Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 2

(Shri Shiv Leelamrut Adhyay 2)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 2 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 2. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 193
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति सर्वकल्याण ।
नाना संकटे विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयी ॥ १ ॥
संकेते अथवा हास्येकरून । भलत्या मिसे घडो शिवस्मरण ।
न कळता परिसासी लोह जाण । संघटता सुवर्ण करी की ॥ २ ॥
न कळता प्राशिले अमृत । परी अमर करी की यथार्थ ।
औषधी नेणता भक्षीत । परी रोग सत्य हरी की ॥ ३ ॥
शुष्कतृणपर्वत अद्भुत । नेणता बाळक अकस्मात ।
अग्निस्फुलिंग टाकीत । परी भस्म यथार्थ करी की ॥ ४ ॥
तैसे न कळता घडे शिवस्मरण । परी सकळ दोषा होय दहन ।
अथवा विनोदेकरोन । शिवस्मरण घडो का ॥ ५ ॥
हे का व्यर्थ हाका फोडिती । शिव शिव नामे आरडती ।
अरे का हे उगे न राहती । हरहर ध्या गर्जती वेळोवेळा ॥ ६ ॥
शिवनामाचा करिती कोल्हाळ । माझे उठविले कपाळ ।
शिव शिव म्हणता वेळोवेळ । काय येते यांच्या हाता ॥ ७ ॥
ऐसी हेळणा करी क्षणोक्षणी । परी उमावल्लभनाम ये वदनी ।
पुत्रकन्यानामेकरूनी । शिवस्मरण घडो का ॥ ८ ॥
महाप्रीतीने करिता शिवस्मरण । आदरे करिता शिवध्यान ।
शिवस्वरूप मानूनि ब्राह्मण । संतर्पण करी सदा ॥ ९ ॥
ऐसी शिवी आवडी धरी । त्याहीमाजी आली शिवरात्री ।
उपवास जागरण करी । होय बोहरी महत्पापा ॥ १० ॥
ते दिवशी बिल्वदळे घेऊन । यथासांग घडले शिवार्चन ।
तरी सहस्रजन्मींचे पाप संपूर्ण । भस्म होऊनी जाईल ॥ ११ ॥
नित्य बिल्वदळे शिवासी वाहत । त्याएवढा नाही पुण्यवंत ।
तो तरेल हे नवल नव्हे सत्य । त्याच्या दर्शने बहुत तरती ॥ १२ ॥
प्रातःकाळी घेता शिवदर्शन । यामिनीचे पाप जाय जळोन ।
पूर्वजन्मीचे दोष गहन । माध्यान्ही दर्शन घेता नुरती ॥ १३ ॥
सायंकाळी शिव पाहता सप्रेम । सप्तजन्मीचे पाप होय भस्म ।
शिवरात्रीचा महिमा परम । शेषही वर्णू शकेना ॥ १४ ॥
कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण । महोदय गजच्छाया ग्रहण ।
इतुकेही पर्वकाळ ओवाळून । शिवरात्रीवरूनि टाकावे ॥ १५ ॥
शिवरात्रि आधीच पुण्यदिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष ।
त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाही ॥ १६ ॥
वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर । सुरगण गंधर्व किन्नर ।
सिद्ध चारण विद्याधर । शिवरात्रिव्रत करिताती ॥ १७ ॥
यदर्थी सुरस कथा बहुत । शौनकादिका सांगे सूत ।
ती श्रोती ऐकावी सावचित्त । अत्यादरेकरोनिया ॥ १८ ॥
तरी मासामाजी माघमास । ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष ।
त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस । मुख्य शिवरात्र जाणिजे ॥ १९ ॥
विंध्याद्रिवासी एक व्याध । मृगपक्षिघातक परमनिषिद्ध ।
महानिर्दय हिंसक निषाद । केले । अपराध बहु तेणे ॥ २० ॥
धनुष्यबाण घेऊनि करी । पारधीस चालिला दुराचारी ।
पाश वागुरा कक्षेसी धरी । कवच लेत हरितवर्ण ॥ २१ ॥
करी गोधांगुलित्राण । आणिकही हाती शस्त्रसामग्री घेऊन ।
काननी जाता शिवस्थान । शोभायमान देखिले ॥ २२ ॥
तव तो शिवरात्रीचा दिन । यात्रा आली चहूकडून ।
शिवमंदिर शृंगारून । शोभा आणिली कैलासींची ॥ २३ ॥
शुद्धरजततगटवर्ण । देवालय झळके शोभायमान ।
गगनचुंबित ध्वज पूर्ण । रत्नजडित कळस तळपताती ॥ २४ ॥
मध्ये मणिमय शिवलिंग । भक्त पूजा करिती सांग ।
अभिषेकधारा अभंग । विप्र धरिती रुद्रघोषे ॥ २५ ॥
एक टाळ मृदुंग घेऊन । सप्रेम करिती शिवकीर्तन ।
श्रोते करटाळी वाजवून । हरहर शब्दे घोष करिती ॥ २६ ॥
नाना परिमळद्रव्यसुवास । तेणे दशदिशा दुमदुमल्या विशेष ।
लक्ष दीपांचे प्रकाश । जलजघोष घंटारव ॥ २७ ॥
शशिमुखा गर्जती भेरी । त्यांचा नाद न माये अंबरी ।
एवं चतुर्विध वाद्ये नानापरी । भक्त वाजविती आनंदे ॥ २८ ॥
तो तेथे व्याध पातला । समोर विलोकी सर्व सोहळा ।
एक मुहूर्त उभा ठाकला । हासत बोलिला विनोदे ॥ २९ ॥
हे मूर्ख अवघे जन । येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन ।
आत दगड बाहेर पाषाण । देवपण येथे कैचे ॥ ३० ॥
उत्तम अन्न सांडून । व्यर्थ का करिती उपोषण ।
ऐसिया चेष्टा करीत तेथून । काननाप्रती जातसे ॥ ३१ ॥
लोक नामे गर्जती वारंवार । आपणही विनोदे म्हणे शिव हरहर ।
सहज सव्य घालोनि शिवमंदिर । घोर कांतार प्रवेशला ॥ ३२ ॥
वाचेसी लागला तोचि बेध । विनोदे बोले शिव शिव शब्द ।
नामप्रतापे दोष अगाध । झडत सर्व चालिले ॥ ३३ ॥
घोरांदर सेवता वन । नाढळतीच जीव लघुदारुण ।
तो वरुणदिग्वधूचे सदन । वासरमणि प्रवेशला ॥ ३४ ॥
निशा प्रवर्तली सबळ । की ब्रह्मांडकरंडा भरले काजळ ।
की विशाळ कृष्णकंबळ । मंडप काय उभारिला ॥ ३५ ॥
विगतधवा जेवी कामिनी । तेवी न शोभे कदा यामिनी ।
जरी मंडित दिसे उडुगणी । परी पतिहीन रजनी ते ॥ ३६ ॥
जैसा पंडित गेलिया सभेतून । मूर्ख जल्पती पाखंडज्ञान ।
जेवी अस्ता जाता सहस्रकिरण । उडुगणे मागे झळकती ॥ ३७ ॥
असो ऐशी निशा दाटली सुबुद्ध । अवघा वेळ उपवासी निषाद ।
तो एक सरोवर अगाध । दृष्टी देखिले शोधिता ॥ ३८ ॥
अनेक संपत्ति सभाग्यसदनी । तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी ।
तटी बिल्ववृक्ष गगनी । शोभायमान पसरला ॥ ३९ ॥
योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन । तेवी बिल्वडहाळिया गगनींहून ।
भूमीस लागल्या येऊन । माजी रविशशिकिरण न दिसे ॥ ४० ॥
त्यात तम दाटले दारुण । माजी बैसला व्याध जाऊन ।
शरासनी शर लावून । कानाडी ओढोनि सावज लक्षी ॥ ४१ ॥
दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत । ती दक्षिण हस्ते खुडोनि टाकीत ।
तो तेथे पद्मजहस्ते स्थापित । शिवलिंग दिव्य होते ॥ ४२ ॥
त्यावरी बिल्वदळे पडत । तेणे संतोषला अपर्णानाथ ।
व्याधास उपवास जागरण घडत । सायास न करिता अनायासे ॥ ४३ ॥
वाचेसी शिवनामाचा चाळा । हर हर म्हणे वेळोवेळा ।
पापक्षय होत चाळिला । पूजन स्मरण सर्व घडले ॥ ४४ ॥
एक याम झालिया रजनी । तो जलपानालागी एक हरिणी ।
आली तेथे ते गर्भिणी । परम सुकुमार तेजस्वी ॥ ४५ ॥
व्याध तिने लक्षिला दुरून । कृतान्तवत परम दारुण ।
आकर्ण ओढिला बाण । देखोनिया हरिणी बोलतसे ॥ ४६ ॥
म्हणे महापुरुषा अन्यायाविण । का मजवरी लाविला बाण ।
मी तव हरिणी आहे गर्भिण । वध तुवा न करावा ॥ ४७ ॥
उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान । वधिता दोष तुज दारुण ।
एक रथभरी जीव वधिता सान । तरी एक बस्त वधियेला ॥ ४८ ॥
शत बस्त वधिता एक । वृषभहत्येचे पातक ।
शत वृषभ तै गोहत्या देख । घडली शास्त्र वदतसे ॥ ४९ ॥
शत गोहत्यांचे पातक पूर्ण । एक वधिता होय ब्राह्मण ।
शत ब्रह्महत्यांचे पातक जाण । एक स्त्री वधिलिया ॥ ५० ॥
शत स्त्रियांहून अधिक । एक गुरुहत्येचे पातक ।
त्याहूनि शतगुणी देख । एक गर्भिण वधिलिया ॥ ५१ ॥
तरी अन्याय नसता ये अवसरी । मज मारिसी का वनांतरी ।
व्याध म्हणे कुटुंब घरी । उपवासी वाट पहात ॥ ५२ ॥
मीही आजि निराहार । अन्न नाहीच अणुमात्र ।
परी मृगी होऊनि सुंदर । गोष्टी वदसी शास्त्रींच्या ॥ ५३ ॥
मज आश्चर्य वाटते पोटी । नराऐशा सांगसी गोष्टी ।
तुज देखोनिया दृष्टी । दया हृदयी उपजतसे ॥ ५४ ॥
पूर्वी तू होतीस कोण । तुज एवढे ज्ञान कोठून ।
तू विशाळनेत्री रूपलावण्य । सर्व वर्तमान मज सांगे ॥ ५५ ॥
मृगी म्हणे ते अवसरी । पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी ।
चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी । महाप्रयत्ने करूनिया ॥ ५६ ॥
त्यामाजी मी रंभा चतुर । मज देखोनि भुलती सुरवर ।
नाना तपे आचरोनि अपार । तपस्वी पावती आम्हाते ॥ ५७ ॥
म्या नयनकटाक्षजाळे पसरून । बांधिले निर्जरांचे मनमीन ।
माझिया अंगसुवासा वेधून । मुनिभ्रमर धावती ॥ ५८ ॥
माझे गायन ऐकावया सुरंग । सुधापानी धावती कुरंग ।
मी भोगी स्वर्गींचे दिव्य भोग । स्वरूपे न मानी कोणासी ॥ ५९ ॥
मद अंगी चढला बहुत । शिवभजन टाकिले समस्त ।
शिवरात्रा सोमवार प्रदोषव्रत । शिवार्चन सांडिले म्या ॥ ६० ॥
सोडोनिया सुधापान । करू लागले मद्यप्राशन ।
हिरण्यनामा दैत्य दारुण । सुर सोडोनि रतले त्यासी ॥ ६१ ॥
ऐसा लोटला काळ अपार । मृगयेस गेला तो असुर ।
त्या दुष्टासंगे अपर्णावर- । भजनपूजनविसरले ॥ ६२ ॥
मनास ऐसे वाटले पूर्ण । असुर गेला मृगयेलागोन ।
इतक्यात घ्यावे शिवदर्शन । म्हणोनि गेले कैलासा ॥ ६३ ॥
मज देखता हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत ।
तू परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकी ॥ ६४ ॥
तुझ्या सख्या दोघीजणी । त्या होतील तुजसवे हरिणी ।
हिरण्य असुर माझिये भजनी । असावध सर्वदा ॥ ६५ ॥
तोही मृग होऊनि सत्य । तुम्हासीच होईल रत ।
ऐक व्याधा सावचित्त । मग म्या शिव प्रार्थिला ॥ ६६ ॥
हे पंचवदना विरूपाक्षा । सच्चिदानंदा कर्माध्यक्षा ।
दक्षमखदळणा सर्वसाक्षा । उःशाप देई आम्हाते ॥ ६७ ॥
भोळा चक्रवर्ती दयाळ । उःशाप वदला पयःफेनधवल ।
द्वादश वर्षे भरतां तात्काळ । पावाल माझिया पदाते ॥ ६८ ॥
मग आम्ही मृगयोनी । जन्मलो ये कर्मअवनी ।
तरी मी गर्भिणी आहे हरिणी । प्रसूतकाळ समीप असे ॥ ६९ ॥
तरी मी आपुल्या स्वस्थळी जावोन । सत्वर येते गर्भ ठेऊन
मग तू सुखे घेई प्राण । सत्य वचन हे माझे ॥ ७० ॥
ऐसी मृगी बोलली सावचित्त । त्यावरी तो व्याध काय बोलत ।
तू गोड बोलसी यथार्थ । परी विश्वास मज न वाटे ॥ ७१ ॥
नानापरी असत्य बोलोन । करावे शरीराचे संरक्षण ।
हे प्राणिमात्रास आहे ज्ञान । तरी तू शपथ वदे आता ॥ ७२ ॥
महत्पापे उच्चारून । शपथ वदे यथार्थ पूर्ण ।
यावरी ते हरिणी दीनवदन । वाहात आण ऐका ते ॥ ७३ ॥
ब्राह्मणकुळी उपजोन । जो न करी वेदशास्त्राध्ययन ।
सत्यशौचवर्जित संध्याहीन । माझे शिरी पातक ते ॥ ७४ ॥
एक वेदविक्रय करिती पूर्ण । कृतघ्न परपीडक नावडे भजन ।
एक दानासी करिती । विघ्न । गुरुनिंदाश्रवण एक करिती ॥ ७५ ॥
रमावर-उमावरांची निंदा । त्या पापाची मज होय आपदा ।
दान दिधले जे ब्रह्मवृंदा । हिरोनि घेती माघारे ॥ ७६ ॥
एक यतिनिंदा करिती । एक शास्त्रे पहाती द्वैत निर्मिती ।
नाना भ्रष्टमार्ग आचरती । स्वधर्म आपला सांडूनिया ॥ ७७ ॥
देवालयामाजी जाउनी । हरिकथापुराणश्रवणी ।
जै बैसती विडा घेउनी । ते कोडी होती पापिये ॥ ७८ ॥
जे देवळात करिती स्त्रीसंभोग । की स्त्री-भ्रतारांसी करिती वियोग ।
ते नपुंसक होवोनि अभाग्य । उपजती या जन्मी ॥ ७९ ॥
वर्मकर्मे निंदा करीत । तो जगपुरीषभक्षक काग होत ।
शिष्यांसी विद्या असोनि न सांगत । तो पिंगळा होत निर्धार ॥ ८० ॥
अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती । त्यानिमित्ते गंडमाळा होती ।
परक्षेत्रीच्या गाई वळोनि आणिती । ते अल्पायुषी होती या जन्मी ॥ ८१ ॥
जो राजा करी प्रजापीडण । तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण ।
वृथा करी साधुछळण । निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥ ८२ ॥
स्त्रिया व्रतनेम करीत । भ्रतारासी अव्हेरित ।
धनधान्य असोनि वंचित । त्या वाघुळा होती या जन्मी ॥ ८३ ॥
पुरुष कुरूप म्हणोनिया त्यागिती । त्या या जन्मी बालविधवा होती ।
तेथेही जारकर्म करिती । मग त्या होती वारांगना ॥ ८४ ॥
ज्या भ्रतारासी निर्भर्सिती । त्या दासी किंवा कुलटा होती ।
सेवक स्वामीचा द्रोह करिती । ते जन्मा येती श्वानाच्या ॥ ८५ ॥
सेवकापासून सेवा घेऊन । त्याचे न दे जो वेतन ।
तो अत्यंत भिकारी होऊन । दारोदारी हिंडतसे ॥ ८६ ॥
स्त्री-पुरुष गुज बोलता । जो जाऊनि ऐके तत्त्वता ।
त्याची स्त्री दुरावे हिंडता । अन्न न मिळे तयाते ॥ ८७ ॥
जे जारण मारण करिती । ते भूत प्रेत पिशाच्च होती ।
यती उपवासे पीडिती । त्यांते दुष्काळ जन्मवरी ॥ ८८ ॥
स्त्री रजस्वला होऊनी । गृही वावरे जे पापिणी ।
पूर्वज रुधिरी पडती पतनी । त्या गृही देव-पितृगण न येती ॥ ८९ ॥
जे देवाच्या दीपाचे तेल नेती । ते या जन्मी निपुत्रिक होती ।
ज्या रांधिता अन्न चोरोनि भक्षिती । त्या मार्जारी होती या जन्मी ॥ ९० ॥
ब्राह्मणांस कदन्न घालून । आपण भक्षिती षड्रस पक्वान्न ।
त्यांचे गर्भ पडती गळोन । आपुलिया कर्मवशे ॥ ९१ ॥
जो माता-पित्यांसी शिणवीत । तो ये जन्मी मर्कट होत ।
सासू-श्वशुरा स्नुषा गांजीत । तरी बालक न वांचे तियेचे ॥ ९२ ॥
मृगी म्हणे व्याधालागून । जरी मी न ये परतोन ।
तरी ही महत्पापे संपूर्ण । माझ्या माथा बैसोत ॥ ९३ ॥
हे मिथ्या गोष्ट होय साचार । तरी घडो शिवपूजेचा अपहार ।
ऐसी शपथ ऐकता निर्धार । व्याध शंकला मानसी ॥ ९४ ॥
म्हणे पतिव्रते जाई आता । सत्वर येई निशा सरता ।
हरिणी म्हणे शिवपदासी तत्त्वता । पुण्यवंता जाशील ॥ ९५ ॥
उदकपान करोनि वेगी । निजाश्रमा गेली ते कुरंगी ।
इकडे व्याध दक्षिणभागी । टाकी बिल्वदळे खुडोनिया ॥ ९६ ॥
दोन प्रहर झाली यामिनी । द्वितीय पूजा शिवे मानूनी ।
अर्धपाप जळाले मुळीहूनी । सप्तजन्मीचे तेधवा ॥ ९७ ॥
नामी आवड जडली पूर्ण । व्याध करी शिवस्मरण ।
मृगीमुखे ऐकिले निरूपण । सहज जागरण घडले तया ॥ ९८ ॥
तो दुसरी हरिणी अकस्मात । पातली तेथे तृषाकांत ।
व्याधे बाण ओढिता त्वरित । करुणा भाकी हरिणी ते ॥ ९९ ॥
म्हणे व्याधा ऐक ये समयी । मज कामानळे पीडिले पाही ।
पतीस भोग देवोनि लवलाही । परतोनि येते सत्वर ॥ १०० ॥
व्याध आश्चर्य करी मनात । म्हणे शपथ बोलोनी जाई त्वरित ।
धन्य तुमचे जीवित्व । सर्व शास्त्रार्थ ठाऊका ॥ 10१ ॥
वापी तडाग सरोवर । जो पतित मोडी देवागार ।
गुरुनिंदक मद्यपानी दुराचार । ती पापे समग्र मस्तकी माझ्या ॥ 10२ ॥
महाक्षत्रिय आपण म्हणवीत । समरांगणी मागे पळत ।
वृत्ति हरी सीमा लोटीत । ग्रंथ निंदीत महापुरुषांचे ॥ 10३ ॥
वेदशास्त्रांची निंदा करी । संतभक्तांसी द्वेष धरी ।
हरि-हर चरित्रे अव्हेरी । माझे शिरी ती पापे ॥ 10४ ॥
धन धान्य असोनि पाही । पतीलागी शिणवी म्हणे नाही ।
पति सांडोनि निजे परगृही । ती पापे माझिया माथा ॥ 10५ ॥
पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्तता । त्यासी व्यर्थचि गांजिती जे न पाहता ।
ते कुरूप होती तत्त्वता । हिंडता भिक्षा न मिळेचि ॥ 10६ ॥
बंधु-बंधु जे वैर करिती । ते या जन्मी मत्स्य होती ।
गुरुचे उणे जे पाहती । त्यांची संपत्ति दग्ध होय ॥ 10७ ॥
जे मार्गस्थांची वस्त्र हरिती । ते अतिशूद्र प्रेतवस्त्रे पांघरती ।
आम्ही तपस्वी म्हणोनिया अनाचार करिती । ते घुले होती मोकाट ॥ 10८ ॥
दासी स्वामीची सेवा न करी । ती ये जन्मी होय मगरी ।
जो कन्याविक्रय करी । हिंसकयोनी निपजे तो ॥ 10९ ॥
स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजीत ।
त्याचा गृहभंग होत । जन्मजन्मांतरी न सुटे ॥ ११० ॥
ब्राह्मण करी रसविक्रय । घेता देता मद्यपी होय ।
जो ब्रह्मवृंदा श्री अपमानिताहे । तो होय ब्रह्मराक्षस ॥ १1१ ॥
एके उपकार केला । जो नष्ट नाठवी त्याला ।
तो कृतघ्न जंत झाला । पूर्वकर्मे जाणिजे ॥ 1१२ ॥
विप्र श्राद्धी जेवुनी । स्त्रीभोग करी ते दिनी ।
तो श्वानसूकरयोनी । उपजेल निःसंशये ॥ १1३ ॥
व्यवहारी दहांत बैसोन । खोटी साक्ष देई गर्जोन ।
पूर्वज नरकी पावती पतन । असत्य साक्ष देताचि ॥ १1४ ॥
दोघी स्त्रिया करोन । एकीचेच राखी जो मन ।
तो गोचिड होय जाण । सारमेयशरीरी ॥ १1५ ॥
पूर्वजन्मी कोंडी उदक । त्याचा मळमूत्रनिरोधदेख ।
करिता साधुनिंदा आवश्यक । सत्वरदंत भग्न होती ॥ १1६ ॥
देवालयी करी भोजन । तरी ये जन्मी होय क्षीण ।
पृथ्वीपतीची निंदा करिता जाण । उदरी मंदाग्नि होय पै ॥ १1७ ॥
ग्रहणसमयी करी भोजन । त्यासी पित्तरोग होय दारुण ।
परबाळे विकी परदेशी नेऊन । तरी सर्वांगी कुष्ठ भरे ॥ १1८ ॥
जी स्त्री करीगर्भपात । ती उपजे वंध्या होऊन ।
देवालय टाकी पाडोन । तरी अंगभंग होय त्याचा ॥ १1९ ॥
अपराधाविण स्त्रीसी गांजिता हे । त्याचे ये जन्मी एक अंग जाये ।
ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये । त्यांचा वंश न वाढे कधी ॥ १२० ॥
गुरु संत माता पिता । त्यांसी जो होय निर्भत्सिता ।
तरी वाचा जाय तत्त्वता । अडखळे बोलता क्षणाक्षणा ॥ 1२१ ॥
जो ब्राह्मणांसी दंड मारी । त्यासी व्याधितिडका लागती शरीरी ।
जो संतांसी वादविवाद करी । दीर्घ दंत होती त्याचे ॥ 1२२ ॥
देवद्वारीचे तरुवर । अश्वत्थादि वृक्ष साचार ।
तोडिता पांगुळ होय निर्धार । भिक्षा न मिळे हिंडता ॥ 1२३ ॥
जो सूतकअन्न भक्षित । त्याचे उदरी नाना रोग होत ।
आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त । तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ॥ 1२४ ॥
ब्राह्मणाचे ऋण न देता । तरी बाळपणी मृत्यु पावे पिता ।
जलवृक्षछाया मोडिता । तरी एकही स्थळ न मिळे त्याते ॥ 1२५ ॥
ब्राह्मणासी आशा लावून चाळवी नेदी कदा दान ।
तो ये जन्मी अन्न अन्न । करीत हिंडे घरोघरी ॥ 1२६ ॥
जो पुत्रद्वेष करीत । आणि दरिद्रयाचे लग्न मोडीत ।
तरी स्त्रीस सल राहे पोटात । वंध्या निश्चित संसारी ॥ 1२७ ॥
जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसे तोडी सूर्यनंदन ।
जो नायके कथाग्रंथ पावन । बधिर होय जन्मोजन्मी ॥ 1२८ ॥
जो पीडी माता-पितयांस । त्याचा सर्वदा होई कार्यनाश ।
एकास भजे निंदी सर्व देवां । तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥ 1२९ ॥
जो चांडाळ गोवध करी । त्यासी मिळे कर्कशा नारी ।
वृषभ श्री वधिता निर्धारी । शतमूर्ख पुत्र होंय त्यासी ॥ १३० ॥
उदकतृणेविण पशु मारीत । तरी मुक्याच प्रजा होती समस्त ।
जो प्रतिव्रतेसी भोगू इच्छित । तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥ 1३१ ॥
जो पारधी बहुं जीव संहारी । तो फेपरा होय संसारी ।
गुरूचा त्याग जो चांडाळ करी । तो उपजताचि मृत्यु पावे ॥ 1३२ ॥
नित्य अथवा रविवारी मुते रवीसमोर । त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र ।
जे मृत बाळासाठी रुदती निर्धार । त्यास हासता निपुत्रिक होय ॥ 1३३ ॥
हरिणी म्हणे व्याधालागून । मी सत्वरी येते पतीस भोग देऊन ।
न ये तरी ही पापे संपूर्ण । माझ्या माथा बैसोत पै ॥ 1३४ ॥
व्याध मनात शंकोन । म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान ।
सत्वर येई गृहास जाऊन । सत्य संपूर्ण सांभाळी ॥ 1३५ ॥
जलपान करोनि वेगी । आश्रमा गेली ते कुरंगी ।
तो मृगराज तेच प्रसंगी । जलपानार्थ पातला ॥ 1३६ ॥
व्याधे ओढिला बाण । तो मृग बोले दीनवदन ।
म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण । त्यासी पुसोन येतो मी ॥ 1३७ ॥
शपथ ऐके त्वरित । कीर्तन करिती प्रेमळ भक्त ।
तो कथारंग मोडिता निर्वंश होत । ते पाप सत्य मम माथा ॥ 1३८ ॥
ब्रह्मकर्म वेदोक्त । शूद्र निजांगे आचरत ।
तो अधम नरकी पडत । परधर्म आचरता ॥ 1३९ ॥
तीर्थयात्रेसी विघ्ने करी । वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी ।
तरी सर्वांगी व्रण अघोरी । नरकी पडे कल्पपर्यंत ॥ १४० ॥
शास्त्रकोशी नाही प्रमाण । कूटकविता करी क्षुद्र लक्षून ।
हरिती ब्राह्मणांचा मान । तरी संतान तयांचे न वादे ॥ 1४१ ॥
हरिदिनी शिवदिनी उपोषण । विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण ।
तरी हस्तपाद क्षीण । होती त्याचे निर्धारि ॥ 1४२ ॥
एक शिवहरिप्रतिमा फोडिती । एक भगवद्भक्ता विघ्ने करिती ।
एक शिवमहिमा उच्छेदिती । नरकी होती कीटक ते ॥ 1४३ ॥
मातृद्रोही त्यासी व्याधी भरे । पितृद्रोही पिशाच विचरे ।
गुरुद्रोही तत्काळ मरे । भूतप्रेतगणी विचरे तो ॥ 1४४ ॥
विप्र आहार बहुत जेविती । त्यांस जो हासे दुर्मती ।
त्याचे मुखी अरोचकरोग निश्चिती । न सोडिती जन्मवरी ॥ 1४५ ॥
एक गोविक्रय करिती । एक कन्याविक्रय अर्जिती ।
ते नर मार्जार मस्त होती । बाळे भक्षिती । आपुली ॥ 1४६ ॥
जो कन्या भगिनी अभिलाषी । कामदृष्टी न्याहाळी पतिव्रतेसी।
प्रमेहरोग होय त्यासी। की खडा गुह्यात दाटत ॥ 1४७॥
प्रासादभंग लिंगभंग करी। देवांची उपकरणे अलंकार चोरी ।
देवप्रतिष्ठा अव्हेरी। पंडुरोग होय तेथे ॥ 1४८॥
एक मित्रद्रोह विश्वासघात करिती । मातृपितृहत्या गुरूसी संकटी पाडिती।
ब्रह्मवध गोवध न वारिती। अंगी सामर्थ्य असोनिया ॥ 1४९॥
ब्राह्मण बैसवोनि बाहेरी। उत्तमान्न जेविती गृहांतरी।
सोयर्‍यांची प्रार्थना करी। संग्रहणी पोटशूळ होती तया ॥ १५० ॥
एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती। एक ब्राह्मणांची सदने जाळिती।
एक दीनासी मार्गी नागविती। एक संतांचा करिती अपमान ॥ 1५१ ॥
एक करिती गुरुछळण। एक म्हणती पाहो याचे लक्षण ।
नाना दोष आरोपिती अज्ञान। त्यांचे संतान न वाढे ॥ 1५२ ॥
जो सदा पितृद्वेष करी। जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी।
शिवकीर्तन ऐकता ध्या त्रासे अंतरी। तरी पितृवीर्य नव्हे तो ॥ 1५३ ॥
शिवकीर्तनी नव्हे सादर। तरी कर्णमूळरोग निर्धार ।
नसत्याच गोष्टी जल्पे अपार। तो दर्दुर होय निर्धारे ॥ 1५४ ॥
शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण । तेथे शयन करिता सर्प होय दारुण ।
एक अतिवादक छळक जाण । ते पिशाचयोनी पावती ॥ 1५५ ॥
एका देवार्चनी वीट येत। ब्राह्मण पूजावया कंटाळत।
तीर्थप्रसाद अव्हेरीत। त्याच्या आखुडती अंगशिरा ॥ 1५६ ॥
मृग म्हणे ऐसी पापे अपार। मम मस्तकी होईल परम भार।
मग पारधी म्हणे सत्वर। जाई स्वस्थाना मृगवर्या ॥ 1५७ ॥
व्याध शिवनामे गर्जे ते क्षणी। कंठ सद्‌गदित अश्रू नयनी।
मागुती बिल्वदळे खुडोनी। शिवावरी टाकीतसे ॥ 1५८ ॥
चौप्रहरांच्या पूजा चारी। संपूर्ण झाल्या शिवजागरी।
सप्तजन्मीची पापे निर्धारी। मुळीहूनी भस्म झाली ॥ 1५९ ॥
तो पूर्वदिशा मुख प्रक्षाळीत। सुपर्णाग्रज उदय पावत।
आरक्तवर्ण शोभा दिसत। तेचि कुंकुम प्राचीचे ॥ १६० ॥
तो तिसरी मृगी आली अकस्मात। व्याध देखिला कृतान्तवत।
म्हणे मारू नको मज यथार्थ। बाळासी स्तन देऊन येते मी ॥ 1६१ ॥
व्याध अत्यंत हर्षभरित। म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ ।
तो ऐकावया म्हणत। शपथ करूनि जाय तू ॥ 1६२ ॥
यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक। जो तृणदाहक ग्रामदाहक।
गोब्राह्मणांचे कोंडी उदक। क्षयरोग त्यासी न सोडी ॥ 1६३ ॥
ब्राह्मणांची सदने हरिती देख। त्यांचे पूर्वज रौरवी पडती निःशंक।
मातृ-पुत्रा विघडती एक। स्त्रीपुरुषा विघड पाडिती ॥ 1६४ ॥
देवब्राह्मण देखोन । खालती न करिती कदा मान ।
निंदिती बोलती कठोर वचन । यम करचरण छेदी तयांचे ॥ 1६५ ॥
परवस्तु चोरावया देख । अखंड लाविला असे रोख ।
साधुसन्मानाने मानी दुःख । त्यास नेत्ररोगतिडका न सोडिती ॥ 1६६ ॥
पुस्तकचोर ते मुके होती । रत्नचोरांचे नेत्र जाती ।
अत्यंत गर्वी ते महिष होती । पारधी निश्चित श्येनपक्षी ॥ 1६७ ॥
भक्तांची जो निंदा करीत । त्याचे मुखी दुर्गंधी घाणित ।
जो माता-पितयांसी ताडित । लुला होत यालागी ॥ 1६८ ॥
जो अत्यंत कृपण । धन न वेची अणुप्रमाण ।
तो महाभुजंग होऊन । धुसधुसीत बैसे तेथे ॥ 1६९ ॥
भिक्षेसी यतीश्वर आला । तो जेणे रिता दवडिला ।
शिव त्यावरी जाण कोपला । संतति संपत्ति दग्ध होय ॥ 1७० ॥
ब्राह्मण बैसला पात्रावरी । उठवूनि घातला बाहेरी ।
त्याहूनिया दुराचारी । दुसरा कोणी नसेचि ॥ 1७१ ॥
ऐसा धर्माधर्म ऐकोन । पारधी सद्‌गद बोले वचन ।
स्वस्थळा जाई जलपान करोन । बाळांसी स्तन देऊन येई ॥ 1७२ ॥
ऐसे ऐकोनि मृगी लवलाह्या । गेली जलप्राशन करूनिया ।
बाळे स्तनी लावूनिया । तृप्त केली तियेने ॥ 1७३ ॥
वडील झाली प्रसूत । दुसरी पतीची कामना पुरवित ।
मृगराज म्हणे आता त्वरित । जाऊ चला व्याधापासी ॥ 1७४ ॥
मृग पाडसांसहित सर्वही । व्याधापासी आली लवलाही ।
मृग म्हणे ते समयी । आधी मज वधी पारधिया ॥ 1७५ ॥
मृगी म्हणे हा नव्हे विधी । आम्ही जाऊ पतीच्या आधी ।
पाडसे म्हणती त्रिशुद्धी । आम्हासी वधी पारधिया ॥ 1७६ ॥
त्यांची वचने ऐकता ते क्षणी । व्याध सद्गद झाला मनी ।
अश्रुधारा लोटल्या ला नयनी । लागे चरणी तयांच्या ॥ 1७७ ॥
म्हणे धन्य जिणे माझे झाले । तुमचेनि मुखे निरूपण ऐकिले ।
बहुता जन्मींचे पाप जळाले । पावन केले शरीर ॥ 1७८ ॥
माता पिता गुरु देव । तुम्हीच आता माझे सर्व ।
कैचा संसार मिथ्या वाव । पुत्रकलत्र सर्व लटके ॥ 1७९ ॥
व्याध बोले प्रेमेकरून । आतां कधी मी शिवपद पावेन ।
तो अकस्मात आले विमान । शिवगण बैसले त्यावरी ॥ १८० ॥
पंचवदन दशभुज । व्याघ्रांबर नेसले महाराज ।
अद्भुत तयांचे तेज । दिक्‌चक्रामाजी न समाये ॥ 1८१ ॥
दिव्य वाद्ये वाजविती किन्नर । आलाप करिती विद्याधर ।
दिव्य सुमनांचे संभार । सुरगण स्वये वर्षती ॥ 1८२ ॥
मृगे पावली दिव्य शरीर । व्याध करी साष्टांग नमस्कार ।
मुखे म्हणे जय जय शिव हर हर । तो शरीरभाव पालटला ॥ 1८३ ॥
परिसी झगडता लोह होय सुवर्ण । तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन ।
शिवगणी बहुत प्रार्थुन । दिव्य विमानी बैसविला ॥ 1८४ ॥
मृगे पावली दिव्य शरीर । तीही विमानी आरूढली समग्र ।
व्याधाची स्तुती वारंवार । करिती सुरगण सर्वही ॥ 1८५ ॥
व्याध नेला शिवपदाप्रती । तारामंडळी मृगे राहती ।
अद्यापि गगनी झळकती । जन पाहतीला सर्व डोळा ॥ 1८६ ॥
सत्यवतीहृदयरत्नखाणी । रसभरित बोलिला लिंगपुराणी ।
ते सज्जन ऐकोत दिनरजनी । ब्रह्मानंदेकरूनिया ॥ 1८७ ॥
धन्य ते शिवरात्रिव्रत । श्रवणे पातक दग्ध होत ।
जे हे पठण करिती सावचित । धन्य पुण्यवंत नर तेचि ॥ 1८८ ॥
सज्जन श्रोते निर्जर सत्य । प्राशन करोत अ शिवलीलामृत ।
निंदक असुर कुतर्की बहुत । त्यास प्राप्त कैचे हे ॥ 1८९ ॥
कैलासनाथ ब्रह्मानंद । तयाचे पदकल्हार सुगंध ।
तेथे श्रीधर अभंग षट्पद । रुंजी घालीत शिवनामे ॥ १९० ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । द्वितीयाध्याय गोड हा ॥ १९१ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More