Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 1

(Purushottam Maas Katha Adhyay 1)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 1

Purushottam Maas Katha Adhyay 1. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 225
श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥
ॐ नमोजी गणराजा ॥ एकदंता चतुर्भुजा ॥
फरशपाणि अधोक्षजा ॥ उभवीं ध्वजा यशाची ॥ १ ॥
ऐसा तूं विघ्नहरुं ॥ ग्रंथारंभीं नमस्कारू ॥
देऊनियां अभयवरुं ॥ नेई परपारु ग्रंथ हा ॥ २ ॥
नमूं आदीजननी ॥ चराचर जियेपासुनी ॥
ते शारदा हंसवाहिनी ॥ ग्रंथारंभीं नमियेली ॥ ३ ॥
नमूं श्रीगुरुरामदास ॥ जो सर्वीसर्वस्व उदास ॥
तयाची धरूनियां कास ॥ ग्रंथ शेवटास जावो हा ॥ ४ ॥
प्रार्थनेचे एक कारण ॥ आयुष्य नसे आपुल्या आधीन ॥
ग्रंथारंभीं लोभ धरून ॥ वदेन म्हणे तो मूर्खंहो ॥ ५ ॥
येथें कर्ता आणि करविता ॥ वक्ता अणि वदविता ॥
सर्वही रघुनाथसत्ता ॥ वृथा अहंता प्राणियाची ॥ ६ ॥
असो आतां हे वार्तां ॥ ग्रंथ तरि हा कोणता ॥
तरी अधिक माहात्म्य ग्रंथा ॥ वंदू आता निर्धारें ॥ ७ ॥
संस्कृत वाणी व्यासोक्त ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
तयाचा असे हा मतितार्थ ॥ तो असो अवगता श्रोतिया ॥ ८ ॥
एकदा मुनयः सर्वे नैमिषारण्यमागताः ॥
परब्रह्मरतायेच हरिद्वारनिवासिनः ॥ १ ॥
कवण एक अवसराचे संधीं ॥ मिळोनियां ऋषींची मांदी ॥
नेमिषारण्याचिये अवधी ॥ येते झाले सत्वर ॥ ९ ॥
जे महा तपस्वी योगिराज ॥ महानुभाव तेजःपुंज ॥
हरिद्वार-कुरुक्षेत्रज ॥ समुदायेंसीं पातले ॥ १० ॥
शशीसमान शीतळता ॥ भानुसमान तेजाळता ॥
तयाचिया आशीर्वादे तत्वता ॥ रंक तो प्रभुत्वता पावे पै ॥ ११ ॥
ऐसे सर्वही ऋषीश्वर ॥ गालव आणि शुकेंद्र ॥
नामें सांगतां अपार ॥ होईल प्रसर ग्रंथातें ॥ १२ ॥
समग्र ऋषी मिळोन ॥ सूताप्रती करिती प्रश्न ॥
कलियुगीं अन्नगतप्राण ॥ परमार्थसाधन केवि घडे ॥ १३ ॥
त्याहीवरी दरिद्र व्यथा ॥ शरीरीं जडे रोग अवस्था ॥
नित्य नामस्मरण करितां ॥ अवकाश कदा नसे पै ॥१ ४ ॥
जरी कीजे तीर्थाटण ॥ व्याधिग्रस्त शरीर क्षीण ॥
संसार धंदा करितां जाण ॥ अवकाश कदां नसे पै ॥ १५ ॥
शक्तीविण सर्वथा ॥ न जाववे तीर्थपंथा ॥
द्रव्यें जावें जरि तत्वता ॥ तरि दरिद्रव्यथा अपार ॥ १६ ॥
स्वगृही करावें धर्मदान ॥ तरि द्रव्य पाहिजे तयालागुन ॥
अथवा भगवंतीं होता अनन्य ॥ तरि गतायुषी प्राणी हा ॥ १७ ॥
ऐसियासी कवण उपाय ॥ प्राणिया कैसा तरणोपाय ॥
अमोल्य हा नरदेह ॥ केवीं पावे परलोकातें ॥ १८ ॥
अनंत पापाचिया राशी ॥ दरिद्रें घडती प्राणियासी ॥
मग पावे रवरव नरकासी ॥ यमयातनेसी अपार ॥ १९ ॥
नानाप्रकारें यमयातना ॥ शास्त्रीं बोलिले प्रकार नाना ॥
ते जाचणी भोगिता जना ॥ उसंत जाणा नसेची ॥ २० ॥
ऐसिया प्राणियासी ॥ कैसेनि करावें परमार्थासी ॥
तरि कृपा करून आम्हांसी ॥ कांहीं उपाय सांगावें ॥ २१ ॥
ऐसें समस्तांचें प्रश्नाक्षर ॥ ऐकुनियां सविस्तर ॥
बोलता झाला उत्तर ॥ व्यासशिष्य सूत पै ॥ २२ ॥
श्रृणुध्वमृषयः सर्वे कथा पौराणिकीं शुभां ॥
लक्ष्मीमाधवसंवादं श्रृण्वतां पापनाशनं ॥ २ ॥
सूत वदे तेव्हां वदनमौळी ॥ ऐकाहो सर्व ऋषीमंडळी ॥
एकदा श्री माधव जवळी ॥ प्रार्थिती जाली कमळजा ॥ २३ ॥
तुम्हा ऐसाची प्रश्न ॥ लक्ष्मी करि आपण ॥
हे माधव जनार्दन ॥ ऐका वचन पै माझें ॥ २४ ॥
श्रीलक्ष्मी उवाच॥ देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्तिप्रदायक ॥
कथयस्व प्रसादेन ॥ संशयोमे ह्रदिस्थितः ॥ ३ ॥
मुनीश्वराः प्रवदन्ति कृष्णद्वैपायनादयः ॥
अदत्तं नैवलभ्येत दत्तंचैवोपतिष्ठति ॥ ४ ॥
यथा वंध्या गृहस्यस्थ पतिवंशविनाशिनी ॥
तथा दानविहीनंतु जंतोर्जन्मनिरर्थकं ॥ ५ ॥
हे भगवान् देवदेवेश ॥ तुम्ही तो सर्व देवांचे ईश ॥
आणि प्राणिमात्रांचे पाळणाधीश ॥ सर्वत्रांचे स्वामीयां ॥२५॥
तरि कृपाळुत्वें करूनी ॥ निवेदावें मजलागुनी ॥
जे चराचर जीव प्राणी ॥ केवी तरती भवार्णवीं ॥ २६ ॥
जैसी पतिवीण रमणी ॥ न शोभे कदां दीन यामिनी ॥
तेवी अदत्त जालिया प्राणी ॥ न शोभे दानीं कदा तो ॥ २७ ॥
तैसे दानधर्माविण जे नर ॥ ते द्विपदाचे केवळ खर ॥
तरि अल्प वेंचुन पुण्य अपार ॥ कवण असे स्वामियां ॥ २८ ॥
कवण दान कवण तप ॥ हें कृपा करूनियां अल्प ॥
मज निवेदावें स्वल्पस्वल्प ॥ तरणोपाय जगातें ॥ २९ ॥
ऐसा प्रश्न समुद्रतरण्याचा ॥ आकर्णुनी बोलतसे वाचा ॥
स्वामी तो दीन जनाचा ॥ केशवराज सत्य पै ॥ ३० ॥
तथापि कथयंतीह दैवज्ञाः शास्रकोविदाः ॥
मलिम्लुचेतुसं प्राप्ते क्रियाः सर्वाः परित्यजेत् ॥ ६ ॥
युक्‍तायुक्‍तं यदा पूर्वाचार्येर्यथोदितं ॥
देवकार्यं पितृकार्य तीर्थयात्राव्रतादिकं ॥ ७ ॥
क्षौरंमौजीविवाहंच व्रतंकाम्योपवासिकं ॥
मलिम्लुचेसदात्याज्यं गृहस्थैश्च विशेषतः ॥ ८ ॥
ऐकेंहो क्षीराब्धितनये ॥ दुर्लभ तो नरदेह ॥
येथें सहजासहज घडती अपाय ॥ सायास नसतां अनायासें ॥ ३१ ॥
ते कवण म्हणसी तरि ऐकें ॥ युक्तायुक्त प्रकार देखें ॥
शास्त्रीं बोलिले अनेके ॥ ते अवश्यक घडतीकीं ॥ ३२ ॥
स्नानसंध्या देवतार्चन ॥ कुळधर्म वर्णाश्रम जाण ॥
पर्वकाळ न घडे दान ॥ मग तीर्थाभ्रमण कायसें ॥ ३३ ॥
शरीरीं भरतां व्याधी ॥ मग कैचे स्नान देवतार्चन विधी ॥
अथवा पर्वकाळ कुळधर्मसंधी ॥ द्रव्याविण सिद्धी केवि होय ॥ ३४ ॥
किंवा अकाळी घडे मौंजी लग्न ॥ द्रव्य नाहीं म्हणवून ॥
शास्त्रीं निर्धार केला जाण ॥ अष्ट वर्षांचा निर्धारें ॥ ३५ ॥
अष्ट वर्षी चौलोपनयन ॥ तैसेंच कन्येचें कन्यादान ॥
हे समयासीं न घडती जाण ॥ म्हणोनि अकाळ बोलिजे ॥ ३६ ॥
कां आलिया पितृदिवस ॥ कांता जालिया अस्पर्श ॥
म्हणोनि अकाळीं तो दिवस ॥ शास्त्राज्ञेनें ऐसें बोलती ॥ ३७ ॥
अथवा व्याधिग्रस्त जालें शरीर ॥ मग राहिला सहजची आचार ॥
तैसेंच प्राशन करणें लागे नीर ॥ अन्नही परिकर शय्येवरी ॥ ३८ ॥
इतुकिया दोषांच्या मळासी ॥ संचय होतांचि समरसी ॥
तयाते म्हणती मलमासी ॥ घटका पळ दिवस गणितां ॥ ३९ ॥
नक्षत्र आणि मासतिथी ॥ हे कवणें अर्थे उणे होती ॥
तरि ऐसिया दोषाचि होतां भरती ॥ मग ते पावती क्षयाते ॥ ४० ॥
म्हणोनी तिसरे वरुषीं जाण ॥ येक मास अधिक तेणें गुण ॥
मग ते होय म्हणोनि नामाभिधान ॥ मलमास जाण बोलिजे ॥ ४१ ॥
तरि ऐसिया दोषांचें क्षाळण ॥ होईल तेचीं ऐके साधन ॥
मल मासाचें जें अधिष्ठान ॥ तें स्वयें मीच जाण वल्लभे ॥ ४२ ॥
जेवी त्रिगुण निरसीलियावरी ॥ वस्तु उरे साक्षात्कारीं ॥
हें खूण जाणावी चतुरीं ॥ संत सेवा धरिजे ॥ ४३ ॥
तैसें तीन संवत्सर गेलियां ॥ उरे मास ज्योतिर्मया ॥
नाम धरिती जाणती तया॥ केशवराया म्हणोनी ॥४४॥
केला सर्व कर्माचा नाश ॥ उरला नाहीं लवलेश ॥
म्हणोनि बोलिजे केश ॥ दोषग्रासक जो मी ॥ ४५ ॥
तया मासाचें महिमान ॥ ऐकें होउनी सावधान ॥
मलमास प्राप्त झालिया जाण ॥ मांगल्य विधान लोपती ॥ ४६ ॥
न होती विवाह कार्य ॥ न होती उपनयन आचार्य ॥
तीर्थाटण पर्याय ॥ तोही न घडे जाण पै ॥ ४७ ॥
तरी ऐसियासी काय कीजे ॥ कवण पुण्यें दोषक्षाळीजे ॥
तरि ऐकें कमळजे ॥ जें सुगम भूमंडळी ॥ ४८ ॥
असंक्रांतो यदा मासः ॥ प्राप्यतेमानवैः प्रिये ॥
महोत्सवस्तदा कार्य ॥ आत्मनोहितकांक्षिभिः ॥ ९ ॥
संक्रांतीहीन जो मास ॥ म्हणोनियां मलमास ॥
येथें जया वाटे हव्यास ॥ परलोकीचा पै ॥ ४९ ॥
तयानें काय आचरावें ॥ स्त्री अथवा पुरुष भावें ॥
पुण्यक्रिया स्वभावें ॥ आचरण पै कीजे ॥ ५० ॥
ऐकूनी ऐसें उत्तर ॥ लक्ष्मी बोले प्रत्युत्तर ॥
कवण विधी कवण प्रकार ॥ कृपा करूनि सांगिजे ॥ ५१ ॥
लक्ष्मी उवाच॥ यदि नाथत्वया प्रोक्तामहमेव प्रदायकः ॥
उद्यापनंच विधिवदितिहाससमन्वितं ॥ १० ॥
हे नाथ कृपाळुवा ॥ यथानुक्रमें निवेदावा ॥
उद्यापन विधी बरवा ॥ जें पूर्वी केशवा पुसिलें ॥ ५२ ॥
मग बोलों आदरिलें ॥ देवें परम हास्य केलें ॥
म्हणे अद्यापी नाहीं गेलें ॥ अज्ञान पै तुझें ॥ ५३ ॥
ब्राह्मणोस्य मुखमासीत् ॥ ऐसी तो श्रुती गर्जत ॥
ते ब्राह्मण मुख माझें निश्चित ॥ हें तूं जाणत अससी कीं ॥ ५४ ॥
तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे ॥ सांगतो तू तें जाण ऐसें ॥
वेदत्रयी ज्ञानप्रकाशे ॥ अनारिसें सर्वदां ॥ ५५ ॥
विद्याविनयसंपन्ने ॥ ब्राम्हणेगविहस्तिनी ॥
शुनिचैवश्वपाकेच पंडिताः ॥ समदर्शिनः ॥ ११ ॥
इहीं लक्षणीं जे मंडित ॥ स्नानसंध्याशीळ सदायुक्त ॥
विद्या असोनि अगर्वित ॥ ते प्रिय होत मजलागीं ॥ ५६ ॥
स्वगृहीं जें पचते अन्न ॥ अग्निहोत्र श्रौतस्मार्तजाण ॥
वेदांतरंगींचे ज्ञान ॥ तें प्रिय जाण मजलागीं ॥ ५७ ॥
वेदज्ञ आणि शास्त्रसंपन्न ॥ पंडित आणि विप्र जाण ॥
याज्ञीक अज्ञाईक जाण ॥ ते प्रिय मजलागीं ॥ ५८ ॥
इतुकें असूनि अगर्वित ॥ वोळंगता नाहीं किंचित ॥
समान दृष्टी सर्वातीत ॥ तो प्रिय निश्चित मजलागीं ॥ ५९ ॥
म्हणोनि माझें मुख हे निर्धार ॥ वेदेंचे केला असे साचार ॥
ऐकूनियां ऐसें उत्तर ॥ लक्ष्मी बोलती जाहली ॥ ६० ॥
ऐका विनंती स्वामिनाथा ॥ येवढी पदवी ब्राह्मणा देता ॥
तरी कां फिरती लोलंगता ॥ कवडीसाठी विदेशीं ॥ ६१ ॥
तरि ये विषयींचा संशयो ॥ निरसावा जी संदेहो ॥
तंव बोलेति ये तें माधवो ॥ ऐकें अभिप्रावे पैं याचा ॥ ६२ ॥
कृत त्रेत द्वापार आणि कली ॥ हे निर्माण जाले जिये काळीं ॥
सूर्यकर्णीं उद्भवे येकची वेळीं ॥ तया काळींचा वृत्तांत असे पै ॥ ६३ ॥
चारियुगें निर्माण होतां ॥ मूर्तिमंत उभी राहिलीं तत्वतां ॥
तै तेतीस कोटीसी विधाता ॥ तोही होता जवळीके ॥ ६४ ॥
ते वेळीं युगाचा युगधर्म ॥ चारी वर्णाचा वर्णाश्रम ॥
तयामाजी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म ॥ तोची नेम अवधारी ॥ ६५ ॥
कृत युगामाझारी ॥ स्नानसंध्यादी कर्मे माध्यानवरी ॥
ब्राह्मणें संपादावी बरवी परी ॥ मग आश्रमा भीतरी पै यावें ॥ ६६ ॥
परी तयांची योगक्षेमचिंता ॥ रायानी करावी व्यवस्था ॥
न मागतां पुरविती पदार्था ॥ कार्य प्रसंगता संपादी ॥ ६७ ॥
ऐसा प्रथमयुगीं धर्म होता ॥ दुसरियाचा ऐक आतां ॥
त्रेता युग प्राप्त होतां ॥ धर्म कोणता अवधारीं ॥ ६८ ॥
एक याम परियंत वरी ॥ नित्य नेम सारावा भूसुरीं ॥
मग जाऊन राजद्वारीं ॥ जोडल्या करीं विनवावें ॥ ६९ ॥
तंव तया प्रभूनें जाणा ॥ पुरविजें ब्राह्मणाची वासना ॥
द्वितीय युगींचीही रचना ॥ कर्माचरण अंतरलें ॥ ७० ॥
आतां तिसरें द्वापार ॥ ऐकें तयाचा निर्धार ॥
यज्ञादी कर्मे करिती राजेश्वर ॥ तेथे जाती न पाचारितां ॥ ७१ ॥
धन आशेसाठीं बापुडीं ॥ हिंडताती देशोधडी ॥
तेथें स्वधर्मातें बापुडीं ॥ अंतरलीं अनायासें ॥ ७२ ॥
कैची संध्या कैचे स्नान ॥ अवघें द्रव्याचेंच ध्यान ॥
म्हणोन हिंडती रानोरान ॥ कर्मभोगें आपुलिया ॥ ७३ ॥
ऐसें चतुर्युगाचें विवरण ॥ तुज केले म्या कथन ॥
तरी ब्राम्हणांचा अन्याय कवण ॥ पाहे शोधुन अंतरी ॥ ७४ ॥
केला अवतार तो मीच जाण ॥ म्हणोन ब्राम्हणोस्यमुख म्हणोन ॥
या लागीं दोष न ठेवून ॥ निर्दोषी जाण भूसुर ॥ ७५ ॥
जैसें स्वर्गीं सुरवर ॥ तैसें पृथ्वीवरी भूसुर ॥
होतो माझाच अवतार ॥ म्हणोन अगोदर पूजावे ॥ ७६ ॥
म्हणोन जया वाटे पुनित व्हावे ॥ तेणें हे व्रत करावें बरवें ॥
देव ब्राम्हण पूजावे ॥ ऐक बरवें परी कैसी ॥ ७७ ॥
प्रातःकाळीं उठोनियां ॥ नित्य नेमादिकाक्रिया ॥
सारूनियां स्नानविधी बरविया ॥ मूर्ती पूजाव्या देवतार्चनीं ॥ ७८ ॥
उपरी सपत्‍निक ब्राम्हणातें ॥ पाचारिजे भावार्थे ॥
आसन देउनि तयातें ॥ पूजाविधानातें पैं कीजे ॥ ७९ ॥
अर्घ्यपाद्यादि पूजा बरवी ॥ चंदन सुगंधी पुष्पें आणावी ॥
तेणें विधी समर्पावी ॥ पूजा मजप्रीत्यर्थ ॥ ८० ॥
मग नाना प्रकारें मिष्टान्न ॥ अपूपलाडू पक्वान्न ॥
क्षीरखांड पायसान्न ॥ करावी निर्माण तयालागी ॥ ८१ ॥
नाना प्रकारें चित्रविचित्र ॥ शाखा निर्माव्या सुपवित्र ॥
कथिकवटकादी यंत्र ॥ दधी मिश्रित करावे ॥ ८२ ॥
अनेक प्रकारची रायतीं ॥ भावें करावी तयाप्रती ॥
दध्योदन भोजनांतीं ॥ तयाप्रति समर्पावे ॥ ८३ ॥
ऐसें षड्रस मिष्टान्न ॥ आकंठ घालावें भोजन ॥
येणें करितां मी जनार्दन ॥ संतुष्ट होय तयावरी ॥ ८४ ॥
अर्घ्यदद्यात्सपत्‍नीकः प्रह्रष्टेनांतरात्मना ॥
मंत्रेणानेन देवेशि ब्राह्मणैः सहमांस्मरन् ॥ १२ ॥
अर्चयित्वार्ध्यदानेन ब्राह्मणा पूजयेत्ततः ॥
सपत्‍नीकान् शुचीन् शांतन्मधुचूर्णैः सभोजनैः ॥ १३ ॥
स्मर्तव्यो द्विजरूपेण तत्पत्‍नीत्वामनुस्मरन् ॥
परिधाय यथा शक्त्या वस्त्रालंकारचंदनैः ॥ १४ ॥
भोजनें झालियावरी ॥ यथाशक्त्या वस्त्रें अळंकार बरी ॥
मदर्पण बरवियापरी ॥ तया करीं अर्पावें ॥ ८५ ॥
मग घृतपक्व पांच पक्वान्नें करून ॥ फल तांबूल दक्षिणा दान ॥
येणें करूनी वायनदान ॥ द्यावें जाण तयासी ॥ ८६ ॥
एला लवंगा जायफळ ॥ पत्रीसहित त्रयोदशगुणी तांबूल ॥
अर्पुनी घालीजे माळ ॥ गळां सुगंध पुष्पाची ॥ ८७ ॥
ऐसें पूजन करून बरवें ॥ तयांचे आशीर्वाद घ्यावे ॥
लक्ष्मीनारायण जाणूनि नमस्कारावे ॥ मग बोळवावे स्वआश्रमा ॥ ८८ ॥
ऐसें व्रत एक मासवरी ॥ करावे सहपरिवारीं ॥
आपण नक्‍त करावें अस्तमानावरी ॥ मग भोजनपरीसारावी ॥ ८९ ॥
ऐसें करितां व्रताचरण ॥ होय दोष मळाचें क्षाळण ॥
मग शुचिस्मंत होऊन ॥ पावे सदन माझें तो ॥ ९० ॥
ऐसा इतिहास बरवा जाण ॥ लक्ष्मीप्रती श्रीनारायण ॥
स्वमुखें श्रुत करी आपण ॥ तेंची कथन कथिलेसे ॥ ९१ ॥
प्राकृत भाषा बरवी ॥ तुम्हांतें अर्पिली आवघी ॥
संशय न धरा जीवी ॥ पुराणीं पाहावी प्रचीत ॥ ९२ ॥
ऐसा प्रथमोध्याय बरवा ॥ तुजप्रती पावो माधवा ॥
येथुनी कथाभाग अवघा ॥ अवधरावा पुढें पै ॥ ९३ ॥
करितां ऐसे व्रत ॥ ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य ॥
यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ ॥ स्वयें भगवंत बोलिलासे ॥ ९४ ॥
मलमासव्रतं नारीया ॥ करोति समुद्रजे ॥
न वैधव्यं न दारिद्र्यं ॥ पुत्रशोकः कदाचन ॥ १५ ॥
इतिश्री अधिक माहात्म्य ॥ पद्म पुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ प्रथमोऽध्याय गोड हा ॥ ९५ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओंव्या ॥ 95॥
॥ इति प्रथमोध्यायः ॥

Explore More