Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 3

(Shri Shiv Leelamrut Adhyay 3)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 3 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 3. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 195
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय शिव मंगलधामा । निजजनहृदयआरामा ।
चराचरफलांकितद्रुमा । नामाअनामातीत तू ॥ १ ॥
इंदिरावरभगिनीनीमनरंजना । षडास्यजनका शफरीध्वजदहना ।
ब्रह्मानंद भाललोचना । भवभंजना त्रिपुरांतका ॥ २ ॥
हे शिवसद्योजात वामघोरा । तत्पुरुषा ईशान ईश्वरा।
अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ३ ॥
गंगाधरा भोगिभूषणा । सर्वव्यापका अंधकमर्दना ।
परमातेता निरंजना । गुणत्रयविरहित तू ॥ ४ ॥
हे पयःफेनधवल जगज्जीवन । द्वितीयाध्यायीं कृपाकरून ।
अगाध सुरस आख्यान । शिवरात्रीमहिमा वर्णविला ॥ ५ ॥
यावरी कैसी कथेची रचना । वदवीं पंचमुकुट पंचानना ।
शौनकादिकां मुनिजनां । सूत सांगे नैमिष्यारण्यीं ॥ ६ ॥
इक्ष्वाकुवंशी महाराज । मित्रसहनामें भूभुज ।
वेदशास्त्रसण्पन्न सतेज । दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥ ७ ॥
पृतनावसनेंकरून । घातलें उर्वीस पालाण ।
प्रतापसूर्य उगवला पूर्ण । शत्रुभणें मावळलीं ॥ ८ ॥
तो एकदा मृगयाव्याजेंकरून । निघाला धुरंधर चमू घेऊन ।
फ़्होरांदर प्रवेश्ला विपिन । तों सावजें चहूकडून उठलीं ॥ ९ ॥
व्याघ्र वृक रीस वनकेसरी । मृग मृगी वनगौ वानर वानरी ।
शशकजंबुकांच्या हारी । संहारीत नृपवर ॥ १० ॥
चातक मयूर बदक । कस्तुरीकुरंग जवादिबिडालक ।
नकुल राजहंस चक्रवाक । पक्षी श्वापदे धावती ॥ ११ ॥
नृपे मारिले जीव बहुवस । त्यात एक मारिला राक्षस ।
महाभयानक तामस । गतप्राण होऊनि पडियेला ॥ १२ ॥
त्याचा बंधु परम दारुण । तो लक्षिता झाला दुरोन ।
मनी कापट्य कल्पून । म्हणे सूड घेईन बंधूचा ॥ १३ ॥
मित्रसह पातला स्वनगरास । असुरे धरिला मानववेष ।
कृष्णवसनवेष्टित विशेष । दर्वी स्कंधी घेऊनिया ॥ १४ ॥
नृपासी भेटला येऊन । म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण ।
अन्न शाका सुवास करीन । देखोन सुर नर भूलती ॥ १५ ॥
राये ठेविला पाकसदनी । त्यावरी पितृतिथी लक्षुनी ।
गुरु वसिष्ठ घरालागुनी । नृपश्रेष्ठे आणिला ॥ १६ ॥
भोजना आला अब्जजनंदन । तो राक्षसे कापट्य स्मरून ।
शाकांत नरमांस शिजवून । ऋषीस आणून वाढिले ॥ १७ ॥
त्रिकाळज्ञानी वसिष्ठमुनी । सकळ ऋषींमाजी शिरोमणी ।
कापट्य सकळ जाणुनी । मित्रसह शापिला ॥ १८ ॥
म्हणे तू वनी होई राक्षस । जेथे आहार न मिळे निःशेष ।
मी ब्राह्मण मज नरमांस । वाढिले कैसे पापिया ॥ १९ ॥
राव म्हणे मी नेणे सर्वथा । बोलावा सूपशास्त्री जाणता ।
तव तो पळाला क्षण न लागता । गुप्तरूपे वना आपुल्या ॥ २० ॥
राव कोपला दारुण । मज शापिले काय कारण ।
मीही तुज शापीन म्हणोन । उदक करी घेतले ॥ २१ ॥
तव रायाची पट्टराणी । मदयंती नामे पुण्यखाणी ।
रूपे केवळ लावण्यहरिणी । चातुर्य उपमे जेवी शारदा ॥ २२ ॥
मदयंती म्हणे राया । दूरदृष्टी पाहे विचारूनिया ।
शिष्ये गुरूसी शापावया । अधिकार नाही सर्वथा ॥ २३ ॥
गुरूसी शाप देता निर्धारी । आपण नरक भोगावे कल्पवरी ।
राव म्हणे चतुर सुंदरी । बोललीस साच ते ॥ २४ ॥
म्हणे हे उदक खाली टाकू जरी । तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री ।
मग आपुल्याच प्रपदांवरी । जल टाकी मित्रसह ॥ २५ ॥
तो जानूपर्यंत चरण । दग्ध झाले कृष्णवर्ण ।
कुष्ठ भरला मग तेथून । कल्माषपाद नाम त्याचे ॥ २६ ॥
वसिष्ठे जाणोनि वृत्तान्त । रायासी उःशाप देत ।
म्हणे द्वादशवर्षी होशील मुक्त । येसी स्वस्थाना आपुल्या ॥ २७ ॥
गुरू पावला अंतर्धान । मग कल्माषपाद राक्षस होऊन ।
क्षुधाक्रांत निशिदिन । वनी भक्षी जीव सर्व ॥ २८ ॥
परम भयानक असुर । विशाळ देह कपाळी शेंदुर ।
विक्राळ वदन बाहेर शुभ्र । दंतदाढा वाढलिया ॥ २९ ॥
जीव भक्षिले आसमास । वनी हिंडता तो राक्षस ।
एक ब्राह्मणकुमर डोळस । द्वादशवर्षी देखिला ॥ ३० ॥
सवे त्याची ललना चिमणी । दोघे क्रीडती कौतुके वनी ।
तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरूनी । भक्षावया सिद्ध झाला ॥ ३१ ॥
तव त्याची वधू काकुळती येत । अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत ।
गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य । माझा कांत मारू नको ॥ ३२ ॥
गडबडा लोळे सुंदरी । करुणा भाकी पदर पसरी ।
सवेचि जाऊनि चरण धरी । सोडी झडकरी पति माझा ॥ ३३ ॥
पतीस भक्षू नको राजेंद्रा । महत्पाप घेऊ नको एकसरा ।
स्वर्गमार्ग तरी चतुरा । कैसा पावसी अंतकाळी ॥ ३४ ॥
ऐसी करुणा भाकिता कामिनी । निर्दये भक्षिला तेच क्षणी ।
अस्थिपंजर टाकुनी । तियेपुढे दीधला ॥ ३५ ॥
तव ती दुःखेकरोनी । आक्रोशे कपाळ पिटी धरणी ।
मृत्तिका घेवोनि घाली वदनी । कोण वनी सावरी तीते ॥ ३६ ॥
मग तिने शाप दिधला रायाते । जो अलोट विधिहरिहरांते ।
म्हणे मदयंतीसंगसुरते । प्राण जाईल तेचि क्षणी ॥ ३७ ॥
कोणे एके स्त्रीचा संगसोहळा । तुज न घडो रे चांडाळा ।
ऐसा शाप वदोनि ते वेळा । केल्या गोळा अस्थी पतीच्या ॥ ३८ ॥
तत्काळ प्रवेशली अग्नी । इकडे द्वादशवर्षी शापमुक्त होऊनि ।
राव स्वनगरा येऊनी । वर्तमान सांगे स्त्रियेसी । ॥ ३९ ॥
येरी कपाळ पिटी आक्रोशेकरोन । म्हणे झाले वंशखंडन ।
पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून । प्राण आपुला रक्षी का ॥ ४० ॥
अनिवार अत्यंत मन । न करी कोणे स्त्रियेसी संभाषण ।
खदिरांगाराची सेज आजपासून । झाली तुजलागी जाण पा ॥ ४१ ॥
परम तळमळी राजेंद्र । जैसा सापळा कोंडिला व्याघ्र ।
की त महाभुजंगाचे दंत समग्र । पाडोनि गारुडी दीन करी ॥ ४२ ॥
की नासिकी वेसण घालून । महावृषभ करिती दीन ।
की बनी निरंकुश वारण । धरून क्षीण करिती मग ॥ ४३ ॥
तैसा कल्माषपाद भूप । होऊनि राहिला दीनरूप ।
पुढे प्रकाशावया कुळदीप । आपण धर्मशास्त्र पाहातसे ॥ ४४ ॥
तेथींचे पाहोनि प्रमाण । वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन ।
अमोघ वीर्य पडता पूर्ण । दिव्य पुत्र जाहला ॥ ४५ ॥
तेणे पुढे वंश चालिला । असो तो राव मृगयेस निघाला ।
यथारण्य तथा गृह वाटे नृपाला । भोग त्यजिले सर्वही ॥ ४६ ॥
मनात मनोजविकार उठत । विवेकांकुशे कामइभ आवरीत ।
म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य । ते कर्म सहसा न करावे ॥ ४७ ॥
आपुली कर्मगति गहन । प्राक्तन विचित्र दारुण ।
देवावरी काय बोल ठेवून । भोगिल्यावीण न सुटेचि ॥ ४८ ॥
ऐसा राव उदासयुक्त । वनी हिंडता मागे पहात ।
तो पिशाच भयानक अत्यंत । रायापाठी उभे सदा ॥ ४९ ॥
दंपत्ये पूर्वी मारिली । ती ब्रह्महत्या पाठीसी लागली ।
राजा तीर्थे हिंडता सकळी । परी कदाकाळी न सोडी ॥ ५० ॥
न सोडी स्वप्नी जागृतीत । महाविक्राळ दात करकरा खात ।
राये व्रते केली त बहुत । दान देत बहुसाल ॥ ५१ ॥
ऐसा हिंडता राव भागला । मिथुलानगरासमीप आला ।
वनश्री देखता आनंदला । परी ब्रह्महत्या पाठीसी उभी ॥ ५२ ॥
वृक्ष लागले बहुत । आम्रवृक्ष फळभारे डोलत ।
पोफळी रातांजन विराजित । केळी नारळी खर्जुरिया ॥ ५३ ॥
चंपक जाई जुई मालती । मोगरे पुन्नागराज शेवंती ।
मलयागर कृष्णागर जाती । जपा करवीर कोविदार ॥ ५४ ॥
वड पिंपळ औदुंबर । पारिजातक बकुल देवदार ।
कपित्थ बिल्व अंजिर । अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥ ५५ ॥
ऐसिया वनामाजी नृपती । क्षण एक पावला विश्रांती ।
परी ते पाठीसी पापमती । ब्रह्महत्या उभी असे ॥ ५६ ॥
तो उगवला भाग्यवासरमणी । की निधान जोडे रंकालागुनी ।
की क्षुधितापुढे उचंबळोनी । क्षीराब्धि जैसा पातला ॥ ५७ ॥
की मरतियाच्या मुखात । अकस्मात घातले अमृत ।
की चिंताग्रस्तासी प्राप्त । चिंतामणी जाहला ॥ ५८ ॥
तैसा तापसियांमाजी मुकुटमणी । शिष्यमांदी सवें घेऊनी ।
महाराज तपस्वी गौतममुनी । तये स्थानी पातला ॥ ५९ ॥
राये घातले लोटांगण । दाटला अष्टभावेकरून ।
उभा ठाकला कर जोडून । करी स्तवन प्रीतीने ॥ ६० ॥
सहज होता संतदर्शन । पापे संहारती संपूर्ण ।
तू विलोकिसी जरी कृपा करून । तरी रंक सहस्रनयन होय ॥ ६१ ॥
यावरी तो महाराज गौतम । कल्माषपादा पुसे कुशलक्षेम ।
राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम । सुखेकरून नांदती की ॥ ६२ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । स्वधर्म आचरती की समग्र ।
पशु सेवक पुत्र कलत्र । समस्त सुखरूप आहेत की ॥ ६३ ॥
राव म्हणे आपुले कृपेकरून । समस्त आहेत क्षेमकल्याण ।
परंतु आलासी वाटते दुरून । आनंदघन दिसतोसी ॥ ६४ ॥
तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर । ब्रह्महत्या दूर होईल समग्र ।
मग पूर्वकर्म आपुले दुस्तर । ऋषीप्रती निवेदिले ॥ ६५ ॥
गौतम म्हणे परम पवित्र । भूकैलास गोकर्णक्षेत्र ।
तेथूनि मी आलो अपार । महिमा तेथींचा न वर्णवे ॥ ६६ ॥
ॐकाररूपे कैलासनाथ । भवानीसहित तेथे नांदत ।
सुर असुर किन्नर सेवीत । अर्धमात्रापीठ जे ॥ ६७ ॥
त्या गोकर्णींचे शिवदर्शन । ब्रह्मादिकां दुर्लभ जाण ।
तेथे इंदिरेसहित जनार्दन । तप गहन आचरत ॥ ६८ ॥
कोटिसूर्यांची प्रभा । मृडानीसहित शिव उभा ।
कैवल्यगर्भाचा पूर्ण गाभा । तेथींची शोभा ने वर्णवे ॥ ६९ ॥
इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र । तेथेचि वसती अहोरात्र ।
जेथींचे पाषाण तरुवर । समग्र निर्जर अवतरले ॥ ७० ॥
सत्यवतीहृदयरत्न । जेथे करी अनुष्ठान ।
वसिष्ठ भृगु जामदग्न्य । गोकर्णक्षेत्री सदा वसती ॥ ७१ ॥
पहावया मृडानीनायक । मंडपघसणी होतसे देख ।
नारद तुंबरु गायक । जेथे गाती शिवलीला ॥ ७२ ॥
गोकर्णाभोवते समग्र । उभे अखंड देवांचे भार ।
मुखे गर्जती शिव हर हर । आनंद थोर होतसे ॥ ७३ ॥
ऋषि करिती वेदघोष । अष्टनायिकांचे नृत्य विशेष ।
किन्नर गंधर्व गायक सुरस । तोषविती महेशाते ॥ ७४ ॥
ते अति उत्तम स्थान । तेजोमय प्रकाश गहन ।
नाना वृक्ष लागले सघन । कैलासभुवन प्रत्यक्ष ॥ ७५ ॥
शुभ्र सिंहासन लेखलखित । चारी द्वारे मणिमयखचित ।
ऐरावतारूढ अमरनाथ । पूर्वद्वारी तिष्ठतसे ॥ ७६ ॥
दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन । पश्चिमेसी वारुणीरमण ।
उत्तरेसी वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ॥ ७७ ॥
कर्पूरगौर भवानीसहित । घवघवीत तेजे विराजित ।
भूकैलास साक्षात । माहेर संत-साधकांचे ॥ ७८ ॥
त्या मूर्तीचे करावे ध्यान । त्याभोवते महासिद्धीचे पूजन ।
त्याभोवते कात्यायनीआवरण । अष्टभैरव पूजिजे ॥ ७९ ॥
द्वादश मित्र एकादश रुद्र । तेथेचि वसती अहोरात्र ।
अष्टवसु दिक्पाळ समग्र । जोडोनि कर उभे तेथे ॥ ८० ॥
अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी । अखंड आराधिती पिनाकपाणी ।
रायासी म्हणे गौतममुनी । मीही वसतो सदा तेथे ॥ ८१ ॥
वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण । तप आचरला निर्वाण ।
गोकर्णी एक दिन । होय प्रसन्न सदाशिव ॥ ८२ ॥
अमावास्या संक्रांति सोमवार । प्रदोष पर्वकाळ शिववास ।
समुद्रस्नान करिता समग्र । फळ होय सकळ तीर्थांचे ॥ ८३ ॥
रावण कुंभकर्ण बिभीषण । याही पूर्वी केले लेथे अनुष्ठान ।
ते निर्वाणलिंग दशानने जाण । कैलासाहूनि आणिले ॥ ८४ ॥
गणेशे स्थापिले ते लिंग । ऋषी म्हणती सूताते कथा सांग ।
ऐकावया लीला सुरंग । श्रवण वाट पाहती ॥ ८५ ॥
यावरी सूत वक्ता निपुण । रावणमातेसी कैकसी अभिधान ।
ती नित्य लिंगपूजनाविण जाण । उदक प्राशन न करीच ॥ ८६ ॥
पंचधान्यांचे पिष्ट करून । लिंग करी कामना धरोन ।
व्हावे रावणाचे कल्याण । जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥ ८७ ॥
शक्रे तिचे लिंग नेऊन । समुद्री टाकिले द्वेषे करून ।
त्यालागी रात्रंदिन । रावणमाता अन्न न घे ॥ ८८ ॥
रावण म्हणे मातेलागून । मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन ।
कैलासाप्रती द्विपंचवदन । जाता झाला साक्षेपे ॥ ८९ ॥
तप आचरला दारुण । जो चतुःषष्टिकलाप्रवीण ।
जेणे वेदांची खंडे करून । सारासार निवडिले ॥ ९० ॥
चतुर्दशविद्यापारंगत । शिवासी आवडे अत्यंत ।
दशमुखे गायन अद्भुत । केले त्याणे स्वामीपुढे ॥ ९१ ॥
आपुले शिर छेदून स्वहस्ते । शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्त ।
दशमुख गात प्रेमभरित । उमानाथ संतोषे जेणे ॥ ९२ ॥
राग उपराग भार्यांसहित । मूर्च्छना शरीर कंपित ।
सप्तस्वर ताल संगीत । शास्त्रप्रमाण गातसे ॥ ९३ ॥
गद्यपद्यरचना नाना कळा । गीत प्रबंध अखंड नाममाळा ।
गाता प्रीतीने शिवलीला । शंभु तोषला अद्भुत ॥ ९४ ॥
म्हणे प्रसन्न झालो दशमुखा । इच्छित माग तुज प्रिय जे का ।
दशकद्वयनयन म्हणे कामांतका । आत्मलिंग मज देई ॥ ९५ ॥
या त्रिभुवनात जे सुंदर । ऐसी ललना देई सुकुमार ।
ऐकून संतोषला कर्पूरगौर । भोळा उदार चक्रवर्ती ॥ ९६ ॥
कोटि चंद्रसूर्याची प्रभा पूर्ण । ऐसे लिंग काढिले हृदयातून ।
की ब्रह्मानंदरस मुरोन । दिव्य लिंग ओतिलें ॥ ९७ ॥
सहस्र बालसूर्य न पावती सरी । ऐसी प्रभा पडली दशदिशांतरी ।
दिधले रावणाचे करी । जे अतर्क्य ब्रह्मादिका ॥ ९८ ॥
जे मुनिजनांचे ध्येय ध्यान । जे सनकादिकांचे देवतार्चन ।
वेद शास्त्र पुराण । दिव्य लिंग वर्णिती ॥ ९९ ॥
जे त्रिगुणातीत परब्रह्म । जे अज अजित अनाम ।
सच्चिदानंद निर्वाणधाम । योगी आराम पावती जेथे ॥ १०० ॥
अनंत ब्रह्मांडे विचित्रे । जेणे रचिली इच्छामात्रे ।
ज्याकारणे भांडती वेदशास्त्रे । ते दिव्य लिंग पुरातन ॥ 10१ ॥
ते लिंग रावणे हाती घेऊन । म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन ।
लावण्यसागरींचे निधान । त्रिभुवनसुंदर ललना दे ॥ 10२ ॥
जी अपर्णेची अपर प्रतिमा । ऐसी देई मज सर्वोत्तमा ।
सच्चिदानंद पूर्णब्रह्मा । नामाअनामातीत तू ॥ 10३ ॥
शिव म्हणे इची प्रतिमा विशेष । निर्मू न शके विधीश ।
भोळा चक्रवर्ती महेश । म्हणे हेचि नेई अपर्णा तू ॥ 10४ ॥
रावणे श्री अवश्य म्हणोनी । स्कंधी घेतली स्कंदजननी ।
दिव्यलिंग हाती घेऊनी । लंकानाथ चालिला ॥ 10५ ॥
दक्षिणपंथे जाता सत्वर । गजबजिले सकळ सुरवर ।
गजानन स्कंद वीरभद्र । नंदिकेश्वर तळमळती ॥ 10६ ॥
म्हणती हे सदाशिव त्रिनयन । हे कैसे तुझे उदारपण ।
भवानी बैसलासी देऊन । पंचवदन हासतसे ॥ 10७ ॥
म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ । तो धावेल आता स्नेहभरित ।
इकडे भवानी स्तवन करीत । हे पद्मजतात धाव वेगी ॥ 10८ ॥
वारिजनयना इंदिरावरा । निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा ।
हे नीलपयोधरगात्रा । धाव वेगी सोडवी मज ॥ 10९ ॥
हे मधुकैटभनरकमुरभंजना । हे दशावतारधरा पीतवसना ।
हे मदनांतकमानसरंजना । हे जनार्दना जगद्गुरू ॥ ११० ॥
हे कोटिमनोजतात श्रीधर । असुरमर्दन परम उदार ।
ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर । विप्ररूपे आडवा आला ॥ 1११ ॥
म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना । कोठे मिळविली ऐसी ललना ।
दशमुख म्हणे हे अपर्णा । सदाशिवे दीधली ॥ १1२ ॥
विप्र म्हणे खाली उतरून । न्याहाळूनि पाहे इचे वदन ।
रावण पाहे तव ते कुलक्षण । अत्यंत कुरूप देखिली ॥ १1३ ॥
भुवयास आंठी अमंगळ पूर्ण । वृद्ध गाल बैसले दंतहीन ।
गदगदा विप्र हासे देखून । टाकोनि रावण चालिला ॥ १1४ ॥
मग रमाधवे तये स्थळी । स्थापिली माता भद्रकाळी ।
इकडे असुर शिवाजवळी । म्हणे स्त्री अमंगळ कैसी दीधली ॥ १1५ ॥
शिव म्हणे सत्य वचन । ते तुज नाटोपे कौटाळीण ।
अनंत ब्रह्मांडे दावून । सवेचि लपवील तत्त्वता ॥ १1६ ॥
मग श्रीधरे आंगीची मळी काढून । स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न ।
मयासुराचे उदरी जाण । उत्पन्न झाली तेच पै ॥ १1७ ॥
तिच्या स्वरूपाची प्रति । नाही नाही त्रिजगती ।
आंगीच्या सुवासे धावती । काद्रवेयचक्रे प्रीतीने ॥ १1८ ॥
तिचे नाम मंदोदरी । तिची प्रतिमा नाही उर्वीवरी ।
विंशतिनेत्राचे चत्वरी । पट्टमहिषी पतिव्रता ॥ १1९ ॥
मयासुर करील कन्यादान । वरी एक शक्ति देईल आंदण ।
सप्तकोटी मंत्रांचे गहन । सामर्थ्य असे जियेमाजी ॥ १२० ॥
ते निर्वाणसांगातीण शक्ती । तुज प्राप्त होईल लंकापती ।
महाशत्रूवरी निर्वाणी ती । प्रेरावी त्वा सत्य पै ॥ 1२१ ॥
ऐसे ऐकताचि रावण । परतला लिंग घेऊन ।
पूर्वस्थळासी आला जाण । तो गजानन गाई राखी ॥ 1२२ ॥
गजाननाचे स्तवन । देव करिती कर जोडून ।
म्हणती दिव्य लिंग सोडवून । स्थापी अक्षयी गणपती ॥ 1२३ ॥
ऐसा देवी प्रार्थिला एकदंत । तव रावणासी मूत्र लागले बहुत ।
पुढे पाऊल न घालवत । चरफडीत मूत्रभरे ॥ 1२४ ॥
भूमीवरी लिंग न ठेवावे । ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे ।
हाती घेऊनि लघुशंकेस बैसावे । हेही कर्म अनुचित ॥ 1२५ ॥
तव तो सिद्धीबुद्धींचा दाता । विप्रवेषे गाई राखिता ।
त्यासी लंकानाथ म्हणे तत्त्वता । लिंग हाती धरी हे ॥ 1२६ ॥
विप्र म्हणे लंकापती । माझ्या गाई रानोरानी पळती ।
तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती । लागेल हे न कळे मज ॥ 1२७ ॥
रावण म्हणे न लगता क्षण । येतो मूत्रशंका करून ।
विप्र म्हणे तीन वेळा बाहीन । न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥ 1२८ ॥
अवश्य म्हणे लंकापती । लिंग देत विप्राच्या हाती ।
दूर जाऊन एकांतक्षिती । लघुशंकेस बैसला ॥ 1२९ ॥
अगाध गजमुखाचे चरित्र । जो साक्षात् अवतरला इंदिरावर ।
शिवउपासना करावया पवित्र । झाला पुत्र शंभूचा ॥ १३० ॥
असो रावणासी मूत्राचे पूर । लोटले न सांवरती अनिवार ।
एक घटिका लोटता इभवक्त्र । हाक फोडी गर्जोनी ॥ 1३१ ॥
माझ्या गाई गेल्या दूरी । हे आपुले लिंग घेई करी ।
रावण न बोलेचि निर्धारी । हस्तसंकेते थांब म्हणे ॥ 1३२ ॥
दुसरी घटिका झाली पूर्ण । हाक फोडी गजानन ।
एवं घटिका झाल्या तीन । कदापि रावण न उठेचि ॥ 1३३ ॥
जैसे पाखंडियाचे कुमत । न सरेचि वारिता पंडित ।
तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य । पुनः एकदंत हाक फोडी ॥ 1३४ ॥
राक्षसा आपुले लिंग सांभाळी । म्हणोनि ठेविले भूमंडळी ।
अक्षय स्थापिले कदाकाळी । ब्रह्मादिका उपटेना ॥ 1३५ ॥
पृथ्वीसहित अभंग । एकचि झाले दिव्य लिंग ।
रावण धावे सवेग । अशौच अपवित्र क्रोधभरे ॥ 1३६ ॥
लिंग उपटता डळमळी कुंभिनी । महाबळे दशमुख पाहे उपटोनी ।
परी न उपटे तयालागुनी । अखंड अभंग जाहले ॥ 1३७ ॥
गुप्त जाहला गजानन । गाई पृथ्वीत जाती लपोन ।
रावणे एक गाईचा कर्ण । धांवोनिया धरियेला ॥ 1३८ ॥
तोही न उपटे तयालागून । मग तेथेच केले लिंगपूजन ।
गोकर्ण-महाबळेश्वर तेथून । नाम जाण पडियेले ॥ 1३९ ॥
रावणमाता तेथे येऊन । ते नित्य करी शिवपूजन ।
आदिलिंग हे जाणोन । करिती अर्चन सुरऋषी ॥ १४० ॥
रावण कुंभकर्ण बिभीषण । तेथेच करिती अनुष्ठान ।
त्याच्या बळेकरून । देव जिंकले रावणे ॥ 1४१ ॥
मयासुर मंदोदरी आणि शक्ती । देता झाला रावणाप्रती ।
लक्ष पुत्र नातू गणती । सवा लक्ष जयाचे ॥ 1४२ ॥
इंद्रजिताऐसा पुत्र । अष्टादशाक्षौहिणी सेनाभार ।
जेथीच्या अनुष्ठाने अपार । रावण पावला संपत्ती ॥ 1४३ ॥
गौतम म्हणे राजोत्तमा । ऐसा गोकर्णीचा थोर महिमा ।
वर्णू न शके मघवा ब्रह्मा । येणे आम्हा तेथूनि जाहले ॥ 1४४ ॥
मिथुलेश्वराच्या यागाकारणे । आम्ही येत असता त्वरेने ।
अद्भुत एक वर्तले तुजकारणे । कथा तेचि सांगतो ॥ 1४५ ॥
एक वृक्ष न्यग्रोध विशाळ । त्याखाली आम्ही बैसलो सकळ ।
तो एक चांडाळीण अमंगळ । अति अपवित्र देखिली ॥ 1४६ ॥
सर्वरोगवेष्टित पूर्ण । जन्मांध गलितकुष्ठ भरले जाण ।
किडे पडले सर्वांगी व्रण । दुर्गंधी उठली चहूकडे ॥ 1४७ ॥
रक्तपिती भरोन । हस्तपाद बोटे गेली झडोन ।
परम कुश्चित कुलक्षण । कैचे अन्न उदक तियेते ॥ 1४८ ॥
दंतहीन कर्णहीन । गर्भाच तियेचे गेले लोचन ।
कर्ण नासिक झडोन । किडे पडले बुचबुचित ॥ 1४९ ॥
अंगींचे चर्म गेले झडोन । वस्त्र पडले गळोन ।
धुळीत लोळे चांडाळीण । पाप पूर्वीचे भोगीत ॥ १५० ॥
तिचा मरणकाळ जवळी आला जाण । वरते पाहिले आम्ही विलोकून ।
तो शिवे धाडिले दिव्य विमान । तियेलागी न्यावया ॥ 1५१ ॥
दशभुज पंचवदन । शिवदूत बैसले चौघेजण ।
कोटिसूर्यतेज विराजमान । प्रभा शशीसमान एकाची ॥ 1५२ ॥
कोणी अग्नितेजे विराजत । भालचंद्र शोभिवंत ।
दिव्य विमान लखलखीत । वाद्ये वाजती चतुर्विध ॥ 1५३ ॥
अष्टनायिका नृत्य करिती । किन्नर से गंधर्व शिवलीला गाती ।
गौतम म्हणे ऐक नृपती । मग तयाप्रती पूसिले ॥ 1५४ ॥
हे दिव्य विमान घेऊन । कोणाचे करू जाता उद्धरण ।
ते म्हणती तिया चांडाळिणीलागून । शिवे आणू पाठविले निजपदा ॥ 1५५ ॥
मग म्या तयांसी पुसिले । इणे पूर्वी काय तप केले ।
मग ते शिवदूत बोलिले । पूर्वजन्मीचा वृत्तांत ॥ 1५६ ॥
पूर्वी केकयनामा ब्राह्मण । त्याची कन्या सुमित्रा जाण ।
आपुल्या सौंदर्य गर्वेकरून कोणासही मानीना ॥ 1५७ ॥
ही बाळपणी विधवा झाली । तारुण्यमदे स्वधर्म विसरली ।
जारकर्म करू लागली । बापे शिकविल्या नायके ॥ 1५८ ॥
तो हे जाहली गरोदर । लोक निंदा करिती समग्र ।
मग बापे केश धरूनि सत्वर । बाहेर घातले इयेसी ॥ 1५९ ॥
मग ही हिंडता देशांतर । कोणीएक सभाग्य शूद्र ।
त्याणे इते स्त्री करूनि सत्वर । समग्र द्रव्य ओपिले ॥ 1६० ॥
तेथे अपत्ये झाली बहुत । ही अत्यंत मद्यमांसी रत ।
पुष्ट जाहली बहुत । घूर्णित लोचन उघडीना ॥ 1६१ ॥
शूद्र घेवोनि दासीदास । गेला क्षेत्री कृषिकर्मास ।
हे क्षुधित आठवूनि मांसास । शस्त्र घेवोनि चालिली ॥ 1६२ ॥
मद्ये माजली नुघडी लोचन । हा बस्तचि आहे म्हणोन ।
गोवत्साचे कंठी जाण । पापिणी सुरी घालीतसे ॥ 1६३ ॥
ते अट्टाहासे ओरडत । गाई त हंबरोनि अनर्थ करीत ।
इणे कंठ छेदोनि गृहात । वत्स नेले त्वरेने ॥ 1६४ ॥
डोळे उघडूनि पाहे पापिणी । मग गोवत्स ओळखिले ते क्षणी ।
तेव्हा तिणे शिव अ शिव उच्चारूनी । म्हणे करणी न कळता केली ॥ 1६५ ॥
मग अर्ध वत्समांस भक्षून । उरले टाकी बाहेर नेऊन ।
लोकांत उठविले पूर्ण । गोवत्स मारिले व्याघ्राने ॥ 1६६ ॥
त्यावरी ही काळे मृत्यु पावत । तो येऊनिया यमदूत ।
इयेस नेले मारीत । बहुत जाचिती निर्दयपणे ॥ 1६७ ॥
कुंभीपाकी घालिती । असिपत्रवनी हिंडविती ।
तप्तभूमीवरी लोळविती । स्तंभ कवटाळविती तप्त जे-का ॥ 1६८ ॥
चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन । इचे काही आहे की नाही पुण्य ।
ते म्हणती शिवनाम उच्चारून । गोवत्सवध इणे केला ॥ 1६९ ॥
मग यमे दिधले लोटून । चांडाळयोनीत पावली जनन ।
गर्भांध कुश्चळ कुलक्षण । विष्ठामूत्रे भरली सदा ॥ १७० ॥
श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण । तव मायबापे गेली मरोन ।
मग ही हाती काठी घेऊन । गांवोगांवी हिंडतसे ॥ 1७१ ॥
तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून । गोकर्णक्षेत्राप्रती संपूर्ण ।
यात्रा चालली घोष गहन । नानाविध वाद्यांचा होतसे ॥ 1७२ ॥
शिवनामाचा घोष अपार । शिवभक्त करिती वारंवार ।
त्यांच्यासंगे ही दुराचार । चांडाळीही चालिली ॥ 1७३ ॥
गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी । पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी ।
म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी । बहुत पापिणी मी आहे ॥ 1७४ ॥
हाका फोडीत हात पसरून । तो ध्या प्रदक्षिणा करिती भक्तजन ।
एके बिल्वपत्र नेऊन । तिचे हाती घातले ॥ 1७५ ॥
ते त्रिदळ चांचपोन पाहत । मुखी घालावयाची नाही वस्त ।
म्हणोनि रागे भिरकावीत । ते पडत शिवलिंगावरी ॥ 1७६ ॥
शिवरात्रीस उपोषण । बिल्वदळे घडले शिवपूजन ।
शिवभक्तांसवे जागरण । घडले संपूर्ण चांडाळीस ॥ 1७७ ॥
शिवनामे गर्जती जन । हेही करीत तसेचि स्मरण ।
ती ही वडाखाली येऊन । पडली आहे चांडाळी ॥ 1७८ ॥
ऐसा तिचा पूर्ववृत्तांत । शिवगणी सांगितला समस्त ।
मग ती दिव्य देह पावोनि बैसत । शिवविमानी तेधवा ॥ 1७९ ॥
आपुले पूर्वकर्म आठवून । करू लागली शिवस्मरण ।
मग शिवगणी नेऊन । शिवपदी स्थापिली ॥ १८० ॥
गौतम म्हणे ऐक राया सादर । तू गोकर्णाप्रती जाई सत्वर ।
शिवरात्रीस पार्वतीपरमेश्वर । त्रिदळेकरूनि अर्ची का ॥ 1८१ ॥
ऐसे बोलोनि गौतममुनी । गेला जनकाच्या यागालागुनी ।
कल्माषपाद तेच क्षणी । गोकर्णक्षेत्री पातला ॥ 1८२ ॥
शिवरात्रीस दिव्य लिंग । मित्रसहराये पूजिले सांग ।
अंतरी सप्रेम अनुराग । उमारंग संतोषला ॥ 1८३ ॥
ब्रह्महत्येचे पातक विशेष । जाऊनि राव झाला निर्दोष ।
तो कैलासाहूनि आदिपुरुष । पाठवीत दिव्य विमान ॥ 1८४ ॥
विमानी बैसले शिवगण । परम तेजस्वी देदीप्यमान ।
अनंत विजांचे रस पिळोन । मूर्ति ओतिल्या वाटते ॥ 1८५ ॥
अनंत वाद्ये गर्जती एक वेळा । तेणे रंगसुरंग दाटला ।
दिव्य सुमनांच्या माळा । वर्षती वरून वृंदारक ॥ 1८६ ॥
मित्रसह दिव्य देह पावोन । झाला दशभुज पंचानन ।
इंदचंद्रादिपदे ओलांडून । नेला मिरवत शिवपदा ॥ ८७ ॥
सरूपता मुक्ति पावोन । शिवरूपी मिळाला आनंदघन ।
धन्य शिवरात्रिव्रत पावन । धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥ 1८८ ॥
गौतमऋषि परम धन्य । तेणे इतिहास सांगितला पावन ।
धन्य श्रोते तुम्ही सज्जन । श्रवणी सादर बैसला ॥ 1८९ ॥
मानससरोवरवेष्टित । मराळ जैसे विराजित ।
की निधानाभोवते समस्त । साधक जैसे बैसती ॥ १९० ॥
तरी पंडित तुम्ही चतुर । तुमचे अवधान दिव्यालंकार ।
देवोनि गौरवा श्रीधर । ब्रह्मानंदेकरूनिया ॥ 1९१ ॥
श्रीमद्भीमातटविलासा । ब्रह्मानंदा आदिपुरुषा ।
श्रीधरवरदा कैलासविलासा । कथारस वदवी पुढे ॥ 1९२ ॥
श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सजन अखंड । तृतीयाध्याय गोड हा ॥ १९३ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More