Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 10

(Shri Shiv Leelamrut Adhyay 10)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 10 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 10. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 150
श्रीगणेशाय नमः ॥
कामगजविदारकपंचानना । क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ।
मदतमहारका चंडकिरणा । चंद्रशेखरा वृषभध्वजा ॥ १ ॥
मत्सरदुर्धरविपिनदहना । दंभनगच्छेदका सहस्रनयना ।
अहंकारअंधकासुरमर्दना । धर्मवर्धना भालनेत्रा ॥ २ ॥
आनंदकैलासनगविहारा । निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा ।
दक्षमखदलना आनंदसमुद्रा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ ३ ॥
नवमाध्यायाचे अंती । उद्धरिला शबर सिंहकेतनृपती ।
यावरी सूत शौनकादिकांप्रती । नैमिषारण्यी सांगत ॥ ४ ॥
आनर्तदेशी वास्तव्य करीत । एक द्विज नामे देवरथ ।
वेदाध्ययनी शास्त्ररत । पंडित आणि वंशज होय ॥ ५ ॥
त्याची कन्या चातुर्यखाणी । शारदानामे कमलनयनी ।
जिचे स्वरूप देखोनी । जन होती तटस्थ ॥ ६ ॥
तव ते झाली द्वादशवर्षी । पित्याने लग्न करूनि संभ्रमेसि ।
पद्मनाभ द्विजासी । देता झाला विधियुक्त ॥ ७ ॥
तोही परम अधीत ब्राह्मण । सभाग्य आणि वेदसंपन्न ।
जयाची विद्या पाहोन । राजे होती तटस्थ ॥ ८ ॥
लग्नसोहळा जाहलियावरी । काही दिवस होता श्वशुरघरी ।
सायंकाळी नदीतीरी । संध्यावंदनासी तो गेला ॥ ९ ॥
परतोन येता अंधार । पायास झोंबला दुर्धर विखार ।
तेथेच पडिले कलेवर । नगरात हाक जाहली ॥ १० ॥
मातापितासमवेत । शारदा धावोनि आली तेथ ।
गतप्राण देखोनि प्राणनाथ । शरीर घालीत धरणीवरी ॥ ११ ॥
म्हणे विद्याधनाचे सतेज । आजि बुडाले माझे जहान ।
वोस पडली सेज । बोलो गुज कोणासी ॥ १२ ॥
माझे बुडाले भांडार । सर्परूपे वरी पडला तस्कर ।
दग्ध झाली आभरणे समग्र । म्हणोनि टाकी तोडोनिया ॥ १३ ॥
देखोनि शारदेची करुणा । अश्रु आले जनांचियां नयना ।
म्हणती अहा पशुपते भाललोचना । हे आता करील काय ॥ १४ ॥
मग त्या विप्राचे करूनि दहन । माता पिता बंधु आप्त जन ।
शारदेस संगे घेऊन । सदनाप्रती गेले ते ॥ १५ ॥
कित्येक दिवस जाहलियावरी । घरची कार्यास गेली बाहेरी ।
शारदा एकली मंदिरी । तव एक अपूर्व वर्तले ॥ १६ ॥
नैधृव नामे ऋषीश्वर । वृद्ध तपस्वी गेले नेत्र ।
शिष्य हाती धरोनि पवित्र । सदना आला शारदेच्या ॥ १७ ॥
शारदा आसन देऊनि सत्वर । पूजन करोनि करी नमस्कार ।
नैधृव म्हणे सौभाग्य वाढो अपार । हो तुज पुत्र वेदवक्ता ॥ १८ ॥
विप्रास न दिसे केवळ अंध । अमोघ वदला आशीर्वाद ।
हासोनि शारदा करी खेद । शोक करी दुःखभरे ॥ १९ ॥
म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण । सांगितले पूर्ववर्तमान ।
नैधृव म्हणे माझे वचन । असत्य नोहे कल्पांती ॥ २० ॥
माझे जिव्हेबाहेर आले । ते माघारे न सरे कदाकाळे ।
माझे तपानुष्ठान वेगळे । अघटित तेचि घडवीन ॥ २१ ॥
घरींची बाहेरूनि आली त्वरित । माता पिता बंधु समस्त ।
समूळ कळला वृत्तान्त । म्हणती विपरीत केवि घडे ॥ २२ ॥
ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र । क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र ।
शापे न लगता क्षणमात्र । कुळासहित संहारित ॥ २३ ॥
शापबळेचि विशेष । सर्प केला राजा नहुष ।
यादवकुळ निःशेष । भस्म झाले ब्रह्मशापे ॥ २४ ॥
ब्राह्मणी क्षोभोनि निर्धारी । शक्राची संपत्ति घातली सागरी ।
ब्रह्मशापे मुरारी । अंबऋषीचे जन्म घेत ॥ २५ ॥
विधिहरिहर चित्ती । ब्रह्मशापाचे भय वाहती ।
विप्रशापे राव परीक्षिती । भस्म झाला क्षणार्धे ॥ २६ ॥
जमदग्नीचा क्रोध परम । चौघे पुत्र केले भस्म ।
स्त्रिया असता पांडुराजसत्तम । भोग नाही सर्वदा ॥ २७ ॥
विप्रशापाची नवलगती । साठ सहस्र सगर जळती ।
कुबेरपुत्र वृक्ष होती । नारदशापेकरोनिया ॥ २८ ॥
कृष्णासहित यादवकुळ । ब्रह्मशापे भस्म झाले सकळ ।
दंडकाऐसा नृपाळ । क्षणमात्रे दग्ध केला ॥ २९ ॥
ब्रह्मशाप परम दृढ । नृगराज केला सरड ।
धराधरशत्रु बळ प्रचंड । सहस्र भगे त्या अंगी ॥ ३० ॥
क्षयरोगी केला अत्रिनंदन । मेदिनीवसनाचे केले आचमन ।
शाप देवोनि सूर्यनंदन । दासीपुत्र केला पै ॥ ३१ ॥
पाषाणाचे करिती देव । रंकाचेही करिती राव ।
मंत्राक्षता टाकिता नवपल्लव । कोरड्या काष्ठा फुटेल की ॥ ३२ ॥
ब्राह्मण थोर त्रिजगती । हे ब्रह्मांड मोडोनि पुन्हा घडती ।
यावरी नैधृव तियेप्रती । बोलता झाला ते ऐका ॥ ३३ ॥
म्हणे ऐके शारदे यथार्थ । तू धरी उमामहेशव्रत ।
षडक्षर मंत्र विधियुक्त । नित्य जप करावा ॥ ३४ ॥
म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण । तंववरी मी येथेचि राहीन ।
मग त्याच्या अंगणात मठ करून । राहता झाला नैधृव तो ॥ ३५ ॥
म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी । करावा जाण चैत्रमासी ।
अथवा मार्गशीर्षेसी । शुद्धपक्षी करावा ॥ ३६ ॥
पाहोनि सुमुहूर्त सोमवार । अष्टमी चतुर्दशी परिकर ।
पूजावा उमामहेश्वर । एक संवत्सर नेमेसी ॥ ३७ ॥
गुरुवचन शारदा ऐकोन । तैसेच करी न पडे न्यून ।
नैधृवगुरूपासून । षडक्षर मंत्र घेतला ॥ ३८ ॥
दिव्य शिवमंदिर करून । वरी दिधले शुभ्रवितान ।
चारी स्तंभ शोभायमान । नानाफळे शोभताती ॥ ३९ ॥
अष्टगंधे सुवाससुमने । भूमि शोधूनि रंगमाळा आस्तरणे ।
षोडशवर्ण यंत्रकरणे । अष्टदळे तयामाजी ॥ ४० ॥
तयामाजी चतुर्दळ । त्यावरी घालोनि तांदुळ ।
वरी घट स्थापून अढळ । शोभा बहुत आणिजे ॥ ४१ ॥
उमामहेश प्रतिमा दोन्ही । स्थापिजे सुवर्णाच्या करोनी ।
मग एकनिष्ठा धरूनी । षोडशोपचारी पूजिजे ॥ ४२ ॥
यथासांग ब्राह्मण-संतर्पण । सुवासिनी पूजिजे प्रीतीकरून ।
षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी ॥ ४३ ॥
पुराणश्रवण कीर्तन । येणेच करावे जागरण ।
गुरुवचनी विश्वास पूर्ण । धरूनि वर्तणे सर्वदा ॥ ४४ ॥
कुंदेंदुवर्ण केवळ । कर्पूरगौर पयःफेनधवल ।
ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ । रजतवर्ण निर्मळ जो ॥ ४५ ॥
सूर्यकोटिसम तेज विराजित । शुभ्र आभरणी भूषित ।
जगदानंदकंद गुणातीत । स्वधुनी विराजित मस्तकी ॥ ४६ ॥
शुभ्र जटामुकुटमंडित । सर्प मणियुक्त विराजित ।
किशोरचंद्र भाळी मिरवत । भस्मचर्चित शुभ्र दिसे ॥ ४७ ॥
उन्मीलित भाललोचन । केयूरांगद शुभ्र वीरकंकण ।
मुंडमाळा शोभायमान । दिसती लोचन सूर्येंदुवत ॥ ४८ ॥
दिव्य गरुडपाचूहूनि वरिष्ठ । विराजमान दिसे नीलकंठ ।
दशभुज आयुधे सघट । झळकती प्रळयचपळेऐसी ॥ ४९ ॥
खट्वांग त्रिशूळ कपाल डमरू । अंकुश पाश घंटा नागधरू ।
पिनाक पाशुपत कमल तेजाकारू । शुभ्रवर्ण आयुधे ॥ ५० ॥
शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन । शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन ।
मणिमय शुभ्र सिंहासन । नाना रत्ने विराजित ॥ ५१ ॥
कैलासगिरी शुभ्रवर्ण । वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन ।
स्तंभविरहित सहस्रकिरण । गगनी जेवी प्रकाशे पै ॥ ५२ ॥
ऐरावताहूनि विशाळ शुभ्र । पुढे शोभे नंदिकेश्वर ।
मणिमय कुंडले सुंदर । शेष तक्षक झळकती ॥ ५३ ॥
ब्रह्मानंदसुख मुरोन । ओतिले शिवस्वरूप सगुण ।
आता भवानीचे ध्यान । शारदा ध्यानी आणीत ॥ ५४ ॥
बाला तन्वंगी सुंदर । विराजमान चंद्रशेखर ।
चतुर्भुज पाशांकुशधर । गदापद्मयुक्त जे ॥ ५५ ॥
सुरतरुसुमनमालायुक्त । मल्लिकाबकुळ कमळी विराजित ।
इभमुक्तावतंस डोलत । शोभा अद्भुत कोण वर्णी ॥ ५६ ॥
हरिमध्या भुजंगवेणी । जलजवदना आकर्णनयनी ।
द्वादशादित्यशोभा जघनी । कांची वरी झळकतसे ॥ ५७ ॥
मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत । निःसीमरूपलक्षणयुक्त ।
ओवाळूनि टाकाव्या समस्त । तीच्या पादांगुष्ठावरूनी ॥ ५८ ॥
कोटिमन्मथशोभा साजिरी । त्रिभुवनजननी त्रिपुरसुंदरी ।
ब्रह्मांड फोडोनिया वरी । आगीचा सुवास धावत ॥ ५९ ॥
पदमुद्रा जेथे उमटती । तेथे आरक्त कमळे उगवती ।
द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती । खडे होती दिव्यमणी ॥ ६० ॥
या ब्रह्मांडमंडपात देख । ऐसे स्वरूप नाही आणिक ।
शशि मित्र द्विमुख । जिच्या तेजे शोभती ॥ ६१ ॥
विधिशक्रादि बाळे अज्ञान । स्नेहे निजगर्भी करी पाळण ।
समस्त त्रिभुवन लावण्य । ओतिले स्वरूप देवीचे ॥ ६२ ॥
विशाळ ताटंके प्रभाघन । ओतिली शशिमित्रतेज गाळून ।
गंडस्थळी प्रभा पूर्ण । पडली झळके अत्यंत ॥ ६३ ॥
बिंबाधर अतिरिक्त । नासिकीचे वरी डोलता मुक्त ।
प्रवाळचि केवळ भासत । तेज अमित न वर्णवे ॥ ६४ ॥
नेत्रांजनप्रभा पडली मुक्तशिरी । तो गुंजेऐसे दिसे क्षणभरी ।
जगन्माता हास्य करी । तो रंग दिसे शुभ्र मागुती ॥ ६५ ॥
ओळीने बैसल्या हंसपंक्ती । तैसे द्विज हासता झळकती ।
मुक्त शुभ्रवर्ण मागुती । हैमवतीचे झळकती ॥ ६६ ॥
दंतपंक्ती शुभ्र अत्यंत । अधरप्रभेने आरक्त भासत ।
डाळिंबबीज पक्व शोभत । क्षणैक तैसे दीसती ॥ ६७ ॥
कंठीचे मुक्ताहार संपूर्ण । दिसती इंद्रनीळासमान ।
श्यामलांगप्रभा देदीप्यमान । मुक्तांमाजी बिंबली ॥ ६८ ॥
कमंडलु तेजस्वी सुंदर । तेवी विश्वजननीचे पयोधर ।
कुमार आणि इभवक्त्र । ज्यांतील अमृत प्राशिती ॥ ६९ ॥
प्रळयचपळा गाळोनि समग्र । रंगविले वाटे देवीचे अंबर ।
मुक्तालग कंचुकी प्रभाकर । बाहुभूषणे झळकती ॥ ७० ॥
इंद्रनील कीलवर्णी । लीलावेषधारिणी ।
भक्तानुग्रहकारिणी । प्रलयरूपिणी आदिमाता ॥ ७१ ॥
आदिपुरुषाची ज्ञानकळा । घडी मोडी ब्रह्मांडमाळा ।
जिचे स्वरूप पाहता डोळा । जाश्वनीळा धणी न पुरे ॥ ७२ ॥
कृत्तिकापुंज झळके गगनी । तैसे जलजघोस डोलती कर्णी ।
अरुणसंध्यारागा उणे आणी । कुंकुमरेखा आरक्तपणे ॥ ७३ ॥
विश्वप्रलयी शिव सगुणपण । टाकोनि होता तत्काळ निर्गुण ।
परी तिचे सौभाग्य गहन । ताटंककुंकुममहिमा हा ॥ ७४ ॥
दोन वेळा वरिले कर्पूरगौरा । भवानीने लाविला कपाळी बिजवरा ।
तांबूलरेखांकित वदनचंद्रा । अपार कवि वर्णिती ॥ ७५ ॥
प्रयागी त्रिवेणी जैसी । अंबेची वेणी शोभे तैसी ।
कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी । आदित्यनंदिनी होय ते ॥ ७६ ॥
शुभ्र हार गुंफिला दिव्यसुमनी । तेचि ब्रह्मांडावरूनि स्वर्धुनी ।
माजी आरक्तपुष्पे दिसती नयनी । पद्मजनंदिनी गुप्त ते ॥ ७७ ॥
मूदराखडी मच्छकच्छादि अलंकार । हे प्रयागी तळपती जळचर ।
केशाग्रीं गुच्छ विशाळ थोर । सागराकार शोभती ॥ ७८ ॥
काये ब्रह्मांडे गुंफिली सकळ । तेचि डोलत मोहनमाळ ।
जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ । आवरोनि धरिले दोन पक्षी ॥ ७९ ॥
अक्षय सौभाग्य नव्हे खंडन । म्हणून वज्रचूडमंडित कर जाण ।
दशांगुळी मुद्रिका बंधु जनार्दन । दशावतार नटलासे ॥ ८० ॥
पायी नेपुरे पैंजण । गर्जता शिव समाधि विसरून ।
पाहे मुखचंद्र सावधान । नेत्रचकोरेकरूनिया ॥ ८१ ॥
भक्ते जे का एकनिष्ठ । पायी दोल्हारे जोडवी अनुवट ।
ऐसे स्वरूप वरिष्ठ । शारदा ध्यात ब्रह्मानंदे ॥ ८२ ॥
ऐसे एक संवत्सरपर्यंत । आचरली उमामहेश्वरव्रत ।
नैधृव उद्यापन करवीत । यथाविधिप्रमाणे ॥ ८३ ॥
अकरा शते दंपत्य । वस्त्रअलंकार दक्षिणायुक्त ।
पूजोनि शारदा हर्षभरित । तव रवि अस्त पावला ॥ ८४ ॥
जप ध्यान कीर्तन करीत । शारदा गुरुजवळी बैसत ।
अर्धयामिनी झालिया अकस्मात । भवानी तेथे प्रगटली ॥ ८५ ॥
असंभाव्य तेज देखोनि । नैधृवासी नेत्र आले तेच क्षणी ।
नैधृव शारदा लागती चरणी । प्रेमभावे करूनिया ॥ ८६ ॥
देवीचे करिती स्तवन । उभे ठाकती कर जोडून ।
परी त्या दोघावाचून । आणिक कोणी न देखती ॥ ८७ ॥
जय जय भवानी जगदंबे । मूळप्रकृति प्रणवस्वयंभे ।
ब्रह्मानंदपददायिनी सर्वारंभे । चिद्विलासिनी तू माये ॥ ८८ ॥
धराधरेंद्रनंदिनी । सौभाग्यसरिते हेरंबजननी ।
भक्तहृदयारविंदचिन्मयखाणी । वेदपुराणी वंद्य तू ॥ ८९ ॥
तुझिये कृपे निश्चिती । गर्भांधासी नेत्र येती ।
मागे सांडून पवनगती । पांगुळ धावती कृपे तुझ्या ॥ ९० ॥
मुके होती वाचाळ । मूर्ख पंडित होती तत्काळ ।
रत्ने होती सिकताहरळ । गारा होती चिंतामणी ॥ ९१ ॥
भवभयहारके भवानी । भक्तपालके मनोल्हासिनी ।
वेदमाते द्विजजनरंजनी । वेधले ध्यानी ब्रह्मादिक ॥ ९२ ॥
त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी । दोषत्रयहारके त्रितापशमनी ।
त्रिकाळ जे सादर तव ध्यानी । त्रिदेहविरहित ते ॥ ९३ ॥
शिवमानससरोवरमराळिके । जय जय विज्ञानचंपककळिके ।
सकळ ऐश्वर्यकल्याणदायके । सर्वव्यापके मृडानी ॥ ९४ ॥
ऐसे ऐकता सुप्रसन्न । देवी म्हणे माग वरदान ।
नैधृवे वृत्तांत मुळीहून । शारदेचा सांगितला ॥ ९५ ॥
मम मुखांतून वचन आले । ते अंबे पाहिजे सत्य केले ।
तुवा जरी मनी धरिले । तरी काय एक न करिसी ॥ ९६ ॥
यावरी शिवजाया बोले वचना । हे शारदा पूर्वी शुभानना ।
द्रविडदेशी विप्रकन्या । नाम भामिनी इयेचे ॥ ९७ ॥
इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी । ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी ।
इणे वर वश करोनी । वडील कामिनी विघडविली ॥ ९८ ॥
शेजारी एक जार होता । तो ईस बहुत दिवस जपत असता ।
एकान्त पाहोनि इच्या हाता । धरिता झाला दुर्बुद्धी ॥ ९९ ॥
इणे नेत्र करोनि आरक्त । झिडकारिला तो जार पतित ।
मग तो होवोनि खेदयुक्त । गृहासी गेला दुरात्मा ॥ १०० ॥
इचे त्यास लागले ध्यान । सुरत आलिंगन आठवून ।
इच्या ध्यासेकरून । तो जार मृत्यु पावला ॥ १०१ ॥
ईस विधवा हो म्हणून । इच्या सवतीने शापिले दारुण ।
मग तीही पावली मरण । इच्या दुःखेकरूनिया ॥ १०२ ॥
मग हेही काळे मृत्यु पावली । तेचि शारदा हे जन्मली ।
पूर्वीच्या जारे ईस वरिली । ये जन्मी जाण निधरे ॥ १०३ ॥
तोचि पद्मनाभ ब्राह्मण । गेला इसी दावा साधून ।
इचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण । द्रविडदेशी आहे आता ॥ १०४ ॥
तीनशेसाठ योजन । येथोनि दूर आहे तो ब्राह्मण ।
स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून । तळमळीत सर्वदा ॥ १०५ ॥
तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन । भोग देईल प्रीतीकरून ।
जागृतीहूनि विशेष जाण । सुख होईल इयेते ॥ १०६ ॥
ऐसे लोटता बहुत दिवस । पुत्र एक होईल शारदेस ।
शारदानंदन नाम तयास । लोकी विख्यात जाण पा ॥ १०७ ॥
ईस नित्यभोगी होईल जो हरिख । तैसाच विप्र पावेल सुख ।
स्वप्नानंदे विशेष देख । तृप्ति होईल निर्धारे ॥ १०८ ॥
ऐसे तयासी सांगोन । अंबा पावली अंतर्धान ।
त्यावरी शारदा नित्य स्वप्न । देखती झाली तैसेचि ॥ १०९ ॥
तव ती झाली गरोदर । जन निंदा करिती समग्र ।
दीर भावे सासू श्वशुर । आप्त सोयरे सर्व आले ॥ ११० ॥
देवीचे करणे अघटित । खदखदा जन हासत ।
म्हणती हे केवी घडे विपरीत । अंबा ईस भेटली कधी ॥ १११ ॥
एक म्हणती कर्ण नासिक छेदून । बाहेर घाला खरारोहण करून ।
तो आकाशवाणी बोले गर्जोन । सत्य गर्भ शारदेचा ॥ ११२ ॥
जन परम अमंगळ । म्हणती हे कापट्यवाणी सकळ ।
त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ । वदता झाला ते ऐका ॥ ११३ ॥
ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र । अघटित घडवी निर्धार ।
स्तंभेवीण धरिले अंबर । कुंभिनी तरे जळावरी ॥ ११४ ॥
ग्रहगण भगणे विधु मित्र । यास आहे कोणाचा आधार ।
सर्वदेही व्यापक परमेश्वर । परी शोधिता ठायी न पडे ॥ ११५ ॥
परस्परे पंचभूतांसी वैर । ती एकरूपे चालती कौतुक थोर ।
जननीगर्भी जीव समग्र । रक्षितो कैसा पहा हो ॥ ११६ ॥
काय एक न करी जगन्नाथ । राजा पूर्वी यूपकेत ।
त्याचे जळी पडले रेत । ते जळ प्राशीत वेश्या एक ॥ ११७ ॥
तितुकेनि झाली ते गर्भिणी । पुत्र प्रसवली उत्तम गुणी ।
विभांडकाचे रेत जळी पडोनी । ते जळ हरिणी प्राशीत ॥ ११८ ॥
तोचि झाला ऋषिश्रृंगी । तेणे ख्याती केली दशरथयागी ।
सौराष्ट्रराजा स्पर्शता करे मृगी । दिव्य पुत्र प्रसवली ॥ ११९ ॥
सत्यवती मत्स्यगर्भसंभूत । तो मत्स्य राजपुत्र होत ।
महिषासुर दैत्य । महिषीगर्भी जन्मला ॥ १२० ॥
कित्येक ऋषि करुणावंत । वचनमात्रे गर्भ रहात ।
रेवतीरमण जन्मत । रोहिणीपोटी कैसा पा ॥ १२१ ॥
सांबाचे पोटी मुसळ झाले । ते कोणी कैसे घातले ।
कुंतीपोटी पांडव जन्मले । पांच देवासमागमे ॥ १२२ ॥
ऐसे बोलती वृद्धजन । तरी निंदा करिती दुर्जन ।
मागुती देववाणी झाली पूर्ण । ऐका वचन मूर्ख हो ॥ १२३ ॥
शारदेस कोणी असत्य म्हणती । तरी जिव्हा चिरोनि किडे पडती ।
ऐसे ऐकता सात्त्विक सुमती । सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ॥ १२४ ॥
कित्येक दुर्जन पुन्हा बोलत । हे सर्वही कापट्य असत्य ।
तो जिव्हा चिरोनि अकस्मात । किडे गळो लागले ॥ १२५ ॥
हे देखोनि सर्व जन । शारदेसी घालिती लोटांगण ।
म्हणती माते तू सत्य पूर्ण । जानकीरेणुकेसारखी ॥ १२६ ॥
मग तीस पुत्र झाला सतेज । लोक म्हणती शारदात्मज ।
वाढत जैसा द्विजराज । शुद्धद्वितीये पासूनी ॥ १२७ ॥
उपनयन झालिया पूर्ण । आठवे वर्षी वेदाध्ययन ।
चारी वेद षट्शास्त्र जाण । मुखोद्गत पुराणे ॥ १२८ ॥
नवग्रहांत जैसा वासरमणी । तेवी पंडितांत अग्रगणी ।
जेणे अनुष्ठाने पिनाकपाणी । प्रसन्न केला सर्वस्वे ॥ १२९ ॥
यावरी शारदा पुत्रसमवेत । लक्षुनि शिवरात्रिव्रत अद्भुत ।
गोकर्णक्षेत्राप्रति जात । यात्रा बहुत मिळाली ॥ १३० ॥
तो द्रविडदेशीचा ब्राह्मण । तोही आला यात्रेलागून ।
परस्परे पाहून । कष्टी होती अंतरी ॥ १३१ ॥
परस्परा कळली खूण । पूर्वी देवी बोलिली वचन ।
उमामहेश्वरव्रताचे पुण्य । अर्ध देई पतीसी ॥ १३२ ॥
पुत्र देई त्याचा त्यास । तू त्यापासी राहे चार मास ।
समागम न करी निःशेष । शिवपदासी पावसी ॥ १३३ ॥
मग शिवरात्रियात्रा करून । भ्रतारासी केले नमन ।
म्हणे हा घ्या आपुला नंदन । म्हणोनि करी दिधला ॥ १३४ ॥
उमामहेश्वरव्रत । त्याचे अर्धपुण्य देत ।
मग शारदा सवे जात । द्रविडदेशाप्रती तेव्हा ॥ १३५ ॥
शारदा व्रतस्थ पूर्ण । दुरून पतीचे घे दर्शन ।
विख्यात झाला शारदानंदन । महापंडित पृथ्वीवरी ॥ १३६ ॥
तप आचरला अपार । मातृपितृभजनी सादर ।
माता भवानी पिता शंकर । हेचि भावना तयाची ॥ १३७ ॥
जो न करी जनकजननीचे भजन । धिक् त्याचे तप ज्ञान ।
धिक विद्या धिक थोरपण । धिक भाग्य तयाचे ॥ १३८ ॥
घरी साठवी स्त्रियेचे गोत । आणि मायबापा शिणवीत ।
अन्न नेदी बाहेर घालीत । शब्दबाणे हृदय भेदी ॥ १३९ ॥
तो जरी पढला षट्शास्त्र । परी अनामिकाहुनि अपवित्र ।
तयाचे न पहावे वक्त्र । विटाळ कदा न व्हावा ॥ १४० ॥
यद्यपि झाला स्पर्श जाण । तरी करावे सचैल स्नान ।
महादोषी तो कृतघ्न । यम दारुण गांजीत ॥ १४१ ॥
यावरी शारदेचा भ्रतार । महातपस्वी योगीश्वर ।
शरीर ठेवोनि परत्र । पावला तो शिवपदा ॥ १४२ ॥
शारदाही चिंतून मदनदहन । करी विधियुक्त सहगमन ।
पतिसमवेत कैलासभुवन । पावोनि सुखे राहिली ॥ १४३ ॥
शिवलीलामृत सुरस पूर्ण । किंवा हे दिव्य रसायन ।
भवरोगी सेविता जाण । आरोग्य होऊनी शिव होती ॥ १४४ ॥
जे मृत्यूने कवळिले सहज । त्यांसी नावडे हा रसराज ।
ज्यांची सुकृते तेजःपुंज । तेचि अधिकारी येथीचे ॥ १४५ ॥
ब्रह्मानंदे श्रीधर । श्रोतया विनवी जोडोनि कर ।
शिवलीलामृत निर्जर । तुम्ही सेवा आदरे ॥ १४६ ॥
पुढील अध्यायी सुरस कथा । पावन होय श्रोता वक्ता ।
मृडानीसहित शिव तत्त्वता । पाठी राखी सर्वार्थी ॥ १४७ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । दशमाध्याय गोड हा ॥ १४८ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More