Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 25

(Purushottam Maas Katha Adhyay 25)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 25

Purushottam Maas Katha Adhyay 25. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 155
श्री गणेशाय नमः ॥
ऐका भाविकजन सकळ ॥ मलमहात्म अतिरसाळ ॥
श्रवण केलिया तात्काळ ॥ झडे कलिमल निजनिष्ठें ॥ १ ॥
साक्षात लक्ष्मी नारायण ॥ तयाचा संवाद जाण ॥
येर लापनिका नव्हे जाण ॥ करा श्रवण भावार्थ ॥ २ ॥
विष्णुरुवाच ॥ श्रुणु सुश्रोणि वक्ष्यामि फलं यन्मलमासजं ॥
सर्वदा सर्व दानोत्थं फलं प्राप्नोति मानवः ॥ १ ॥
सर्वव्रताधिकोमासः सर्वदानाधिकोमतः ॥
सर्वेषामेवमासानमयमेवाधिकोमतः ॥ २ ॥
स्नानं दानं जपो होमः ॥ स्वाध्यायो हरितोषणं ॥
मलिम्लुचे प्रकर्तव्यमनंतं फलमाप्नुयात् ॥ ३ ॥
स्नानेनाथ व्रतेनाथ दीपदाने नवापुनः॥
पूजनेन तु विप्रस्य तथा गोपूजनेनच ॥ ४ ॥
शुष्कार्द पातक घोरं पापसंघात्समुद्भवं ॥
संप्राप्ते मलमासेतु तत्सर्वयाति भस्मसात् ॥ ५ ॥
श्रीविष्णु साक्षात आपण ॥ लक्ष्मी ते म्हणे ऐक वचन ॥
मलमास परम पावन् ॥ करीं श्रवण शुभानने ॥ ३ ॥
सकळ तीर्थामाजी प्रयाग पूर्ण ॥ किंवा शस्त्रामाजी सुदर्शन ॥
वेदामाजी सामवेद जाण ॥ श्रेष्ठपण तयाते ॥ ४ ॥
व्रतामाजी एकादशी ॥ सप्तपुरीमाजी काशी ॥
उत्तम स्नान गंगेसी ॥ भागिरथीसी जेवी घडे ॥ ५ ॥
पुराणामाजी श्रीभागवत ॥ अर्थामाजी भगवद्गीतार्थ ॥
शास्त्रामाजी वेदांत निश्चित ॥ मासांत मलमास हा ॥ ६ ॥
यामाजी उत्तमोत्तम प्रकारीं ॥ संपूर्ण दानातें जो अंगीकारी ॥
सदा सर्वदा मनोच्छाव स्विकारीं ॥ तरीं जन्मफेरी निवारे ॥ ७ ॥
स्नान दान होम जप ॥ स्वाध्याय ऐसें जें तप ॥
मलमासीं करितां अमुप ॥ तरीं नासे पाप तयाचें ॥ ८ ॥
दीपदानादि विप्रसेवन ॥ भावें कीजे ब्राह्मण संतर्पण ॥
दानवस्तु कीजे दान ॥ तरीं पावे सदन तो माझे ॥ ९ ॥
तयाचे शुष्क अथवा घोर ॥ पातकाचा मी न करीं विचार ॥
भस्म करीं मी समग्र सत्वर ॥ नाहीं उशीर मजलागीं ॥ १० ॥
ऐसें वचन नारायणाचें ॥ आकर्णूनी लक्ष्मी वदे साचें ॥
स्वामिया महिमान याचें ॥ अधिकाधिक ऐकिलें ॥ ११ ॥
लक्ष्मीरुवाच ॥
हे स्वामी जनार्दन सर्वेश ॥ यथाशक्ति आचेरे जो दानास ॥
तरीं इतुकें पुण्य प्राप्त होय त्यास ॥ नवल वचनास वाटतसे ॥ १२ ॥
तरीं स्वाभाविक कवणाला ॥ शक्तिनुसार दानधर्म घडला ॥
कोण पावन कोण उद्धरला ॥ पाहिजे कथिला वृत्तांतु ॥ १३ ॥
ऐकूनि ऐसे उत्तर ॥ बोलता झाला सर्वेश्वर ॥
म्हणे कथानक परिकर ॥ श्रवण करीं शुभानने ॥ १४ ॥
ऐक कमळलक्षणे वरदे ॥ पुरातन इतिहास शुभदे ॥
अरुंधती आणि पार्वती संवादे ॥ सुखप्रद श्रवण करी ॥ १५ ॥
एकदा कैलासाप्रती ॥ जाती जाली अरुंधती सती ॥
नमोनियां पार्वती प्रती ॥ अनुवादा संतोषे ॥ १६ ॥
तंव तो मलमासाचा दिवस ॥ प्राप्त होतां त्या समयास ॥
अरुंधती वदे देवीस ॥ ऐक वचनास माझियां ॥ १७ ॥
तूं तंव जगत्रय जननी ॥ साक्षात आदि भवानी ॥
सदा वससी सन्निधानीं ॥ खट्‍वांगपाणी वश्य केला ॥ १८ ॥
कवण पुण्याचिया कोटी ॥ पूर्वि आचरलीस गोमटी ॥
ते मज निवेदी हातवटी ॥ बोलतां होटीं लाजे मी ॥ १९ ॥
मी तंव ऋषि भार्या सत्य ॥ तुजलागीं सर्व असावें श्रुत ॥
परि नेणतपणे असे पुसत ॥ न यावें कोपाते मजलागीं ॥ २० ॥
मासपक्ष वर्षे दिन ॥ कोठे नव्हे तुझे आगमन ॥
टाकूनियां कैलास भुवन ॥ कोठे न जासी शुभानने ॥ २१ ॥
वृद्ध भ्रतार सदांचा पाहीं ॥ भस्मोद्धारण सदा देहीं ॥
सुगंध द्रव्याची वार्ता नाहीं ॥ लवथवित गजचर्मे ॥ २२ ॥
उदक प्राशना तुंबिनीफळ ॥ भक्षावया पात्र नरकपाळ ॥
ऐसें असें परि त्रैलोक्य पाळ ॥ म्हणती अचळ अविनाशी ॥ २३ ॥
ऐशी अविनाश काशी ॥ कवण पुण्य जोडलें तयासीं ॥
ते कृपा करूनियां मजसीं ॥ संकलित अर्थासीं वदावें ॥ २४ ॥
ऐकून अरुंधतीचे वचन ॥ देवी करी हास्यवदन ॥
मग वदती जाली आपण ॥ गौरीरमण तोषकजे ॥ २५ ॥
पार्वत्युवाच॥ अरुंधति यदा मात्रा एवं स्नेहेनतर्जिता ॥
भर्तुः समीपे वासल्याद्विनोदेनावभाषणात् ॥ ६ ॥
मग वदतसे पार्वती सती ॥ ऐके बाई अरुंधती भर्ता ॥
आमुचा भोळा पशुपती ॥ स्नेहे मजप्रती पाळीत ॥ २६ ॥
जेवीं पुत्रालागीं कृपाळू माता ॥ स्नेहवृद्धि प्रतिपाळिता ॥
तेवीं मातें भोळानाथ ॥ कृपा करीत स्नेहभरें ॥ २७ ॥
भ्रतारची कृपा परिपूर्ण ॥ असलिया दुजे नाठवे जाण ॥
माहेर नाठवे तिये लागून ॥ भ्रतार पूर्ण स्नेहाळू ॥ २८ ॥
नानापरी विनोदे रीती ॥ समयीं संतोषवी मजप्रती ॥
हे तंव पूर्वीची रीती ॥ तेही पद्धती वेगळीच ॥ २९ ॥
मी असतां पितृगृहीं ॥ कुमारीदशा प्राप्त देहीं ॥
ऎसें असतां एकेसमयीं ॥ दुर्वास आले भेटीसी ॥ ३० ॥
तपिया माजी शिरोमणी ॥ महाराज तो दुर्वासमुनी ॥
तेणें माझिया पितया लागुनी ॥ निवेदिली काहाणी ते ऐका ॥ ३१ ॥
मलमास महिमा परिकर ॥ मुनिरावो वदला अपार ॥
तेथेंचि मी होऊन तत्पर ॥ श्रवणरंध्री आकर्णिलें ॥ ३२ ॥
मग तेथेची बसला हेत ॥ मीही आचरें नित्यानित्य ॥
संपूर्ण साधिलेंसे व्रत ॥ पिता करवित उद्यापन ॥ ३३ ॥
तया पुण्यें करूनि जाण ॥ प्रसन्न झाला त्रिनयन ॥
अर्धांगी ठाव देई म्हणोन ॥ वदतां तथास्तु ऐसें म्हणे ॥ ३४ ॥
तोची व्रत प्रभावो फळला ॥ शंकरा ऐसा पति प्राप्त जाला ॥
मलमास महिमा परिकर ॥ न भूतो न भविष्यति ॥ ३५ ॥
ऐसें सांगतां पार्वती ॥ बोलती जाली अरुंधती ॥
म्हणे कृपा करून मजप्रती ॥ व्रत पद्धति निवेदी पैं ॥ ३६ ॥
मी व्रत संपादीन ॥ भावार्थे जाण आचरेन ॥
विनाव्रतें दानाविण ॥ निरर्थक जाण जन्म हा ॥ ३७ ॥
ऐसें बोलतां विनयवाणी ॥ ऋषिभार्या शिरोमणी ॥
मग बोलती जाली भवानी ॥ तेंची श्रवणीं परिसवूं ॥ ३८ ॥
पार्वती म्हणे शुभ कल्याणी ॥ ऐकहो माये साध्वी शिरोमणी ॥
मासामाजी प्रतिदिनी ॥ ऐक अरुंधती सुशीळे ॥ ३९ ॥
द्वादशी संक्रांती पाहीं ॥ त्या विभागिल्या मासाच्या ठायीं ॥
प्रतिमासातें पर्वे सर्वही ॥ पुण्यदेही आचरती ॥ ४० ॥
परी या मलमासाच्या ठायीं ॥ संक्रातिये ठावेचि नाहीं ॥
म्हणोन असकृत पाहीं ॥ म्हणती जाण निश्चयेंसी ॥ ४१ ॥
म्हणोन पर्वकाळ उत्तमोत्तम ॥ येथें कीजे दानधर्म ॥
तेणें योगें पार्वतीरमण ॥ निजधाम वैकुंठीं ॥ ४२ ॥
येथें जे जे जैसें दान कीजे ॥ स्नानविधी आचरिजे ॥
तैसें तैसें फळ पाविजे ॥ सायास न करितां अनायासे ॥ ४३ ॥
ऐसे वाक्य वदतां गौरी ॥ येरी मागुती नमस्कारी ॥
मस्तक ठेवी चरणांवरी ॥ म्हणे कृपा करी स्वामिणीये ॥ ४४ ॥
तरी मलमहिमा अनुपम्य ॥ मज निवेदावा संपूर्ण ॥
तुम्हीं केले व्रत तेही जाण ॥ करावे कथन मजलागी ॥ ४५ ॥
स्वये मी अंगिकारीन ॥ तया व्रतालागीं आचरेन ॥
इतुके देई कृपादान ॥ करीं पावन जननीये ॥ ४६ ॥
ऐकोनि ऐसिया वचनाते ॥ उमा निवेदितसे तियेते ॥
म्हणे ऐकें संपूर्ण व्रतातें ॥ जें मी आचरलें भामिनी ॥ ४७ ॥
तेंची कथित्ये तुजलागूनी ॥ प्रातःकाळीं स्नानातें सारुनी ॥
चंद्रमौळीतें नमस्कारुनी ॥ बैसे पूजनीं आदरें ॥ ४८ ॥
षोडशोपचारें पूजा समस्त ॥ साहित्येसी यथास्थित ॥
कांही न्यून पदार्थांत ॥ उणे पडो नेदी सर्वथा ॥ ४९ ॥
मग अश्वात्थातळीं आसन ॥ घालून बैसे निवांत मन ॥
तेथें गौरी पंचकाते स्थापून ॥ करी पूजन यथाविधी ॥ ५० ॥
गौरी पंचक माझिये मातेतें ॥ मज आंदण दिधलेसे तियेने ॥
करीतसे तेची मी पूजन ॥ भाव धरूनी अवधारीं ॥ ५१ ॥
पंचामृत पूजा सोपस्कारी ॥ नित्य पूजिती पंचगौरी ॥
धूपदीप पुष्पे नानापरी ॥ अर्पी निर्धारी पूजनी ॥५२ ॥
सौभाग्यादि वस्त्रे कज्जल ॥ अर्पि दक्षिणेसी फल तांबूल ॥
नैवेद्य षड्रस सुपरिमळ ॥ अर्पी निर्मळ भावार्थे ॥ ५३ ॥
ऐसी पूजा संपूर्ण मासवरी ॥ करितसे जाण मी सुंदरी ॥
मग उद्यापनाते स्वीकारी ॥ तेही परी अवधारी ॥ ५४ ॥
पाचारूनि विप्र पंचकाते ॥ सहदंपत्यासी तयाते ॥
वस्त्र अलंकारादि सहिते ॥ भोजनाते षड्रस ॥ ५५ ॥
ऐसे करितां उद्यापन ॥ विप्रे दिधले आशीर्वचन ॥
अक्षयी सौभाग्य नव्हे खंडण ॥ साधिले पूर्ण व्रतासी ॥ ५६ ॥
ऐसे संपूर्ण मासवरी जाण ॥ मौन्येची एकभुक्त करून ॥
व्रत साधिले संपूर्ण ॥ फलपूर्ण प्राप्त झाले ॥ ५७ ॥
ऐसे व्रत माझिया आनंदाचे ॥ तूंते निवेदिले आजी साचे ॥
जरी आचरसी नेमाचे ॥ फल तयाचे प्राप्त होय ॥ ५८ ॥
हे व्रत करिती ज्या नारी ॥ त्या पुत्र प्रसवती संसारी ॥
अक्षयी सौभाग्याची परी ॥ लाहे संसारी परिसा ते ॥ ५९ ॥
संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा ॥ अरुंधतीने आकर्णिला सौरसा ॥
नमोनि उमेच्या चरणरजसा ॥ पुसोनि गृहा पातलीसे ॥ ६० ॥
स्वगृहीं जाऊनियां त्वरें ॥ व्रतारंभ करितसे आदरें ॥
पूर्ण होतांच निर्धारें ॥ अखंड सौभाग्या ते पावली ॥ ६१ ॥
ख्याती जिची त्रिभुवनी ॥ पूजिती जीतें सुरवरमुनी ॥
या व्रताची ऎसी करणी ॥ तुजलागुनी कथियेली ॥ ६२ ॥
ऐसा इतिहास पाहीं ॥ लक्ष्मीप्रती वदे शेषशाई ॥
अरुंधती पार्वती संवाद पाहीं ॥ वदला स्वदेही नारायण ॥ ६३ ॥
तोची कथा भाग आघवा ॥ निवेदिला श्रोतिया सर्वां ॥
भावें करूनी आचरावा ॥ मग पहावा प्रत्ययो ॥ ६४ ॥
ऐसे हें गौरीपंचकव्रत ॥ पूजा करावी नेमस्त ॥
तेणें सौभाग्यवर्धन स्त्रियांस ॥ पावे निश्चित आदरेंसी ॥ ६५ ॥
आतां अविश्वास अंतरी ॥ ग्रंथी न धरावा निर्धारी ॥
तेची वर्णु आतां परी ॥ कथा बरी उत्तराध्यायी ॥ ६६ ॥
जे विश्वास न मानिती ग्रंथास ॥ तयाची व्यवस्था कैसी असे ॥
तेचि परिसा सावकाश ॥ पुढती प्रसंगास आदरें ॥ ६७ ॥
जें बोलिला स्वयें नारायण ॥ तेची कथूं श्लोकाधारे करून ॥
म्हणोनि न करावा अनुमान ॥ मानावे वचन दासाचे ॥ ६८ ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराण सारोद्धार संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ पंचविंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २५ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्या ६८ ॥ श्लोक ६ ॥
॥ इति पंचविशतितमोऽध्यायः ॥

Explore More