Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 19

(Purushottam Maas Katha Adhyay 19)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 19

Purushottam Maas Katha Adhyay 19. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 197
श्री गणेशाय नमः ॥
जयजयाजी श्रीगुरुसमर्था ॥ भाविकांते मोक्षदाता ॥
अनाथनाथा कृपावंता ॥ करुणाकरा दीनबंधो ॥ १ ॥
अगाध भक्‍तीचा महिमा ॥ भक्‍तप्रिय सर्वोत्तमा ॥
भक्‍तिवीण निरर्थक जन्मा ॥ प्राणियांचा निर्धारें ॥ २ ॥
यालागीं भाव धरून अंतरीं ॥ प्रचीत घ्यावी शरीरीं ॥
आत्मप्रचीत गुरुप्रचीतवरी ॥ शास्त्रप्रचीत तिसरी जाणिजे ॥ ३ ॥
म्हणोन दृष्टांतीं कथाभाग सत्य ॥ स्वयें बोलिला श्रीअनंत ॥
ही जाणिजे शास्त्रप्रचीत ॥ ऐका दृष्टांत दुसरा ॥ ४ ॥
वक्ता वदेल अर्थांतर ॥ तो जाणिजे गुरुकृपा साचार ॥
भाव धरूनि उकलावें अंतर ॥ मग साक्षात्कार आत्मप्रचीती ॥ ५ ॥
एवं तिन्ही प्रचीती घेऊनी ॥ प्रवर्तावें श्रोतेजनीं ॥
याउपरी मलमास कथनीं ॥ श्रोतेजनीं परिसावी ॥ ६ ॥
लक्ष्मी नारायण संवाद ॥ तोची श्रोतियां करूं विशद ॥
ऐका विचक्षण सावध ॥ जेणें हरेल वेध मानसीं ॥ ७ ॥
क्षीराब्धिजा वदे पुरुषोत्तमा ॥ अनुपम्य ऐकिला जी महिमा ॥
तरी पुढील परिसावें नेमा ॥ कवणे परी आचरावें ॥ ८ ॥
कवण उद्धरोनि गेला ॥ कवणें नेम असा साधिला ॥
हा तंव विस्तार आगळा ॥ कृपा करून वदावा ॥ ९ ॥
ऐकून लक्ष्मीची वाणी ॥ बोलता जाला चक्रपाणी ॥
म्हणे ऐकहो शुभकल्याणी ॥ एकाग्र करून मानस ॥ १० ॥
मेरु सिंधौतु नगरी वर्तते बहुविस्तरा ॥
नाम्ना शिवपुरी ख्याता शिवस्याति प्रिया सदा ॥ १ ॥
गोकर्णस्य गिरेः प्रार्श्वे प्रासादाट्टलभूषिता ॥
बव्हाश्चर्यवतीरम्या रम्यचत्वर शोभिता ॥ २ ॥
नाना ब्राह्मणसंयुक्ता क्षत्रियैश्च विराजिता ॥
वैश्यैः शूद्रै स्तथान्यैश्च संयुक्ता सत्यवादिभिः ॥ ३ ॥
तस्यामासीत्सदाचारः शूद्रः कश्चिद्वरोगृही ॥
नाम्नापि विप्रदासोसौ कमर्णापि तथाविधः ॥ ४ ॥
तस्य पत्‍नी विप्रदासीसा नाम्ना शुभलक्षणा ॥
साध्वी पतिपरापत्युराज्ञासन्निता सदा ॥ ५ ॥
मेरु तळाचिया ठायीं जाण ॥ शिवकांची नगरी विस्तीर्ण ॥
ब्रह्मसमुदावो परिपूर्ण ॥ अध्ययन घरोघरीं ॥ ११ ॥
गोकर्णाचे पश्चिमदिशे ॥ अपूर्व नगरी ते असे ॥
क्षुद्र क्षेत्री सर्व धर्म वसे ॥ वेदमार्गे वर्तती पैं ॥ १२ ॥
वेदमर्यादा नुलंघिती कोणी ॥ ब्राह्मणा पूजिती वर्ण तिन्ही ॥
श्रौतस्मार्त अवग्रहणीं ॥ सदाचारें ब्राह्मण वर्तती जे ॥ १३ ॥
नगराची रचना अतिअद्‍भुत ॥ पाहून जननयन तटस्थ होत ॥
रम्य गोपुरें लखलखीत ॥ बरवी झळकत रविकिरणें ॥ १४ ॥
तया नगरीं एक शूद्र जाण ॥ नाम तयाचें विप्रदास म्हणोन ॥
बाहाताती सर्वही जन ॥ सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा ॥ १५ ॥
एका विप्राचिया घरीं ॥ करून सेवा चाकरी ॥
निरंतर वर्ते सदाचारी ॥ विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा ॥ १६ ॥
तयाची भार्या पतिव्रता पूर्ण ॥ नुलंघी कदा पतिवचन ॥
तेही विप्रसेवा करूनि जाण ॥ कुटुंब रक्षण करिताती ॥ १७ ॥
याउपरी एके दिनी ॥ मलमासे संधी जाणुनी ॥
विप्रमेळा तये क्षणीं ॥ स्नानालागुनी चालिले ॥ १८ ॥
तंव ते शुद्रकामिनी ॥ विनवी भ्रतारालागुनी ॥
समस्त जग मिळोनी ॥ स्नानालागुनी जाताती ॥ १९ ॥
तरी आपण वर्णहीन याती ॥ केवी न घडेल पुण्यप्राप्ती ॥
द्रव्यही नाहीं संचितीं ॥ जे दान पद्धती करावी ॥ २० ॥
यालागीं प्राणनाथा पाहीं ॥ विप्रा सांगातें चला सर्वही ॥
दानधर्मातें धन तें नाहीं ॥ परी करूं देह पवित्र ॥ २१ ॥
स्नानें करून पवित्रता ॥ ऐसी वदतसे जनवार्ता ॥
यालागीं विप्रातें प्रार्था ॥ न्यावे तत्वता समागमें ॥ २२ ॥
ऐसें ऐकून उत्तर ॥ द्रवलें शूद्राचें अंतर ॥
मग प्रार्थूनिया द्विजवर ॥ निघाला सत्वर कुटुंबेंसि ॥ २३ ॥
यात्रेचा समुदावो पातला ॥ गोकर्ण क्षेत्राप्रति आला ॥
पाहोन तेथीच्या गंगाजळा ॥ तटस्थ जाला समुदावो ॥ २४ ॥
गंगा पाहतांच नयनीं ॥ तात्काळ पातका होय धुणी ॥
समग्र जन स्नानालागुनीं ॥ तये स्थानीं उतरले ॥ २५ ॥
नित्य करिती स्नानदानास ॥ यात्रा राहिली एक मास ॥
विप्रासवें शूद्रही स्नानास ॥ स्त्रियेसहीत जातसे ॥ २६ ॥
नित्य स्नान-विधीसारूनी ॥ मग पुष्पबिल्वादी आणुनी ॥
नित्य पूजितसे शिवभवानी ॥ भावार्थ मनी आगळा ॥ २७ ॥
उभयतां जाऊनि वनांत ॥ काष्ठभारा आणिती नित्य ॥
त्याचा विक्रय करून सत्य ॥ द्रव्य संचय करिताती ॥ २८॥
मौन्य न बोलती कवणासी ॥ नक्‍त राहती उपवासी ॥
सायंकाळीं सारिती भोजनासी ॥ नित्यनेमेसी वर्तत ॥ २९ ॥
ऐसे व्रत संपूर्ण एकमास ॥ उभयतां आचरली निर्दोष ॥
पाप जळालें निःशेष ॥ नाहीं लवलेश तिळभरी ॥ ३० ॥
मग संचयो जो धनाचा ॥ नित्य विक्रय काष्ठाचा ॥
तो काढुनियां तयाचा ॥ व्यय करिते पैं जाले ॥ ३१ ॥
यथायुक्त ब्राह्मण भोजन ॥ करिते जाले उद्यापन ॥
त्रयचि दशक अपूप अन्न ॥ केलें अर्पण द्विजातें ॥ ३२ ॥
मग शेवटीं ते उभयतां ॥ भोजनीं बैसलें तत्वता ॥
घेऊन विप्रांची मंत्राक्षता ॥ बिराडमार्गी चालिले ॥ ३३ ॥
तंव नवल वर्तलें तये क्षणीं ॥ रात्र जाली एक यामिनी ॥
तंव एक पिशाच मार्गस्थानीं ॥ उभां येऊनि ठाकला ॥ ३४ ॥
विक्राळ वदन भयंकर ॥ लंबबाहो विशाळ शरीर ॥
मुख पसरूनि क्षुधातुर ॥ धांवला समोर ग्रासावया ॥ ३५ ॥
तयातें पाहून उभयांनीं ॥ तटस्थ ठेले तयास्थानीं ॥
तंव दैवयोगें करूनीं ॥ अपूर्व काहाणीं पैं जाली ॥ ३६ ॥
पुण्यशरिरी शूद्रदंपत्य ॥ पाहूनी पिशाच प्रेत ॥
क्रूर भावना निरसून तेथें ॥ जाला बोलतां शूद्रातें ॥ ३७ ॥
म्हणे महापुरुषां तू कोण ॥ येथें यावया काय कारण ॥
मी तंव क्षुधीत पिशाच जाण ॥ करावया भक्षण आलों तुम्हां ॥ ३८ ॥
परी तंव दर्शनें समाधान ॥ पावन जालें माझें मन ॥
तूंतें करितां संभाषण ॥ वाटे पावन होईन मी ॥ ३९ ॥
आजवरी या पर्वतशिखरीं ॥ मी फिरत होतों वनांतरी ॥
वृकव्याघ्र नानापरी ॥ क्षुधाहारीं हिंडतसे ॥ ४० ॥
परि क्षुधा न धाय सर्वथा ॥ या क्षुधेंत फिरे मी तत्वता ॥
तंव दृष्टीस देखिलें अवचिता ॥ विप्रदासा तुजलागी ॥ ४१ ॥
तरी कृपावंता दयानिधी ॥ निरसी माझी भवव्याधी ॥
देऊनियां पुण्य औषधी ॥ भवभयव्याधी हरावी ॥ ४२ ॥
ऐकून तयाचें उत्तर ॥ शूद्र वदे तेव्हां प्रत्युत्तर ॥
म्हणें तूं पूर्वी होतासि थोर ॥ ते सविस्तर निवेदी ॥ ४३ ॥
कवण पापास्तव पाहें ॥ पिशाच देह लाधला आहे ॥
तो सांगे लवलाहें ॥ पुढें उपाय विचारू ॥ ४४ ॥
येरू म्हणे ऐकें स्वामिराजा ॥ पूर्वी मीं क्षेत्रज वंशी राजा ॥
होतों पराक्रमीं तेजःपुंजा ॥ शत्रु सहज पायातळी ॥ ४५ ॥
सर्वांवरी दरारा पाहें ॥ कापती सर्वही राये ॥
यवन मंडळी पाळीं निर्भय ॥ नाहीं भयपापाचें ॥ ४६ ॥
पुण्य लेश नाहीं सर्वथा ॥ स्वप्नीं नेणें धर्मवार्ता ॥
मार्ग पाडून तत्वता ॥ वस्तु हरीं मार्गस्थांच्या ॥ ४७ ॥
परद्वार असंख्यात ॥ मज घडले अपरमित ॥
माझिया पापा नाहीं गणित ॥ सौख्या अमीत भोगिलें ॥ ४८ ॥
आपपर नेणें सर्वथा ॥ प्रजेतें नागवीं तत्वता ॥
त्यांचिया शापें मज ताता ॥ क्षयरोग लागला पैं ॥ ४९ ॥
त्यायोगें मृत्यु पावलों सवेग ॥ यमदूतीं कर्शूनियां आंग ॥
दुर्धर माझा पापभोग ॥ जाणुनि जाचिती मजलागीं ॥ ५० ॥
मी दानधर्म केलाच नाहीं ॥ अतीत अभ्यागत नेणें कांहीं ॥
तीर्थ पर्वणी स्वप्नीही ॥ पाहिलीं नाहीं पापिष्टें ॥ ५१ ॥
द्रव्य असूनि माझे पदरीं ॥ मी तव तीर्थ दान न करीं ॥
सरली आयुष्याची दोरी ॥ नरक अघोरी टाकिलें मज ॥ ५२ ॥
मग तेथें बहु पस्तावलों ॥ अहा देवा स्वधर्म आंचरलों ॥
पापातें मी नाहीं भ्यालों ॥ मदबळें करूनियां ॥ ५३ ॥
मग तेथें उपाव नसे काहीं ॥ हिंपुटी जालों स्वदेहीं ॥
द्रव्य जोडिलें तेंही ॥ राहिलें जेथिचें तेथेंची ॥ ५४ ॥
व्यर्थ गेलीं माझी वयसा ॥ पापबळें जोडिला पैसा ॥
संसारकारणीं सर्व आशा ॥ शेवटीं नाशा पावलों ॥ ५५ ॥
मिळोनीं काका मामा आत्या ॥ बंधुभगिनी आणि चुलत्या ॥
मिळूनियां मज भोंवत्या ॥ वाटोळे केलें द्रव्याचें ॥ ५६ ॥
सासूसासरा विहिणी ॥ सुना जावई काकी मामी ॥
आपा आबा सर्वांनीं ॥ वेढिले मजलागी धनलोभें ॥ ५७ ॥
शेवटीं अंतकाळ आला ॥ सकळ जालीं सभोंवती गोळा ॥
हात देऊनी कपाळा ॥ रडती खळखळा धनासाठीं ॥ ५८ ॥
म्हणती छत्र गेलें आमुचें ॥ कोण रक्षण करील कुटुंबाचें ॥
शेवटीं नाहीं कोणी कोणाचें ॥ सर्वही जायाचें सर्व लेणें ॥ ५९ ॥
ऐसी गती माझी झालीं ॥ शेवटीं यमयातना प्राप्त झाली ॥
सर्व आटलें तये काळीं ॥ सोडविता बळी न दिसे पैं ॥ ६० ॥
काळाचे मुखींहूनी सर्वथा ॥ न देखों कोणी सोडविता ॥
यालागीं विचक्षण जनीं तत्वता ॥ मोक्षपंथा स्मरावें ॥ ६१ ॥
एका सद्‍गुरू वांचुनी ॥ उपाव नाहींच त्रिभुवनीं ॥
तोची सोडवी काळापासुनी ॥ इतरांची कहाणी न चलेची ॥ ६२ ॥
ऐसा मी फार पस्तावलों ॥ शेवटीं रवरवीं पडता जालों ॥
तेथें बहुत जाजावलों ॥ कुसमुसलों अंतरीं ॥ ६३ ॥
तेथें कुंभपाक कुंड ॥ तळीं विस्तीर्ण लहान तोंड ॥
तयामाजी नरक भरला उदंड ॥ तोचि दंड प्राणियातें ॥ ६४ ॥
त्यामाजी नेउनी टाकिती ॥ एकावरी एक रिचविती ॥
उसंत नाहीं निघावयाप्रती ॥ बुचकळ्या घेती एकाएक ॥ ६५ ॥
तंव टोले देती यमदूत ॥ मागुते आंत लोटीत ॥
नाकीं तोंडीं भरत नरक तो ॥ ६६ ॥
ऐसो जाचणी दिवस बहुत ॥ भोगिली सहस्र वर्षे परियंत ॥
शेवटी मज काढूनि देत ॥ पिशाच योनींत टाकिलें ॥ ६७ ॥
तेथे क्षुधा लागतां बहुत ॥ परी संकीर्ण रंध्रमुखांत ॥
कवळमध्यें अडकत ॥ क्षुधा शांत न होय ॥ ६८ ॥
उदक प्राशनासी नाहीं ॥ संवदनीचें किंवा अशौच्य देहीं ॥
निर्मळ पाहतातें नाहीं ॥ ऐसी देहीं दुःखयातना ॥ ६९ ॥
वस्त्र नाहीं दिगंबर ॥ वृक्षावरी आमुचें घर ॥
ऐसा भोग तीस हजार ॥ संवत्सर भोगावा ॥ ७० ॥
यालागीं भाकितों करुणा ॥ कृपाळू तू तापसी राणा ॥
देऊन कांहीं पुण्यदाना ॥ निवारी यातना माझी हे ॥ ७१ ॥
अवघे गेले सुखाचे सांगाती ॥ शेवटी झाली हे माझी गती ॥
कृपासागरा दयामूर्ति ॥ करीं निवृत्ती पापाची ॥ ७२ ॥
येवढा उपकार करीं ॥ सुकृत बांधीं आपुले पदरीं ॥
चुकवीं माझी जन्ममरण फेरी ॥ थोर उपकारीं बुडेन मी ॥ ७३ ॥
ऐसी करुणादीन वाणी ॥ ऐकून शूद्र द्रवला अंतःकरणी ॥
मग उदक करीं घेऊनी ॥ संकल्पुनी सोडित ॥ ७४ ॥
म्हणे महापुरुषा ऐक ॥ तूं तंव कर्मपातकी देख ॥
तूं तें पाहूनि अधिक ॥ दया मातें उपजली ॥ ७५ ॥
तरी सप्तदिन स्नानाचें फळ ॥ मी आचरी जो केवळ ॥
मलमाहात्माचें निर्मळ ॥ तें हें जळ असे पैं ॥ ७६ ॥
या सप्तदिनाचे पुण्येकरून ॥ तुझें पापक्षाळण ॥
तात्काळ जाई उद्धरून ॥ ऐसें म्हणोन उदक सोडिलें ॥ ७७ ॥
तें उदक पडतां प्रेतहस्तीं ॥ तेथें आश्चर्य झाले श्रोतीं ॥
अवधाराहो परमप्रीती ॥ महापातकी उद्धरला ॥ ७८ ॥
तात्काळ दिव्य देह पावला ॥ प्रेतभाव सर्व लोपला ॥
तंव अकस्मात देखिला ॥ घंटारव स्वर्गीचा ॥ ७९ ॥
दिव्य विमान स्वर्गीहून ॥ तात्काळ उतरलें तयेक्षण ॥
लखलखीत देवगण ॥ उभे येऊन ठाकले ॥ ८० ॥
पिशाच उद्धरला तात्काळ ॥ विमानीं बैसवोनि गेला ते वेळ ॥
नेत्रीं पाहते जाले सकळ ॥ म्हणती धन्य फळ स्नानाचें ॥ ८१ ॥
मलस्नान अगाध महिमा ॥ कृपाळु तो सर्वोत्तमा ॥
धन्य या शूद्राच्या नेमा ॥ केलें कर्म अघटित ॥ ८२ ॥
स्वयें पुण्याचें दान केलें ॥ ऐसें कधी देखिलें ना ऐकिलें ॥
ऐसिया पापिया तें उद्धरिलें ॥ अनुपम्य केलें या शूद्रें ॥ ८३ ॥
आश्चर्य करून सर्वांनी ॥ येऊन लागती शूद्रचरणीं ॥
जयजयकार गोकर्णी ॥ प्रवर्तला आदरें ॥ ८४ ॥
मग नानापरी दिव्यान्न ॥ ठायीं ठायीं विप्रभोजन ॥
होता पुराणकथा श्रवण ॥ आनंद पूर सर्वांतें ॥ ८५ ॥
ऐसा मलमास स्नानमहिमा ॥ निवेदिला श्रोतयां तुम्हां ॥
जो कथिला सार्वभौमा ॥ श्रीविष्णु लक्ष्मीते ॥ ८६ ॥
तोचि प्राकृत भाषे वैखरीं ॥ भरविला श्रोतियांचे कर्णद्वारीं ॥
न्यून पूर्ण तो चतुरीं ॥ क्षमा मजवरी पैं कीजे ॥ ८७ ॥
मलमहात्म अगाध महिमा ॥ जेणें संतोष पुरुषोत्तमा ॥
म्हणोनि धरिजे अतिनेमा ॥ अनुक्रमें संपादावा ॥ ८८ ॥
कांहीं धन न लागतां बहुत ॥ फुकाचें पुण्य असे जोडत ॥
यालागीं साधावें हिताहित ॥ हेची विहित सर्वदां ॥ ८९ ॥
शेवट कोणी कोणाचें नाहीं ॥ एकटें पडणें लागे प्रवाहीं ॥
धनधान्यतें सर्वही राही ॥ जेथील तेथेंची ॥ ९० ॥
यालागीं करा काढाकाढी ॥ साधा बापानों लवडसवडी ॥
जेणें सुटे काळाची वोढी ॥ ऐसी तांतडी करावी ॥ ९१ ॥
इति श्रीमलमासमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणाचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ एकोनविंशोध्याय गोड हा ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्याः ९१ ॥ श्लोक ५ ॥
॥ इति एकोनविंशोऽध्यायः ॥

Explore More