
स्नानाय प्रतिवासरं भवतु मे गांगं जलं निर्मलं ॥ ६ ॥
ऐसा शूद्र स्नान करितसे ॥ वरी ब्राह्मणांचे चरणतीर्थ प्राशीतसे ॥
तेंची स्वयें शरीरा लावितसे ॥ तें तीर्थ गंगोदकेंसी ॥ ७४ ॥
ऐसा नेम एक मासवरी पूर्ण ॥ आचरला तो शूद्र जाण ॥
तंव नवल जालें तेच क्षण ॥ मासगणना संपूर्ण होतां ॥ ७५ ॥
तयाचा कुष्ट जाऊनि पाहे ॥ शरीरीं जाला दिव्य देहे ॥
मना चोज मानिताहे ॥ म्हणे नवल काय हें जालें ॥ ७६ ॥
या व्याधीमुळे बहुत ॥ द्रव्य वेंचलें अपरिमित ॥
परी व्याधी नव्हे शांत ॥ तो स्नानेंच निःपात जाहला ॥ ७७ ॥
चमत्कार पाहोनि अद्‍भुत ॥ मग तेथेंच बैसला हेत ॥
मग हर्षभरित होऊन तेथे ॥ उद्यापनातें करितसे ॥ ७८ ॥
ब्राह्मण संतर्पण यथाविधीं ॥ घृतपाचित अन्नें संपादी ॥
नानास्नानदानाचा विधी ॥ विप्रा करीं अर्पितसे ॥ ७९ ॥
त्रैत्रीणिदशक ॥ अपूप करून घृतपाक ॥
ते कांस्यपात्री निक्षेपून देख ॥ वायन देत विप्रातें ॥ ८० ॥
सआज्येंसी तें तंव वाण ॥ वरी शक्तिनुसार घालुनि सुवर्ण ॥
दक्षिणेसहित देतसे दान ॥ भावें जनार्दन स्मरोनी ॥ ८१ ॥
ऐसें उद्यापन करूनिया ॥ उल्हासेसी राहिला त्याच ठायां ॥
नित्य स्मरोनि केशवराया ॥ स्नान सारी गंगोदकीं ॥ ८२ ॥
समूळ पाप लेश झडला ॥ आणि कुष्टही समूळ गेला ॥
तंव तो समीप काळ पातला ॥ विप्र देखतां तयातें ॥ ८३ ॥
ते विष्णुदूत येऊनि ॥ तात्काळ वाहिला विमानीं ॥
ऐसी स्नानाची अगाध करणी ॥ पावला निर्वाणीं मोक्षातें ॥ ८४ ॥
कोटि पापाचा क्षय करूनीं ॥ काया कष्टविली तीर्थसेवनीं ॥
ऐसें पुण्य आचरोनी ॥ पावला निर्वाणीं मोक्षातें ॥ ८५ ॥
आधीं अर्पावें मग पावावें ॥ जैसें द्यावें तैसें घ्यावें ॥
शरीरीं कष्ट भोगावे ॥ मग पावावें सुखातें ॥ ८६ ॥
जैसें वेव्हारी देता धन ॥ अथवा सवाईसी धान्य ॥
तें व्याजासहित येत परतून ॥ तेवी जाण हे गोष्टी ॥ ८७ ॥
भक्तिभावें अर्पितां आडका ॥ मी कदां न घेई फुका ॥
वश्य जालो भावा एका ॥ स्वपदीं निका नेईं तयातें ॥ ८८ ॥
ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ तो लक्ष्मीनें आकर्णिला ॥
तोचि तुम्हां श्रोतियांतें कथिला ॥ प्राकृत भाषेकरूनी ॥ ८९ ॥
आतां पुढें लक्ष्मी करील प्रश्न ॥ त्याचें उत्तर देईल जनार्दन ॥
तें परिसा श्रोतेजन ॥ अति आदरें करूनिया ॥ ९० ॥
श्रोता असलिया सादर ॥ तरी वक्‍तृत्वा हर्षनिर्भर ॥
म्हणोनि जोडूनियां कर ॥ वारंवार प्रार्थितो ॥ ९१ ॥
जैसे वृक्षमुळी घालितां उदक ॥ मग तो फोफावे अधिकाधिक ॥
तैसा श्रोतियां असलिया नेटक ॥ फोंफावें देखवाग्वल्ली ॥ ९२ ॥
इति स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ एकविंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २१ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्याः ९२ ॥ श्लोकः ६ ॥
॥ इति एकविंशतितमोऽध्यायः ॥

Explore More