Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 13

(Shri Shiv Leelamrut Adhyay 13)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 13 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 13. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 219
श्रीगणेशाय नमः ॥
जो सद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाहृदयाञ्जमिलिंद ।
स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध । चरणारविंद नमू त्याचे ॥ १ ॥
स्कंदपुराण सूत । शौनकादिकांप्रती सांगत ।
त्रेतायुगीं अद्भुत । कथा एक वर्तली ॥ २ ॥
दक्षप्रजापति पवित्र । आरंभिता झाला महासत्र ।
निंदोनि स्वामी त्रिनेत्र । सर्व निर्जर बोलाविले ॥ ३ ॥
जगदात्मा सदाशिव । जयासी वंदिती पद्मज रमाधव ।
आम्नाय आणि वासव । स्तविती ज्यासी सर्वदा ॥ ४ ॥
शिवमहिमा नेणोनि अदभुत । दिवसनिशीं दक्ष निंदित ।
नरमुंडमाळा अपवित्र बहुत । गळां घालित कैसा हा ॥ ५ ॥
करी ओलें गजचर्म प्रावरण । न कंटाळे दुर्गधीने मन ।
भिक्षा मागे नरकपाल घेऊन । वसे श्मशानीं सर्वदा ॥ ६ ॥
चिताभस्म अंगीं चर्चिलें । विखार ठायी ठायीं वेष्टिले ।
भ्रष्ट तितुकें अंगिकारिले । सवें पाळे भूतांचे ॥ ७ ॥
अभद्र तितुकें अंगिकारिले । यासी कोण म्हणतील भलें ।
ज्यासी जे योग्य नाहीं बोलिलें । तें दिल्हे येणे सर्वस्वें ॥ ८ ॥
यासी देव म्हणेल कोण । क्रोधे संतप्त अनुदिन ।
तृतीयनेत्रीं प्रळयाग्न । वाटे त्रिभुवन जाळील ॥ ९ ॥
मस्तकीं वाहे सदा पाणी । नाचत जाऊन निजकीर्तनीं ।
भक्त देखितां नयनीं । बैसे देवोनि अवघेचि ॥ १० ॥
दैत्यांसी देवोनियां वर । येणेंचि माजविलें अपार ।
न कळे यासी लहान थोर । वाहन ढोर तयाचें ॥ ११ ॥
शिवनिंदा करावया कारण । एकदां दक्ष गेला कैलासालागून ।
शिवें नाहीं दिधलें अभ्युत्थान । तेणें दुःखे क्षोभला ॥ १२ ॥
ऐसा दक्ष शिवासी निंदी । यज्ञीं न पूजी विभाग नेदी ।
पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धि उपजली ॥ १३ ॥
शिवभजन न करी जो पतित । त्यावरी विघ्ने पडती असंख्यात ।
याग जप तप दान व्यर्थ । उमानाथ नावडे जया ॥ १४ ॥
जेणें निंदिला शिव दयाळ । परम निर्दय तो दुर्जन खळ ।
मनुष्यांमाजीं तो चांडाळ । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १५ ॥
असो दक्षकन्या दाक्षायणी । कैलास वाट पाहे भवानी ।
म्हणे याग मांडिला पितृसदनीं । मज बोलावू न ये का ॥ १६ ॥
अपर्णा म्हणे त्रिनेत्रा । मी जाईन पित्याच्या सत्रा ।
तेणे सर्व कन्या पंचवक्त्रा । सन्मानेसी बोलाविल्या ॥ १७ ॥
मज विसरला काय म्हणोन । तरी मी तेथवरी जाईन ।
यावरी बोले भाललोचन । मृडानीप्रती तेधवां ॥ १८ ॥
म्हणे मृगलोचने ऐक गौरी । पद्मजजनकसहोदरी ।
लावण्यामृतसरिते अवधारीं । कदाही तेथे न जावें ॥ १९ ॥
तव पिता निंदक कुटिल । मम द्वेषी दुर्जन खळ ।
तूं जातांचि तत्काळ । अपमानील शुभानने ॥ २० ॥
ज्याच्या अंतरी नाहीं प्रीती । त्याचे वदन न पाहावें कल्पांतीं ।
ऐसें त्र्यंबक बोले अंबिकेप्रती । तों नारद तेथे पातला ॥ २१ ॥
म्हणे पितृसदना जावयालागून । न पाहावा कदाही मान ।
मग नंदिवरी आरूढोन । दाक्षायणी चालिली ॥ २२ ॥
सवें घेतले भूतगण । मनोवेगें पातली दक्षसदन ।
तंव मंडप शोभायमान । ऋषींसुरवरीं भरलासे ॥ २३ ॥
आपुलाल्या पूज्यस्थानीं । देव बैसविलें सन्मानेकरूनी ।
एक सदाशिव वेगळा करूनी । पूजिले ऋषि सुरवर ॥ २४ ॥
जैसा उडुगणांत मिरवे अत्रिसुत । तैसा दक्ष मध्ये विराजित ।
शिवद्वेषी परम अभक्त । कुंडीं टाकीत अवदानें ॥ २५ ॥
भवानी जवळी आली ते वेळे । देखोनि सुरवर आनंदले ।
परी दक्षाचे धुरे डोळे भरले । कन्येकडे न पाहेचि ॥ २६ ॥
नंदीवरूनि उतरोनी । पितयासमीप आली भवानी ।
दक्ष मुख मुरडोनी । घाली ग्रंथी भूमंडळा ॥ २७ ॥
जगन्माता गुणनिधान । न्याहाळूनि पाहे पितृवदन ।
म्हणे धुरे भरले नयन । म्हणोनि न पाहे मजकडे ॥ २८ ॥
सकळ भगिनींचा सन्मान बहुत । दाक्षायणी तेव्हां देखत ।
जननीकडे विलोकित । तेही न पाहे तियेतें ॥ २९ ॥
मनांत दक्ष भावित । ईस कोणे बोलाविलें येथ ।
कन्या आणि जामात । दृष्टीं मज नावडती ॥ ३० ॥
आदिमाया प्रणवरूपिणी । अनंतब्रह्मांडांची स्वामिणी ।
तिचा अपमान देखोनि । भ्याले सकळ सुरवर ॥ ३१ ॥
म्हणती दक्ष भुलला यथार्थ । हे ब्रह्मांड जाळील निमिषांत ।
अपमान देखोनि उमा तेथ । क्रोधे संतप्त जाहली ॥ ३२ ॥
प्रलयवीज पृथ्वीवरी पडत । तैसी उडी घातली कुंडांत ।
उमंडळ डळमळत । होय कंपित भोगींद्र ॥ ३३ ॥
वैकुंठ कैलास डळमळी । कमळभवांडीं हांक वाजली ।
कृतांत कांपे चळचळी । म्हणे बुडाली सृष्टि आतां ॥ ३४ ॥
हांक देवोनी शिवगण । गेले शिवापाशीं धांवोन ।
सांगती सर्व वर्तमान । जें जें जाहलें दक्षगृहीं ॥ ३५ ॥
ऐकतां क्षोभला उमाकांत । जेवीं महाप्रलयींचा कृतांत ।
हांक देवोनि अदभुत । जटा आपटित आवेश ॥ ३६ ॥
तों अकस्मात वीरभद्र । प्रकटला तेथें प्रलयरूद्र ।
वाटे प्रलयाग्नि आणि द्वादश मित्र । एकत्र होवोनि प्रकटले ॥ ३७ ॥
वाटे त्याचिया तेजांत । चंद्र सूर्य बुचकळ्या देत ।
आकाश असे आसुडत । सडा होत नक्षत्रांचा ॥ ३८ ॥
कुंभिनी बुडाली देख । चतुर्दश लोक गाजली होक ।
दक्षगृहीं बलाहक । रक्तवर्षाव करीतसे ॥ ३९ ॥
अवचित उकलली क्षिती । दिवसा दिवाभीतें बोभाती ।
दक्षअंगींची सर्व शक्ती । निघोनि गेली तेधवां ॥ ४० ॥
इकडे वीरभद्र शिवस्तवन । करोनि निघाला क्रोधायमान ।
एकवीस पद्मे दळ घेऊन । मनोवेगें धांविन्नला ॥ ४१ ॥
सांठ कोटि गण घेऊन । मागूनी धांविन्नला अपर्णाजीवन ।
पुढे शिवपुत्र धांवोन । ख्याती केली दक्षयागीं ॥ ४२ ॥
वारणचक्र असंभाव्य । त्यावरी एकला लोटे कंठीरव ।
कीं विनायकें घेतली धांव । अपार अही पाहोनी ॥ ४३ ॥
आला देखोनि वीरभद्र । पळों लागले देव समग्र ।
अवदाने सांडोनि सत्वर । ऋत्विज पळाले तेथोनियां ॥ ४४ ॥
आकांतला त्रिलोक । प्रळयकाळींचा पावक ।
दुमदुमला ब्रह्मांडगोळक । शक्रादि देव कांपती ॥ ४५ ॥
एक मळमूत्र भयें विसर्जिती । धोत्रे गळालीं नेणती क्षितीं ।
कुकुटरूपे रोहिणीपती । पळता झाला तेधवां ॥ ४६ ॥
शिखी होवोनियां शिखी । पळता झाला एकाएकीं ।
यम आपुलें स्वरूप झांकी । बकवेष घेवोनियां ॥ ४७ ॥
नैर्ऋत्यपती होय काक । शशक होय रसनायक ।
कपोत होवोनियां अर्क । पळता झाला तेधवां ॥ ४८ ॥
कीर होवोनि वृत्रारी । पळतां भय वाटे अंतरीं ।
नाना पक्षिरूपें झडकरी । नवग्रह पळाले ॥ ४९ ॥
पायाळावरी वीज पडत । दक्षावरी तेवीं अकस्मात ।
महावीर शिवसुत । वीरभद्र पातला ॥ ५० ॥
षड्बाहु वीर देदीप्यमान । असिलता खेटक धनुष्य बाण ।
त्रिशूळ डमरू शोभायमान । सायुध ऐसा प्रकटला ॥ ५१ ॥
पूषाचे पाडिले दांत । भगदेवाचे नेत्र फोडित ।
खांड मिशा उपडीत । ऋत्विजांच्या तेधवां ॥ ५२ ॥
चरणी धरूनि आपटिले । बहुतांचे चरण मोडिले ।
कित्येकांचे प्राण गेले । वीरभद्र देखतां ॥ ५३ ॥
मागूनि पातला शंकर । तेणे दक्षपृतना मारिली सत्वर ।
कुंडमंडप समग्र । विध्वंसूनि जाळिला ॥ ५४ ॥
देखोनियां विरूपाक्ष । भयभीत झाला दक्ष ।
पद्मज आणि सहस्राक्ष । पूर्वीच तेथूनि पळाले ॥ ५५ ॥
वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा । त्वां निंदिलें कैसे विरूपाक्षा ।
तुज लावीन आता शिक्षा । शिवद्वेषिया पाहें पां ॥ ५६ ॥
विद्युत्प्राय असिलता तीव्र । ऊर्ध्वहस्ते महावीर ।
छेदिता झाला दक्षशिर । प्रलय थोर जाहला ॥ ५७ ॥
दक्षशिर गगनीं उसळले । वीरभद्रं पायांतळीं रगडिलें ।
मग उमाधवापाशी ते वेळे । देव पातले चहूकडोनी ॥ ५८ ॥
सकळ सुरांसहित कमळासन । करीत उमावल्लभाचे स्तवन ।
म्हणे वृषभध्वजा कृपा करून । दक्षालागीं ऊठवीं ॥ ५९ ॥
संतोषोनि कर्पूरगौर । म्हणे आणोनि लावा दक्षाचे शिर ।
परी ते नेदी वीरभद्र । पायांतळीं रगडिलें ॥ ६० ॥
म्हणे शिवद्वेषी दुराचार । त्याचा करीन ऐसा संहार ।
जो शिवनाम न घे अपवित्र । जिव्हा छेदीन तयाची ॥ ६१ ॥
जो न करी शिवार्चन । त्याचे हस्तचरण छेदीन ।
जो न पाहे शिवस्थान । त्याचे नयन फोडीन मी ॥ ६२ ॥
विष्णु थोर शिव लहान । हर विशेष विष्णु सान ।
ऐसे म्हणे जो खळ दुर्जन । संहारीन तयातें ॥ ६३ ॥
सर्वथा नेदीं मी दक्षशिर । काय करितील विधिहरिहर ।
मग मेषशिर सत्वर । दक्षालागी लाविलें ॥ ६४ ॥
सजीव सानफोडीन
सर्वथा करोनियां दक्ष । तीर्थाटना गेला विरूपाक्ष ।
द्वादश वर्षे निरपेक्ष । सेवीत वने उपवनें ॥ ६५ ॥
महाश्मशान जे आनंदवन । तेथे शंकर राहिला येऊन ।
मग सहस्र वर्षे संपूर्ण । तपासनीं बैसला ॥ ६६ ॥
पुढे हिमाचलाचे उदरीं । अवतरली त्रिपुरसुंदरी ।
शिवआराधना नित्य करी । हिमाचळीं सर्वदा ॥ ६७ ॥
हिमनगाची स्त्री मेनका । तीस पुत्र झाला मैनाकपर्वत देखा ।
पार्वती कन्या जगदंबिका । आदिमाया अवतरली ॥ ६८ ॥
ब्रह्मांडमंडपामाझारीं । जिची प्रतिमा नाहीं दुसरी ।
कमळजन्मा वृत्रारी । त्यासही दुजी करवेना ॥ ६९ ॥
तिचे स्वरूप पहावया । येती सुरभुसु मिळोनियां ।
जिचे स्वरूप वर्णावया । सहस्रवदना शक्ति नव्हे ॥ ७० ॥
मृग मीन कल्हार खंजन । कुरवंडी करावे नेत्रांवरून ।
अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण । चरणांगुष्ठी न तुळे जिच्या ॥ ७१ ॥
आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज । देखोनि लजित होय द्विजराज ।
कंठीरव देखोनि जिचा माज । मुख न दावी मनुष्यां ॥ ७२ ॥
परम सुकुमार घनश्यामवर्णी । ओतिली इंद्रनीळ गाळूनी ।
दंततेज पडतां मेदिनी । पाषाण महामणी मैं होती ॥ ७३ ॥
आदिमाया प्रणवरूपिणी । ते झाली हिमनगनंदिनी ।
अनंतशक्तींची स्वामिणी । वेदपुराणीं वंद्य जे ॥ ४ ॥
कोट्यानुकोटी मीनकेतन । सांडणी करावीं नखांवरून ।
आंगींचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनि वरी जाय ॥ ७५ ॥
ब्रह्मादि देव मुळींनी । गर्मी पाळी बाळे तीन्ही ।
बोलतां प्रकाश पडे सदनीं । निराळवर्णी कोमलांगी ॥ ७६ ॥
सहज बोलतां क्षितीं । वाटे रत्नराशी विखुरती ।
पदमुद्रा जेथे उमटती । कमळे उठती दिव्य तेथे ॥ ७७ ॥
त्या सुवासासी वेधोनि वसंत । भोंवता गडबडा लोळत ।
केवळ कनकलता अद्भुत । कैलासाहुनी उतरली ॥ ७८ ॥
नंदीसहित त्रिपुरारी । येवोनि हिमाचळीं तप करी ।
शिवदर्शना झडकरी । हिमनग येता जाहला ॥ ७९ ॥
घालोनियां लोटांगण । करीत तेव्हां बहुत स्तवन ।
यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचें ॥ ८० ॥
साठ सहस्र लावण्यखाणी । सवे सखिया जैशा पद्मिणी ।
तयांसहित गजास्यजननी । सेवा करी शिवाची ॥ ८१ ॥
द्वारीं सुरभीपुत्र रक्षण । ध्यानस्थ सदा पंचवदन ।
लाविले पंचदश लोचन । सदा निमग्न स्वरूपीं ॥ ८२ ॥
तारकासुराचे पुत्र तिघेजण । तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन ।
तिहीं घोर तप आचरोन । उमारमण अर्चिला ॥ ८३ ॥
सहस्रदळ कमळेकरून । त्रिवर्गपूजिती त्रिनयन ।
सहस्रांत एक न्यून । कमळ झाले एकदां ॥ ८४ ॥
तिघेही काढूनि नेत्रकमळे । शिवार्चन करिते झाले ।
मागुती एक न्यून आलें । मग स्वशिरकमळे अर्पिलीं ॥ ८५ ॥
प्रसन्न होवोनि त्रिनेत्र । तिघे उठविले तारकपुत्र ।
तिघांसी दिधले अपेक्षित वर । झाले अनिवार त्रिभुवनीं ॥ ८६ ॥
तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी । त्रिपुरें दिधलीं अंतरिक्षगमनी ।
दिव्य सहस्र वर्षे पाहतां शोधोनी । निमिषार्धे एक होती ॥ ८७ ॥
इतुक्यांत जो धनुर्धर । मारील लक्ष्य साधूनि शर ।
त्रिपुरासहित संहार । तुमचा करील निर्धारिं ॥ ८८ ॥
यावरी त्या तिघांजणीं । त्रिभुवन त्रासिलें बळेकरूनी ।
देव पळविले स्वस्थानाहूनी । पीडिली धरणी बहु पापें ॥ ८९ ॥
मग देव ऋषि सकळ मिळोन । वैकुंठपतीस गेले शरण ।
गरुडध्वज सर्वास घेऊन शिवापाशीं पातला ॥ ९० ॥
करितां अद्भुत स्तवन । परम संतोषला पंचवदन ।
म्हणे मी झालों प्रसन्न । मागा वरदान अपेक्षित ॥ ९१ ॥
म्हणती त्रिपुरें पीडिलें बहुत । देव ऋषि झाले पदच्युत ।
शिव म्हणे पाहिजे रथ । त्रिपुरमर्दनाकारणे ॥ ९२ ॥
तंव देव बोलती समस्त । आम्ही सजोनि देतों दिव्यरथ ।
मग कुंभिनी स्पंदन होत । चक्रे निश्चित शशिमित्र ॥ ९३ ॥
मंदरगिरी अक्ष होत । स्तंभ झाले चारी पुरुषार्थ ।
चारी वेद तुरंग बळिवंत । मूर्तिमंत पैं झाले ॥ ९४ ॥
सारथी विधि होत सत्वर । लाविले शास्त्रांचे वाग्दोर ।
पुराणे तटबंध साचार । उपपुराणें खिळे बहू ॥ ९५ ॥
कनकाद्रि धनुष्य थोर । धनुज्र्या होत भोगींद्र ।
वैकुंठींचा सुकुमार । झाला शर तेजस्वी ॥ ९६ ॥
रथीं चढतां उमानाथ । रसातळीं चालिला रथ ।
कोणासी न उपडे निश्चित । मग नंदी काढित शृंगानें ॥ ९७ ॥
मग स्पंदनीं एक चरण । दुजा नंदीवरी ठेवून ।
अपार युद्ध करून । त्रिपुरदळे संहारिलीं ॥ ९८ ॥
होतां युद्धाचें घनचक्र । वीरभद्रे संहारिले असुर ।
परी अमृतकुंडे समग्र । दैत्यांकडे असती पैं ॥ ९९ ॥
अमृत शिंपितां अमित । सजीव होती सवेंचि दैत्य ।
शिवें मेघास्त्र घालूनि समस्त । अमृतकुंडे बुडविलीं ॥ १०० ॥
अंतराळीं त्रिपुरें भ्रमती । लक्ष्य साधी मृडानीपती ।
दिव्य सहस्र वर्षे झालीं येच रीतीं । न लवती पातीं कदापि ॥ 10१ ॥
अंगीं लोटला घर्मपूर । ते हे भीमरथी गंगा थोर ।
नेत्रींचे जलबिंदु पडतां अपार । रुद्राक्ष तेथे जाहले ॥ 10२ ॥
दैत्यस्त्रिया पतिव्रता थोर । तेणें असुरांसी जय अपार ।
मग बौद्धरूपें श्रीकरधर । दैत्यस्त्रियांत प्रवेशला ॥ 10३ ॥
वेदबाह्य अपवित्र । प्रकट केलें चार्वाक शास्त्र ।
पतिव्रताधर्म मोडोनि समग्र । व्यभिचारकर्मे करविलीं ॥ 10४ ॥
तेणें दैत्यांस झालें अकल्याण । तंव इकडे शिवें लक्ष्य साधून ।
धनुष्यीं योजिला विष्णुबाण । पाशुपतास्त्र स्थापुनी ॥ 10५ ॥
उगवले सहस्र मार्तड । तैसें अस्त्र चालिलें प्रचंड ।
कीं उभारिला कालदंड । संहारावया विश्वातें ॥ 10६ ॥
कीं प्रळयाग्नीची शिखा सबळ । कीं कृतांताची जिव्हा तेजाळ ।
कीं ते प्रळयमेघांतील । मुख्य चपला निवडली ॥ 10७ ॥
कीं सप्तकोटिमंत्रतेज पाहीं । एकवटलें त्या अस्त्राठायीं ।
देव दैत्य भयभीत हृदयीं । म्हणती कल्पांत मांडिला ॥ 10८ ॥
न्याससहित जपोनि मंत्र । सोडोनि दिधलें दिव्यास्त्र ।
नवखंड धरणी आणि अंबर । तडाडले ते काळीं ॥ 10९ ॥
सहस्र विजा कडकडती । तैसी धांविन्नली अस्त्रशक्ती ।
भयें व्यापिला सरितापती । आंग टाकू पाहती दिग्गज ॥ ११० ॥
देव विमाने पळविती । गिरिकंदरीं असुर दडती ।
एक मूच्र्छना येवोनि पडती । उठती ना मागुते ॥ 1११ ॥
त्या अखें न लागतां क्षण । त्रिपुरें टाकिलीं जाळून ।
त्यांत तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न । साह्य झाला तयातें ॥ १1२ ॥
तिन्ही ग्राम सेनेसहित । त्रिपुरें भस्म झाली तेथ ।
देव शिवस्तवन करित । चरण धरित सप्रेमें ॥ १1३ ॥
त्यावरी त्रिपुरपिता तारकासुर । तेणें प्रलय मांडिला थोर ।
देव पळविले समग्र । चंद्र सूर्य धरूनि नेले ॥ १1४ ॥
भागीरथी आदि गंगा पवित्र । धरूनि नेत तारकासुर ।
देवांगना समग्र । दासी करोनि ठेविल्या ॥ १1५ ॥
ब्रह्मा विष्णु शचीवर । करिती एकांतीं विचार ।
म्हणती शिवउमा करावीं एकत्र । होईल पुत्र षण्मुख ॥ १1६ ॥
त्याचे हस्तें मरेल तारकासुर । मग बोलावूनि पंचशर ।
म्हणती तुवां जावोनि सत्वर । शिवपार्वती ऐक्य करीं ॥ १1७ ॥
हिमाचळी तप करी व्योमकेश । मन्मथा तू भुलवीं तयास ।
मग रतीसहित कुसुमेश । शिवाजवळी पातला ॥ १1८ ॥
पार्वतीच्या स्वरूपांत । रती तेव्हां प्रवेशत ।
वसंतें वन समस्त । शृंगारिलें तेधवां ॥ १1९ ॥
शिवाच्या मानसीं सतेज । प्रवेशला शफरीध्वज ।
पाखरें करिती बहु गजबज । शिवध्यान विक्षेपिती ॥ १२० ॥
ते पक्षी हांकावया नंदिकेश्वर । गेला होता तेव्हां दूर ।
तों पार्वती होवोनि कामातुर । पाठीसी उभी मन्मथाच्या ॥ 1२१ ॥
शिवें उघडिले नयन । तों पुढे देखिला मीनकेतन ।
म्हणे माझ्या तपासी केलें विघ्न । मग भाललोचन उघडला ॥ 1२२ ॥
निघाला प्रलयवैश्वानर । भस्म केला कुसुमशर ।
फाल्गुन पौर्णिमा साचार । काम जाळिला ते दिनीं ॥ 1२३ ॥
शिवदूत भूतगण । महाशब्दें हांक देवोन ।
स्मरगृह शब्द उच्चारून । नानापरी उपहासिती ॥ 1२४ ॥
शिवाची आज्ञा तेंपासून । फाल्गुनमासीं हुताशनी करून ।
जो हे व्रत न पाळी पूर्ण । अवदसा जाण त्या बाधी ॥ 1२५ ॥
ऐसा संहारूनि पंचशर । विचार करूनि पंचवक्त्र ।
तत्काळ उठोनि कर्पूरगौर । गेला कैलाससदनासी ॥ 1२६ ॥
रती शोक करी बहुत । मग समाधान करी निर्जरनाथ ।
म्हणे कृष्णावतारीं तुझा कांत । रुक्मिणीउदरीं अवतरेल ॥ 1२७ ॥
कमलासने कन्येसी भोगितां । कंदर्पास शाप दिधला होता ।
कीं शिवदृष्टीने तत्त्वतां । भस्म होसील कामा तू ॥ 1२८ ॥
असो इकडे हिमनगकुमारी । शिवप्राप्तीलागीं तप करी ।
सप्तऋषि प्रार्थिती त्रिपुरारी । वरीं कन्या हिमनगाची ॥ 1२९ ॥
पार्वती तप करी जे वनीं । शिव तेथे गेला बटुवेष धरोनी ।
गायनाच्या छंदें करूनी । पुसे भवानीप्रती तेव्हां ॥ १३० ॥
कासया तप करिसी येथ । येरी म्हणे जो कैलासनाथ ।
पति व्हावा एतदर्थ । आचरें तप येथे मी ॥ 1३१ ॥
बटु बोले ते अवसरीं । तू तंव हिमनगराजकुमारी ।
शंकर केवळ भिकारी । महाक्रोधी दारुण ॥ 1३२ ॥
ओलें गजचर्म प्रावरण । शार्दूलचर्म नेसला सर्पभूषण ।
वसविलें महाश्मशान । भूतगण सभोंवते ॥ 1३३ ॥
तरी विष्णु विलासी सगुण । त्यासी वरीं तूं ऐक वचन ।
तुज योग्य पंचवदन । वर नव्हे सर्वथा ॥ 1३४ ॥
ऐकतां क्षोभली जगन्माता । म्हणे शिवनिंदका होय परता ।
वदन न दाखवीं मागुता । परम खळा द्वेषिया ॥ 1३५ ॥
शिवनिंदक जो दुराचार । त्याचा विटाळ न व्हावा साचार ।
तुज शिक्षा करीन निर्धार । विप्र म्हणोनि राहिलें ॥ 1३६ ॥
देखोनि दुर्गेचा निर्धार । स्वरूप प्रकट करी कर्पूरगौर ।
पार्वतीने करूनि जयजयकार । चरण दृढ धरियेले ॥ 1३७ ॥
शिव म्हणे ते समयीं । प्रसन्न झालों माग लवलाहीं ।
अंबिका म्हणे ठाव देईं । अर्धांगी तुझ्या जगदात्म्या ॥ 1३८ ॥
अवश्य म्हणोनि त्रिपुरारी । कैलासासी गेला ते अवसरीं ।
पितृसदना झडकरी । गेली तेधवां जगदंबा ॥ 1३९ ॥
मग सप्तऋषि ते वेळे । शिवें हिमाचळा पाठविले ।
हिमनगें ते आदरें पूजिले । षोडशोपचारेंकरूनियां ॥ १४० ॥
अरुंधतीने येऊन । भवानी पाहिली अवलोकून ।
म्हणे शिव आणि भवानी पूर्ण । जोडा होय निर्धारे ॥ 1४१ ॥
मन्मथ संवत्सर चैत्रमासीं । लग्न नेमिलें शुद्ध अष्टमीसी ।
निश्चय करूनि सप्तऋषी । स्वस्थानासी पातले ॥ 1४२ ॥
कधी होईल शिवगौरी लग्न । इच्छिती बसेंद्रादि सहस्रनयन ।
तारकासुराचा तो प्राण । शिवपुत्र घेईल कधीं ॥ 1४३ ॥
इकडे नंदीस पाठवूनि ते वेळे । सर्व देव शिवें बोलाविले ।
घेवोनि त्रिदशांचे पाळे । पाकशासन पातला ॥ 1४४ ॥
इंदिरेसहित इंदिरावर । सावित्रीसहित चतुर्वक्त्र ।
अठ्याऐशीं सहस्र ऋषीश्वर । शिष्यांसहित निघाले ॥ 1४५ ॥
सिद्ध चारण गुह्यक । पितृगण मरुद्रण वसुअष्टक ।
एकादशरुद्र द्वादशार्क । यक्षनायक पातला ॥ 1४६ ॥
आपुलाल्या वाहनीं बैसोन । लोकपाल निघाले संपूर्ण ।
नवग्रह अष्टनायिका आदिकरून । किन्नर गंधर्व सर्वही ॥ 1४७ ॥
एवं सर्वांसहित शंकर । हिमाचलासी आला सत्वर ।
नगेंद्र येवोनि समोर । पूजोनि नेत सकळांते ॥ 1४८ ॥
दशसहस्र योजने मंडप । उभविला ज्यांचे तेज अमूप ।
सुवर्णसदने देदीप्य । जानवशासी दीधली ॥ 1४९ ॥
शिवस्वरूप पाहतां समस्त । वर्‍हाडी होत विस्मित
एक म्हणती वृद्ध बहुत । पुराणपुरुष अनादि ॥ १५० ॥
हा आहे केवळ निर्गुण । नवरी स्वरूपें अति सगुण ।
असो देवकप्रतिष्ठा करून । मूळ आला हिमाद्री ॥ 1५१ ॥
आद्यंत अवघे साहित्य । कमलोद्भव स्वयें करित ।
नवनिधी अष्ट महासिद्धी राबत । न्यून तेथे नसे काही ॥ 1५२ ॥
असो नवरा मिरवीत । नेला आपुल्या मंडपांत ।
मधुपर्कादि पूजाविधी समस्त । हिमाचळ करीतसे ॥ 1५३ ॥
लग्नघटिका आली जवळी । तंव ते श्रृंगारसरोवरमराळी ।
बाहेर आणिली हिमनगबाळी । उभी केली पटाआड ॥ 1५४ ॥
लग्नघटिका पाहे दिनपती । मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ।
पुण्याहं निश्चितीं । कमलासन म्हणतसे ॥ 1५५ ॥
असो यथाविधी संपूर्ण । दोघां झालें पाणिग्रहण ।
होमासी करिती प्रदक्षिण । शिव शक्ति तेधवां ॥ 1५६ ॥
इतुकें याज्ञिक झाले सर्वही । परी नोकरी कोणीं देखिली नाहीं ।
प्रदक्षिणा करितां ते समयी । पदनख देखिलें विधीनें ॥ 1५७ ॥
कामें व्यापिला सूर्यजामात । पटपटां वीर्यबिंदु पडत ।
साठी सहस्र बालखिल्य तेथ । जन्मले क्षण न लागतां ॥ 1५८ ॥
अन्याय देखोनि थोर । मदनांतक कोपला अनिवार ।
ब्रह्मयाचें पांचवें शिर । छेदूनि टाकिलें तेधवां ॥ 1५९ ॥
झाला एकचि हाहाकार । त्यावरी वैकुंठींचा सुकुमार ।
समाधान करी अपार । चतुर्वक्त्र नाम लैंपासुनी ॥ १६० ॥
असो यथाविधी सोहळे । चारी दिवस संपूर्ण जाहले ।
सकळ देव गौरविले । वस्त्रालंकारी हिमनगें ॥ 1६१ ॥
सवें पार्वती घेऊनी । कैलासा आला शूलपाणी ।
यावरी सर्व देव मिळोनी । प्रार्थिते झाले विश्वनाथा ॥ 1६२ ॥
खुटली विश्वाची उत्पत्ती । मन्मथ उठवीं उमापती ।
मग तो मीनध्वज पुढती । अनंग करोनि जीवविला ॥ 1६३ ॥
अंधकपुत्र तारकासुर । तेणे पळविले देव समग्र ।
शिवासी होईल कधीं पुत्र । देव समग्र वांछिती ॥ 1६४ ॥
चारी युगेपर्यंत । शिव उमा एकांतीं रमत ।
परी नोहें वीर्यपात । नव्हे सुत याकरितां ॥ 1६५ ॥
तों तारकासुरें केला आकांत । स्वर्ग जाळिले समस्त ।
देवललना धरूनि नेत । दासी बहुत पैं केल्या ॥ 1६६ ॥
देव शिवासी शरण जाती । तंव ती दोघे एकांती रमती ।
देव ऋषी बाहेर तिष्ठती । प्रवेश कोणा नव्हेचि ॥ 1६७ ॥
मग अग्नि आत पाठविला । अतीतवेष तेणें धरिला ।
जो तृतीयनेत्रीं शिवाच्या राहिला । देवीं पाठविला मित्र म्हणोनी ॥ 1६८ ॥
हांक फोडोनि भिक्षा मागत । शिव पार्वतीस आज्ञापित ।
माझे वीर्य धरोनि अदभुत । भिक्षा देई अतीतातें ॥ 1६९ ॥
मग अमोघ वीर्य धरून । अग्नीस देत अंबिका आणोन ।
सांडले जेथे वीर्य जाण । रेतकूप झाला तो ॥ १७० ॥
तोचि पारा परम चंचळ । न धरवे कोणा हातीं तेजाळ ।
असो कृशानूनें वीर्य तत्काळ । प्राशन केले तेधवां ॥ 1७१ ॥
अग्नि झाला गरोदर । परम लज्जित हिंडे कांतार ।
तो साही कृत्तिका परम सुंदर । ऋषिपत्न्या देखिल्या ॥ 1७२ ॥
त्या गंगेत स्नान करूनी । तापत बैसल्या साहीजणी ।
तंव अग्नीने गर्भ काढूनी । पोटांत घातला साहींच्या ॥ 1७३ ॥
साहीजणी झाल्या गर्भिणी । परम आश्चर्य करिती मनीं ।
मग लजेनें गर्भ काढूनी । साहीजणींनी त्यागिला ॥ 1७४ ॥
साहींचे रक्त एक झालें । दिव्य शरीर तत्काळ घडलें ।
सहा मुखे हस्त शोभलें । द्वादश सरळ तेजस्वी ॥ 1७५ ॥
कार्तिकमासी कृत्तिकायोगीं । कुमार जन्मला महायोगी ।
मयूरवाहन भस्म अंगी । उपासीत शिवातें ॥ 1७६ ॥
शिवें निजपुत्र जाणोनी । नेवोनी लाविला अपर्णास्तनी ।
सप्त वर्षे मृडानी । लालन पालन करी त्याचें ॥ 1७७ ॥
देवांसी सांगे वैश्वानर । शिवासि झाला स्कंद पुत्र ।
ऐकतां देव समग्र । तारकावरी चालिले ॥ 1७८ ॥
सेना जयाची बाहत्तर अक्षौहिणी । त्याचें नगर वेढिती सुधापानी ।
पृतनेसहित तेच क्षणीं । तारकासुर बाहेर निघे ॥ 17९ ॥
इंद्रे स्वामिकार्तिकापासीं जाऊन । सेनापतित्व दिधलें संपूर्ण ।
दिव्य रथीं बैसवून । अभिषेकिला कुमार ॥ १८० ॥
इकडे तारकासुर सुधापानी । युद्ध करिती झोटधरणी ।
देव त्रासिले दैत्यांनी । आले पळोनि कुमाराकडे ॥ 1८१ ॥
स्कंदापुढे कर जोडून । देव करिती अपार स्तवन ।
रक्षीं तारकासुरापासून । शिवनंदन तोषला ॥ 1८२ ॥
देवांचा वृत्तांत जाणोनि सकळ । कुमारे धरिलें रूप विशाळ ।
तों तारकासुर धांविन्नला प्रबळ । शिवकुमार लक्षूनी ॥ 1८३ ॥
तेहतीस कोटी सुरवर । उभे स्वामीचे पाठीं भार ।
तारकाअंगीं बळ अपार । दशसहस्र कुंजरांचे ॥ 1८४ ॥
तारकासुर अनिवार । वर्षे सायकांचे संभार ।
स्वामीचे पाठीसीं सुर । लपती सत्वर जाऊनी ॥ 1८५ ॥
लक्षुनियां पाकशासन । तारकें शक्ति दिधली सोडून ।
प्रळयचपळेस मागे टाकून । मनोवेगें चालिली ॥ 1८६ ॥
भयभीत शक्र होऊन । करी हरिस्मरण कर जोडोन ।
म्हणे हे इंदिरामानसरंजन । निवारी येवोनि शक्ति हे ॥ 1८७ ॥
ब्रह्मानंदा विश्वव्यापका । दशावतार चरित्रचालका ।
मधुमुरनरकांतका । निवारी प्रळयशक्ति हे ॥ 1८८ ॥
वैकुंठींहूनि योगमाया । हरीने धाडिली लवलाह्या ।
तिणे ते शक्ति परतोनियां । एकीकडे पाडिली ॥ 1८९ ॥
यावरी तारकें बाणांचे पूर । स्वामीवरी सोडिले अपार ।
मुख पसरोनि शिवकुमार । तितुकें गिळितां जाहला ॥ १९० ॥
नाना शख्ने अस्त्रशक्ती । तारकें सोडिल्या अनिवारगती ।
तितुक्या गिळिल्या सहजस्थिती । शास्त्रसंख्यावदनाने ॥ 1९१ ॥
कल्पांतरुद्रासमान । भयानक दिसे मयूरवाहन ।
तारकें ब्रह्मास्त्र दिधले सोडून । तेंही गिळीं अवलीळे ॥ 1९२ ॥
जितुके शस्त्रमंत्र निर्वाण । तितुके प्रेरीतसे चहूंकडून ।
प्रळयकाळासम शिवनंदन । गिळी क्षण न लागतां ॥ 1९३ ॥
मग निःशस्त्र तारकासुर । स्यंदनाहूनि उतरला सत्वर ।
स्वामीवरी धांवे अनिवार । सौदामिनीसारखा ॥ 1९४ ॥
ऐसें देखोनि षडानन । कृतांताऐसी हांक देऊन ।
रथाखाली उतरून । मल्लयुद्ध आरंभिलें ॥ 1९५ ॥
सप्तदिनपर्यंत । युद्ध झालें परम अदभुत ।
तारकासुर अत्यंत । जर्जर केला आपटोनी ॥ 1९६ ॥
पायीं धरोनि अवलीला । चक्राकार भोवडिला ।
मग धरणीवरी आपटिला । चूर्ण झाला मृद्धटवत ॥ 1९७ ॥
निघोनि गेला प्राण । दुंदुभी वाजवी शचीरमण ।
पुष्पें वर्षिती सुरगण । कर जोडोनि स्तुती करिती ॥ 1९८ ॥
मारिला जेव्हा तारकासुर । तेव्हा सात वर्षांचा शिवकुमार ।
मग सेनापतित्व समग्र । इंद्रे त्यासी दीधलें ॥ 1९९ ॥
तारकासुराचें नगर । इंद्रे लुटिले समग्र ।
देवस्त्रिया सोडविल्या सत्वर । सर्व देव मुक्त झाले ॥ २०० ॥
लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष । कुमार गेला वाराणसीस ।
नमूनि शिवमृडानीस । सुख अपार दीधलें ॥ 20१ ॥
मग झालें मौंजीबंधन । सर्व तीर्थे करी षडानन ।
मग कपाटीं बैसला जाऊन । अनुष्ठान करी सुखें ॥ 20२ ॥
षडाननास भवानी म्हणत । ब्रह्मचर्य केले आजपर्यंत ।
आता स्त्री करूनि यथार्थ । गृहस्थाश्रम करीं कीं ॥ 20३ ॥
षडानन म्हणे अंबेप्रती । सांग स्त्रिया कैशा असती ।
म्यां देखिल्या नाहीं निश्चिती । कैसी आकृति सांगें मज ॥ 20४ ॥
अपर्णा म्हणे सुकुमारा । मजसारख्या स्त्रिया सर्बत्रा ।
ऐकतां हांसें आलें कुमारा । काय उत्तरा बोलत ॥ 20५ ॥
तुजसारख्या स्त्रिया जरी । तुजसमान मज निर्धारीं ।
तुझ्या वचनासी मातुश्री । अंतर पडों नेदी मी ॥ 20६ ॥
ऐसें कुमार बोलोन । महाकपाटांत जाय पळोन ।
मग ते जगन्माता आपण । धरू धांविन्नली तयातें ॥ 20७ ॥
नाटोपे कुमार ते क्षणीं । अंबा दुःखे पडे धरणीं ।
जे त्रिभुवनपतीची राणी । वेदपुराणीं वंद्य जे ॥ 20८ ॥
अरे तू कुमारा दावीं बदना । आला माझ्या स्तनासी पान्हा ।
कोणासी पाजू षडानना । निजवदन दाखवीं ॥ 20९ ॥
घेई तुझे दूध लोणी । म्हणोनि कुमार वमी ते क्षणी ।
बोले तेव्हां शापवाणी । क्रोधे करूनि कुमार तो ॥ २१० ॥
माझे दर्शना जी स्त्री येईल । ती सप्तजन्म विधवा होईल ।
स्वामिदर्शना पुरुष येईल । कार्तिकमासी कृत्तिकायोगीं ॥ 2११ ॥
तो सप्तजन्म सभाग्य । होईल धनाढ्य वेदपारंग ।
अनामिक हो अथवा मातंग । दर्शनें लाभ समानचि ॥ 2१२ ॥
स्वामींस ऋषि विनविती समस्त । भवानी तुजलागीं तळमळत ।
भेटोनि येई त्वरित । वाराणसीस जाऊनी ॥ 2१३ ॥
मग स्वामी आनंदवना जाऊनी । आनंदविलीं शिवभवानी ।
उभयतांचे समाधान करोनी । मागुती गेला पूर्वस्थळा ॥ २१४ ॥
स्कंदपुराण कथा सूत । शौनकादिकांप्रती सांगत ।
ऐकतां विघ्ने समस्त । क्षणमात्रे दग्ध होती ॥ २१५ ॥
अपर्णाहृदयाब्जमिलिंदा । श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ।
पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा । आनंदकंदा जगद्गुरु ॥ २१६ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । त्रयोदशाध्याय गोड हा ॥ २१७ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More