Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 9

(Shri Shiv Leelamrut Adhyay 9)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 9 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 9. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 151
शिवलीलामृत अध्याय 9: भस्ममहिमा
श्रीगणेशाय नमः ॥
जेथे शिवनामघोष निरंतर । तेथे कैंचे जन्ममरणसंसार ।
तिही कळिकाळ जिंकिला समग्र । शिवशिवछंदेकरूनिया ॥ १ ॥
पाप जळावया निश्चिती । शिवनामी आहे ज्याची आसक्ती ।
त्यासी नाही पुनरावृत्ती । तो केवळ शिवरूप ॥ २ ॥
जैसे प्राणियाचे चित्त । विषयी गुंतले अत्यंत ।
तैसे शिवनामी होता रत । तरी बंधन कैचे तया ॥ ३ ॥
धन इच्छा धरूनि चित्ती । धनाढ्याची करिती स्तुती ।
तैसे शिवनामी प्रवर्तती । तरी जन्ममरण कैचे तया ॥ ४ ॥
राज्यभांडारीचे धन । साधावया करिती यत्न ।
तैसे शिवचरणी जडले मन । तरी संकट विघ्न कैचे तया ॥ ५ ॥
धन्य ते शिवध्यानी रत । येचिविषयी कथा अद्भुत ।
नैमिषारण्यी सांगत । सूत शौनकादिकांप्रती ॥ ६ ॥
वामदेव नामे महाज्ञानी । शिवध्यानी रत विचरे काननी ।
एकाकी निर्माय शांत दांत जनी । त्रिविधभेदरहित जो ॥ ७ ॥
दिशा जयाचे अंबर । भस्मचर्चित दिगंबर ।
निराहार निरंतर । एकलाचि हिंडतसे ॥ ८ ॥
काय करावे कोठे जावे । काय घेवोनि काय त्यजावे ।
विश्व शिवमय आघवे । खेद मोह भेद नाही ॥ ९ ॥
अक्रोध वैराग्य इंद्रियदमन । क्षमा दया कृपा समान ।
निर्लोभ दाता भय शोक मान । काळत्रयी न धरीच ॥ १० ॥
गृहापत्यदारावर्जित । कोणी एक परिग्रह नाही सत्य ।
कायावाचामनोदंडयुक्त । मौनी न बोले इतरांसी ॥ ११ ॥
ज्ञानचर्चा शिवस्मरण । त्यावीण नेणेचि भाषण ।
या नाव बोलिजे मौन । भेदाभेदरहित जो ॥ १२ ॥
सर्वांच्या अनुग्रहास्तव । ते स्वरूप धरोनि विचरे शिव ।
जडजीव तारावया सर्व । विचरे सृष्टी स्वइच्छे ॥ १३ ॥
कार्याकार्य सारूनि कारण । आत्मस्वरूपी पावला समाधान ।
देहत्रयरहित विधिनिषेधहीन । प्रवृत्तिनिवृत्तिवेगळा ॥ १४ ॥
निरंकुश जो निःसंग । जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग ।
तयाची रीति अभंग । वेदशास्त्र वर्णिती ॥ १५ ॥
तो स्वरूपी सदा समाधिस्थ । गगन तेही अंगासी रुतत ।
म्हणून तेही परते सारीत । हेतुदृष्टांतवर्जित जो ॥ १६ ॥
तेणे तेजाचे दाहकत्व जाळिले । उर्वीचे कठिणत्व मोडिले ।
चंचलत्व हिरोनि घेतले । प्रभंजनाचे तेणे पै ॥ १७ ॥
आर्द्रत्व पूर्ण निरसोन । धुवोनि शुद्ध केले जीवन ।
एवं पिंडब्रह्मांड जाळून । भस्म अंगी चर्चिले ॥ १८ ॥
ऐसा तो अमूर्तामूर्त । केवळ शुक की जडभरत ।
क्रौंचारण्यी विचरत । सर्वही देखत शिवरूप ॥ १९ ॥
तो एक ब्रह्मराक्षस धावत । महाभयानक शरीर अद्भुत ।
कपाळी शेंदूर जिव्हा लळलळित । भयानक मुखाबाहेरी ॥ २० ॥
खदिरांगार तैसे नेत्र । बहुत जीव भक्षिले अपरिमित ।
क्षुधित तृषित पापी कुपात्र । अकस्मात पातला ॥ २१ ॥
महाहिंसक सर्वभक्षक । तेणे वामदेव देखिला पुण्यश्लोक ।
धावोनिया एकाएक । कंठी घालीत मिठी त्याच्या ॥ २२ ॥
लोह परिसासी झगटतां पूर्ण । तत्काळ होय दिव्य सुवर्ण ।
तेवी त्याच्या अंगस्पर्शेकरून । मति पालटली तयाची ॥ २३ ॥
वामदेवअंगीचे भस्म । त्याच्या अंगी लागले उत्तम ।
सत्त्ववृत्ति झाली परम । असुर भाव पालटला ॥ २४ ॥
आपुल्या अंगी झगटोन । उद्धरला पिशिताशन ।
हे त्यासी नाहीच भान । समाधिस्थ सर्वदा ॥ २५ ॥
नेणे सुखदुःख शीतोष्ण । लोक निंदिती की वंदिती पूर्ण ।
शरीरी भोग की रोग दारुण । हेही नेणे कदा तो ॥ २६ ॥
मी हिंडतो देशी की विदेशी । हेही स्मरण नाही त्यासी ।
तो ब्रह्मानंद सौख्यराशी । विधिनिषेधी स्पर्शेना ॥ २७ ॥
ऐसा तो योगींद्र निःसीम । त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म ।
दिव्यरूप होवोनि सप्रेम । चरणी लागला तयाच्या ॥ २८ ॥
सहस्र जन्मींचे झाले ज्ञान । त्यासी आठव झाला संपूर्ण ।
मानससरोवरी उदकपान । करिता काक हंस होय ॥ २९ ॥
की हाटकनदीतीरी देख । पडता पाषाण काष्ठादिक ।
दिव्य कार्तस्वर होय सुरेख । तेवी राक्षस पै झाला ॥ ३० ॥
की करिता सुधारसपान । तेथे सहजचि आले देवपण ।
की शशिकिरणस्पर्शेकरून । द्रवे जैसा चंद्रकांत ॥ ३१ ॥
की रवि उगवता निःशेष । निशा सरे प्रकटे प्रकाश ।
तैसा उद्धरला राक्षस । स्तवन करी तयाचे ॥ ३२ ॥
म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण । मी तव दर्शने झालो पावन ।
तुजसी करिता संभाषण । वाटते पावेन शिवपदा ॥ ३३ ॥
मज सहस्रजन्मीचे झाले ज्ञान । परी पंचवीस जन्मांपासून ।
पापे घडली जी दारुण । ती अनुक्रमे सांगतो ॥ ३४ ॥
पूर्वी मी राजा दुर्जय । यौवनमदे अति निर्दय ।
परम दुराचारी होय । ब्राह्मण प्रजा पीडीत ॥ ३५ ॥
प्रजेसी नित्य करी मार । आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार ।
वेद पुराण शास्त्र । कैसे आहे मी नेणे ॥ ३६ ॥
स्वप्नीही नेणे कदा धर्म । ब्रह्महत्यादि पापे केली परम ।
नारी अपूर्व आणून उत्तम । नित्य नूतन भोगी मी ॥ ३७ ॥
ऐशा स्त्रिया असंख्य भोगून । बंदी घालून केले रक्षण ।
सर्व देश धुंडोन । स्त्रिया नूतन आणवी ॥ ३८ ॥
एकदा भोग देऊन । दुसर्‍याने तिचे न पाहे वदन ।
त्या बंदी रडती आक्रंदून । शाप देती मजलागी ॥ ३९ ॥
विप्र पळाले राज्यातून । पट्टणे ग्रामे खेटके जाण ।
इतुकीही धुंडोन । स्त्रिया धरून आणिल्या ॥ ४० ॥
भोगिल्या तीन शते द्विजनारी । चार शते क्षत्रियकुमारी ।
वैश्यस्त्रिया सुंदरी । दहा शते भोगिल्या ॥ ४१ ॥
शूद्रांच्या सहस्र ललना । चांडालनारी चार शते जाणा ।
त्यावरी अपवित्र मांगकन्या । सहस्र एक भोगिल्या ॥ ४२ ॥
चर्मककन्या पाच शत । रजकांच्या चार शते गणित ।
वारांगना असंख्यात । मिती नाही तयाते ॥ ४३ ॥
पांच शते महारिणी । तितक्याच वृषली नितंबिनी ।
यावेगळ्या कोण गणी । इतर वर्ण अष्टादश ॥ ४४ ॥
इतुक्या कामिनी भोगून । तृप्त नव्हे कदा मन ।
नित्य करी मद्यपान । अभक्ष्य तितुके भक्षिले ॥ ४५ ॥
ऐसे भोगिता पापभोग । मज लागला क्षयरोग ।
मृत्यु पावलो सवेग । कृतांतदूत धरोनि नेती ॥ ४६ ॥
यमपुरीचे दुःख अपार । भोगिले म्या अतिदुस्तर ।
तप्त ताम्रभूमि तीवर । मजलागी चालविले ॥ ४७ ॥
लोहस्तंभ तप्त करून । त्यासी नेऊन देवविती आलिंगन ।
माझे घोर कर्म जाणून । असिपत्रवनी हिंडविती ॥ ४८ ॥
कढईत तेल झाले तप्त । त्यात नेऊन बुडवीत ।
तोंडी घालिती नरक मूत्र । पाप बहुत जाणोनि ॥ ४९ ॥
महाक्षार कटुरस आणोनी । मुखी घालिती पासले पाडोनी ।
तीक्ष्ण चंचूचे गृध्र येवोनी । नेत्र फोडिती एकसरे ॥ ५० ॥
कुंभीपाकी घालोनि शिजविती । कर्णी तप्त लोहदंड दडपिती ।
अहा तेथीची जाचणी किती । सांगो आता गुरुवर्या ॥ ५१ ॥
तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण । त्यात पचविती कित्येक दिन ।
मांस तोडिती सांडसेकरून । वरी शिंपिती क्षारोदक ॥ ५२ ॥
जिव्हा नासिक आणि कर्ण । तीक्ष्ण शत्रे टाकिती छेदून ।
हस्त पाद खंडून । पोट फोडिती क्रूर शत्रे ॥ ५३ ॥
अंगाचा काढिती भाता । तप्त शस्त्र रोविती माथा ।
शिश्न छेदून गुदद्वारी अवचिता । तप्त अर्गळा घालिती ॥ ५४ ॥
सर्वांगासी टिपर्‍या लावून । सवेच करिती पाशबंधन ।
पृष्ठीकडे वाकवून । चरणी ग्रीवा बांधिती ॥ ५५ ॥
बोटी बोटी सुया रोवून । पाषाणे वृषण करिती चूर्ण ।
हस्तपायी आणून । पाषाणबेडी घालिती ॥ ५६ ॥
सहस्र वर्षे न लगे अंत । ऐशिया नरकी बुडवीत ।
एक येवोनि पाडिती दात । पाश घालिती ग्रीवेसी ॥ ५७ ॥
आपुली विष्ठामूत्र । बळेच भक्षविती यमदूत ।
सवेच अंगाचे तुकडे पाडीत । दोष अमित जाणोनी ॥ ५८ ॥
श्यामशबल श्वान लावून । चरचरा टाकिती फाडून ।
एक शिरास्थी काढिती ओढून । एक मांस उकरिती ॥ ५९ ॥
लोहार्गळा उष्ण तीव्र । पृष्ठी हृदयी करिती मार ।
उखळी घालोनि सत्वर । लोहतप्तमुसळे चेचिती ॥ ६० ॥
तीक्ष्ण औषधीचे रस आणिती । नासिकाद्वारे आत ओतिती ।
सवेचि वृश्चिककूपी टाकिती । बहुत विपत्ती भोगिल्या ॥ ६१ ॥
ज्याचे विष परम दुर्धर । ऐसे अंगास डसविती विखार ।
अग्निशिखा लावोनि सत्वर । हे शरीर भाजिले ॥ ६२ ॥
अंतरिक्ष असिधारे बैसवून । पायी बांधिती जड पाषाण ।
सवेचि पर्वतावरी नेऊन । ढकलूनि देती निर्दयपणे ॥ ६३ ॥
आतडी काढून निश्चिती । ज्याची त्याजकडोन भक्षविती ।
ऊर्ध्व नेवोनि टांगिती । आपटती क्रोधभरे ॥ ६४ ॥
लोहकंटकी उभे करून । करिती इंगळांचे आंथरूण ।
मस्तकी घालूनिया पाषाण । फोडोनि टाकिती मस्तक ॥ ६५ ॥
लोहचणक करूनि तप्त । खा खा म्हणोनि दूत मारीत ।
ओष्ठ धरोनि फाडीत । तप्त सळ्या नाकी खोविती ॥ ६६ ॥
उफराटे टांगून । ग्रीवेसी बांधोनि थोर पाषाण ।
रीस व्याघ्रादिक आणोन । विदारिती त्याहाती ॥ ६७ ॥
गजपदाखाली चूर्ण । करविती तप्तनीरप्राशन ।
अष्टांगे कर्वतून । वेगळाली टाकिती ॥ ६८ ॥
भयानक भूते भेडसाविती । लिंग छेदूनि खा म्हणती ।
सांधे ठायी ठायी मोडिती । तीक्ष्ण शत्रेकरूनिया ॥ ६९ ॥
भूमीत रोवोनिया शरीर । करिती बहुत शरमार ।
सवेचि शूळ परम तीव्र । त्यावरी पालथे घालिती ॥ ७० ॥
वरी मारिती मुसळघाये । मग पाषाण बांधोनि लवलाहे ।
नरकवापीत टाकिती पाहे । अंत न लागे उतरता ॥ ७१ ॥
काचा शिसे यांचा रस करून । बळेचि करविती प्राशन ।
तेथे जात नाही कदा प्राण । यातना दारुण भोगिता ॥ ७२ ॥
ऐशा तीन सहस्र वर्षेपर्यंत । नरकयातना भोगिल्या बहुत ।
त्यावरी मज ढकलोनि देत । व्याघ्रजन्म पावलो ॥ ७३ ॥
दुसरे जन्मी झालो अजगर । तिसरे जन्मी वृक भयंकर ।
चौथे जन्मी सूकर । सरडा झालो पाचवा ॥ ७४ ॥
सहावे जन्मी सारमेय सबळ । सातवे जन्मी शृगाल ।
आठव्याने गवय विशाळ । गुरुवर्या मी झालो ॥ ७५ ॥
नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध । दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध ।
त्यावरी नकुळ मग वायस विविध । तेरावे जन्मी बक झालो ॥७६॥
चौदावे जन्मी वनकुक्कुट । त्यावरी गीध झालो पापिष्ठ ।
मग मार्जारयोनी दुष्ट । मंडूक त्यावरी जाण पा ॥ ७७ ॥
अठरावे जन्मी झालो कूर्म । त्यावरी मत्स्य झालो दुर्गम ।
सवेचि पावलो मूषकजन्म । उलूक त्यावरी झालो मी ॥ ७८ ॥
बाविसावे जन्मी वनद्विरद । त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध ।
मग दुरात्मा निषाद । आता राक्षस जन्मलो ॥ ७९ ॥
सहस्रजन्मींचे ज्ञान । झाले स्वामी मज पूर्ण ।
तव दर्शनाच्या प्रतापेकरून । पावन झालो स्वामिया ॥ ८० ॥
गंगास्नाने जळे पाप । अत्रिनंदन हरी ताप ।
सुरतरु दैन्य अमूप । हरीत दर्शनेकरूनिया ॥ ८१ ॥
पाप ताप आणि दैन्य । संतसमागमे जाय जळून ।
यावरी वामदेव योगींद्र वचन । बोलता झाला तेधवा ॥ ८२ ॥
एक विप्र होता महाअमंगळ । शूद्रस्त्रियेसी रतला बहुत काल ।
तिच्या भ्रतारे साधूनि वेळ । जिवे मारिले द्विजाते ॥ ८३ ॥
ग्रामाबाहेर टाकिले प्रेत । कोणी संस्कार न करीत ।
तो यमदूती नेला मारीत । जाच बहुत भोगीतसे ॥ ८४ ॥
इकडे शिवसदन उत्तम । त्यापुढे पडिले असे भस्म ।
महाशिवरात्रिदिवशी सप्रेम । भक्त पूजना बैसले ॥ ८५ ॥
त्या भस्मात श्वान सवेग । येऊनि बैसले पाहे शिवलिंग ।
भस्मचर्चित त्याचे अंग । जात मग त्वरेने ॥ ८६ ॥
पडिले होते विप्रप्रेत । त्यावरी गेले अकस्मात ।
कुणपास भस्म लागत । पापरहित झाला तो ॥ ८७ ॥
तो यमदूती नरकातूनि काढिला । शिवदूती विमानी वाहिला ।
कैलासासी जावोनि राहिला । संहारिला पापसमूह ॥ ८८ ॥
ऐसे हे पवित्र शिवभूषण । त्याचे न वर्णवे महिमान ।
राक्षस पुसे कर जोडून । भस्ममहिमा सांगा कैसा ॥ ८९ ॥
भस्म कोणते उत्तम । शिवभक्ती लावावे कैसा नेम ।
यावरी वामदेव उत्तम । चरित्र सांगे शिवाचे ॥ ९० ॥
मंदरगिरी परम पवित्र । उंच योजने अकरा सहस्र ।
त्यावरी एकदा त्रिनेत्र । देवांसहित पातला ॥ ९१ ॥
यक्षगण गंधर्व किन्नर । चारण पिशाच गुह्यक समग्र ।
देव उपदेव पवित्र । महेशा वेधून बैसले ॥ ९२ ॥
मरुद्गण पितृगण समस्त । एकादश रुद्र द्वादशादित्य ।
अष्ट वसु अष्ट भैरव सत्य । अष्ट दिक्पाळ पातले ॥ ९३ ॥
अठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर । साठ सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र ।
पाताळनाग पृथ्वीचे नृपवर । शंकरा वेधूनि बैसले ॥ ९४ ॥
विष्णु विधि पुरंदर । शिवध्यान पाहती समग्र ।
भूतांचे मेळे अपार । मंदराचळी मिळाले ॥ ९५ ॥
सिंधुरवदन बीरभद्रकुमार । साठ कोटि गण समग्र ।
पुढे विराजे नंदिकेश्वर । दूसरा मांदार शुभ्र दिसे ॥ ९६ ॥
तेथे आले सनत्कुमार । साष्टांग करूनि नमस्कार ।
स्तवन करूनि अपार । विभूतिधारणविधि पुसती ॥ ९७ ॥
यावरी बोले जाश्वनीळ । विभूति जाणा तेचि निर्मळ ।
शुद्ध करूनि गोमयगोळ । मृत्तिकाकणविरहित ॥ ९८ ॥
ते वाळवूनि उत्तम । मग करावे त्यांचे भस्म ।
शुद्ध विभूति मज परम । शिवगायत्रीने मंत्रिजे ॥ ९९ ॥
आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व । मग मस्तकाभोवते वेष्टिजे शुद्ध ।
तर्जनी न लाविजे निषिद्ध । कनिष्ठिका वेगळी करावी | ॥ १०० ॥
दो बोटांनी लाविजे भाळी । अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी ।
ऐसे त्रिपुंड्रधारण चंद्रमौळी । सनत्कुमारा सांगत ॥ १०१ ॥
तर्जनी न लाविता सर्वांगी विभूति । त्रीबोटी लाविजे निश्चिती ।
येणे महत्पापे भस्म होती । शिवभूषणप्रसादे ॥ १०२ ॥
अगम्यागम सुरापान । ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्यभक्षण ।
महत्पापांचे पर्वत जाण । भस्मचर्चने भस्म होती ॥ १०३ ॥
ऐसा भस्माचा महिमा वामदेव । ब्रह्मराक्षसा सांगे सर्व ।
विमान आले अपूर्व । दिव्यरूप असुर झाला ॥ १०४ ॥
कैलासाप्रती जाऊन । राहिला शिवरूप होऊन ।
वामदेव पृथ्वीपर्यटन । स्वेच्छे करीत चालिला ॥ १०५ ॥
सत्संगाचा महिमा थोर । वामदेवासंगे तरला असुर ।
भस्मलेपने भाळनेत्र । सदा सुप्रसन्न भक्तांसी ॥ १०६ ॥
मंत्र तीर्थ द्विज देव । गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व ।
येथे जैसा धरिती भाव । सिद्धि तैसी तयांसी ॥ १०७ ॥
पांचाळदेशी नृपनाथ । नाम जयाचे सिंहकेत ।
जैसा शक्रनंदन की तृतीय सुत । पृथादेवीचा पुरुषार्थी ॥ १०८ ॥
मृगयेस गेला तो भूपाळ । मागे चालत धुरंधर दळ ।
शबरांचेही मेळ । बहुसाल निघती तयासवे ॥ १०९ ॥
वनोवनी हिंडता भूपाळक । शबर एक परम भाविक ।
भग्न शिवालय एक । गेला त्यात निषाद तो ॥ ११० ॥
उन्मळोनी पडले दिव्य लिंग । पंचसूत्री रमणीय अभंग ।
सिंहकेतरायाते सवेग । दाविता झाला तेधवा ॥ १११ ॥
राजा म्हणे लिंग चांगले । परी पाहिजे भावे पूजिले ।
उगेचि देवार्चन मांडिले । दंभेकरूनि लौकिकी ॥ ११२ ॥
लौकिकी मिरवावया थोरपण । प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून ।
जेवी कासारे मांडिले दुकान । प्रतिमाविक्रय करावया ॥ ११३ ॥
ब्राह्मणवेष घेवोनि शुद्ध । यात्रेत हिंडती जैसे मैंद ।
की मार्गघ्न वाटेत साधुसिद्ध । वेष धरूनि बैसले ॥ ११४ ॥
काळनेमी साधुवेष धरून । वाटेत बैसला करावया विघ्न ।
एवं भावेवीण देवतार्चन । व्यर्थ काय दांभिक ॥ ११५ ॥
शबरासी म्हणे नृपसत्तम । तुज हे लिंग सापडले उत्तम ।
निषाद म्हणे पूजन क्रम । कैसा आहे सांग पा ॥ ११६ ॥
विनोदे बोले नृपवर । पूजेचे आहेत बहुत प्रकार ।
परी चिताभस्म पवित्र । नित्य नूतन आणावे ॥ ११७ ॥
चिताभस्मावीण । नैवेद्य करू नये समर्पण ।
हेचि मुख्य वर्म जाण । शैवलक्षण निष्ठेचे ॥ ११८ ॥
नृपवचन मानूनि यथार्थ । शबर लिंग घरा आणीत ।
शबरीस सांगे वृत्तान्त । हर्षभरित ते झाली ॥ ११९ ॥
सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून । दोघे पूजिती एकनिष्ठेकरून ।
चिताभस्म नित्य नूतन । आणिती मेळवून साक्षेपे ॥ १२० ॥
एकार्ती होताचि सुंदरी । नैवेद्या आणीत झडकरी ।
उभयतां जोडल्या करी । शिवस्तवनी सादर ॥ १२१ ॥
ऐसे नित्य करिता पूजन । लोटले कित्येक दिन ।
त्यांची निष्ठा पहावया पूर्ण । केले नवल पंचवदने ॥ १२२ ॥
ऐसे एकदा घडोनि आले । चिताभस्म कोठे न मिळे ।
शबरे बहुत शोधिले । अपार क्रमिले भूमंडळ ॥ १२३ ॥
परतोनि सदनासी येत । शबरीस सांगे वृत्तान्त ।
तेही झाली चिंताक्रांत । म्हणे पूजन केवी होय ॥ १२४ ॥
केले शिवपूजन उत्तम । परी न मिळता चिताभस्म ।
तो शबर भक्तराज परम । नैवेद्य शिवासी अर्पिना ॥ १२५ ॥
शिवदीक्षा परम कठीण । निष्ठा पाहे उमारमण ।
शबरी म्हणे प्रियालागून । मी आपुले भस्म करिते आता ॥ १२६ ॥
पाकसदनी बैसोन । लावोनि घेते आता अग्न ।
ते चिताभस्म चर्चेन । सांबपूजन करावे ॥ १२७ ॥
मग शुचिर्भूत होवोनि शबरी । शिवध्यान स्मरण करी ।
अग्नि लावोनि झडकरी । भस्म करी कलेवर ॥ १२८ ॥
शबर घेवोन ते भस्म । चर्ची सदाशिवासी सप्रेम ।
परी नैवेद्य आणावया उत्तम । दुसरे कोणी नसेचि ॥ १२९ ॥
भोळा चक्रवर्ती उदार । तारावया धैर्य पाहे शंकर ।
आसन घालोनि शबर । परम सादर शिवार्चनी ॥ १३० ॥
शबरी उत्तम पाक करून । नित्य येत नैवेद्य घेवोन ।
शबर एकार्ती करोन । पूर्वाभ्यासे बोलावीत ॥ १३१ ॥
एकार्ती होताचि सदाशिवा । त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा ।
विलंब होता महादेवा । क्षोभ हो अत्यंत पै होय ॥ १३२ ॥
सर्व अन्याय क्षमा करी शंकर । परी नैवेद्यासी होता उशीर ।
क्षोभोनि जातो श्रीशंकर । उशीर अणुमात्र सोसेना ॥ १३३ ॥
शबर आनंदमय शिवार्चनी । स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी
म्हणे ललने नैवेद्य आणी । तव पाठीसी उभी घेवोनिया ॥ १३४ ॥
रंभा उर्वशी मेनका सुंदरी । त्याहनि दिव्यरूप झाली शबरी ।
चतुर्विध नैवेद्य करी । देत पतीच्या तेधवा ॥ १३५ ॥
नैवेद्य अर्पूनि शबर । पूजा झाली षोडशोपचार ।
दोघे जोडोनिया कर । स्तवन करिती शिवाचे ॥ १३६ ॥
जय जय अनंत ब्रह्मांडनायका । जय जय शिव मायाचक्रचालका ।
दुर्जनदमना मदनांतका । भवहारका भवानीपते ॥ १३७ ॥
पूजन झाले संपूर्ण । शबर पाहे स्त्री विलोकून ।
अलंकारमंडित सद्भुण । आपणही शिवरूप जाहला ॥ १३८ ॥
एक नीलकंठ वेगळा करून । शिवभक्त शिवसमान ।
तव आले दिव्य विमान । वाद्ये अपार वाजती ॥ १३९ ॥
येत दिव्य सुमनांचे परिमळ । आश्चर्य करी सिंहकेत नृपाळ ।
विमानी बैसवूनि तत्काळ । शिवपद पावली दोघेही ॥ १४० ॥
राव म्हणे विनोदेकरून । म्या सांगितले चिताभस्मपूजन ।
परी धन्य शबराचे निर्वाण । उद्धरोनि गेला कैलासा ॥ १४१ ॥
धन्य ते शबरी कामिनी । देह समर्पिला शिवार्चनी ।
एवं एकनिष्ठा देखिल्यावाचोनी । पिनाकपाणी प्रसन्न नव्हे | ॥ १४२ ॥
सिंहाकेतासी लागला तोचि छंद । सर्वदा शिवभजनाचा वेध ।
शिवलीलामृत प्रसिद्ध । श्रवण करी सर्वदा ॥ १४३ ॥
शिवरात्रि प्रदोष सोमवार । व्रते आचरे प्रीती नृपवर ।
शिवप्रीत्यर्थ उदार । धने वाटी सत्पात्री ॥ १४४ ॥
ऐसे करिता शिवभजन । सिंहकेत शिवरूप होवोन ।
शिवपदी राहिला जावोन । धन्य भजन निष्ठेचे ॥ १४५ ॥
शिवलीलामृतमंडपी सुरवाडली । चढत जात श्रीधरवाग्वल्ली ।
अहळबहळ पसरली । ब्रह्मानंदेकरूनिया ॥ १४६ ॥
ते छाया सघन अत्यंत । तेथे बैसोत शिवभक्त ।
प्रेमद्राक्षफळे पक्क बहुत । सदा सेवोत आदरे ॥ १४७ ॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा । मृडानीहृदयाब्जमिलिंदा ।
कैवल्यपददायक अभेदा । लीला अगाध बोलवी पुढे ॥ १४८ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । नवमाध्याय गोड हा ॥ १४९ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More