Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 20

(Purushottam Maas Katha Adhyay 20)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 20

Purushottam Maas Katha Adhyay 20. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 151
श्री गणेशाय नमः ॥
जयजयाजी सद्‌गुरुमूर्ती ॥ अनुपम्य तुझी अगाध कीर्ति ॥
चुकवी जन्ममरणांती ॥ हे ख्याती अनुपम्य ॥ १ ॥
भावार्थ पाहिजे निका ॥ व्यर्थ नको हे लापणिका ॥
जेवी गंगा मनकर्णिका ॥ क्षय करी पापातें ॥ २ ॥
जेवी अग्नि स्फुलिंग पाही ॥ भस्म करी सर्व तृणवळई ॥
तैसा सद्‍गुरु मंत्र पाहीं ॥ भस्म होई पापसमूहो ॥ ३ ॥
असो ऐसे जे सद्‌गुरु ॥ तया माझा नमस्कारु ॥
शिरीं ठेवा वरद करु ॥ जेणें भवपारु होय माझा ॥ ४ ॥
आतां ऐका भाविकजन ॥ कथेसीं द्यावें अवधान ॥
येथींचे ग्राहिक कोणकोण ॥ त्यांचें श्रवण करावें ॥ ५ ॥
येर अभाविका चाड नाहीं ॥ व्यर्थ न पडावें प्रवाहीं ॥
जें जें असेल जयाचे दैवीं ॥ तेची नवाई भोगूत ॥ ६ ॥
तोची भावार्थ निका ॥ प्राकृत भाषेंत टीका ॥
भावार्थ बळें ऐकां ॥ म्हणे दासानुदास ॥ ७ ॥
श्रीकृष्ण उवाच॥
भूय एव प्रवक्ष्यामि श्रुणु सर्वांगसुंदरि ॥
मलिम्लुचकृतं स्नानं फलमद्‍भुतकारणं ॥ १ ॥
सौराष्ट्रे सुजने देशे वृक्षछाया विवर्जिते ॥
खेटखर्वट संयुक्ते श्वखरौघसमन्विते ॥ २ ॥
विष्णू वदे लक्ष्मीतें ॥ मलमहात्म अति अद्‍भुत ॥
जें सुखदायक सर्वांतें ॥ श्रवण करी यथार्थ ॥ ८ ॥
सौराष्ट्र देशाचिये ठायीं ॥ जाली असे अपूर्व नवाई ॥
तेची कथा तूंतें सर्वही ॥ ऐक एकाग्र ते शुभानने ॥ ९ ॥
तो देश परम कंटक ॥ कोठें वृक्ष न मिळे एक ॥
छाया नाहींच कोठे देख ॥ बैसावया पांथस्था ॥ १० ॥
वस्तीसी ग्राम न मिळे सर्वथा ॥ तेथें पक्षी श्वापदांची कोण वार्ता ॥
ऋषि समुदावो पाहातां ॥ तोचि तत्वता न दिसे ॥ ११ ॥
ऐसा तो देश कुलक्षण ॥ तेथील एक नगर विस्तीर्ण ॥
नाम तयाचें प्रभास पूर्ण ॥ चर्या संपूर्ण रविसम ॥ १२ ॥
प्राकार गोपुरें परिपूर्ण ॥ स्वधर्माचारें सकळजन ॥
वर्णाश्रम धर्मचारी वर्ण ॥ शास्त्राधारें वर्तती ॥ १३ ॥
राजा तेथील परम धर्मिष्ट ॥ आडकाठी नाहीं कोठे ॥
उदारपणें अतिधारिष्टे ॥ पुरवी मनोरथ याचकाचे ॥ १४ ॥
ब्राह्मण सदाचारें वर्तती ॥ सदां वेदाध्ययन करिताती ॥
नित्य नैमित्य साधिती ॥ सदां करिती वेदघोष ॥ १५ ॥
जपतप होमहवन ॥ मंत्रतंत्र प्रातःस्नान ॥
सदां आचरतां ब्राह्मण ॥ वेदसंपन्न सदाचारी ॥ १६ ॥
जनसारिती प्रातःस्नान ॥ तेणे म्हणविती ब्राह्मण ॥
स्नान करी तोंवरी जाण ॥ शुद्ध ऐसें जाण शास्त्र वदे ॥ १७ ॥
स्नानाविणें वर्तती विप्र ॥ कोणी न पाहाती त्यांचें वक्त्र ॥
म्हणती भेटला अपवित्र ॥ म्हणोनी फिरती माघारे ॥ १८ ॥
यालागीं नेमें करूनी ॥ नित्यनेमें प्रवर्तावें प्रातःस्नानीं ॥
ऐसें पुण्य करितां जनीं ॥ ते पुण्यनिदानीं कामाये ॥ १९ ॥
ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण ॥ नित्य करिती प्रातःस्नान ॥
करूनियां पंचमहायज्ञ ॥ अतिथी सन्मान समयासी ॥ २० ॥
ऐसे तया नगराचे भूदेव ॥ मिळोन सकळ समुदाव ॥
मलमास लक्षुन पाहाहो ॥ चालिला समुदावो स्नानातें ॥ २१ ॥
नित्य गंगातिरीं पाहीं ॥ जाती नरनारी सर्वही ॥
तीर्थदान जपतप सर्वही ॥ शास्त्राधारें आचरती ॥ २२ ॥
उठोनी पंचपंच उषःकालीं ॥ स्नानें सारिती गंगाजळीं ॥
दानें देताती विप्रमंडळी ॥ अति सुमेळीं विप्रांतें ॥ २३ ॥
कोणी करिती दीपदान ॥ कोणी करिती तांबूलदान ॥
कोणी अर्पिती उपान दान ॥ छत्रदान ब्राह्मणातें ॥ २४ ॥
कोणी कुंभदान करिती ॥ कोणी अपूपान्नें अर्पिती ॥
घृतपात्रासहित देती ॥ विप्राप्रति सुवर्ण ॥ २५ ॥
ऐसी दानें अर्पून विप्रातें ॥ मग स्वगृहीं ब्राह्मण पंक्तीतें ॥
घेऊन षड्रस अन्नातें ॥ देती विप्रातें भोजन ॥ २६ ॥
ऐसा सारितां नित्य नेमास ॥ संपूर्ण होऊं सरला मास ॥
तव अपूर्व वर्तलें तया समयास ॥ ते सावकाश अवधारा ॥ २७ ॥
सोमशर्मा नामे एक ब्राह्मण ॥ असे तो वेदशास्त्रसंपन्न ॥
नाना तीर्थी तपदान ॥ केलें संपूर्ण ब्राह्मणें तें ॥ २८ ॥
यज्ञदानादि क्रिया सर्वही ॥ जाणता विप्र तो प्रत्यही ॥
स्नानातें जातां एके समयीं ॥ गंगातीरी पावला तो ॥ २९ ॥
मार्गी जातां स्नानासी ॥ तंव एक राक्षस त्यासी ॥
भेटता जाला वाटेसी ॥ अति भयंकर रूपें ॥ ३० ॥
अक्राळ विक्राळ दीर्घ वदन ॥ लंब बाहो विशाळ नयन ॥
धूम्राकार जटापूर्ण ॥ आरक्तवर्ण ओष्ठ पैं ॥ ३१ ॥
स्थूलोदर गर्तेसमान ॥ उंच ग्रीवा हस्तासमान ॥
लिंग त्याचें लंबायमान ॥ सदां नग्न ब्रह्मचारी ॥ ३२ ॥
शुभ्र लव अंगावरुते ॥ तेंही लंबायमान कंटक ते ॥
ऐसें देखून तयातें ॥ विप्र दचकला मानसीं ॥ ३३ ॥
म्हणे हें विघ्न केऊतें आलें ॥ मज भोवतें उभे ठेलें ॥
स्नानालागीं आडवें ठाकलें ॥ पूर्वकर्म माझे आतां ॥ ३४ ॥
मग ह्रदयीं स्मरोन भगवान् ॥ नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण ॥
तेणें भीती गेली निघोन ॥ मग बोले वचन तयासीं ॥ ३५ ॥
आधींच ब्राह्मण दैदीप्यमान ॥ वरी शुचिर्भूत संध्यास्नान ॥
त्यावरी नारसिंह जप पूर्ण ॥ जपे ब्राह्मण आदरें ॥ ३६ ॥
ऐसा विप्र अग्निवत ॥ राक्षस पाहूनि भीत ॥
म्हणे हातो न भिये किंचित ॥ मी तंव क्षुधित पातलों ॥ ३७ ॥
मग म्हणे हो द्विजवर्या ॥ साधु ह्रदय सकोमळ सदया ॥
मी तंव पापिष्ट क्रूर ह्रदया ॥ करी दया दीनबंधो ॥ ३८ ॥
नाना जीव हिंसाधारी ॥ नाना जीव वधिले अघोरी ॥
पाप भोगिलें नानापरी ॥ राक्षस देहधारी पै मी ॥ ३९ ॥
ऐकून तयाचें करुण उत्तर ॥ द्रवलें तेव्हां विप्र अंतर ॥
कोमळ ह्रदय द्विजवर ॥ नवनीता परि असे ॥ ४० ॥
जयाचे ह्रदयीं नाहीं कोमळता ॥ तो विप्रदेह नव्हे तत्वता ॥
असो द्विज राक्षस पाहतां ॥ जाला बोलता पैं त्यासी ॥ ४१ ॥
म्हणे तूं पूर्वी होतास कोण ॥ कोण्या पापास्तव हा देह जाण ॥
प्राप्त जाला तुजलागून ॥ तें करीं श्रवण सर्वही ॥ ४२ ॥
मग राक्षस म्हणे विप्रातें ॥ ऐक माझियां वृत्तांतातें ॥
मी पूर्वी वैश्य धनवंत ॥ असे विख्यात भूमंडळीं ॥ ४३ ॥
नाना वस्तूंचा रक्षक जाण ॥ क्रयविक्रय करीं पूर्ण ॥
गृहीं संपत्तीस नसे न्यून ॥ पुत्रसुना परिवार ॥ ४४ ॥
गाईम्हशी खिल्लारें अपार ॥ हस्ती वाजी शकट थोर ॥
दासदासी अपार ॥ ऐसा परिवार अपरिमित ॥ ४५ ॥
तंव एक अग्निहोत्री ब्राह्मण ॥ सहकुटुंबी सत्पात्र जाण ॥
वेदाध्यायीं असे निपुण ॥ परिपूर्ण धनेसीं ॥ ४६ ॥
तंव तो विप्र शिरोमणी ॥ चालिला महायात्रा लागुनी ॥
तयानें द्रव्य घट भरूनि ॥ ठेविला आणूनी गृहीं माझ्या ॥ ४७ ॥
सुवर्ण नाणें दहा सहस्र जाण ॥ द्रव्य घट भरिला परिपूर्ण ॥
मजपुढे ठेविला आणून ॥ गेला ब्राह्मण वाराणसी ॥ ४८ ॥
सहकुटुंबेसीं विप्र गेला ॥ तिकडेची द्वादश वर्षे त्याला ॥
यात्रा करितां दिवस गेला ॥ तों इकडे स्मरण मजला झालें ॥ ४९ ॥
काहीं कार्या निमित्य तयाचें ॥ मी द्रव्य घट खर्चिला साचें ॥
तो विप्र यात्रा करून साचें ॥ परतोनि आला माघारी ॥ ५० ॥
यात्रा करून संपूर्ण ॥ द्रव्य घट मागे मजलागुन ॥
तंव अडचणीस्तव जाण ॥ नाहीं म्हणोन बोलिलों मी ॥ ५१ ॥
तूं द्रव्य आणून ठेविलें कधी ॥ यातें साक्ष कोणती दावीं आधीं ॥
आमुचें घर घेतो हा मंदबुद्धी ॥ मिळाली मांदी जनाची ॥ ५२ ॥
वेव्हारी गेला राजद्वारीं ॥ जो तो ब्राह्मणातें धिक्कारी ॥
म्हणती हा जन्मदरिद्री ॥ द्रव्य कैचें पदरी याच्या ॥ ५३ ॥
ऐसा न्याय तेथें जाला ॥ द्रव्य घट म्यां अभिलाषिला ॥
देखत देखत ग्रासिला ॥ पातक गोळा धन लोभे ॥ ५४ ॥
मग तो विप्र तळमळत गेला ॥ तळतळोनी मज शाप दिधला ॥
म्हणे पापिष्टा चांडाळा ॥ अभिलाषिला द्रव्य घट ॥ ५५ ॥
पृथ्वी तेज वायु आकाश ॥ तुज मज साक्ष आहे चंडांश ॥
तरी शाप घेई निःशेष ॥ होई ब्रह्म राक्षस पै आतां ॥ ५६ ॥
माझें वचन असत्य होईल ॥ तरीं माझी यात्रा निर्फळ हो सकळ ॥
ऐसा बोलिला करून तळमळ ॥ विप्रें प्राण त्यागिला ॥ ५७ ॥
धनलोभें मेला द्विजवर ॥ मी राक्षस जालों साचार ॥
ऐसा माझा प्रकार ॥ जाला साचार द्विजवरा ॥ ५८ ॥
परक्याचे द्रव्य अभिलाषिलें ॥ तें आप्तवर्ग खाऊन गेलें ॥
शेवटीं मज व्यसन प्राप्त झालें ॥ भोगणें लागलें दैत्यदशे ॥ ५९ ॥
यालागीं दुसर्‍याचें अभिलाषितां ॥ सौख्य नाहीं तत्वतां ॥
शेवटीं भोगणें लागे अवस्था ॥ न सुटे सर्वथा निर्धारें ॥ ६० ॥
आतां प्रार्थना ऐका ॥ परोपकार करी निका ॥
मज धाडी परलोका ॥ तारक नौका तूं होई ॥ ६१ ॥
ऐसें म्हणतां ते क्षणी ॥ द्विज बोले प्रसादवाणी ॥
म्हणे मलमास स्नानदानीं ॥ मास एक नेम केला ॥ ६२ ॥
तया मी सप्तदिनाचें ॥ उदक तूं तें अर्पितों साचें ॥
तें पुण्य प्राप्त होईल नेमाचें ॥ घडो त्याचें फळ तुजलागीं ॥ ६३ ॥
ऐसें वदोन तये वेळीं ॥ उदक भरलेंसे अंजुळीं ॥
म्हणे तुज सुफळी हो तात्काळीं ॥ होऊ उद्धार ये वेळीं ॥ ६४ ॥
वदोन घातलें उदक ॥ तंव नवल वर्तले एक ॥
विमान आलें तात्काळीक ॥ अति लखलखीत तेजस्वी ॥ ६५ ॥
माजी बैसले विष्णुदूत पाहीं ॥ राक्षस केला दिव्यदेही ॥
तात्काळ विमानीं बैसविला तोही ॥ उद्धरोनि नेला वैकुंठा ॥ ६६ ॥
तंव तो राक्षस जाणा ॥ स्तविता जाला विप्रराणा ॥
वारंवार लागे चरणा ॥ केली उद्धरणा दयानिधे ॥ ६७ ॥
जयजयाजी विप्रमूर्ती ॥ अगाध अनुपम्य तुझी कीर्ती ॥
पुण्य वेचून मजप्रती ॥ गुरुमूर्ति उद्धरिले ॥ ६८ ॥
ऐसा स्तुति वाद करूनी ॥ तात्काळ गेला विष्णुभुवनी ॥
ऐसें मलमाहात्म कथनीं ॥ घातले श्रवणी श्रोतियांचे ॥ ६९ ॥
म्हणोन मलमहात्म अगाध थोर ॥ भावें आचरो नारीनर ॥
करा आपुल्या जन्माचा उद्धार ॥ विनवी किंकर संताचा ॥ ७० ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ विंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २० ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्याः ॥ ७० ॥ श्लोक २ ॥
॥ इति विशंतितमोऽध्यायः ॥

Explore More