Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 14

(Shri Shiv Leelamrut Adhyay 14)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 14 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 14. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 218
श्रीगणेशाय नमः ॥
भस्मासुरहरणा भाललोचना । भार्गववरदा भस्मलेपना ।
भक्तवत्सला भवभयहरणा । भेदातीता भूताधिपते ॥ १ ॥
भवानीवरा भक्ततारका । भोगिभूषणा भूतपालका ।
भाविकरक्षका भवभयहारका । भक्तरक्षका भवशोषणा ॥ २ ॥
त्रितापशमना त्रिदोषहारका । त्रिगुणातीता त्रिपुरांतका ।
त्रिभुवनजनका त्र्यंबका । त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या ॥ ३ ॥
तुझ्या कृपाबळे समस्त । त्रयोदश अध्यायपर्यंत ।
कथिले शिवलीलामृत । आतां कळसाध्याय चौदावा ॥ ४ ॥
तेराव्या अध्यायी शिवगौरीलग्न । सांगितले स्वामीकार्तिकाचे जनन ।
यावरी शौनकादिकांलागून । सूत सांगे नैमिषारण्यी ॥ ५ ॥
सिंहावलोकने तत्त्वतां । परिसा गजास्यषडास्यांची कथा ।
दोघेही धाकुटे असतां । जगदंबा खेळवी प्रीतीने ॥ ६ ॥
गजतुंडा ओसंगा घेऊन । विश्वजननी देत स्तनपान ।
शुंडा दंडेकरून । दुग्ध ओढीत गजास्य ॥ ७ ॥
अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती । शुंडा फिरवीत गणपती ।
गुंडेत पय सांठवूनि षण्मुखाप्रती । बोलतसे तेधवां ॥ ८ ॥
म्हणे हें घेईं का अमृत । ब्रह्मादिकां जें अप्राप्त ।
स्कंद बोले क्रोधयुक्त । उच्छिष्ट तुझे न घे मी ॥ ९ ॥
षडानन म्हणे चराचरजननी । लंबनासिक मजलागुनी ।
उच्छिष्ट दुग्ध देतो पाहें लोचनीं । सांग मृडानी कांहीं यातें ॥ १० ॥
शुंडेस धरूनियां खालें । पाडू काय ये वेळे ।
माते याचें नासिक विशाळ आगळे । कां हो ऐसें केलें तुवां ॥ ११ ॥
इंद्र चंद्र मित्र निर्जर । मूर्ति प्रसवलीस मनोहर ।
परी हा लंबनासिक कर्ण थोर । दंत एक बाहेर दिसतसे ॥ १२ ॥
ऐसा कां प्रसवलीस बाळ । ऐकतां हांसे पयःफेनधवल ।
धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ । तिसीही हास्य नाटोपे ॥ १३ ॥
स्कंद म्हणे जननी पाहीं । यास उतरीं मज स्तनपान देईं ।
मग जगदंबेनें लवलाहीं । विघ्नेशा खालीं बैसविलें ॥ १४ ॥
षण्मुख आडवा घेवोनी । स्तन जों घाली त्याच्या वदनीं ।
पांचही मुखे आक्रंदोनी । रडों लागली तेधवां ॥ १५ ॥
तें देखोनि गणनाथ । पोट धरोनि गदगदां हांसत ।
म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत । हांक फोडीत आक्रोशें ॥ १६ ॥
एक स्तन घातला याचे वदनीं । आणिक पांच आणिसी कोठूनी ।
ऐसे ऐकता पिनाकपाणी । काय हांसोनि बोलत ॥ १७ ॥
काय म्हणतो गजवदन । ऐसा को प्रसवलीस नंदन ।
यावरी अपर्णा सुहास्यवदन । प्रतिउत्तर देतसे ॥ १८ ॥
म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन । तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ।
ऐकता हांसला त्रिनयन । पुत्र पाहोन सुखावे ॥ १९ ॥
यावरी षण्मुख आणि गणपती । लीलाकौतुकें दोघे क्रीडती ।
विनोदें कलह करिती । अंतरीं प्रीति अखंड ॥ २० ॥
दोघेही रडतां ऐकोनी । धावोनि आली जगत्त्रयजननी ।
वक्रतुंडासी हृदयीं धरोनी । म्हणे बाळा काय झालें ॥ २१ ॥
तंव तो म्हणे स्कंदे येवोन । अंबे धरिले माझे कर्ण ।
बोलिला एक कठीण वचन । तुझे नयन सान कां रे ॥ २२ ॥
जगदंबा मग हांसोन । अग्निसंभूताप्रती बोले वचन ।
गजाननासी कठीण भाषण । ऐसे कैसें बोलिलासी ॥ २३ ॥
स्कंद म्हणे तर्जनी उचलोन । येणे मोजिले माझे द्वादश नयन ।
यावरी हैमवती हासोन । एकदंताप्रती बोलत ॥ २४ ॥
म्हणे हे तुवां अनुचित केलें । कुमाराचे नयन कां मोजिले ।
यावरी नागानन बोले । ऐक माते अन्याय याचा ॥ २५ ॥
माझी गुंडा लंबायमान । येणे मोजिली चवंगे घालून ।
अन्याय हा थोर त्रिभुवनाहून । करीं ताडन अंबे यासी ॥ २६ ॥
यावरी स्वामी कार्तिक बोलत । अंबे येणे माझे मोजिले हस्त ।
यावरी करिमुख बोलत । मैनाकभागिनी ऐक पां ॥ २७ ॥
याचा अन्याय एक सांगेन । ऐकतां तूं यासी करिसील ताडण ।
नगात्मजा आणि त्रिलोचन । सावधान होऊन ऐकती ॥ २८ ॥
इभमुख म्हणे भेडसावून । मज बोलिला हा न साहवे वचन ।
तुझे पोट कां थोर पूर्ण । मोदक बह भक्षिले ॥ २९ ॥
ऐसें ऐकता मृडानी । दोघांसी हृदयीं धरी प्रीतीकरूनी ।
दोघांसी प्रिय वस्तु देऊनी । समजाविलें तेधवां ॥ ३० ॥
यावरी मदनांतक पाहें । सिंहासन बैसला आनंदमये ।
जगदंबा मुखाकडे पाहे । हास्य वदन करूनियां ॥ ३१ ॥
यावरी विरूपाक्ष बोलत । कां हो हास्य आले अकस्मात ।
यावरी त्रैलोक्यमाता म्हणत । नवल एक दिसतसे ॥ ३२ ॥
तुमच्या जटामुकुटांत । ललनाकृति काय दिसत ।
तुमची करणी अद्भुत । पद्मजबिडौजा समजेना ॥ ३३ ॥
कैलासपति म्हणे इभगमने । हरिमध्ये मृगशावकनयने ।
मस्तकीं जळ धरिलें वरानने । बिंबाधरे पिकस्वरे ॥ ३४ ॥
यावरी चातुर्यसरोवरमराळी । हेरंबजननी म्हणे कपाळमाळी ।
जळांतरीं स्त्रीचे वदन ये वेळीं । दिसते मज भालनेत्रा ॥ ३५ ॥
यावरी बोले कैलासराज । विद्रमाधरे मुख नव्हे ते वारिज ।
शोभायमान सतेज । टवटवीत दिसतसे ॥ ३६ ॥
यावरी सजलजलदवर्णा । स्कंदमाता म्हणे पंचदशनयना ।
कुरळकेश व्याघ्रचर्मवसना । कृष्णवर्ण दिसताती ॥ ३७ ॥
यावरी बोले पंचवदन । कमळीं मिलिंद घे सुगंध बैसोन ।
नसतेच पुससी छंद घेवोन । रमारमणसहोदरी ॥ ३८ ॥
यावरी बोले भुजंगत्रिवेणी । कमळास भोंवया का खट्वांगपाणी ।
तुमच्या मायेची विचित्र करणी । आम्नायश्रुती नेणती ॥ ३९ ॥
यावरी बोले हिमनगजामात । भृकुट्या नव्हे पाहें त्वरित ।
सलिललहरी तळपत । दृष्टी तरळली तुझी कां हो ॥ ४० ॥
यावरी सकळ प्रमदांची वामिनी । बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी ।
म्हणे कैरवास नेत्र पिनाकपाणी । कां हो दिसती आकर्ण ते ॥ ४१ ॥
यावरी शफरीध्वजदहन बोलत । कमळाभोंवते नीर बहुत ।
नेत्र नव्हेत मीन तळपत । हंसगमने निरखीं बरे ॥ ४२ ॥
जे अनंतगुणपरिपूर्ण वेल्हाळ । त्रिपुरहरसुंदरी बोले प्रेमळ ।
म्हणे राजीवा स्तनयुगुळ । कमंडलूऐसे दिसती कां ॥ ४३ ॥
यावरी बोले त्रिशूळपाणी । ऐकें वसुधाधरनंदिनी ।
ते स्तन नव्हती दोन्ही । विलोकोनि पाहें बरें ॥ ४४ ॥
गंगा-हदाचे दोन्ही तीरीं । चक्रवाके बैसलीं साजिरीं ।
दुर्गा म्हणे मदनारी । बहुत साहित्य पुरवीतसां ॥ ४५ ॥
एकाचे अनेक करून । दाखविले हे त्रिभुवन ।
तुमचे मौनेंच धरावे चरण । बोलतां अप्रमाण न म्हणावें ॥ ४६ ॥
मग मांडूनियां सारीपाट । खेळती दाक्षायणी नीळकंठ ।
ज्याचे खेळ ऐकतां वरिष्ठ । भक्त होती त्रिजगीं ॥ ४७ ॥
दोघे खेळतां आनंदघन । तों आला कमलोद्भवनंदन ।
ब्रह्मवीणा वाजवून । करी स्तवन अपार ॥ ४८ ॥
मग क्षण एक स्वस्थ होऊनी । खेळ विलोकी नारदमुनी ।
म्हणे पण केल्यावांचुनी । रंग न ये खेळातें ॥ ४९ ॥
दोघांसी मानलें तें बहुत । मग पण करूनियां खेळत ।
जिंकील त्यासी एक वस्त । आपुली द्यावी निर्धार हा ॥ ५० ॥
तों प्रथम डाव तेच क्षणीं । जिंकिती झाली मेनकानंदिनी ।
व्याघ्रांबर घेतलें हिरोनी । नारदमुनि हांसतसे ॥ ५१ ॥
दुजाही डाव जिंकिता भवानी । घेतले गजचर्म हिरोनी ।
एकामागे एक तेच क्षणीं । दहाही आयुधे घेतलीं ॥ ५२ ॥
जो तो डाव जिंकी भवानी । सर्व भूषणे घेतली हिरोनी ।
शेवटीं कौपीनही सांडोनी । शंकर झाला दिगंबर ॥ ५३ ॥
सुरभीपुत्र जिंकिला । तोही देवीने आपुला केला ।
नारद गदगदां हाँसिन्नला । काय बोलिला शिवासी ॥ ५४ ॥
म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून । गेला तुझा महिमा पूर्ण ।
सृष्टी अवघी मायाधीन । तू निर्गुण निर्विकार ॥ ५५ ॥
चराचर आहे मायाधीन । तुज इणे दिधलें सगुणपण ।
येरवीं तूं अव्यक्त पूर्ण । तुज कोण पुसत होतें ॥ ५६ ॥
एवं तूं मायाधीन झालासी पूर्ण । आतां भक्तांसी कैसे दाविसी वदन ।
ऐसें ऐकतां भाललोचन । गेला रुसून घोर बना ॥ ५७ ॥
इतुकें कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन । शंकरे सर्वसंग टाकून ।
निरंजनी वास केला ॥ ५८ ॥
शोधितां न पडे कोणासी ठायीं । योगी ध्याती सर्वदा हृदयीं ।
न कळे मूळाग्र कोठे कांहीं । जाति कुळ नसेचि ॥ ५९ ॥
नामरूपगुणातीत । गोत्रवर्ण आश्रमविरहित ।
चहूं देहांसी अतीत । कोणा अंत न कळेचि ॥ ६० ॥
असो जगदंबा सख्या घेऊनियां । बनासी चालिली शोधावया ।
गिरीकंदरीं मठ गुहा शोधूनियां । भागली बहुत जगदंबा ॥ ६१ ॥
सर्वही तीर्थे शोधिलीं सवेग । बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग ।
जो शोधितां अष्टांगयोग । योगियां ठायीं पडेना ॥ ६२ ॥
पंचाग्निसाधन धूम्रपान । जटाधारी नग्न मौन ।
एकीं सदा झांकिले नयन । एक गगन विलोकिती ॥ ६३ ॥
एक उभेचि निरंतर । घेती वायूचा आहार ।
त्यांसही पुसतां श्रीशंकर । कोठे आहे न बोलती ॥ ६४ ॥
एक करिती सदा यज्ञ । एक करिती हिंसा बलिदान ।
परी तेही धुरे डोळे भरून । कष्टी होती सर्वदा ॥ ६५ ॥
एक चौसष्ट कळा दाविती । एका चौदा विद्या मिरविती ।
एक वादविवाद निगुती । करितां बहुत भागले ॥ ६६ ॥
एक सांगती पुराण । एक नाचती उड्या घेऊन ।
लोकांस सांगती उपदेशज्ञान । परी उमारमण दुरावला ॥ ६७ ॥
एक नाशिती कुशे मृत्तिका उदक । म्हणती आम्ही इतुकेनि पावन देख ।
त्यांसही पुसतां कैलासनायक । न पडे ठायीं तत्त्वतां ॥ ६८ ॥
जे आदिमाया विश्वजननी । अनंतशक्तींची स्वामिनी ।
ते श्रमली नाना साधनीं । इतरांची कहाणी काय तेथे ॥ ६९ ॥
ठायीं पडावया शिवस्वरूप । क्षीराब्धिजापती करी तप ।
मघवा द्रुहिण करिली साक्षेप । निशिदिनीं याचलागीं ॥ ७० ॥
ऋग्वेद स्थापित कर्म । यजुर्वेद बोले ज्ञान निःसीम ।
उपासनामार्ग उत्तम । अथर्वण स्थापितसे ॥ ७१ ॥
सामवेद सांगे गायन । न्यायशास्त्री भेद गहन ।
म्हणती ईश्वर समर्थ जीव सान । त्याचे पद न पावती ते ॥ ७२ ॥
मीमांसक स्थापिती कर्ममार्ग । सांख्य प्रकृति-पुरुषविभाग ।
पातंजली सांगती योग । शब्दविभाग व्याकरणी ॥ ७३ ॥
सर्व निरसूनि उरलें उत्तम । वेदांती म्हणती तेंचि ब्रह्म ।
तो शिव ब्रह्मानंद परम । वेदशास्त्रां अगम्य जो ॥ ४ ॥
त्या शिवाचे नाम घेवोनी । जगदंबा बाहे घोर वनीं ।
सकळ अभिमान टाकूनी । वल्लभा मी शरण तूतें ॥ ७५ ॥
सकळ तत्त्वे शोधितां साचार । शेवटीं होय साक्षात्कार ।
तैसा हिमाचळीं त्रिपुरहर । विलोकिला जगदंबेनें ॥ ७६ ॥
तो स्वात्मसुखी झाला तल्लीन । झांकिले असती पंचदश नयन ।
देवी म्हणे श्वशुरगृही येऊन । रहिवास केला असे ॥ ७७ ॥
अपर्णा मनीं विचारी । याच रूपें जवळी जाऊ जरी ।
तरी मजवरी ये अवसरीं । क्रोधायमान होईल ॥ ७८ ॥
मग भिल्लीचा वेष धरून । मयूरपिच्छांचे केले वसन ।
अनुपम वेष धरून । मुरहरभगिनी चालिली ॥ ७९ ॥
अनंत कमळभवांडमाळा । त्रिभुवनसुंदरी गुंफी हेळा ।
तिने स्मरहर मोहिला । नृत्यगायनेकरूनियां ॥ ८० ॥
अनंत शक्ती भोंवत्या विराजती । विमानीं अष्टनायिका तन्मय होती ।
किन्नर गंधर्व आश्चर्य करिती । गायनरीती ऐकूनियां ॥ ८१ ॥
वैरभाव वनचरें विसरती । आहार त्यजिला तन्मय होती ।
नद्यांचे जलप्रवाह खंटती । पक्षी विसरती देहभाव ॥ ८२ ॥
निश्चळ झाला पवन । विधुकुरंग गेला वेधोन ।
कुंभिनीभार सांडोन । फणिपति वरी येऊ पाहे ॥ ८३ ॥
आंगींचा सुटला दिव्य आमोद । देव पाहती होवोनि षट्पद ।
नृत्य करितां भाव विविध । दावी नाना प्रकारांचे ॥ ८४ ॥
शीतलत्व दाहकत्व सांडून । वाटे ताटंक झाले विधुचंडकिरण ।
देवललना म्हणती ओवाळून । इजवरून जावें समस्तीं ॥ ८५ ॥
आदिजननीचे अपार लाघव । नेणती शक्रादि कमलोद्भव ।
दिव्य हिरेखाणींचे वैभव । दंततेजें झांकिलें ॥ ८६ ॥
दंतपंक्तींचा झळकतां रंग । खडे ते हिरे होती सुरंग ।
तनूचा सुगंध अभंग । नभ भेदुनी वरी जाय ॥ ८७ ॥
पदमुद्रा जेथे उमटत । सुवास कमळे तेथे उगवत ।
जेथींच्या परागास वेधोनि वसंत । प्रदक्षिणा करी प्रीतीनें ॥ ८८ ॥
अनंतविद्युल्लताकछोळ । तैसें स्वरूपतेज निर्मळ ।
नेत्र उघडोनि जाश्वनीळ । पाहता झाला तेधवां ॥ ८९ ॥
पायीं पैंजण नूपुरें रुणझुणती । त्यांत क्षुद्रघंटा रसाळ गर्जती ।
करींचीं कंकणे झणत्कारती । नृत्यगतीसरसींच ॥ ९० ॥
भूलताचाप चढवूनी । कामशत्रु विधिला नयनकटाक्षबाणीं ।
मनकुरंग पाडिला धरणीं । सुरवरा करणी न कळेचि ॥ ९१ ॥
दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण । पंचबाणे व्यापिला पंचवदन ।
तप ध्यान विसरून । वृत्तांत पुसे तियेतें ॥ ९२ ॥
म्हणे तू नारी कोठील कोण । कामानळ शांतवीं वर्षोनि घन ।
तुझे स्वरूप लावण्य । त्रिभुवनीं ऐसें दुजें नाही ॥ ९३ ॥
तुझा वदनइंदु विलोकून । चकोर झाले माझे नयन ।
आतां वरीं मजलागून । तुजआधीन मी झालों ॥ ९४ ॥
यावरी बोले भिलिणी । उमेऐसी ललना टाकूनी ।
कां बैसलासी घोर वनीं । कैलासभुवन त्यजोनियां ॥ ९५ ॥
मी तों परनारी निश्चित । न वरीं न घडे कदा सुरत ।
तुवां मन जिंकिलें नाहीं यथार्थ । तरी तपस्वी कैसा तूं ॥ ९६ ॥
यावरी बोले पिनाकपाणी । मी दुर्गेवरी आलों रुसोनी ।
तिचे मुख न पाहे परतोनी । नाम स्वप्नीं न घेचि ॥ ९७ ॥
यावरी भिल्लीण बोलत । पति माझा रागिष्ट अत्यंत ।
हे त्रिभुवन जाळील क्षणांत । अणुमात्र गोष्ट कळतांचि ॥ ९८ ॥
यावरी बोले जगन्नाथ । ती बहुकाळाची कठीण अत्यंत ।
दक्षयागीं उडि घालित । क्रोध अद्भुत तियेचा ॥ २९ ॥
पुढे गेली पर्वताचे पोटीं । मागुती तिसी वरीं मी धूर्जटी ।
परी ती कौटाळीण मोठी । अतिकपटी मी जाणे ॥ १०० ॥
भिल्लीण म्हणे ऐकिलें कानीं । तू कपटी ।
आहेस तिजहूनी । शिरीं ठेविली स्वधुनी । भोळी भवानी अत्यंत ॥ 10१ ॥
दुर्गेऐसी पट्टराणी । टाकूनि कां हिंडसी वनीं ।
परललना देखोनि नयनीं । गळां येवोनि पडों पाहसी ॥ 10२ ॥
मागुती बोले कैलासनाथ । क्षणांत सृष्टी घडामोड करित ।
शुंभनिशुंभादि दैत्य । युद्ध करूनी मर्दिले तिणें ॥ 10३ ॥
ती जरी येथे आली धांवोन । उदंड प्रार्थना केली पूर्ण ।
तरी मी नव जाय परतोन । कैलासासी निश्चयें ॥ 10४ ॥
तिसीं मी न करीं संभाषण । तूंचि वरीं मी झालों तुज आधीन ।
जिकडे नेशील तिकडे येईन । वचनाधीन तुझ्या मी ॥ 10५ ॥
यावरी बोले गोरटी । भवानी बैसली तुझ्या पाठीं ।
दोन वेळा वरिला धूर्जटी । तिची गति हे केली ॥ 10६ ॥
मग माझा पाड काय तुज । केव्हां टाकोनि जासील न कळे मज ।
द्यूतीं पण खेळतां सहज । तुझे त्वांचि हारविलें ॥ 10७ ॥
न बोलेचि मदनदहन । भिल्लीणी मागुती करी नृत्यगायन ।
मग उठिला पंचदशनयन । तिसी आलिंगन द्यावया ॥ 10८ ॥
अंबा चालिली सत्वर । दीर्घशब्दें बोले त्रिपुरहर ।
मुखशशी दावीं सुंदर । भाक घेईं मैं माझी ॥ 10९ ॥
तूं मज माळ घालीं येऊन । मी न जाय तुज टाकून ।
मग जगदंबा बोले हांसोन । यावें भुवना माझिया ॥ ११० ॥
तुमची होईन कामिनी । अवश्य बोले खट्वांगपाणी ।
मदनातक वेधोनी । कैलासासी नेला तेधवा ॥ १1१ ॥
सिंहासन बैसवून । षोडशोपचारें केलें पूजन ।
देवीने दृढ धरिले चरण । कंठीं माळ घातली ॥ १1२ ॥
देवी आपुलें स्वरूप प्रकट करी । तटस्थ पाहे त्रिपुरारी ।
मग हांसती परस्परीं । एकमेकां पाहोनी ॥ १1३ ॥
शिव म्हणे धन्य भवानी । त्वांचि आणिलें मज समजावोनी ।
सूत शौनकादिकांलागोनी । कथा सांगे विचित्र ॥ १1४ ॥
करीं वीणा घेवोनि ब्रह्मसुत । शिवाजवळी आला अकस्मात ।
म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ । तुझे भक्त देखिले बहु ॥ १1५ ॥
परी कांतिनगरीं श्रियाळ । धीर गंभीर उदार सुशीळ ।
कीर्तीने भरले दिग्मंडळ । सात्त्विक केवळ क्षमावंत ॥ 1१६ ॥
तेणें घातलें अन्नसत्र । झालीं वर्षे दहा सहस्र ।
इच्छाभोजन दान पवित्र । अतीतांप्रती देतसे ॥ १1७ ॥
अवनी जे अगम्य वस्त । भोजन मागितली अकस्मात ।
प्रयत्ने आणोनि पुरवीत । शिवभक्त थोर तो ॥ १1८ ॥
ऐसें नारद सांगतां वर्तमान । त्याच्या गृहाप्रती पंचवदन ।
कुश्चळ अतीतवेष धरून येता झाला ते समयीं ॥ १1९ ॥
आंगण उभा ठाकला येऊन । परम कोपी जेवीं दावाग्न ।
दुष्टवचन बोले कठीण । रूपही संपूर्ण कुश्चळची ॥ १२० ॥
म्हणे मज देईं इच्छाभोजन । नातरी जातों सत्त्व घेवोन ।
श्रियाळ चांगुणा येवोन । पाय धरिती सद्भावें ॥ 1२१ ॥
आणोनि बैसविला आसनीं । त्याची क्रोधवचने सोसूनी ।
षोडशोपचारें पूजा करोनी । कर जोडोनी ठाकती पुढे ॥ 1२२ ॥
मागा स्वामी इच्छभोजन । येरू म्हणे नरमांस देईं आणोन ।
तूं चोर आणिसी धरून त्याचे मांस न घे मी ॥ 1२३ ॥
धरूनि माझा उद्देश । विकत आणिसील मनुष्य ।
तें न घे मी निःशेष । सत्य सत्य त्रिवाचा ॥ 1२४ ॥
चांगुणा म्हणे कर जोडून । मी आपुलें मांस देतें करीं भोजन ।
श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण । माझे मांस देतों मी ॥ 1२५ ॥
येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्त्वतां । परी सर्व याचकांचे मातापिता ।
तुम्हां दोघांसी भक्षितां । अन्नसत्र खंडेल ॥ 1२६ ॥
तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ । पांच वर्षांचा चिलया बाळ ।
बत्तीस लक्षणी वेल्हाळ । तो मज देईं भोजना ॥ 1२७ ॥
ऐसें ऐकतां वचन । मायामोहजाळ दूर करून ।
म्हणती अवश्य जा घेऊन । मग सदाशिव बोलत ॥ 1२८ ॥
मी काय आहे वृक व्याघ्र रीस । भक्षू तव पुत्राचे मांस ।
उबग न मानूनि विशेष । पचवूनि घालीं मज आतां ॥ 1२९ ॥
मायामोह धरून । कोणी कराल जरी रुदन ।
तरी मी जाईन उठोन । सत्त्व घेवोन तुमचें ॥ १३० ॥
अवश्य म्हणोनि पतिव्रता । उभी ठाकोनि बाहे निजसुता ।
म्हणे बाळा चिलया गुणवंता । खेळावया कोठे गेलासी ॥ 1३१ ॥
तुजलागीं खोळंबला अतीत । बाळा माझ्या येई धांवत ।
ऐसे ऐकतां अकस्मात । बाळ आला धांवोनी ॥ 1३२ ॥
अतितासी करूनि नमन । मातापित्यांचे धरी चरण ।
माता म्हणे तुझे पिशितदान । अतीत मागतो राजसा ॥ 1३३ ॥
बाळ बोले स्नेहेकरून । हा देह म्यां केला शिवार्पण ।
अतीत होता तृप्त पूर्ण । उमारमण संतोषेल ॥ 1३४ ॥
ऐसें ऐकतां झडकरी । बाळ घेतला कडियेवरी ।
पाकशाळेभीतरीं । घेवोनि गेली वधावया ॥ 1३५ ॥
चिलयासी चुंबन देऊन । हृदयीं धरिला प्रीतींकरून ।
बाळ म्हणे पुढतीं येईन । तुझ्या उदरीं जननीये ॥ 1३६ ॥
मायाजाळ सर्व सोडून । मन केले वज्राहृनि कठीण ।
चिलयाचे शिर छेदून । काढिले मांस आंगींचें ॥ 1३७ ॥
आपणांसी पुत्र नाही म्हणोनियां । शिरकमळ ठेविलें पाहावया ।
शरीराचा पाक करूनियां । उठवी भोजना अतीतातें ॥ 1३८ ॥
अतींद्रियद्रष्टा श्रीशंकर । अनंत ब्रह्मांडाचा समाचार ।
सर्व ठावुक सूत्रधार । कळले शिर ठेविलें तें ॥ 1३९ ॥
उठोनि चालिला तात्काळ । धांवती चांगुणा श्रियाळ ।
येरू म्हणे कळलें सकळ । शिरकमळ ठेविलें ॥ १४० ॥
सर्व गात्रांत शिर प्रधान । तेंचि कैसे ठेविलें वंचून ।
तंव ती दोघे धरिती चरण । तेही पचवूनि घालितों ॥ 1४१ ॥
क्षोभ न धरावा अंतरीं । नेणतपणे चुकलों जरी ।
तरी सर्वज्ञा तू क्षमा करीं । सत्त्व आमुचें राखावें ॥ 1४२ ॥
मग बैसला आसन येऊन । म्हणे शिर येईं बाहेर घेऊन ।
उखळांत घालून कंडन । मजदेखता करीं आतां ॥ 1४३ ॥
अश्रु आलिया तुझ्या नयनीं । कीं कष्टी झालीया अंतःकरणीं ।
तरी पुत्र गेला सत्त्वास हानी । करून जाईन तुमच्या ॥ 1४४ ॥
अवश्य म्हणे नृपललना । शिर आणोनि करी कंडणा ।
सत्त्व पाहे कैलासराणा । अंतरीं सद्गद होऊनी ॥ 1४५ ॥
निजसत्त्वाचे उखळ । धरिलें धैर्याचे करीं मुसळ ।
कांडीत बैसली वेल्हाळ । निर्धार अचळ धरूनियां ॥ 1४६ ॥
अतीत म्हणे परम मंगळ । गीत गाय रसिक सुढाळ ।
खंती करितां पयःफेनधवल । दुरावेल जाण पां ॥ 1४७ ॥
ते सद्भावसरोवरविलासिनी । कोमलहृदय नृपकामिनी ।
कीं निश्चळ गंगा भरूनी । जात मर्यादा धरूनियां ॥ 1४८ ॥
तिचे पाहतां निजवदन । काळवंडला रोहिणीरमण ।
मृगशावाक्षी गुणनिधान । उपमा नाहीं स्वरूपातें ॥ 1४९ ॥
म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा । सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा ।
सुहास्यवक्त्रा राजीवनेत्रा । येवोनि उदरा धन्य केलें ॥ १५० ॥
तू सुकुमार परम गुणवंता । माझे निष्ठुर घाव लागती माथा ।
तुजवीण परदेशी आता । दुबळी भणंग झाले मी ॥ 1५१ ॥
कुचकमंडली अतिसुंदरा । कंचुकीबाहेर फुटल्या दुग्धधारा ।
की भूलिंगासी एकसरा । गळत्या लावल्या तियेने ॥ 1५२ ॥
म्हणे अतीत जेवोनि अवधारी । जाऊ दे राजद्वाराबाहेरी ।
देह त्यागीन ये अवसरी । यावरी धीर न धरवे पै ॥ 1५३ ॥
कैलासपंथ लक्षून । सखया एकला जातोसि मज टाकून ।
तुझे संगती मी येईन । उभा राहे क्षणभरी ॥ 1५४ ॥
तू मोक्षद्वीपाचे केणे भरून । जासी कैलासराजपेठ लक्षुन ।
तुझे संगती मी उद्धरेन । मज टाकुनि जाऊ नको ॥ 1५५ ॥
उदकावीण जैसा मीन । तैसी मी तान्हया तुजवीण ।
माझे हृदय निर्दय कठिण । लोकांत वदन केवी दावू ॥ 1५६ ॥
तुझी माउली मी म्हणता । लाज वाटे रे गुणवंता ।
तुवा आपुली सार्थकता । करुनि गेलासी शिवपदा ॥ 1५७ ॥
हे त्रिभुवन शोधिता सकळ । तुजऐसा न दिसे बाळ ।
मग ते पचवुनि तत्काळ । उठा म्हणे अतिताते ॥ 1५८ ॥
अतीत म्हणे अवनीपती । उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ।
ऐसे ऐकता श्रियाळनृपती । झाला चित्ती संकोचित ॥ 1५९ ॥
चांगुणा म्हणे नृपनाथा । सत्त्व राखावे सत्वर आता ।
विन्मुख जाऊ न द्यावे अतीता । मनी चिंता न धरावी ॥ १६० ॥
नवमास वाहिला म्यां उदरात । तुम्हास जड नव्हे चौप्रहरात ।
पोटीचा पोटी घालिता सुत । चिंता काय नृपश्रेष्ठा ॥ 1६१ ॥
राव बैसला पंक्तीसी । ताट वाढोनि आणिले वेगेसी ।
अतीत म्हणे चांगुणेसी । तूही येई सवेग ॥ 1६२ ॥
अवश्य म्हणोनि झडकरी । येवोनि बैसली नृपसुंदरी ।
यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी । अन्न न घ्यावे सर्वथा ॥ 1६३ ॥
निपुत्रिकाचे न पहावे वदन । मग तेथे कोण घेईल अन्न ।
दीपेवीण शून्य सदन । पुत्रावीण तेवी तुम्ही ॥ १6४ ॥
नासिकेवाचोनि वदन । की वृक्ष जैसा फळावीण ।
की बुबुळावीण जैसे नयन । शून्य सदन तुमचे तेवी ॥ 1६५ ॥
तंव ती दोघे बोलती सद्गदित । एक होता तो अर्पिला सुत ।
चांगुणा म्हणे गेले सत्त्व । अतीत विन्मुख जाईल आता ॥ 1६६ ॥
एक बाळ तो दिधला भोजनासी । आता महाराजा सत्त्व किती पाहासी ।
ऐसे बोलता चांगुणेसी । अदभुत गहिंवर दाटला ॥ 1६७ ॥
म्हणे सत्त्वही बुडाले सकळ । वृथा गेले माझे बाळ ।
मग कंठ मोकळा करूनि ते स्नेहाळ । हाक फोडी चांगुणा ॥ 1६८ ॥
नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा । म्हणे अहा शिव कर्पूरगौरा ।
दीर्घस्वरे बाहे उमावरा । पाव सत्वरी या आकांती ॥ 1६९ ॥
आहा झाले वंशखंडन । न देखो पुढती पुत्रवदन ।
ऐसे ऐकता अतीताचे नयन । स्रवो लागले प्रेमभरे ॥ 1७० ॥
बाहेर फुटली मात । वळसा थोर होत नगरात ।
लोक दुःखे वक्षःस्थळ पिटित । राजकिशोर आठवूनी ॥ 1७१ ॥
विमानी दाटले सुरवर । म्हणती धन्य पतिव्रता सत्त्वधीर ।
ईस प्रसन्न होवोनि श्रीशंकर । काय देईल ते न कळेचि ॥ 1७२ ॥
अतीत म्हणे चांगुणेसी । जे प्रिय असेल तुझे मानसी ।
ते मजसी माग सद्गुणराशी । यावरी सती काय बोले ॥ 1७३ ॥
मज निपुत्रिक म्हणतील लोक । हा धुवोनि काढी कलंक ।
ऐसे ऐकता कैलासनायक । बोलावी म्हणे पुत्रासी ॥ 1७४ ॥
सत्य मानूनि अतीतवचना । दीर्घ हांका फोडीत चांगुणा ।
म्हणे चिलया गुणनिधाना । येई स्नेहाळा धावोनी ॥ 1७५ ॥
अतीत तुजवीण न घे ग्रास । कोठे गुंतलासी खेळावयास ।
माझे तान्हे तू पाडस । सत्त्व राखे येवोनिया ॥ 1७६ ॥
तू न येसी जरी धावोन । तरी माझा जाऊ पाहे प्राण ।
दशदिशा विलोकून । चांगुणा पाहे तेधवा ॥ 1७७ ॥
मागुती हाक फोडी वेल्हाळ । तो जैसे उगवे मित्रमंडळ ।
तैसा धावतच आला बाळ । पाहे श्रियाळ स्नेहभरे ॥ 1७८ ॥
अतीतस्वरूप टाकून । शिव प्रकटला निजरूप पूर्ण ।
दशहस्त पंचवदन । दीनोद्धारण जगद्गुरु ॥ 1७९ ॥
चिलया शिवे हृदयी धरिला । निजअंकावरी बैसविला ।
श्रियाळ चांगुणा ते वेळा । पायांवरी लोळती ॥ १८० ॥
सुरवर सुमने वर्षती अपार । दुंदुभीनादे कोंदले अंबर ।
आनंदमय झाले नगर । धावती लोक पहावया ॥ 1८१ ॥
शिवे आणविले दिव्य विमान । श्रियाळ चांगुणा दिव्यरूप होऊन ।
चिलयासी सिंहासनी स्थापून । छत्र धरिले तयावरी ॥ 1८२ ॥
सचिवांस निरवोनि राज्यभार । विमानी बैसली सत्वर ।
निजपदी जगदुद्धार । श्रीशंकर स्थापी तया ॥ 1८३ ॥
कांतिनगरी सौख्य अगाध । त्रिभुवनी न माये आनंद ।
श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद । अभंग न विटे कालत्रयी ॥ 1८४ ॥
शिवलीलामृत ग्रंथ । झाला चतुर्दश अध्यायपर्यंत ।
चौदा भुवनांचे सार यथार्थ । चौदा अध्याय निर्मिले ॥ 1८५ ॥
की चौदा विद्यांचे सार । की चौदा गाठींचा अनंत परिकर ।
की चौदा पदे निरंतर गयावर्जन घडे हे ॥ 1८६ ॥
की चतुर्दश रत्नांचा प्रकाश । येथेचि झाला एकरस ।
कीं चौदा चक्रे निःशेष । प्रिय चौदाही लोकाते ॥ 1८७ ॥
की चौदा कांडे वेद । की चौदा कोहळी द्रव्य प्रसिद्ध ।
की चौदा कोठड्या शुद्ध । शिवमंदिर निर्मिले ॥ 1८८ ॥
श्रवण पठण लेखन । निदिध्यास अनुमोदन ।
परम प्रीती करिता ग्रंथरक्षण । फल समान सर्वासी ॥ 1८९ ॥
इतुक्यांसही शिव होऊनि माउली । करील निजांगाची साउली ।
आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी । ग्रंथश्रवणे प्राप्त होय ॥ १९० ॥
आधि व्याधि जाय निरसोन । वंध्याही पावे पुत्रसंतान ।
ग्रामा गेला बहुत दिन । पिता बंधु भेटेल ॥ 1९१ ॥
घरी संपत्ति दाटे बहुत । ऋणमोचन होय त्वरित ।
शत्रुक्षय यथार्थ । दक्षिणमुखे वाचिता ॥ 1९२ ॥
शत आवर्तने करिता भक्तियुक्त । पोटी होय शिवभक्त सुत ।
ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ । पिशाच भूत न रिघे तेथे ॥ 1९३ ॥
त्रिमास करिता नित्य आवर्तन । सर्व संकटे जाती निरसोन ।
भावे प्रचीत पाहावी वाचोन । नाही कारण अभाविकांचे ॥ 1९४ ॥
सोमवारी ग्रंथ पूजून । अथवा प्रदोषकाळ शिवरात्री लक्षून ।
शूचिर्भूत होवोनि करावे शयन । स्वप्नी प्रकटोनि शिव सांगे ॥ 1९५ ॥
जे जे पडेल संकट । ते ते निवारील स नीलकंठ ।
चौदा अध्यायांचे फळ वरिष्ठ । वेगळाले लिहिले असे ॥ 1९६ ॥
प्रथमाध्यायी मंगळाचरण । दाशार्हरायाचे आख्यान ।
कलावतीने पति उद्धरिला पूर्ण । हेचि कथन निर्धारे ॥ 1९७ ॥
द्वितीयाध्यायी निरूपण । शिवरात्रि कर्मविपाककथन ।
तिस-यांत गौतमे कथा सांगोन । कल्माषपाद उद्धरिला ॥ 1९८ ॥
चौथ्यांत महाकाळलिंगार्चन । गोपबाळ गेला उद्धरून ।
पाचव्यात उमेने पुत्र पाळून । राज्यी स्थापिला शिवप्रसादे ॥ 1९९ ॥
सहावा अध्याय अतिरसिक । सीमंतिनी आख्यान पुण्यकारक ।
सातवा आठवा सुरस कौतुक । भद्रायुरायाचे कथन पै ॥ २०० ॥
नवमात वामदेवाचे आख्यान सुरस । दुर्जय राजा झाला राक्षस ।
जन्मदुःखे कथिली बहुवस । अतिसुरस अध्याय तो ॥ 20१ ॥
दहाव्यात शारदाआख्यान । अकराव्यात रुद्राक्षमहिमा पूर्ण ।
महानंदा गेली उद्धरोन । भद्रसेनराव तरला ॥ 20२ ॥
बाराव्यात विदुरबहुला उद्धार । विष्णूने मर्दिला भस्मासुर ।
तेराव्या अध्यायात समग्र । शिवगौरीविवाह पै ॥ 20३ ॥
चौदाव्यात शिवअपर्णाविनोद । गौरी भिल्लीणी झाली प्रसिद्ध ।
पुढे श्रियाळचरित्र अगाध । चौदावा अध्याय संपूर्ण हा ॥ 20४ ॥
श्रीधरस्वामी ब्रह्मानंद । आनंदसांप्रदाय परम अगाध ।
क्षीरसागरी गोविंद । आधी उपदेशी कमलोद्भवा ॥ 20५ ॥
तेथोनि अत्रिऋषी प्रसिद्ध । पुढे पूर्णब्रह्म दत्तात्रय अगाध ।
त्यापासूनि सदानंद । रामानंद यती तेथोनि ॥ 20६ ॥
तेथोनि अमलानंद गंभीर । मग ब्रह्मानंद उदार ।
त्यावरी कल्याणी राहणार । सहजानंद यतींद्र पै ॥ 20७ ॥
तेथूनि पूर्णानंद यती शुद्ध । त्यापासाव पितामह दत्तानंद ।
पिता तोचि सद्गुरु प्रसिद्ध । ब्रह्मानंद यतींद्र जो ॥ 20८ ॥
पंढरीहूनि चारी योजने दूरी । नैर्ऋत्य कोणी नाझरे नगरी ।
तेथील देशलेखक निर्धारी । पूर्वाश्रमी ब्रह्मानंद ॥ 20९ ॥
पुढे पंढरीसी येऊन । केले तेथे संन्यासग्रहण ।
तेथेचि समाधिस्थ होऊन । अक्षय वस्ती केली पै ॥ २१० ॥
तो ब्रह्मानंद माझा पिता । सावित्री नामे माझी माता ।
वंदृनि त्या उभयतां । शिवलीलामृतग्रंथ संपविला ॥ 2११ ॥
शके सोळाशे चाळीस । विलंबीनाम संवत्सरास ।
शुद्धपौर्णिमा फाल्गुन मास । रविवारी ग्रंथ संपविला ॥ 2१२ ॥
ब्रह्मकमंडलूच्या तीरी । द्वादशमती नाम नगरी ।
आद्यंत ग्रंथ निर्धारी । तेथेचि झाला जाणिजे ॥ 2१३ ॥
शिवलीलामृतग्रंथ आद्यंत । चतुर्दश अध्यायपर्यंत ।
जयजय शंकर उमानाथ । तुजप्रीत्यर्थ हो कां सदा ॥ 2१४ ॥
अपर्णाजीवना कर्पूरगौरा । ब्रह्मानंदा जगदुद्धारा ।
श्रीधरहृदयाब्जभ्रमरा । अक्षय अभंग दयानिधे ॥ 2१५ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
सदा परिसोत सज्जन अखंड । चतुर्दशाध्याय गोड हा ॥ २१६ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More