Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 7

(Shri Shiv Leelamrut Adhyay 7)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 7 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 7. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 214
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा ।
भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा । लीला विचित्रा तूझिया ॥ १ ॥
भानुकोटितेज अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा ।
रमामाधवप्रिया भूताधिपते अनंता । अमूर्तमूर्ता विश्वपते ॥ २ ॥
परमानंदा पंचवक्त्रा । परात्परा पंचदशनेत्रा ।
परमपावना पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ ३ ॥
मंदस्मितवदन दयाळा । षष्ठाध्यायी अतिनिर्मळा ।
सीमंतिनी आख्यानलीळा । स्नेहाळा तू वदलासी ॥ ४ ॥
श्रीधरमुख निमित्त करून । तूचि वदलासी आपुले गुण ।
व्यासरूपे सूतास स्थापून । रसिक पुराण सांगविसी ॥ ५ ॥
ऐसे ऐकता दयाळ । वदता झाला श्रीगोपाळ ।
विदर्भनगरी एक सुशीळ । वेदमित्रनामे द्विज होता ॥ ६ ॥
तो वेदशास्त्रसंपन्न । त्याचा मित्र सारस्वतनामे ब्राह्मण ।
वेदमित्रास पुत्र सुगुण । सुमेधा नामे जाहला ॥ ७ ॥
सारस्वतसुत सोमवंत । उभयतांचे मित्रत्व अत्यंत ।
दशग्रंथी ज्ञान बहुत । मुखोद्गत पुराणे ॥ ८ ॥
संहिता पद क्रम अरण ब्राह्मण । छंद निघंट शिक्षा जाण ।
ज्योतिष कल्प व्याकरण । निरुक्त पूर्ण दशग्रंथी ॥ ९ ॥
ऐसा विद्याभ्यास करता । षोडश वर्षे झाली तत्त्वता ।
दोघांचे पिते म्हणती आता । भेटा नृपनाथा वैदर्भासी ॥ १० ॥
विद्या दाऊन अद्भुत । मेळवावे द्रव्य बहुत ।
मग वधू पाहूनि यथार्थ । लग्ने करू तुमची ॥ ११ ॥
यावरी ते ऋषिपुत्र । विदर्भरायासी भेटले सत्वर ।
विद्याधनाचे भांडार । उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ॥ १२ ॥
विद्या पाहता तोषला राव । परी विनोद मांडिला अभिनव ।
म्हणे मी एक सांगेन भाव । धरा तुम्ही दोघेही ॥ १३ ॥
नैषधपुरीचा नृपनाथ । त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात ।
मृत्युंजयमृडानीप्रीत्यर्थ । दांपत्यपूजा करी बहु ॥ १४ ॥
तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी । होवोनि जावे ये क्षणी ।
दिव्य अलंकार बहुत धनी । पूजील तुम्हाकारणे ॥ १५ ॥
तेथोन यावे परतोन । मग मीही देईन यथेष्ट धन ।
मातापितागुरुनृपवचन । कदा अमान्य करू नये ॥ १६ ॥
तव बोलती दोघे किशोर । हे अनुचित कर्म निंद्य फार ।
पुरुषास स्त्रीवेष देखता साचार । सचैल स्नान करावे ॥ १७ ॥
पुरुषासी नारीवेष देखता । पाहणार जाती अधःपाता ।
वेष घेणारही तत्त्वता । जन्मोजन्मी स्त्री होय ॥ १८ ॥
हेही परत्री कर्म अनुचित । तैसेचि शास्त्र बोलत ।
त्याहीवरी आम्ही विद्यावंत । धन अमित मेळवू ॥ १९ ॥
आमुची विद्यालक्ष्मी सतेज । तोषवू अवनीचे भूभुज ।
आमुचे नमूनि चरणांबुज । धन देती प्रार्थूनिया ॥ २० ॥
पंडितांची विद्या माय सद्गुणी । विद्या अकाळी फळदायिनी ।
विद्या कामधेनु सांडूनी । निंद्य कर्म न करू कदा ॥ २१ ॥
मातापित्यांहूनि विद्या आगळी । संकटी प्रवासी प्रतिपाळी ।
पृथ्वीचे प्रभु सकळी । देखोनिया जोडिती कर ॥ २२ ॥
विद्याहीन तो पाषाण देख । जिताचि मृत तो शतमूर्ख ।
त्याचे न पाहावे मुख । जननी व्यर्थ श्रमविली ॥ २३ ॥
राव म्हणे दोघांलागून । माझे मान्य करावे एवढे वचन ।
परम संकट पडले म्हणून । अवश्य म्हणती तेधवा ॥ २४ ॥
राये वस्त्र अलंकार आणून । एकासी स्त्रीवेष देऊन ।
सोमवारी यामिनीमाजी जाण । पूजासमयी पातले ॥ २५ ॥
जे सकळ प्रमदांची ईश्वरी । जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी ।
जीस देखोनि नृत्य करी । पंचशर प्रीतीने ॥ २६ ॥
रंभा उर्वशी चातुर्यखाणी । परी लज्जा पावती जीस देखोनी ।
रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी । उपमा शोभे जियेसी ॥ २७ ॥
तिणे हे दंपत्य देखोनि । कृत्रिम पाहूनि हासे मनी ।
परी भावार्थ धरूनि चातुर्यखाणी । हरभवानी म्हणोनि पूजित ॥ २८ ॥
अलंकार वस्त्र यथेष्ट धन । षड्रसअन्ने देत भोजन ।
शिवगौरी म्हणोन । नमस्कार करून बोळवी ॥ २९ ॥
जाता ग्रामपंथ लक्षुनी । पुढे भ्रतार मागे कामिनी ।
नाना विकार चेष्टा भाषणी । बहुत बोले तयासी ॥ ३० ॥
म्हणे आहे हे एकांतवन । वृक्ष लागले निबिड सघन ।
मी कामानळेकरून । गेले आहाळून प्राणपति ॥ ३१ ॥
तू वर्षोनि सुरतमेघ । शीतळ करी ममांग ।
मी नितंबिनी झाले अभंग । जवळी पाहे येऊनिया ॥ ३२ ॥
तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष । फेडी वस्त्र होय पुरुष ।
विनोद करिसी आसमास । हासती लोक मार्गीचे ॥ ३३ ॥
तव ते कामे होवोनि मूर्छित । मेदिनीवरी अंग टाकीत ।
म्हणे प्राणनाथा धाव त्वरित । करी शांत कामज्वराते ॥ ३४ ॥
तव तो परतोनि आला सवेग । म्हणे हे नसते काय मांडिले सोंग ।
तुम्ही आम्ही गुरुबंधु निःसंग । ब्रह्मचारी विद्यार्थी ॥ ३५ ॥
येरी म्हणे बोलसी काये । माझे अवयव चाचपोनि पाहे ।
गेले पुरुषत्व लवलाहे । भोगी येथे मज आता ॥ ३६ ॥
हाती धरूनि तयासी । आडमार्गे नेले एकांतासी ।
वृक्ष गेले गगनासी । पल्लव भूमीसी पसरले ॥ ३७ ॥
साल तमाल देवदार । आम्र कदंबादि तरुवर ।
त्या वनी नेऊनि सत्वर । म्हणे शंका सांडी सर्वही ॥ ३८ ॥
मी स्त्री तू भ्रतार निर्धार । नाही येथे दुसरा विचार ।
येरू म्हणे हे न घडे साचार । तुम्ही आम्ही गुरुबंधु ॥ ३९ ॥
शास्त्र पढलासी सकळ । त्याचे काय हेचि फळ ।
परत्रसाधन सुकृत निर्मळ । विचार करूनि पाहे पां ॥ ४० ॥
आधीच स्त्री वरी तारुण्य । परम निर्लज्ज एकांतवन ।
मिठी घाली गळा धावून । देत चुंबन बळेचि ॥ ४१ ॥
घेऊनिया त्याचा हात । म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत ।
तव तो झिडकारूनि मागे सारीत । नसता अनर्थ करू नको ॥ ४२ ॥
धन्य धन्य ते पुरुष जनी । परयोषिता एकान्त वनी ।
सभाग्य सधन तरुणी । प्रार्थिता मन चळेना ॥ ४३ ॥
वृत्तीस नव्हे विकार । तरी तो नर केवळ शंकर ।
त्यापासी तीर्थे समग्र । येवोनि राहती सेवेसी ॥ ४४ ॥
जनरहित घोर वनी । द्रव्यघट देखिला नयनी ।
देखता जाय ओसंडोनी । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४५ ॥
सत्यवचनी सत्कर्मी रत । निगमागमविद्या मुखोद्गत ।
इतुके असोनि गर्वरहित । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४६ ॥
आपण देखता वर्म काढूनी । निंदक विंधिती वाग्बाणी ।
परी खेदरहित आनंद मनी । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४७ ॥
दुसरियाचे कूटदोषगुण । देखे ऐके जरी अनुदिन ।
परी ते मुखास नाणी गेलिया प्राण । तरी तो शंकर निर्धार ॥ ४८ ॥
न दिसे स्त्रीपुरुष भाव जाण । गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण ।
न सांगे आपुले सुकृत तप दान । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४९ ॥
पैल मूर्ख हो पंडित । निवडू नेणे समान पाहत ।
कीर्ति वाढवावी नावडे मनांत । तरी तो शंकर निर्धारे ॥ ५० ॥
अभ्यासिले न मिरवी लोकात । शिष्य करावे हा नाहीच हेत ।
कोणाचा संग नावडे आवडे एकान्त । तरी तो शंकर निर्धार ॥ ५१ ॥
विरोनि गेल्या चित्तवृत्ती । समाधी अखंड गेली भ्रांती ।
अर्थ बुडालियाची नाही खंती । तरी तो शंकर निर्धारे ॥ ५२ ॥
श्रीधर म्हणे ऐसे पुरुष । ते ब्रह्मानंद परमहंस ।
त्यांच्या पायींच्या पादुका निःशेष । होऊनि राहावे सर्वदा ॥ ५३ ॥
वेदमित्रपुत्र साधु परम । धैर्यशत्रे निवटोनि काम ।
म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम । विचार करू या गोष्टीचा ॥ ५४ ॥
ऐसे बोलोनि सारस्वतपुत्र । स्त्रीरूपे सदना आणिला सत्वर ।
श्रुत केला समाचार । गतकथार्थ वर्तला जो ॥ ५५ ॥
सारस्वते मांडिला अनर्थ । रायाजवळी आला वक्षःस्थळ बडवीत ।
म्हणे दुर्जना तुवा केला घात । हत्या करीन तुजवरी ॥ ५६ ॥
वेदशास्त्रसंपन्न । येवढाच पुत्र मजलागून ।
अरे तुवा निर्वंश केला पूर्ण । काळे वदन झाले तुझे ॥ ५७ ॥
विदर्भ अधोगतमुख पहात । म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य ।
शिवमाया परम अद्भुत । अघटित कर्तृत्व तियेचे ॥ ५८ ॥
राये मेळवूनि सर्व ब्राह्मण । म्हणे सतेज करा अनुष्ठान ।
द्यावे यासी पुरुषत्व आणून । तरीच धन्य होईन मी ॥ ५९ ॥
विप्र म्हणती हे ईश्वरी कळा । आमुचेनि न पालटे भूपाळा ।
तेव्हा विदर्भराव तये वेळा । आराधिता झाला देवीते ॥ ६० ॥
हवन मांडिले दुर्धर । राव सप्तदिन निराहार ।
देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर । मग बोले विदर्भ तो ॥ ६१ ॥
म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष । यासी पुनः करी पुरुष ।
देवी म्हणे ही गोष्ट निःशेष । न घडे सहसा कालत्रयी ॥ १२ ॥
निःसीम पतिव्रता सीमंतिनी । परम भक्त सद्भुणखाणी ।
तिचे कर्तृत्व माझेनी । न मोडवे सहसाही ॥ ६३ ॥
या सारस्वतासी दिव्य नंदन । होईल सत्य वेदपरायण ।
ईस सुमेधा वर जाण । लग्न करूनि देइजे ॥ ६४ ॥
देवीच्या आज्ञेवरून । त्यासीच दिधले लग्न करून ।
अंबिकेचे वचने जाण । पुत्र जाहला सारस्वता ॥ ६५ ॥
धन्य सीमंतिनीची शिवभक्ती । उपमा नाही त्रिजगती ।
जिचे कर्तृत्व हैमवती । मोडू न शके सर्वथा ॥ ६६ ॥
सूत म्हणे ऐका सावधान । अवंतीनगरी एक ब्राह्मण ।
अत्यंत विषयी नाम मदन । शृंगारसुगंधमाल्यप्रिय ॥ ६७ ॥
पिंगलानामे वेश्या विख्यात । तिसी झाला सदा रत ।
सांडूनि ब्रह्मकर्म समस्त । मातापिता त्यागिली ॥ ६८ ॥
धर्मपत्नी टाकूनि दुराचारी । तिच्याच घरी वास करी ।
मद्यमांसरत अहोरात्री । कामकर्दमी लोळत ॥ ६९ ॥
करावया जगदुद्धार । आपणचि अवतरला शंकर ।
ऋषभनामें योगीश्वर । होवोनि विचरत महीवरी ॥ ७० ॥
आपुले जे जे निर्वाणभक्त । त्यांची दुःखे संकटे निवारीत ।
पिंगलेच्या सदना अकस्मात । पूर्वपुण्यास्तव पातला ॥ ७१ ॥
तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन । दोघेही धांवती धरिती चरण ।
षोडशोपचारेकरून । सप्रेम होऊनी पूजिती ॥ ७२ ॥
शुष्क सुपक्क स्निग्ध विदग्ध । चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद ।
भोजन देऊनि बहुविध । अलंकारवस्त्र दीधली ॥ ७३ ॥
करूनियां दिव्य शेज । निजविला तो शिवयोगिराज ।
तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज । सुवर्णाग्रजउदय होय तो ॥७४ ॥
एक निशी क्रमोनि जाण । शिवयोगी पावला अंतर्धान ।
दोघे म्हणती उमारमण । देऊनि दर्शन गेला आम्हां ॥ ७५ ॥
मग पिंगला आणि मदन । कालांतरी पावली मरण ।
परी गांठीस होते पूर्वपुण्य । शिवयोगीपूजनाचे ॥ ७६ ॥
दाशार्हदेशींचा नृपती । वज्रबाहुनामें विशेषकीर्ती ।
त्याची पट्टराणी नामे सुमती । जेवी दमयंती नळाची ॥ ७७ ॥
तो मदननामें ब्राह्मण । तिच्या गर्भी राहिला जाऊन ।
सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न । पिंगला वेश्या जन्मली ॥ ७८ ॥
कीर्तिमालिनी तिचे नांव । पुढे कथा ऐका अभिनव ।
इकडे सुमतीचे पोटी भूदेव । असतां विचित्र वर्तले ॥ ७९ ॥
तिच्या सवती होत्या अपार । ही पट्टराणी ईस होईल पुत्र ।
त्यांही तीस विष दुर्धर । गर्भिणी असतां घातले ॥ ८० ॥
तीस तत्काळ व्हावा मृत्यू । परी रोग लागला झाली प्रसूत ।
विष अंगावरी फुटले बहुत । बाळकासहित जननीच्या ॥ ८१ ॥
क्षते पडली झाले व्रण । रक्त पू गळे रात्रंदिन ।
राये बहुत वैद्य आणून । औषधे देता बरे नोहे ॥ ८२ ॥
रात्रंदिवस रडे बाळ । सुमती राणी शोके विव्हळ ।
मृत्यूही नोहे व्यथा सबळ । बरी नव्हेचि सर्वथा ॥ ८३ ॥
लेकरू सदा करी रुदन । रायासी निद्रा न लागे रात्रंदिन ।
कंटाळला मग रथावरी घालून । घोर काननी सोडिली ॥ ८४ ॥
जेथे मनुष्याचे नाही दर्शन । वसती व्याघ्र सर्प दारुण ।
सुमती बाळ कडे घेऊन । सव्यअपसव्य हिंडतसे ॥ ८५ ॥
कंटक पाषाण रुतती चरणी । मूच्र्छा येऊनि पडे धरणी ।
आक्रंदे रडे परी न मिळे पाणी । व्रणेकरूनी अंग तिडके ॥ ८६ ॥
म्हणे जगदात्म्या कैलासपती । जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ति ।
भक्तवज्रपंजरा तुझी कीर्ती । सदा गाती निगमागम ॥ ८७ ॥
जयजय त्रिदोषशमना त्रिनेत्रा । जगदंकुरकंदा पंचवक्त्रा ।
अज अजिता पयःफेनगात्रा । जन्मयात्रा चुकवी कां ॥ ८८ ॥
अनादिसिद्धा अपरिमिता । मायाचक्रचालका सद्गुणभरिता ।
विश्वव्यापका गुणातीता । धांव आता जगदगुरो ॥ ८९ ॥
ऐसा धांवा करिता सुमती । तंव वनी सिंह व्याघ्र गर्जती ।
परम भयभीत होऊनि चित्ती । बाळासहित क्षिती पडे ॥ ९० ॥
श्रावणारितनये नेऊन । वनी सांडिले उर्वीगर्भरत्न ।
की वीरसेनस्नुषा घोर कानन । पतिवियोगे सेवी जैसे ॥ ९१ ॥
सुमतीची करुणा ऐकून । पशुपक्षी करिती रुदन ।
धरणी पडता मूर्च्छा येऊन । वृक्ष पक्षी छाया करिताती ॥ ९२ ॥
चंचु भरूनिया जळ । बाळावरी शिंपिती वेळोवेळ ।
एकी मधुर रस आणोनि स्नेहाळ । मुखी घालोनि तोषविती ॥ ९३ ॥
वनगाई स्वपुच्छेकरूनी । वारा घालिती रक्षिती रजनी ।
असो यावरी ते राजपत्नी । हिंडता अपूर्व वर्तले ॥ ९४ ॥
तो वृषभभार वणिक घेवोनी । पंथे जाता देखे नयनी ।
त्यांचिया संगेकरूनी । वैश्यनगरा पातली ॥ ९५ ॥
तेथील अधिपति वैश्य साचार । त्याचे नाव पद्माकर ।
परम सभाग्य उदार । रक्षक नाना वस्तूंचा ॥ ९६ ॥
तेणे सुमतीस वर्तमान । पुसिले तू कोठील कोण ।
तिणे जे वर्तले मुळीहून । श्रुत केले तयाते ॥ ९७ ॥
ते ऐकूनि पद्माकर । त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र ।
श्वासोच्छ्‍वास टाकूनि घोर । म्हणे गति थोर कर्माची ॥ ९८ ॥
वज्रबाहूची पट्टराणी । पतिव्रता अवनीची स्वामिणी ।
अनाथापरी हिंडे वनी । दीनवदन आली येथे ॥ ९९ ॥
मग पद्माकर म्हणे सुमती । तू माझी धर्मकन्या निश्चिती ।
शेजारी घर देऊनि अहोराती । परामर्श करी तियेचा ॥ १०० ॥
बहुत वैद्य आणून । देता झाला रसायन ।
केले बहुत प्रयत्न । परी व्याधि न राहेचि ॥ १०१ ॥
सुमती म्हणे ताता । श्रीशंकर वैद्य न होता ।
कवणासही हे व्यथा । बरी न होय कल्पांती ॥ १०२ ॥
असो पुढे व्यथा होता कठीण । गेला राजपुत्राचा प्राण ।
सुमती शोक करी दीनवदन । म्हणे रत्न गेले माझे ॥ १०३ ॥
पद्माकर शांतवी बहुता रीती । नगरजन मिळाले सभोवती ।
तो निशांती उगवला गभस्ती । तेवी शिवयोगी आला तेथे ॥ १०४ ॥
जैसे दुर्बळाचे सदन शोधीत । चिंतामणि ये अकस्मात ।
की क्षुधेने प्राण जात । तो क्षीराब्धि पुढे धाविन्नला ॥ १०५ ॥
पद्माकरे धरिले चरण । पूजिला दिव्यासनी बैसवून ।
त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरूपण । शिवयोगीं सांगता झाला ॥ १०६ ॥
म्हणे वत्से सुमती ऐक । का हो रडसी करिसी शोक ।
तुझे पूर्वजन्मीचे पति पुत्र जनक । कोठे आहेत सांग पा ॥ १०७ ॥
आलीस चौर्‍याऐंशी लक्ष योनी फिरत । तेथीचे स्वजन सोयरे आप्त ।
आले कोठून गेले कोठे त्वरित । सांग मजपाशी वृत्तान्त हा ॥ १०८ ॥
तू नानायोनी फिरसी । पुढेही किती फेरे घेसी ।
कोणाचे पुत्र तू कां रडसी । पाहे मानसी विचारूनी ॥ १०९ ॥
शरीर धरावे ज्या ज्या वर्षी । त्या त्या कुळाभिमाने नाचती प्राणी ।
परी आपण उत्पन्न कोठूनी । ते विचारूनी न पाहती ॥ ११० ॥
त्वां पुत्र आणिला कोठून । कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन ।
तू आणि हे अवघे जन । जातील कोठे कवण्या देहा ॥ १११ ॥
आत्मा शिव शाश्वत । शरीर क्षणभंगुर नाशवंत ।
तरी तू शोक करिसी व्यर्थ । विचारूनि मनी पाहे पां ॥ ११२ ॥
आत्मा अविनाशी शाश्वत । तो नव्हे कोणाचा बंधु सुत ।
शरीराकारणे शोक करिसी व्यर्थ । तरी पडले प्रेत तुजपुढे ॥११३ ॥
जळी उठती तरंग अपार । सवेंचि फुटती क्षणभंगुर ।
मृगजळचि मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी ॥ ११४ ॥
चित्रींच्या वृक्षच्छाये बैसला कोण । चित्राग्नीने कोणाचे जाळिले सदन ।
तेथे गंगा लिहिली सहित मीन । कोण वाहोनि गेला तेथे ॥ ११५ ॥
वंध्यासुते द्रव्य आणून । भीष्मकन्या मारुतीस देऊन ।
गंधर्वनगरींचे वर्‍हाडी आणून । लग्न कोणे लाविले ॥ ११६ ॥
वार्‍याचा मंडप शिवून । सिकतादोरे बांधिला आवळून ।
शुक्तिकारजताचे पात्र करून । खपुष्पे कोणी भरियेले ॥ ११७ ॥
कासवीचे घालूनि घृत । मृगजळीचे मीन पाजळती पोत ।
ते चरणी नुपूरे बांधोनि नाचत । जन्मांध पाहत बैसले ॥ ११८ ॥
अहिकर्णीची कुंडले हिरोनी । चित्रींचे चोर आले घेवोनि ।
हा प्रपंच लटिका मुळीहूनी । तो साच कैसा जाणावा ॥ ११९ ॥
मुळीच लटिके अशाश्वत । त्याचा शोक करणे व्यर्थ ।
क्लेशतरूचे उद्यान समस्त । शरीर हे उद्भवले ॥ १२० ॥
सकळ रोगांचे भांडार । कृमिकीटकांचे माहेर ।
की पापाचा समुद्र । की अंबर भ्रांतीचे ॥ १२१ ॥
मूत्र श्लेष्म मांस रक्त । अस्थींची मोळी चर्मवेष्टित ।
मातेचा विटाळ पितृरेत । अपवित्र असत्य मुळीच हे ॥ १२२ ॥
ऐसे हे शरीर अपवित्र । ते पशुमूत्रे झाले पवित्र ।
क्षुरे मूर्धज छेदिले समग्र । इतुकेनि पावन केवि होय ॥ १२३ ॥
शरण न जाती देशिकाप्रती । तरी कैसेनि प्राणी तरती ।
कल्पकोटी फेरे घेती । मुक्त होती कधी हे ॥ १२४ ॥
सुमती तू सांगे सत्वर । तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार ।
अवघा हा मायापूर । सावध सत्वर होई का ॥ १२५ ॥
जयाचे हे सकळ लेणे । मागतां देतां लाजिरवाणे ।
तनुघर बांधिले त्रिगुणे । पांच वांसे आणोनिया ॥ १२६ ॥
याचा भरवसा नाही जाण । केधवा लागेल न कळे अग्न ।
की हे झाले वस्त्र जीर्ण । ऋणानुबंध तंव तगे ॥ १२७ ॥
मिथ्या जैसे मृगजळ । की स्वप्नीचे राज्य ढिसाळ ।
अहा प्राणी पापी सकळ । धन धान्य पुत्र इच्छिती ॥ १२८ ॥
गंगेमाजी काष्ठे मिळती । एकवट होती मागुती विघडती ।
तैसी स्त्रीपुरुष बोलिजेती । खेळ मुळीच असत्य हा ॥ १२९ ॥
वृक्षावरी पक्षी येती । किती एक बैसती किती एक जाती ।
आणिक्या तरूवरी बैसती । अपत्ये तैसी जाण पां ॥ १३० ॥
पथिक वृक्षातळी बैसत । उष्ण सरलिया उठून जात ।
सोयरे बंधु आप्त । तैसेच जाण निर्धार ॥ ३१ ॥
मायामय प्रपंचवृक्षी । जीव शिव बैसले दोन पक्षी ।
शिव सावधान सर्वसाक्षी । जीव भक्षी विषयफळे ॥ १३२ ॥
ती भक्षितांच भुलोनि गेला । आपण आपणासी विसरला ।
ऐसा अपरिमित जीव भ्रमला । जन्ममरण भोगीतसे ॥ १३३ ॥
त्यांमाजी एकादा पुण्यवंत । सद्‌गुरूसी शरण रिघत ।
मग तो शिव होवोनि भजत । शिवालागी अत्यादरे ॥ १३४ ॥
ऐसे ऐकता दिव्य निरूपण । पद्माकर सुमती उठोन ।
अष्टभावे दाटोन । वंदिती चरण तयाचे ॥ १३५ ॥
म्हणती येवढे तुझे ज्ञान । काय एक न करिसी इच्छेकरून ।
तू साक्षात उमारमण । भक्तरक्षणा धावलासी ॥ १३६ ॥
मग मृत्युंजयमंत्र राजयोगी । सुमतीस सांगे शिवयोगी ।
मंचूनि भस्म लाविता अंगी । व्यथारहित जाहली ते ॥ १३७ ॥
रंभाउर्वशीहूनि वहिले । दिव्य शरीर तिचे झाले ।
मृत्युंजयमंत्रे भस्म चर्चिले । बाळ उठले तत्काळ ॥ १३८ ॥
व्रणव्यथा जावोनि सकळ । बत्तीसलक्षणी झाला बाळ ।
मग शिवध्यान उपासना निर्मळ । सुमतीबाळ उपदेशिले ॥ १३९ ॥
परीस झगटतां पूर्ण । लोह तत्काळ होय सुवर्ण ।
तैसी दोघे दिव्यरूप जाण । होती झाली ते काळी ॥ १४० ॥
आश्चर्य करी पद्माकर । म्हणे धन्यधन्य गुरुमंत्र ।
काळ-मृत्युभय अपार । त्यापासून रक्षी गुरुनाथ ॥ १४१ ॥
गुरुचरणी रत होती सदा । त्यांसी कैंची भवभयआपदा ।
धनधान्यांसी नाही मर्यादा । भेद खेदा वारिले ॥ १४२ ॥
बाळ चरणांवरी घालोनी । सुमती लागे सप्रेम चरणी ।
म्हणे सद्गुरु तुजवरूनी । शरीर सांडणे हे माझे ॥ १४३ ॥
या शरीराच्या पादुका करून । तुझीया दिव्यचरणी लेववीन ।
तरी मी नव्हे उत्तीर्ण । उपकार तुझे गुरुमूर्ति ॥ १४४ ॥
मग शिवयोगी बोलत । आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत ।
तुझिया पुत्रासी होईल प्राप्त । राज्य पृथ्वीचे करील हा ॥ १४५ ॥
त्रिभुवनभरी होईल कीर्ती । निजराज्य पावेल पुढती ।
भद्रायु नाम निश्चिती । याचे ठेविले मी जाण ॥ १४६ ॥
थोर होय भद्रायु बाळ । तंववरी क्रमी येथेचि काळ ।
मृत्युंजयमंत्र जप त्रिकाळ । निष्ठा धरूनि करीत जा ॥ १४७ ॥
हा राजपुत्र निश्चित । लोकांत प्रकटो नेदी मात ।
हा होईल विद्यावंत । चतुःषष्टिकळाप्रवीण ॥ १४८ ॥
ऐसे शिवयोगी बोलोन । पावला तेथेचि अंतर्धान ।
गुरुपदांबुज आठवून । सुमति सद्‌गद क्षणक्षणां ॥ १४९ ॥
पद्माकरासी सुख अत्यंत । सुनय पुत्राहूनि बहुत ।
भद्रायू त्यासी आवडत । सदा पुरवीत लाड त्याचा ॥ १५० ॥
पद्माकरे आपुली संपत्ती वेचून । दोघांचे केले मेखलाबंधन ।
दोघांसी भूषणे समान । केले संपन्न वेदशास्त्री ॥ १५१ ॥
द्वादश वर्षांचा झाला बाळ । धीर गंभीर परम सुशीळ ।
मातेच्या सेवेसी सदाकाळ । जवळी तिष्ठत सादर ॥ १५२ ॥
पदरी पूर्वसुकृताचे पर्वत । शिवयोगी प्रकटला अकस्मात ।
सुमती भद्रायु धांवत । पाय झाडीती मुक्तकेशी ॥ १५३ ॥
नयनोदके चरणक्षालन । केशवसने पुसिले पूर्ण ।
जे सुगंधभरित जाण । स्नेह तेचि लाविले ॥ १५४ ॥
वारंवार करिती प्रदक्षिणा । दाटती अष्टभावेकरून ।
षोडशोपचारी पूजन सोहळा करिती अपार ॥ १५५ ॥
स्तवन करीतसे तेव्हा सुमती । तुझिया प्रसादेकरून मी पुत्रवंती ।
यावरी भद्रायूसी नीती । शिवयोगी शिकवितसे ॥ १५६ ॥
श्रुतिस्मृतिपुराणोक्त पाही । धर्मनीती वर्तत जाई ।
मातापितागुरुपायी । निष्ठा असो दे सर्वदा ॥ १५७ ॥
गोभूदेवप्रजापाळण । सर्वाभूती पहावा उमारमण ।
वर्णाश्रमस्वधर्माचरण । सहसाही न सांडावे ॥ १५८ ॥
विचार केल्यावाचूनिया । सहसा न करावी आन क्रिया ।
मागे पुढे पाहोनिया । शब्द बोलावा कुशलत्वे ॥ ५९ ॥
काळ कोण मित्र किती । कोणी द्वेषी शत्रु किती ।
आय काय खर्च किती । पाहावे चित्ती विचारूनिया ॥ १६० ॥
माझे बळ किती काय शक्ती । आपुले सेवक कैसे वर्तती ।
यश की अपयश देती । पहावे चित्ती विचारूनी ॥ १६१ ॥
अतिथी देव मित्र । स्वामी वेद अग्निहोत्र ।
पशु कृषि धन विद्या सर्वत्र । घ्यावा समाचार क्षणक्षणां ॥ १६२ ॥
लेकरू भार्या अरि दास । सदन गृहवार्ता रोगविशेष ।
येथे उपेक्षा करिता निःशेष । हानि क्षणात होत पै ॥ १६३ ॥
ज्या पंथे गेले विद्वज्जन । आपण जावे तोचि पंथ लक्षून ।
माता-पिता-यतिनिंदा जाण । प्राणांतीही न करावी ॥ १६४ ॥
वैश्वदेवसमयी अतिथी । आलिया त्यासी न पुसावी याती ।
अन्न वस्त्र सर्वांभूती । द्यावे प्रीत्यर्थ शिवाचिया ॥ १६५ ॥
परोपकार करावा पूर्ण । परपीडा न करावी जाण ।
करावे गोब्राह्मणरक्षण । सत्य सुजाण म्हणती तया ॥ १६६ ॥
निंदा वाद टाकोन । सर्वदा कीजे शिवस्मरण ।
तेच म्हणावे मौन । शिवसेवन तप थोर ॥ १६७ ॥
परदारा आणि परधन । हे न पहावे जेवी वमन ।
करावे शास्त्रश्रवण । शिवपूजन यथाविधी ॥ १६८ ॥
स्नान होम जपाध्ययन । पंचयज्ञ गोविप्रसेवन ।
श्रवण मनन निजध्यास पूर्ण । अनालस्ये करावी ॥ १६९ ॥
सुरत निद्रा भोजन । येथे असावे प्रमाण ।
दान सत्कर्म अभ्यास श्रवण । आळस येथे न करावा ॥ १७० ॥
काम पूर्ण धर्मपत्नीसी । निषिद्ध जाण परयोषितेसी ।
क्रोधे दंडावे शत्रूसी । साधुविप्रांसी नमिजे सदा ॥ १७१ ॥
द्वेषियांसी धरावा मद । संतभक्तांसी नम्रता अभेद ।
संसाररिपूसी मत्सर प्रसिद्ध । असावे निर्मत्सर सर्वांभूती ॥ १७२ ॥
दुर्जनासी दंभ दाविजे । भल्याचे पदरज वंदिजे ।
अहंकारे पृथ्वी जिंकिजे । निरहंकार द्विजासी ॥ १७३ ॥
वाचा सावध शिवस्मरणी । पाणी सार्थक दानेकरूनी ।
पाद पावन देवालययात्रागमनी । नित्य शिवध्यानी बैसावे ॥ १७४ ॥
पुराणश्रवणी श्रोत्र सादर । त्वचा संतआलिंगनीं पवित्र ।
सार्थक शिवध्यानी नेत्र । जिव्हेने स्तोत्र वर्णावे ॥ १७५ ॥
शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणी । ये रीती इंद्रिये लावावी भजनी ।
दीन अनाथ अज्ञान देखोनी । तयावरी कृपा कीजे ॥ १७६ ॥
ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री । देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी ।
युक्तनिद्रा युक्ताहारी । मृगया करी परम नीतीने ॥ १७७ ॥
अतिविद्या अतिमैत्री । अतिपुण्य अतिस्मृती ।
उत्साह धैर्य दान धृती । वर्धमान असावी ॥ १७८ ॥
आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र । मैथुन औषध सुकृत मंत्र ।
दान मान अपमान ही सर्वत्र । गुप्त असावी जाणिजे ॥ १७९ ॥
नष्ट पाखंडी शठ धूर्त । पिशुन तस्कर जार पतित ।
चंचळ कपटी नास्तिक अनृत । ग्राम्य सभेसी नसावे ॥ १८० ॥
निंदक शिवभक्तिउच्छेदक । मद्यपानी गुरुतल्पक ।
मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक । त्यांचे दर्शन न व्हावे ॥ १८१ ॥
दारा धन आणि पुत्र । यांसी आसक्त नसावे अणुमात्र ।
अलिप्तपणे संसार । करोनि आसक्त असावे ॥ १८२ ॥
बंधु सोयरे श्वशुर स्वजन । यांसी स्नेह असावा साधारण ।
भलता विषय देखोन । आसक्ती तेथे न करावी ॥ १८३ ॥
करावे रुद्राक्षधारण । मस्तकी कंठी दंडी करभूषण ।
गेलिया प्राण शिवपूजन । सर्वथाही न सांडावे ॥ १८४ ॥
शिवकवच सर्वांगी । लेऊं शिकवी शिवयोगी ।
भस्म चर्चिता रणरंगी । शस्त्रास्त्रबाधा न होय ॥ १८५ ॥
काळमृत्युभयापासून । रक्षी मृत्युंजयऔपासन ।
आततायी मार्गघ्न ब्रह्मघ्न । यांसी जीवे मारावे ॥ १८६ ॥
सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष । विधियुक्त आचरावे विशेष ।
शिवहरिकीर्तन निर्दोष । सर्व सांडूनि ऐकावे ॥ १८७ ॥
महापर्व कुयोग श्राद्धदिनीं । व्यतीपात वैधृति संक्रमणी ।
न प्रवर्तावे मैथुनी । ग्रहणी भोजन न करावे ॥ १८८ ॥
सत्पात्री देतां दान । होय ऐश्वर्य वर्धमान ।
अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण । शास्त्रप्रमाण जाणिजे ॥ १८९ ॥
वेद शास्त्र पुराण कीर्तन । गुरुब्राह्मणमुखे करावे श्रवण ।
दान दिधल्याचे पाळण । करिता पुण्य त्रिगुण होय ॥ १९० ॥
अपूज्याचे पूजन । पूज्य त्याचा अपमान ।
तेथे भय दुर्भिक्ष मरण । होते जाण विचारे ॥ १९१ ॥
महाडोही उडी घालणे । महापुरुषासी विग्रह करणे ।
बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची ॥ १९२ ॥
दाने शोभे सदा हस्त । कंकण मुद्रिका भार समस्त ।
श्रवणी कुंडले काय व्यर्थ । श्रवणसार्थक श्रवणेचि ॥ १९३ ॥
ज्याची वाचा रसवंती । भार्या रूपवती सती ।
औदार्य गुणसंपत्ती । सफल जीवित्व तयाचे ॥ १९४ ॥
देईन अथवा नाही सत्य । हे वाचेसी असावे व्रत ।
विद्यापात्रे येती अमित । सद्यः दान त्यां दीजे ॥ १९५ ॥
विपत्तिकाळी धैर्य धरी । वादी जयवंत वैखरी ।
युद्धामाजी पराक्रम करी । याचकांसी पृष्ठी न दाविजे ॥ १९६ ॥
ब्राह्मणमित्रपुत्रांसमवेत । तेचि भोजन उत्तम यथार्थ ।
गजतुरंगांसहित पंथ । चालणे तेचि श्रेष्ठ होय ॥ १९७ ॥
ज्या लिंगाचे नाही पूजन । तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन ।
अनाथप्रेतसंस्कार जाण । करणे त्या पुण्यासी पार नाही ॥ १९८ ॥
ब्रह्मद्वेषाएवढे विशेष । मारक नाही कदा विष ।
सत्समागम रात्रंदिवस । तुच्छ सुधारस त्यापुढे ॥ १९९ ॥
प्रतापे न व्हावे संतप्त । परसौख्ये हर्षभरित ।
सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत । तोचि भक्त शिवाचा ॥ २०० ॥
पाषाण नाम रत्ने व्यर्थ । चार रत्ने आहेत पृथ्वीत ।
अन्न उदक सुभाषित । औदार्य रत्न चौथे पैं ॥ २०१ ॥
वर्म कोणाचे न बोलावे । सद्‌भक्तांचे आशीर्वाद घ्यावे ।
भाग्याभाग्य येत स्वभावे । स्वधर्मध्रुव न ढळावा ॥ २०२ ॥
पूर्वविरोधी विशेष । त्याचा न धरावा विश्वास ।
गर्भिणी पाळी गर्भास । तेवी प्रजा पाळी का ॥ २०३ ॥
गुरु आणि सदाशिव । यांसी न करावा भेदभाव ।
भाग्यविद्यागर्व सर्व । सोडोनि द्यावा जाण पां ॥ २०४ ॥
नराची शोभा स्वरूप पूर्ण । स्वरूपाचे सद्गुण आभरण ।
गुणांचे अलंकार ज्ञान । ज्ञानाचे भूषण क्षमा शांति ॥ २०५ ॥
कुल शील विद्या धन । राज्य तप रूप यौवन ।
या अष्टमदेकरून । मन भुलो न द्यावे ॥ १०६ ॥
ऐसा नानापरी शिवयोगी । बोधिता झाला भद्रायूलागी ।
हे नीति ऐकतां जगी । साकडे न पडे सर्वथा ॥ २०७ ॥
सातवा अध्याय गिरी कैलास । यावरी वास्तव्य करी उमाविलास ।
पारायण प्रदक्षिणा करिती विशेष । निर्दोष यश जोडे तयां ॥२०८ ॥
की हा अध्याय हिमाचळ । भक्तिभवानी कन्या वेल्हाळ ।
तिस वरोनी पयःफेनधवल । श्वशुरगृही राहिला ॥ २०९ ॥
पुढिले अध्यायी कथा सुरस । शिवयोगी दया करील भद्रायूस ।
ब्रह्मानंद निशिदिवस । श्रवण करोत विद्वज्जन ॥ २१० ॥
भवगजविदारक मृगेंद्र । श्रीधरवरद आनंदसमुद्र ।
तो शिव ब्रह्मानंद यतींद्र । जो जगद्गुरू जगदात्मा ॥ २११ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । सप्तमाध्याय गोड हा ॥ २१२ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More