Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 8

(Shri Shiv Leelamrut Adhyay 8)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 8 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 8. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 154
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती । वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती ।
शिवयोगिरूपे भद्रायूप्रती । अगाध नीती प्रगटविली ॥ १ ॥
तुझिया बळे विश्वव्यापका । सूत सांगे शौनकादिकां ।
भद्रायूसी शिवकवच देखा । श्रीगुरूने शिकविले ॥ २ ॥
मृत्युंजयमंत्र उत्तम । सर्वांगी चर्चिले भस्म ।
रुद्राक्षधारण सप्रेम । करी भद्रायुबाळ तो ॥ ३ ॥
एक शंख उत्तम देत । ज्याच्या नादे शत्रू होती मूर्च्छित ।
खड्ग दिधले अद्भुत । त्रिभुवनांत ऐसे नाही की ॥ ४ ॥
ते शस्त्र शत्रूते दावितां नग्न । जाती एकदाच भस्म होऊन ।
द्वादशसहस्र इभबळ गहन । तत्काळ दिधले कृपेने ॥ ५ ॥
देणे शिवाचे अद्भुत । म्हणे होई ऐश्वर्यवंत ।
आयुरारोग्य विख्यात । सर्व रायांत श्रेष्ठ तू ॥ ६ ॥
चिरकाल विजयी होऊनी । संतोषरूपे पाळी मेदिनी ।
निष्काम दाने करूनी । माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष ॥ ७ ॥
भाग्यलक्ष्मी असो तव सदनी । भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभुवनी ।
दानलक्ष्मी येवोनी । करकमळी राहो सदा ॥ ८ ॥
सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य । दोर्दंडीं वीरलक्ष्मी उत्तम ।
दिगंतरी कीर्ति परम । सर्वदाही वसो तुझी ॥ ९ ॥
शत्रुलक्ष्मी खड्गाग्री वसो । साम्राज्यलक्ष्मी सदा असो ।
विद्यालक्ष्मी विलसो । सर्वदाही तुजपासी ॥ १० ॥
ऐसे शिवयोगी बोलोन । तेथेच पावला अंतर्धान ।
भद्रायु सुमती गुरुचरण । सर्वदाही न विसंबती ॥ ११ ॥
इकडे भद्रायूचा पिता निरूती । दाशार्हदेशींचा नृपती ।
वज्रबाहु महामती । शत्रु त्यावरी पातले ॥ १२ ॥
मगधदेशाधिपति हेमरथ । तेणे देश नागविला समस्त ।
धन धान्य हरूनि नेत । सर्व करीत गोहरण ॥ १३ ॥
स्त्रिया पुरुष धरोनि समस्त । बळे नेऊनि बंदी घालीत ।
मुख्य राजग्राम वेष्टित । बाहेर निघत वज्रबाहु ॥ १४ ॥
युद्ध झाले दशदिनपर्यंत । हा एकला शत्रु बहुत ।
मग त्यासी धरोनियां जित । रथी बांधिती आकर्षोनी ॥ १५ ॥
वज्रबाहूचे अमात्य धरोन । तेही चालविले बांधोन ।
सर्व ग्रामप्रजा लुटून । राजस्त्रिया धरियेल्या ॥ १६ ॥
ऐसे हरोनि समस्त । घेवोनि चालिला हेमरथ ।
वज्रबाहु सचिवांसहित । मागे पुढे पाहतसे ॥ १७ ॥
पुत्र ना बंधु आम्हांस । कोण कैवारी या समयास ।
आम्ही पहावी कवणाची आस । सोडवील कोण दुःखार्णवी ॥ १८ ॥
तो समाचार कळला भद्रायूसी । की शत्रु नेती पितयासी ।
गुरुस्मरण करून मानसी । अंगी कवच लेइले ॥ १९ ॥
मृत्युंजयमंत्र परम । सर्वांगी चर्चिले भस्म ।
शंख खड्ग घेऊनि उत्तम । मातेलाग नमस्कारी ॥ २० ॥
म्हणे माते शत्रु बहुत । ग्राम हरूनि पितयास नेत ।
तरी मी गुरुदास तुझा सुत । संहारीन समस्तातें ॥ २१ ॥
माते तुझ्या सुकृतेकरून । कृतांत समरी करीन चूर्ण ।
पृथ्वी राजे जितचि धरून । आणीन तुझिया दर्शना ॥ २२ ॥
निर्दोष यशाचा ध्वज । उभवीन आज तेजःपुंज ।
शरत्काळींचा द्विजराज । सोज्ज्वळ जैसा शोभत ॥ २३ ॥
पद्माकरपुत्र सुनय वीर । सवे घेतला सत्वर ।
सर्पाचा माग काढी विनतापुत्र । तैसे दोघे धावती ॥ २४ ॥
इभ आहे कोणते कांतारीं । शोधीत धांवती दोघे केसरी ।
की जनकजेचे कैवारी । लहुकुश पुत्र जैसे ॥ २५ ॥
पायी क्रमिती भूमि सत्वर । शोभती धाकुटे वये किशोर ।
जवळी देखोनि शत्रूचे भार । सिंहनादे गर्जिन्नले ॥ २६ ॥
म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त । बज्रबाहूऐसी दिव्य वस्त ।
चोरोनि नेतां त्वरित । शिक्षा लावीन तुम्हांते ॥ २७ ॥
तस्करांसी हेचि शिक्षा जाण । छेदावे कर्ण नासिक कर चरण ।
एवढा अन्याय करून । कैसे वांचून जाल तुम्ही ॥ २८ ॥
अवघे माघारे जंव पाहती । तंव दोघे किशोर धावती ।
म्हणती एक रमापती एक उमापती । येती निजभक्तकैवारे ॥ २९ ॥
एक मृगांक एक मित्र । एक वसिष्ठ एक विश्वामित्र ।
एक वासुकी एक भोगींद्र । तेवी दोघे भासती ॥ ३० ॥
असंख्यात सोडिती बाण । जैशा धारा वर्षे घन ।
वीर खिळिले संपूर्ण । मयूरा ऐसे दीसती ॥ ३१ ॥
परतले शत्रूचे भार । वर्षती शस्त्रास्त्रे समग्र ।
वाद्ये वाजती भयंकर । तेणे दिशा व्यापिल्या ॥ ३२ ॥
तो जलज वाजविला अद्भुत । धाके उर्वी डळमळत ।
पाताळी फणिनाथ । सावरीत कुंभिनीते ॥ ३३ ॥
दिशा कोंदल्या समस्त । दिग्गज थरथरा कापत ।
शत्रु पडिले मूर्च्छित । रिते रथ धावती ॥ ३४ ॥
त्यांतील दिव्य रथ घेवोनि दोनी । दोघे आरूढले तेच क्षणी ।
चापी बाण लावूनी । सोडिती प्रलयविद्युद्वत ॥ ३५ ॥
वज्रबाहूचे वीर बहुत । भारासमवेत गज रथ ।
भद्रायूभोवते मिळत । कैवारी आपुला म्हणवूनी ॥ ३६ ॥
वाद्ये वाजवूनियां दळ । भद्रायूभोवते मिळाले सकळ ।
म्हणती हा कैवारी या वेळ । आला न कळे कोठोनी ॥ ३७ ॥
पाठिराखा देखोनि समर्थ । वीरांस बळ चढले अद्भुत ।
हेमरथाची सेना बहुत । संहारिली ते काळी ॥ ३८ ॥
वज्रबाहूसहित प्रधान । रथी बांधले पाहती दुरून ।
म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघेजण । किशोरवेषे पातले ॥ ३९ ॥
एका गुरूने शिकविले पूर्ण । दिसे दोघांची विद्या समान ।
त्यांत मुख्य राजनंदन । देखोनि स्नेह वाटतो ॥ ४० ॥
कोण आहेत न कळे सत्य । मज वाटती परम आप्त ।
हृदयी धरूनि यथार्थ । द्यावे चुंबन आवडीने ॥ ४१ ॥
मांडिले घोरांदर रण । रक्तपूर चालिले जाण ।
वज्रबाहु दुरून । प्रधानासहित पाहतसे ॥ ४२ ॥
अनिवार भद्रायूचा मार । शत्रु केले तेव्हा जर्जर ।
समरभूमि माजली थोर । बाणे अंबर कोंदले ॥ ४३ ॥
ऐसे देखोनि हेमरथ । लोटला तेव्हा कृतांतवत ।
दोघांसी युद्ध अद्भुत । चार घटिका जाहले ॥ ४४ ॥
शत्रु थरथरा कापत । म्हणती भीम की हनुमंत ।
किंवा आला रेवतीनाथ । मुसळ नांगर घेऊनी ॥ ४५ ॥
शत्रूचा देखोनि उत्कर्ष बहुत । भद्रायूने शिवयोगिदत्त ।
खड्ग काढिले तेज अद्भुत । सहस्रमार्तंडासमान ॥ ४६ ॥
काळाग्नीची जिव्हा कराळ । की प्रळय विजांचा मेळ ।
की काळसर्पाची गरळ । तेवी खड्ग झळकतसे ॥ ४७ ॥
ते शस्त्र झळकता तेजाळ । मागधदळ भस्म झाले सकळ ।
मागे होता हेमरथ तत्काळ । समाचार श्रुत जाहला ॥ ४८ ॥
की काळशस्त्र घेता हाती । देखताचि दळे संहारिती ।
मग पळू लागला पवनगती । उरल्या दळासमवेत ॥ ४९ ॥
प्रधानासहित वज्रबाहूसी टाकून । पळती शत्रु घेतले रान ।
ते भद्रायूने देखोन । धरिला धावून हेमरथ ॥ ५० ॥
धरिला तो दृढ केशी । ओढूनि पाडिला भूमीसी ।
लत्ताप्रहार देता हृदयदेशी । अशुद्ध ओकीत भडभडा ॥ ५१ ॥
रथी बांधिला आकर्षून । मंत्रिप्रधानांसहित जाण ।
क्षुरमुखशर घेऊन । पाच पाट काढिले ॥ ५२ ॥
अर्धखांड धर्ममिशी भादरून । माघारे चालवी संपूर्ण ।
राजस्त्रिया अपार कोश धन । घेत हिरोन तेधवा ॥ ५३ ॥
देश नागविला होता सकळ । वस्तुमात्र आणविल्या तत्काळ ।
गोभार परतविला सकळ । जेथींचा तेथे स्थापिला ॥ ५४ ॥
अमात्यसमवेत पिता । सोडवूनि पायी ठेविला माथा ।
बज्रबाहू होय बोलता । त्याजकडे पाहूनी ॥ ५५ ॥
नयनी लोटल्या अश्रुधारा । तू कोण आहेस सांग कुमारा ।
मज अपयशसमुद्रातून त्वरा । काढिले उडी घालुनी ॥ ५६ ॥
जळता शत्रुदावाग्नीत । वर्षलासी जलद अद्भुत ।
मज वाटे तू कैलासनाथ । बाळवेषे आलासी ॥ ५७ ॥
की वाटे वैकुंठनायके । रूपें धरिली बाळकांची कौतुके ।
की सहस्राक्षे येणे एके । केले धावणे वाटतसे ॥ ५८ ॥
सकल राजस्त्रिया धावोन । उतरिती मुखावरूनि निंबलोण ।
म्हणती बाळा तुजवरून । जाऊ ओवाळून सर्बही ॥ ५९ ॥
भद्रायु म्हणे नगरात । चला शत्रु घेवोनि समस्त ।
बंदी घालूनि रक्षा बहुत । परमयत्नेकरोनियां ॥ ६० ॥
नगरांत पिता नेऊनी । बैसविला दिव्य सिंहासनी ।
जयवाद्यांचा ध्वनी । अपार वाजो लागला ॥ ६१ ॥
नगर श्रृंगारिले एकसरा । रथी भरूनि वाटती शर्करा ।
नगरजन धावती त्वरा । वज्रबाहूसी भेटावया ॥ ६२ ॥
वज्रबाहु म्हणे सद्‌गद होऊन । जेणे मज सोडविले धावून ।
त्या कैवारियाचे चरण । धरा जाऊन ये वेळा ॥ ६३ ॥
भद्रायू म्हणे पितयालागून । शत्रूस करा बहुत जतन ।
तीन दिवसां मी येईन । परतोनि जाणा तुम्हापासी ॥ ६४ ॥
मी आहे कोणाचा कोण । कळेल सकळ वर्तमान ।
ऐसे बोलोनि दोघेजण । रथारूढ पैं झाले ॥ ६५ ॥
मनोवेगेकरून । येऊनि वंदिले मातेचे चरण ।
मग तिने करूनि निंबलोण । सुखावे पूर्ण पद्माकर ॥ ६६ ॥
असो यावरी शिवयोगी दयाघन । चित्रांगदसीमंतिनींसी भेटोन ।
जन्मादारभ्य वर्तमान त्यांसी सांगे भद्रायूचे ॥ ६७ ॥
पिता सोडवूनि पुरुषार्थ । केला तो ऐकिला की समस्त ।
तरी तो तुम्ही करावा जामात । कीर्तिमालिनी देऊनिया ॥ ६८ ॥
ऐकता ऐसा मधुर शब्द । सीमंतिनी आणि चित्रांगद ।
दृढ धरिती चरणारविंद । पूजिती मग षोडशोपचारे ॥ ६९ ॥
म्हणती तुझे वचन प्रमाण । वर आणावा आताचि आहे लग्न ।
मग दळभार वाहने पाठवून । दिधली वैश्यनगराप्रती ॥ ७० ॥
सुनयपुत्रासहित समग्र । नाना संपत्ति घेऊन अपार ।
लग्नासि चालिला पद्माकर । वाद्ये अपार वाजती ॥ ७१ ॥
भद्रायू बैसला सुखासनी । तैसीच माता शिबिकायानी ।
चित्रांगद सामोरा येवोनी । घेऊनि गेला मिरवीत ॥ ७२ ॥
वर पाहूनि जन तटस्थ । म्हणती कायसा यापुढे रतिनाथ ।
पृथ्वीचे राजे समस्त । आणविले लग्नासी ॥ ७३ ॥
त्यात वज्रबाहू सहपरिवारे । लग्नालागी पातला त्वरे ।
वराकडे पाहे सादरें । तब तो कैवारी ओळखिला ॥ ७४ ॥
पाय त्याचे धरावया धाविन्नला । भद्रायूने वरच्यावरी धरिला ।
आलिंगन देता वेळोवेळा । कंठ दाटले उभयतांचे ॥ ७५ ॥
नयनी चालिल्या विमलांबुधारा । अभिषेक करिती येरयेरा ।
मग वज्रबाहू पुसे वरा । देश तुझा कवण सांग ॥ ७६ ॥
फेडी संशय तत्त्वता । सांग कवण मातापिता ।
गोत्र ग्राम गुरु आता । सर्व सांग मजप्रती ॥ ७७ ॥
मग भद्रायूने एकांती नेऊन । सांगितले साद्यंत वर्तमान ।
हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण । उपासना शिवाची ॥ ७८ ॥
अनंतपुण्य कोट्यानुकोटी । तै शिवयोगियाची होय भेटी ।
तो साक्षात् धूर्जटी । त्याचे चरित्र जाण हे ॥ ७९ ॥
मग ते सुमति पट्टराणी । भेटविली एकांती नेऊनी ।
वज्रबाहु खालते पाहुनि । रुदन करी तेधवा ॥ ८० ॥
म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे । म्या घोरवनी टाकिली नष्टे ।
मजएवढा अन्यायी कोठे । पृथ्वी शोधिता नसेल ॥ ८१ ॥
सुमति मागील दुःख अद्भुत । आठवूनि रडे सद्गदित ।
म्हणे शिवयोगी गुरुनाथ । तेणे कृतार्थ केले आम्हा ॥ ८२ ॥
मग सीमंतिनी चित्रांगद । उभयतांचा करूनि ऐक्यवाद ।
वज्रबाहु बोले सद्गद । धन्य सुमति राणी तू ॥ ८३ ॥
बिंदूचा सिंधु करून । मज त्वा दाविला आणोन ।
सर्षप कनकाद्रीहून । श्रेष्ठ केला गुणसरिते ॥ ८४ ॥
त्वा माझा केला उद्धार । मज अभाग्यास कैचा पुत्र ।
हे राज्य तुझेचि समग्र । सुतासहित त्वा दीधले ॥ ८५ ॥
ऐसे बोलोनि त्वरित । वज्रबाहु बाहेर येत ।
भद्रायू धावोनि सद्गदित । साष्टांगे नमीत पितयाते ॥ ८६ ॥
वज्रबाहु देत आलिंगन । जेवी भेटती शिव आणि षडानन ।
की वाचस्पति आणि कच निधान संजीवनी साधिता आलिंगिती-८७
मस्तक अवघ्राणून झडकरी । सप्रेम बैसविला अंकावरी ।
कीर्तिमालिनी स्नुषासुंदरी । दक्षिणांकी बैसविली ॥ ८८ ॥
तव राजे समस्त आश्चर्य करिती । धन्य वज्रबाहु नृपती ।
मग पद्माकर सुनय यांप्रती । भद्रायू भेटवी पितयाते ॥ ८९ ॥
गगनी न समाये ब्रह्मानंद । ऐसा झाला सकळा मोद ।
मग चारी दिवस सानंद । यथासांग लग्न झाले ॥ ९० ॥
आंदण दिधले अपार । दोन लक्ष वाजी अयुत कुंजर ।
दास दासी भांडार । भरूनि द्रव्य दीधले ॥ ९१ ॥
सर्व घेऊनि कीर्तिमालिनी । पद्माकरासहित जनकजननी ।
निजनगरा तेच क्षणी । जाती झाली तेधवा ॥ ९२ ॥
गगनगर्भी न समाये हरिख । ऐसे मातापितयांसी झाले सुख ।
पट्टराणी सुमति देख । केले आधीन सर्व तिच्या ॥ ९३ ॥
मग सकळ शत्रू सोडोन । प्रतिवर्षी करभार नेमून ।
करूनि आपणाआधीन । जीवदान दिधले तया ॥ ९४ ॥
भद्रायूऐसा पुत्र प्राप्त । होय असल्या पुण्य बहुत ।
जरी जन्मोजन्मीं हिमनगजामात । पूजिला असेल प्रेमभरे ॥ ९५ ॥
स्त्री पतिव्रता चतुर सुंदर । पुत्र पंडित सभाग्य पवित्र ।
गुरु सर्वज्ञ उदार थोर । पूर्वदत्ते प्राप्त होय ॥ ९६ ॥
मग त्या भद्रायूवरी छत्र । वज्रबाहूने उभवूनि सत्वर ।
स्त्रीसुमतिसहित तप अपार । हिमकेदारी करिता झाला ॥ ९७ ॥
करिता शिवआराधन । त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन ।
मागे भद्रायू बहुत दिन । राज्य करीत पृथ्वीचे ॥ ९८ ॥
शिवकवच भस्मधारण । रुद्राक्षमहिमा अपार पूर्ण ।
धन्य गुरु शिवयोगी सुजाण । शिष्य भद्रायू धन्य तो ॥ ९९ ॥
असो भद्रायू नृपनाथ । कीर्तिमालिनीसमवेत ।
चालिला वनविहारार्थ । अवलोकीत वनश्रियेते ॥ १०० ॥
छाया सघन शीतळ । पाट वाहती जल निर्मळ ।
तेथे बैसता सूर्यमंडळ । वरी कदापि दिसेना ॥ १०१ ॥
नारळी केळी पोफळी रातांजन । मलयागर सुवास चंदन ।
अशोकवृक्ष खर्जूरी सघन । आंबे जांभळी खिरणिया ॥ १०२ ॥
वट पिंपळ कडवे निंब । डाळिंब सेवरी मंदार कदंब ।
अंजीर औदुंबर पारिभद्र नभ । भेदीत गेले गगनमार्गे ॥ १०३ ॥
चंपक मोगरे जाई जुई । मालती सेवंती बकुळ ठायी ठायी ।
शतपत्र जपा अगस्ति वृक्ष पाही । वेष्टोनि वरी चालिले ॥ १०४ ॥
कनकवेली नागवेली परिकर । पोवळवेली नाना लता सुवासकर ।
द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर । जायफळी डोलती फळभारे ॥ १०५ ॥
बदके चातक मयूर । कस्तूरीमृग जवादी मार्जार ।
चक्रवाक नकुळ मराळ परिकर । सरोवरतीरी क्रीडती ॥ १०६ ॥
असो तया वनात । कीर्तिमालिनीसमवेत ।
क्रीडत असता अकस्मात । एक अपूर्व वर्तले ॥ १०७ ॥
दूरवरी भद्रायू विलोकीत । तो स्त्रीपुरुष येती धावत ।
ऊर्ध्व करोनिया हस्त । दीर्घस्वरे बोभाती ॥ १०८ ॥
पाठी लागला महाव्याघ्र । आक्रोशे बोभात विप्र ।
म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर । मागे सुकुमार राहिली ॥ १०९ ॥
गजबजोनि धाविन्नला नृप । शर लावोनि ओढिले चाप ।
तव तो व्याघ्र काळरूप । स्त्रियेसी नेत धरूनिया ॥ ११० ॥
राये शर सोडिले बहुत । परी तो न गणी तैसाचि जात ।
विजूऐसे शर अद्भुत । आंगी भेदिले तयाच्या ॥ १११ ॥
गिरिकंदरे ओलांडून । व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन ।
विप्र रायापुढे येऊन । शोक करी आक्रोशे ॥ ११२ ॥
अहा ललने तुजविण । गृह वाटते महा अरण्य ।
रायास म्हणे ब्राह्मण । धिक् क्षत्रियपण धिक् जिणे ॥ ११३ ॥
तुज देखता सत्य । माझ्या स्त्रीने केला आकान्त ।
अहा कांत पडले व्याघ्रमुखात । सोडवी मज यापासूनी ॥ ११४ ॥
तुजही हाका फोडिल्या बहुत । धाव धाव हे जगतीनाथ ।
धिक् तुझी शस्त्रे समस्त । खड्ग व्यर्थ गुरूने दीधले ॥ ११५ ॥
द्वादश सहस्र नागांचे बळ । धिक् मंत्र अस्त्रजाळ ।
क्षतापासोनि सोडवी तत्काळ । शरणागता रक्षी तोचि पार्थिव-११६
धिक् आश्रम धिक् ग्राम । जेथे नाही सत्समागम ।
धिक् श्रोता धिक् वक्ता सप्रेम । नाही कीर्तन शिवाचे ॥ ११७ ॥
धिक् संपत्ति धिक् संतती । द्विज न रक्षी न भजे उमापती ।
ते धिक् नारी पापमती । पतिव्रता जे नव्हे ॥ ११८ ॥
माता पितयांसी शिणवीत । धिक् पुत्र वाचला व्यर्थ ।
धिक् शिष्य जो गुरुभक्त । नव्हेचि, मतवादी पै ॥ ११९ ॥
गुरूची झाकोनि पदवी । आपुला महिमा विशेष मिरवी ।
धिक् पार्थिव जो न सोडवी । संकटी प्राण गेलिया ॥ १२० ॥
भद्रायू बोले उदिग्न । मी तुज इच्छिले देईन ।
करी पुढती उत्तम लग्न । अथवा राज्य दान घे माझे ॥ १२१ ॥
विप्र म्हणे कासया लग्न । स्त्रीहीनास कासयो धन ।
जन्मांधासी दर्पण । व्यर्थ काय दाऊनी ॥ १२२ ॥
मूढास कासया उत्तम ग्रंथ । तरुणास संन्यास देणे हे अनुचित ।
जरेने कवळिला अत्यंत । त्याचे लग्न व्यर्थ जैसे ॥ १२३ ॥
तृषाक्रांतासी पाजिले घृत । क्षुधातुरासी माळा गंधाक्षत ।
चिंतातुरापुढे व्यर्थ । गायन नृत्य कासया ॥ १२४ ॥
यालागी नलगे तुझे राज्य धन । दे माझी स्त्री आणोन ।
राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवोन । दिधली म्या तुजप्रती ॥ १२५ ॥
रायाचे सत्त्व पाहे ब्राह्मण । म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान ।
माझे तप मेरुपर्वताहून । उंच असे न सरे कधी ॥ १२६ ॥
मी पापासी भीत नाही जाण । अंगिकारिले तुझे स्त्रीरत्न ।
सागरी ढेकुळ पडले येऊन । तरी सागर काय डहुळेल ॥ १२७ ॥
धुळीने न मळे आकाश । तैसा मी सदा निर्दोष ।
राव म्हणे हे अपयश । थोर आले मजवरी ॥ १२८ ॥
माझे बळ गेले तेच क्षणा । व्याघ्र नेली विप्रललना ।
आता स्त्री देवोनि ब्राह्मणा । अग्निकाष्ठे भक्षीन मी ॥ १२९ ॥
विप्रापुढे संकल्प करूनी । दान दिधली कीर्तिमालिनी ।
विप्र गुप्त झाला तेच क्षणी । राये अग्नी चेतविला ॥ १३० ॥
ज्वाळा चालिल्या आकाशपंथे । मग स्नान केले नृपनाथे ।
भस्म चर्चिले सर्वांगाते । रुद्राक्ष धारण पै केले ॥ १३१ ॥
आठवूनि गुरुचरण । शिवमंत्र शिवध्यान ।
प्रदक्षिणा करूनि तीन । अग्निकुंडाभोवत्या ॥ १३२ ॥
जयजय शंकर उमारंगा । मदनांतका भक्तभवभंगा ।
विश्वव्यापकाआराध्यलिंगा । नेई वेगे तुजपाशी ॥ १३३ ॥
उडी टाको जाता ते वेळी । असंभाव्य चेतला ज्वालामाली ।
तव त्यामधून कपालमौली । अपर्णेसहित प्रकटला ॥ १३४ ॥
दशभुज पंचवदन । कर्पूरगौर पंचदशनयन ।
पंचविंशतितत्त्वांहून । पंचभूतांवेगळा जो ॥ १३५ ॥
भद्रायूस हृदयी धरूनि सत्वर । म्हणे सखया इच्छित माग वर ।
तुझी भक्ति निर्वाण थोर । देखोनि प्रकट झालो मी ॥ १३६ ॥
भद्रायू बोले सद्गदित । म्हणे विप्रस्त्री आणूनि दे त्वरित ।
ते ऐकोनि हासिन्नला गजमुखतात । विप्र तो मीच झालो होतो ॥ १३७ ॥
व्याघ्रही मीच होऊन । गेलो भवानीस घेऊन ।
भक्ति पहावया निर्वाण । दोघेही आम्ही प्रगटलो ॥ १३८ ॥
तुझी ही घे कीर्तिमालिनी । म्हणोनि उभी केली तेच क्षणी ।
देव सुमने वर्षती गगनी । राव चरणी लागतसे ॥ १३९ ॥
शिव म्हणे रे गुणवंता । अपेक्षित वर मागे आता ।
येरू म्हणे वज्रबाहु पिता । सुमति माता महासती ॥ १४० ॥
पद्माकर गुणवंत । कैलासी न्यावा स्त्रीसमवेत ।
इतुक्यास ठाव यथार्थ । तुजसमीप देईजे ॥ १४१ ॥
तुझिया पार्श्वभागी सकळ । असोत स्वामी अक्षयी अढळ ।
यावरी बोले पयःफेनधवल । कीर्तिमालिनी तू माग आता ॥ १४२ ॥
ती म्हणे माता सीमंतिनी । पिता चित्रांगद पुण्यखाणी ।
तुजसमीप राहोत अनुदिनी । शूळपाणी तथास्तु म्हणे ॥ १४३ ॥
तुम्ही उभयतांनी मागितले । ते म्या सर्व दीधले ।
माझे चित्त गुंतले । तुम्हापासी सर्वदा ॥ १४४ ॥
मग कीर्तिमालिनीसमवेत । दहा सहस्र वर्षेपर्यंत ।
भद्रायू राजा राज्य करीत । हरिश्चंद्रासारिखे ॥ १४५ ॥
मग त्यावरी सकळी । दिव्यदेह अवघी झाली ।
दिव्य विमानी कपालमौली । नेता झाला संनिध ॥ १४६ ॥
चित्रांगद सीमंतिनी । वज्रबाहु सुमति राणी ।
अवघी विमानारूढ होवोनी । पावली शिवपद शाश्वत ॥ १४७ ॥
स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर । भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार ।
त्यासी विमान धाडून श्रीशंकर । आपुल्या स्वरूपी मेळविले ॥ १४८ ॥
हे भद्रायूआख्यान । परम यशोदायक आयुष्यवर्धन ।
ऐकता लिहिता जाण । विजय कल्याण सर्वदा ॥ १४९ ॥
हे आख्यान जे म्हणत । ते सर्वदा वादी जयवंत ।
विजय धैर्य अत्यंत । कीर्तिवंत सर्वा ठायी ॥ १५० ॥
भद्रायूआख्यानपुण्य आगळे । पदरचना ही बिल्वदळे ।
उमावल्लभा वाहती भावबळे । ते तरती संसारी ॥ १५१ ॥
भद्रायूआख्यान कैलासगिरी । जो का पारायणप्रदक्षिणा करी ।
त्याचा बंध तोडोनि मदनारी । निष्पाप करी सर्वदा ॥ १५२ ॥
ब्रह्मानंदा सुखदायका । श्रीधरवरदा कैलासनायका ।
भक्तकामकल्पद्रुम गजांतका । न येसी तर्का निगमागमा ॥ १५३ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सजन अखंड । अष्टमाध्याय गोड हा ॥ १५४ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More