Lord Krishna

ज्ञानेश्वरी अध्याय 3

(Dnyaneshwari Adhyay 3)

Sant Dnyaneshwar

Also known as Dnyaneshwari · Jnaneshwari · Jnaneshwari adhyay 3

Dnyaneshwari Adhyay 3. The Dnyaneshwari — Sant Dnyaneshwar's commentary on the Bhagavad Gita, composed at Nevasa in 1290 when he was in his teens. Its proper name is Bhavarthadipika, and it is the work that made Marathi a language of scripture: the Gita's Sanskrit opened out into ovis of extraordinary beauty, image piled on image, for listeners who knew no Sanskrit at all.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 320
अर्जुन उवाच:
ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले ।
तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥ १ ॥
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां ।
ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी ॥ २ ॥
तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं ।
इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुता ॥ ३ ॥
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारासी निःशेष ।
तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं ॥ ४ ॥
तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा ।
आणि येसणी हे हिंसा । करवित अहासी ॥ ५ ॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें ।
आता संपले म्हणे पां आघवें । विवेकाचे ॥ ६ ॥
हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा ।
आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥ ७ ॥
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये ।
तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज ॥ ८ ॥
जैसे आंधळे सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा ।
तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥ ९ ॥
मी आधींचि कांही नेणें । वरी कवळिलों मोहें येणें ।
कृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥ १० ॥
तंव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजीं गांवाई ।
तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ॥ ११ ॥
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें ।
आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणे ॥ १२ ॥
आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी ।
एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥ १३ ॥
तरी ये जाणिवेचे कीर सरलें । परी आणिक एक असें जाहलें ।
जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥ १४ ॥
तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे ।
जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥ १५ ॥
ना तरी झकवितु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें ।
हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥ १६ ॥
म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा ।
मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी ॥ १७ ॥
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें ।
कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ १८ ॥
देखें रोगातें जिणावें । औषध तरी द्यावें ।
परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥ १९ ॥
तैसें सकळार्थभरित । तत्व सांगावे उचित ।
परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥ २० ॥
देवा तुज ऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी कां न करूं ।
एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥ २१॥
हां गा कामधेनूचें दुभतें । देवें जाहलें जरी आपैतें ।
तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे ॥ २२ ॥
जरी चिंतामणि हातां चढे । तरी वांछेचे कवण सांकडे ।
कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ॥ २३ ॥
देखें अमृतसिंधूतें ठाकावें । मग तहाना जरी फुटावें ।
मग सायासु कां करावे । मागील ते ॥ २४ ॥
तैसा जन्मांतरी बहुतीं । उपासिता लक्ष्मीपती ।
तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥ २५ ॥
तरी आपुलेया सवेसा । कां न मगावासी परेशा ।
देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥
देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें ।
हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा ।
तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥ २८ ॥
जैसां मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं ।
स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥
तैसें देवा तूंते । पुसिजतसें आवडे तें ।
आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥ ३० ॥
तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित ।
ते सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
श्रीभगवानुवाच: लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ॥ ३ ॥
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु ।
अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था ।
प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्हीं ॥ ३३ ॥
तो उद्देशु तूं नेणसी । म्हणोनि क्षोभलासि वायांचि ।
तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
अवधारीं वीरश्रेष्ठा । यें लोकीं या दोन्ही निष्ठा ।
मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठीजे ।
जेथ ओळखीसवें पाविजे । तद्रूपता ॥ ३६ ॥
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण ।
होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं ।
जैसे सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी ॥ ३८ ॥
कां पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहतां ।
मग सिंधूमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥
तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें ।
परी उपास्ति ते योग्यते – । आधीन असे ॥ ४० ॥
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे ।
मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावतें होती ॥ ४४ ॥
न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥ ४ ॥
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत ।
कर्महीना निश्चित । होईजेना ॥ ४५ ॥
कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥
सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।
तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥ ४७ ॥
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे ।
कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥ ४८ ॥
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं ।
मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥ ४९ ॥
म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥
आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे ।
कीं त्यजिलें हें कर्म सांडे । ऐसें आहे ॥ ५१ ॥
हें वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे ।
परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी ॥ ५२ ॥
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः ॥ ५ ॥
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।
जि चेष्टा गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥
देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें ।
तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥
सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रीचे तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥ ५५ ॥
ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति ।
की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥ ५६ ॥
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालो विसरले ।
हे असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥ ५७ ॥
हें न ठकेचि जरी कांही । तरी सांडिले तें कायी ।
म्हणोनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिमंतां ॥ ५८ ॥
कर्म पराधीनपणे । निपजतसे प्रकृतिगुणें ।
येरीं धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥
देखें रथीं आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे ।
मग चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥
कां उचलिलें वायुवशें । चळें शुष्क पत्र जैसें ।
निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥ ६१ ॥
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें ।
मिष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥
म्हणऊनि संगु जंव प्रकृतिचा । तंव त्यागु न घडे कर्माचा ।
ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें ॥ ६३ ॥
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उचयते ॥ ६ ॥
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधूनि ॥ ६४ ॥
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सापडे ।
वरी नटती तें फुडे । दरिद्र जाण ॥ ६५ ॥
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा ।
वोळखावे तत्वता । येथ भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥
आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन ।
या नैराश्याचे चिन्ह । धनुर्धरा ॥ ६७ ॥
यस्तित्वंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥ ७ ॥
जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु ।
बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥ ६८ ॥
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी ।
प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥
तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी ।
परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे ।
जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥ ७१ ॥
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे ।
जैसें तोयसंगे आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥
तैसा सामन्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे ।
येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥ ७३ ॥
ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि तरी मुक्तु ।
आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं ।
म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूंते ॥ ७५ ॥
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी ।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मणः ॥ ८ ॥
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे ।
आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां ॥ ७७ ॥
म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥ ७८ ॥
पार्था आणिकही एक । नेणसी तूं हे कवतिक ।
जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥
देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे ।
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८० ॥
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।
तदर्थे कर्म कौंतेय मुक्तसङगः समाचरः ॥ ९ ॥
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।
म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ ८१ ॥
हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे ।
तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥ ८२ ॥
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन ।
जो करी तया बंधन । कहींच नाहीं ॥ ८३ ॥
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला ।
तो नित्ययज्ञाते चुकला । म्हणोनियां ॥ ८४ ॥
आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा ।
जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥ ८५ ॥
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १० ॥
तें नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें ।
परी नेणतीचि तिये यज्ञातें । सूक्ष्म म्हणऊनी ॥ ८६ ॥
तें वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां ।
तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥ ८७ ॥
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ॥ ८८ ॥
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावे । तीर्थासी गा ॥ ८९ ॥
योगादिक साधनें । साकांक्ष आराधनें ।
मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥ ९० ॥
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावे ।
तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥ ९१ ॥
अहेतुकें चित्तें । अनुष्ठां पां ययातें ।
पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ९२ ॥
तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हां एकु ।
ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥ ९३ ॥
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल ।
मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा ॥ ९४ ॥
देवान् भावयतानेन ते देवाः भावयंतु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यच ॥ ११ ॥
जें येणेचिकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां ।
मग ते तुम्हां ईप्सीता । अर्थांते देती ॥ ९५ ॥
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां ।
योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥ ९६ ॥
तुम्हीं देवतांते भजाल । देव तुम्हां तुष्टितील ।
ऐसी परस्परें घडेल । प्रीति तेथ ॥ ९७ ॥
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल ।
वांछितही पुरेल । मानसींचे ॥ ९८॥
वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल ।
म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ ९९ ॥
जैसें ऋतुपतींचे द्वार । वनश्री निरंतर ।
वोळगे फळभार । लावण्येंसी ॥ १००॥
इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत ।
येईल देखा काढत । तुम्हापांठी ॥ १०१ ॥
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त ।
जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥ १०२ ॥
कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा ।
लुब्ध होऊनियां स्वादां । विषयांचिया ॥ १०३ ॥
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।
तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं । न भजेल तो ॥ १०४ ॥
अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन ।
प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचे ॥ १०५ ॥
विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी ।
संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥ १०६ ॥
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु ।
केवळ भोगासक्तु । होईल जो ॥ १०७ ॥
तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचे सकळ जाये ।
देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥ १०८ ॥
जैसें गतायुषीं शरीरीं । चैतन्य वासु न करी ।
कां निदैवाचां घरीं । न राहे लक्ष्मी ॥ १०९ ॥
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला।
जैसा दीपासवे हरपला । प्रकाशु जाय ॥ ११० ॥
तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ।
आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥ १११ ॥
म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचे ॥ ११२ ॥
मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें ।
रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशी ॥ ११३ ॥
तैशी त्रिभुवनींची दुःखे । आणि नानाविध पातकें ।
दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥ ११४ ॥
ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां ।
परी कल्पांतीहीं सर्वथा । प्राणिगण हो ॥ ११५ ॥
म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावीं ।
ऐसें प्रजांते शिकवी । चतुराननु ॥ ११६ ॥
जैसें जळचरां जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे ।
हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥ ११७ ॥
म्हणोनि तुम्ही समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं ।
निरत व्हावें पुढतपुढती । म्हणिपत असे ॥ ११८ ॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः ।
भुङजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ॥ १३ ॥
देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी ।
जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥ ११९ ॥
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं ।
निमितादिकीं यजी । पितरोद्देश ॥ १२० ॥
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां ।
हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥ १२१ ॥
तें सुखे आपुलां घरीं । कुटुंबेसीं भोजन करी ।
कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥ १२२ ॥
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं ।
जयापरी महारोगीं । अमृतसिद्धी ॥ १२३ ॥
कां तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।
तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥
म्हणोनि स्वधर्में जें अर्जें । तें स्वधर्मेचि विनियोगिजे ।
मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।
ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे ॥ १२६ ॥
जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांते भोग्य म्हणती ।
यापरतें न स्मरती । आणिक कांही ॥ १२७ ॥
हे यज्ञोपकरण सकळ । नेणसांते बरळ ।
अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥
इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके ।
ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥
जे संपत्तिजात आघवें । हे हवनद्रव्य मानावें ।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषी ॥ १३० ॥
हें सांडोनिया मूर्ख । आपणपेयांलागीं देख ।
निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये ।
तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां ॥ १३२ ॥
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण ।
जे जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥ १३३ ॥
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नस्संभवः ।
यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥
अन्नस्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें ।
मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
त्या पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥ १३५ ॥
कर्म ब्रह्मोद्बभवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं ॥ १५ ॥
मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर ।
म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुती ।
ऐकें सुभद्रापती । अखंड गा ॥ १३७ ॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती ॥ १६ ॥
ऐशीं आदि हे परंपरा । संक्षेपे तुज धनुर्धरा ।
सांगितली या अध्वरा । लागौनियां ॥ १३८ ॥
म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।
नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥
जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥
तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ ।
जैसे कां अभ्रपटळ । अकाळींचे ॥ १४१ ॥
कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें ।
जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥ १४२ ॥
म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १४३ ॥
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आले ।
मग उचित कां आपुले । वोसंडावे ॥ १४४ ॥
परिस पां सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि ।
खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥ १४५ ॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥ १७ ॥
देखें असतेनि देहकर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।
जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला ।
म्हणोनि सहजे सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥
नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥
तृप्ती झालिया जैसीं । साधने सरती आपैसीं ।
देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्मे नाही ॥ १४८ ॥
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरूषः ॥ १९ ॥
म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु ।
होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥
जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था ।
कैवल्य पर तत्वतां । पातले जगी ॥ १५१ ॥
कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥ २० ॥
देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख ।
न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥
याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था ।
हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥ १५३ ॥
जे आचरता आपणपेयां । देखी लागेल लोका यया ।
तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि । १५४ ॥
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥
मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा ।
अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥ १५६ ॥
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे ।
तिहीं कवणेपरी जाणिजे । मार्गांते या ॥ १५७ ॥
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावे ।
विशेषें आचरावें । लागे संती ॥ १५९ ॥
न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥
आता आणिकाचिया गोठी । तुज सांगो काय किरीटी ।
देखें मीचि इये राहाटी । वर्तत असे ॥ १६० ॥
काय सांकडे कांही मातें । कीं कवणें एकें आर्तें ।
आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥
तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाहीं जगीं ।
ऐसी सामुग्री माझां अंगी । जाणसी तूं ॥ १६२ ॥
मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।
तोही मी उगला । कर्मीं वर्ते ॥ १६३ ॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा ।
तयाचि एका उद्देशा – । लागोनियां ॥ १६४ ॥
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ ।
ते न व्हावें बरळ । म्हणोनियां ॥ १६५ ॥
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥
आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी ॥
तरी हे प्रजा कैसेनि । निस्तरेल ॥ १६६ ॥
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी ।
ते लौकिक स्थिती अवघी । नासिली होईल ॥ १६७ ॥
म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते ।
तेणे सविशेषें कर्मातें । त्यजावे ना ॥ १६८ ॥
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत ।
कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोग्रहम् ॥ २५ ॥
देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा ।
कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥
जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था ।
रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥ १७० ॥
मार्गाधारे वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें ।
अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ।
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥ २६ ॥
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।
म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥
तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता ।
न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥ १७३ ॥
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।
नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥ १७४ ॥
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगी ।
तो कर्मबंधु आंगी । वाजेलना ॥ १७५ ॥
जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनीं ।
परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥ २७ ॥
देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे ।
तरी सांगे कां न दाटिजे । धनुर्धरा ॥ १७७ ॥
तैसी शुभाशुभें कर्में । जिये निफजति प्रकृतिधर्में ।
तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ ।
तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥
हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित ।
तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पां ॥ १८० ॥
तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥
जे तत्वज्ञियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं ।
जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी ।
साक्षिभूत होऊनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥
म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती ।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥ २९ ॥
एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे ।
प्रकृतिचेनि आटोपें । वर्ततु असे ॥ १८४ ॥
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें ।
तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्ज्वरः ॥ ३० ॥
परी उचिते कर्में आघवीं । तुवा आचरोनि मज अर्पावीं ।
परी चित्तवृत्ती न्यासावी । आत्मरूपीं ॥ १८६ ॥
हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था ।
ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगो देसी ॥ १८७ ॥
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।
मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं ।
देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥
जगीं कीर्ती रूढवीं स्वधर्माचा मानु वाढवीं ।
मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥ १९० ॥
आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देईं ।
एथ हें वांचूनि कांही । बोलों नये ॥ १९१ ॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरे स्वीकारिजे ।
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ १९२ ॥
तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पां कर्मरहितु ।
म्हणोनि हें निश्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥
ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥
नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रियां लळा देऊनी ।
जे हें माझे मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती ।
कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥
ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले ।
अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
देखें शवाचां हातीं दिधलें । जैसे कां रत्न वायां गेलें ।
नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।
मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥
तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था ।
तयांसी संभाषण सर्वथा । करावे ना ॥ १९९ ॥
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती ।
सांगे पतंग काय साहती । प्रकाशातें ॥ २०० ॥
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण ।
तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ २०१ ॥
सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥
म्हणोनि इंद्रिये एकें । जाणतेनि पुरुखें ।
लाळावीं ना कौतुकें । आदिकरूनि ॥ २०२ ॥
हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल ।
सांगे हाळाहाळ जिरेल । सेविलिया ॥ २०३ ॥
देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ।
तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥
एर्‍हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।
कां नाना भोगरचना । मेळवावी ॥ २०५ ॥
आपण सायासेंकरूनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें ।
उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावे कां ॥ २०६ ॥
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें ।
तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें । पोखावें काई ॥ २०७ ॥
मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा ।
ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥
म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण ।
यालागी एथ अंतःकरण । देयावें ना ॥ २०९ ॥
इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ ॥ ३४ ॥
एर्‍हवीं इंद्रियाचियां अर्था – । सारिखा विषयो पोखितां ।
संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥ २१० ॥
परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक स्वस्थु ।
जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ २११ ॥
बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता ।
परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी ॥ २१२ ॥
देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे ।
जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥ २१३ ॥
परी तयामाजि गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये ।
तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ २१४ ॥
तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा कीजेल ।
तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥ २१५ ॥
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी ।
आणि मृगातें बुद्धीं । साधावया ॥ २१६ ॥
एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे ।
पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥ २१७ ॥
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा ।
एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ॥ २१८ ॥
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥
अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥ २१९ ॥
येरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा ।
परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥
सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वाने आहाति बरवीं ।
तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥
हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे ।
अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥
तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें ।
असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ॥ २२३ ॥
हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली ।
तरी भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २२४ ॥
तेवीं आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु ।
तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥ २२५ ॥
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध ।
परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपें केवीं ॥ २२६ ॥
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल ।
जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥ २२७ ॥
म्हणोनि आणिकांसी जे विहीत । आणि आपणपेयां अनुचित ।
तें नाचरावे जरी हित । विचारिजे ॥ २२८ ॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता ।
तोहि निका वर उभयतां । दिसतसे ॥ २२९ ॥
ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी ।
तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥
हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें ।
परि पुसेन कांही आपुले । अपेक्षित ॥ २३१ ॥
अर्जुन उवाच: अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थितीही भ्रंशे ।
मार्ग सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥ २३२ ॥
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती ।
तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ॥ २३३ ॥
बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा ।
नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥ २३४ ॥
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करिता न धाती ।
वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५ ॥
आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती ।
परी बलात्कारे सुइजती । तयाचिमाजी ॥ २३६ ॥
जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं ।
चुकविती ते गिंवसी । तयातेंचि ॥ २३७ ॥
ऐस बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे ।
हें बोलावे हृषिकेशें । पार्थु म्हणे ॥ २३८ ॥
श्रीभगवानुवाच: काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥
तंव हृदयकमळारामु । जो योगियांचा निष्कामकामु ।
तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥ २३९ ॥
तरी हे कम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं ।
हें कृतांताचां ठायीं । मानिजती ॥ २४० ॥
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ ।
भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥ २४१ ॥
हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड ।
यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि ॥ २४२ ॥
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे ।
धायपण ययांचे । अविद्या केले ॥ २४३ ॥
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले ।
तेणें निजपद यां दिधले । प्रमादमोह ॥ २४४ ॥
हे मृत्यूचां नगरीं । मानिजति निकियापरी ।
जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥ २४५ ॥
जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा ।
कुळवाडी यांची आशा । चाळित असे ॥ २४६ ॥
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चौदा भुवनें थेंकुटीं ।
तें भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥
जे लोकत्रयाचें भातुके । खेळताचि खाय कवतिकें ।
तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥ २४८ ॥
हें असो मोहे मानिजे । यांते अहंकार घेपे दीजे ।
जेणे जग आपुलेनि भोजें । नाचवित असे ॥ २४९ ॥
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला ।
तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥
साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली ।
तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥ २५१ ॥
इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली ।
जितया मान मोडिली । उपशमाची ॥ २५२ ॥
इहीं संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले ।
आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥ २५३ ॥
इहीं बोधाची रोपे लुंचिली । सुखाची लिपी पुसली ।
जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥ २५४ ॥
हे आंगा तव घडले । जीवींचि आथी जडले ।
परी नातुडती गिंवसले । ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥
हें चैतन्याचे शेजारी । वसती ज्ञानाचां एका हारीं ।
म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥ २५६ ॥
हें जळेंवीण बुडविती । आगीविण जाळिती ।
न बोलता कवळिती । प्राणियांते ॥ २५७ ॥
हे शस्त्रेविण साधिती । दोरेविण बांधिती ।
ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनि ॥ २५८ ॥
चिखलेंवीण रोविती । पाशिकेंवीण गोंविती ।
हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणें ॥ २५९ ॥
धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळीं ।
ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥ २६० ॥
कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु ।
जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥ २६१ ॥
तैसें इहीविण एकलें । आम्हीं ज्ञान नाही देखिलें ।
जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥ २६२ ॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥ ३९ ॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध ।
म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥ २६३ ॥
आधी यांते जिणावें । मग तें ज्ञान पावावें ।
तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥ २६४ ॥
यांते साधावयालागी । जें बळ जाणिजे अंगी ।
तें इंधन जैसें आगी । सावावो होय ॥ २६५ ॥
इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥
तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे ।
म्हणोनि हटियांते जिणिजे । इहींचि जगीं ॥ २६६ ॥
ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला ।
तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥
तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥ ४१ ॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें ।
आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव ॥ २६८ ॥
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल ।
इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥ २६९ ॥
एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३ ॥
हें अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले ।
जैसें रश्मीवीण उरले । मृगजळ नाही ॥ २७० ॥
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें ।
मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥ २७१ ॥
जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं ॥ २७२ ॥
ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो ।
राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥ २७३ ॥
आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु ।
सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥ २७४ ॥
तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु ।
येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा ।
मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा ॥ २७६ ॥

Explore More