Lord Shiva

श्री शिवलीलामृत अध्याय 5

(Shri Shiv Leelamrut Adhyay 5)

Shridhar Swami Nazarekar

Also known as Shiv Leelamrut · Shiv Leelamrut adhyay 5 · Shri Shiv Leelamruta

Shri Shiv Leelamrut Adhyay 5. Shri Shiv Leelamrut, Shridhar Swami Nazarekar's Marathi retelling of the leelas of Shiva drawn from the Skanda and Shiva Puranas. The eleventh adhyay, with the story of the Brahmin boy and the Shiva linga, is read on its own through the month of Shravan in Maharashtrian households.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 124
श्रीगणेशाय नमः ॥
सदाशिव अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
जो नित्य शिवार्चन करी । तो उद्धरी बहुता जीवा ॥ 1 ॥
बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार । शास्त्रवक्ते करिती विचार ।
परी जे शिवनामे शुद्ध साचार । कासया इतर साधने त्या ॥ 2 ॥
नामाचा महिमा परमाद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत ।
त्यासी सर्वसिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ 3 ॥
तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन । संतति संपत्ति दिव्य ज्ञान ।
पाहिजे तिही प्रदोषव्रत पूर्ण । यथासांग करावे ॥ 4 ॥
प्रदोषव्रत भावे आचरता । या जन्मी प्रचीत पहावी तत्त्वता ।
दारिद्रय आणि महद्‌व्यथा । निःशेष पळती षण्मासांत ॥ 5 ॥
एक संवत्सरे होय ज्ञान । द्वादशवर्षी महद्‌भाग्य पूर्ण ।
हे जो असत्य मानील व्यासवचन । त्यासी बंधन कल्पांतवरी ॥ 6 ॥
त्याचा गुरु लटिकाच जाण । त्याची दांभिक भक्ति लटिकेच ज्ञान ।
उमावल्लभचरणी ज्याचे मन । त्याहून पावन कोणी नाही ॥ 7 ॥
मृत्यु गंडांतरे दारुण । प्रदोषव्रते जाती निरसोन ।
येविषयी इतिहास जाण । सूत सांगे शौनकादिका ॥ 8 ॥
विदर्भदेशीचा भूभुज । सत्यरथनामे तेजःपुंज ।
सर्वधर्मरत पराक्रमी सहज । बंदीजन वर्णिती सदा ॥ 9 ॥
बहुत दिवस राज्य करीत । परी शिवभजनी नाही रत ।
त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ । बळे आला चालूनिया ॥ 10 ॥
आणिक त्याचे आप्त । क्षोणीपाल साह्य झाले बहुत ।
सप्त दिवसपर्यंत । युद्ध अद्भुत जाहले ॥ 11 ॥
हा एकला ते बहुत । समरभूमीसी सत्यरथ ।
धारातीर्थी पावला मृत्यु । शत्रु नगरात प्रवेशले ॥ 12 ॥
राजपत्नी गरोदर राजस । पूर्ण झाले नवमास ।
एकलीच पायी पळता वनवास । थोर अनर्थ ओढवला ॥ 13 ॥
परम सुकुमार लावण्यहरिणी । कंटक-सराटे रुतती चरणी ।
मूर्च्छना येऊनि पडे धरणी । उठोनि पाहे मागेपुढे ॥ 14 ॥
शत्रु धरितील अकस्मात । म्हणोनि पुढती उठोनि पळत ।
किंवा ते विद्युल्लता फिरत । अवनीवरी वाटतसे ॥ 15 ॥
वस्त्रे अलंकार-मंडित । हिर्‍यांऐसे दंत झळकत ।
जिचा मुखेंदु देखता रतिकांत । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ 16 ॥
पाहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ।
ते गरोदर हिंडे विपिन । मृगनेत्री गजगामिनी ॥ 17 ॥
वनी हिंडे महासती । जेवी नैषधरायाची दमयंती ।
की भिल्लीरूपे हैमवती । दुस्तरवनी तैसी हिंडे ॥ 18 ॥
कर्म-नदीच्या प्रवाही जाण । पडली तीस काढील कोण ।
असो एका वृक्षाखाली येऊन । परम व्याकुळ पडियेली ॥ 19 ॥
शतांची शते दासी । ओठंगती सदैव जियेपासी ।
इंदुमती नाम जियेसी । ते भूमीवरी लोळत ॥ 20 ॥
चहुंकडे पाहे दीनवदनी । जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी ।
तो प्रसूत झाली तेच क्षणी । दिव्य पुत्र जन्मला ॥ 21 ॥
तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ ।
बाळ टाकून उठत बसत । गेली एका सरोवरा ॥ 22 ॥
उदकात प्रवेशली तेच क्षणी । अंजुळी भरोनि घेतले पाणी ।
तव ग्राहे नेली ओढोनी । विदारुनी भक्षिली ॥ 23 ॥
घोर कर्माचे विंदान । वनी एकला रडे राजनंदन ।
तव उमानामक विप्रपत्नी जाण । विगतधवा पातली ॥ 24 ॥
माता पिता बंधु पाही । तियेलागी कोणी नाही ।
एक वर्षाचा पुत्र तीसही । कडिये घेवोनि आली तेथे ॥ 25 ॥
तो नाही केले नालच्छेदन । ऐसे बाळ उमा देखोन ।
म्हणे आहा रे ऐसे पुत्ररत्न । कोणी टाकिले दुस्तर वनी ॥ 26 ॥
म्हणे कोण याती कोण वर्ण । मी कैसे नेऊ उचलून ।
जावे जरी टाकून । वृक व्याघ्र भक्षितील की ॥ 27 ॥
स्तनी दाटून फुटला पान्हा । नेत्री ढाळीत अश्रुजीवना ।
बाळ पुढे घेऊनि ते ललना । मुखकमळी स्तन लावी ॥ 28 ॥
संशयसमुद्री पडली वेल्हाळ । म्हणे नेऊ की नको बाळ ।
तव तो कृपाळू पयःफेनधवल । यतिरूप धरूनि पातला ॥ 29 ॥
उमेलागी म्हणे त्रिपुरारी । बाळ नेई संशय न धरी ।
महद्‌भाग्य तुझे सुंदरी । क्षत्रिय राजपुत्र तुज सापडला ॥ 30 ॥
कोणासी न सांगे हे मात । समान पाळी दोघे सुत ।
भणंगासी परीस होय प्राप्त । तैसे तुज जाहले ॥ 31 ॥
अकस्मात निधि जोडत । की चिंतामणि पुढे येऊनि पडत ।
की मृताच्या मुखात । पडे अमृत पूर्वदत्ते ॥ 32 ॥
ऐसे बोलोनि त्रिपुरारी । गुप्त झाला ते अवसरी ।
मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी । देशग्रामांतरी हिंडत ॥ 33 ॥
ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत । राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त ।
घरोघरी भिक्षा मागत । कडिये खांदी घेऊनिया ॥ 34 ॥
लोक पुसता उमा सांगत । माझे पोटीचे दोघे सुत ।
ऐसी हिंडत हिंडत । एकचक्रनगरा पातली ॥ 35 ॥
घरोघरी भिक्षा मागत । तो शिवालय देखिले अकस्मात ।
आत द्विज दाटले बहुत । शांडिल्य त्यात मुख्य ऋषि ॥ 36 ॥
शिवाराधना करिती विधियुक्त । तो उमा आली शिवालयात ।
क्षण एक पूजा विलोकीत । तो शांडिल्य ऋषि बोलिला ॥ 37 ॥
अहा कर्म कैसे गहन । हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ।
कैसे विचित्र प्राक्तन । उमा वचन ऐकती जाहली ॥ 38 ॥
ऋषीचे चरण उमा धरीत । म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ।
त्रिकालज्ञानी महासमर्थ । भूतभविष्यज्ञान तुम्हा ॥ 39 ॥
याची मातापिता कोण । आहेत की पावली मरण ।
यावरी शांडिल्य सांगे बर्तमान । याचा पिता जाण सत्यरथ ॥ 40 ॥
तो पूर्वी होता नृप जाण । प्रदोषसमयी करी शिवार्चन ।
तो शत्रु आले चहूकडोन । नगर त्याचे बेढिले ॥ 41 ॥
शत्रूची गजबज ऐकून । उठिला तैसीच पूजा सांडोन ।
तव प्रधान आला पुढे धावोन । शत्रू धरोनि आणिले ॥ 42 ॥
त्यांचा शिरच्छेद करून । पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे ।
तैसाच जाऊनि करी भोजन । नाही स्मरण विषयांधा ॥ 43 ॥
त्याकरिता या जन्मी जाण । सत्यरथ अल्पायुषी होऊन ।
अल्पवयात गेला मरोन । म्हणोनि पूजन न सोडावे ॥ 44 ॥
याच्या मातेने सवत मारिली । ती जळी विवशी झाली ।
पूर्व वैरे वोढोनि नेली । क्रोधे भक्षिली विदारुनी ॥ 45 ॥
हा राजपुत्र धर्मगुप्त । याणे काहीच केले नाही शिवव्रत ।
म्हणोनि मातापितारहित । अरण्यात पडियेला ॥ 46 ॥
याकरिता प्रदोषकाळी । अव्यग्र पूजावा इंदुमौळी ।
पूजन सांडूनि कदाकाळी । सर्वथाही न उठावे ॥ 47 ॥
भवानीस बैसवूनि कैलासनाथ । प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत ।
वाग्देवी वीणा वाजवीत । वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥ 48 ॥
अंबुजसंभव ताल सावरी । भार्गवी गातसे मधुरस्वरी ।
मृदंग वाजवी मधुकैटभारी । नृत्यगती पाहूनिया ॥ 49 ॥
यक्षपति शिवप्राणमित्र । हस्त जोडोनि उभा समोर ।
यक्षगण गंधर्व किन्नर । सुरासुर उभे असती ॥ 50 ॥
ऐसा प्रदोषकाळीचा महिमा । अगोचर निगमांगमां ।
मग काय बोले उमा । मम पुत्र दरिद्री का झाला ॥ 51 ॥
तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत । पूर्वी घेतले दुष्ट अमित ।
दान केले नाही किंचित । शिवार्चन न करी कदा ॥ 52 ॥
परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ । दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त ।
स्त्रीअभिलाषे नेत्र दग्ध होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैचे ॥ 53 ॥
मग उमेने पुत्र दोन्ही । घातले ऋषीचे चरणी ।
तेणे पंचाक्षर मंत्र उपदेशुनी । प्रदोषव्रत उपदेशिले ॥ 54 ॥
पक्षप्रदोष शनिप्रदोष । महिमा वर्णिला अतिविशेष ।
निराहार असावे त्रयोदशीस । दिवसा सत्कर्म आचरावे ॥ 55 ॥
तीन घटिका झालिया रजनी । प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ।
गोमये भूमि सारवूनी । दिव्य मंडप उभारिजे ॥ 56 ॥
चित्रविचित्र वितान । कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून ।
मंडप कीजे शोभायमान । रंगमाळा नानापरी ॥ 57 ॥
शुभ वस्त्र नेसावे आपण । शुभ्र गंधं सुवाससुमन ।
मग शिवलिंग स्थापून । पूजा करावी विधियुक्त ॥ 58 ॥
प्राणायाम करून देखा । अंतर्बाह्य न्यास मातृका ।
दक्षिणभागी पूजावे मुरांतका । सव्यभागी अग्नि तो ॥ 59 ॥
वीरभद्र गजानन । अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण ।
अष्ट दिक्पालपूजन । सप्तावरणी शिवपूजा ॥ 60 ॥
यथासांग शिवध्यान । मग करावे पूजन ।
राजोपचारे सर्व समर्पून । करावे स्तवन शिवाचे ॥ 61 ॥
जय जय गौरीनाथ निर्मळ । जय जय कोटिचंद्र सुशीतळ ।
सच्चिदानंदघन अढळ । पूर्णब्रह्म सनातन ॥ 62 ॥
ऐसे प्रदोषव्रत ऐकवून । बाळ उपदेशिले दोघेजण ।
मग ते एकमनेकरून । राहते झाले एकचक्री ॥ 63 ॥
चार महिनेपर्यंत । दोघेही आचरती प्रदोषव्रत ।
गुरुवचने यथार्थ । शिवपूजन करिती पै ॥ 64 ॥
शिवपूजा न द्यावी सर्वथा । न द्यावे प्रसादतीर्था ।
शत ब्रह्महत्यांचे पाप माथा । होय सांगता शांडिल्य ॥ 65 ॥
सर्व पापाहून पाप थोर । शिवपूजेचा अपहार ।
असो ते दोघे किशोर । सदा सादर शिवभजनी ॥ 66 ॥
ब्रह्मपुत्र शुचिव्रत । एकला नदीतीरी क्रीडत ।
दरडी ढासळता अकस्मात । द्रव्यघट सापडला ॥ 67 ॥
घरासी आला घेऊन । माता संतोषली देखोन ।
म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण । ऐश्वर्य चढत चालिले ॥ 68 ॥
राजपुत्रास म्हणे ते समयी । अर्ध द्रव्यविभाग घेई ।
येरू म्हणे सहसाही । विभाग न घेई अग्रजा ॥ 69 ॥
या अवनीतील धन । आमुचेच आहे संपूर्ण ।
असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण । न विसरती कदाही ॥ 70 ॥
यावरी एकदा दोघे जण । गेले वनविहारालागून ।
तो गंधर्वकन्या येऊन । क्रीडता दृष्टी देखिल्या ॥ 71 ॥
दोघे पाहती दुरूनी । परम सुंदर लावण्यखाणी ।
शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागोनी । परदारा नयनी न पहाव्या ॥ 72 ॥
दर्शने हरती चित्त । स्पर्शने बळ वीर्य हरीत ।
कौटिल्यदंभसंयुक्त । महाअनर्थकारिणी ॥ 73 ॥
ब्रह्मसुतास तेथे ठेवून । राजपुत्र चालिला सुलक्षण ।
स्वरूप सुंदर मन्मथाहून । आकर्णनयन कोमलांग ॥ 74 ॥
जवळी येवोनि पाहात । तव मुख्य नायिका विराजित ।
अंशुमती नामे विख्यात । गंधर्वकन्या पद्मिनी ॥ 75 ॥
कोद्रविणनामा गंधर्वपति । त्याची कन्या अंशुमती ।
पिता पुसे महेशाप्रती । हे कन्या अर्पू कोणाते ॥ 76 ॥
मग बोले हिमनगजामात । धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ।
तो माझा परम भक्त । त्यासी देई अंशुमती ॥ 77 ॥
हे पूर्वीचे शिववचन । असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ।
न्याहाळीत राजनंदन । वाटे पंचबाण दुसरा ॥ 78 ॥
क्षीरसिंधूत रोहिणीरमण । काय आला कलंक धुवोन ।
तैसे राजपुत्राचे वदन । अंशुमती न्याहाळी ॥ 79 ॥
बत्तीसलक्षणसंयुक्त । आजानुबाहू चापशरमंडित ।
विशाळ वक्षःस्थळ चालत । करिनायक ज्यापरी ॥ 80 ॥
ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित । अंशुमती सखयांप्रती सांगत ।
तुम्ही दुज्या वनाप्रती जाऊनि समस्त । सुमने आणावी सुवासे ॥ 81 ॥
अवश्य म्हणोनि त्या ललना । जात्या झाल्या आणिका वना ।
अंशुमती एकली जाणा । राजपुत्रा खुणावीत ॥ 82 ॥
भूरुहपल्लव पसरून । एकांती घातले आसन ।
वरी वृक्षडाहाळिया भेदून । भूमीवरी पसरल्या ॥ 83 ॥
असो तेथे बैसला येऊन । राजपुत्र सुहास्यवदन ।
विशाळभाळ आकर्णनयन । आरक्त ओष्ठ सुकुमार ॥ 84 ॥
मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणी । विंधिली ते लावण्यहरिणी ।
मनोज मूर्च्छना सांवरूनी । वर्तमान पुसे तयाते ॥ 85 ॥
श्रृंगारसरोवरा तुजपासी । मी वास करीन राजहंसी ।
देखता तव वदन दिव्यशशी । मम मानसचकोर नृत्य करी ॥ 86 ॥
तब मुखाब्ज़ देखता आनंद । झेपावती मम नेत्रमिलिंद ।
की तब वचन गर्जता अंबुद । मम चित्तशिखी नृत्य करी ॥ 87 ॥
कविगुरूहूनी तेज विशाळ । आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ ।
कंठी सूदली तत्काळ । चरणी भाळ ठेवीत ॥ 88 ॥
म्हणे मी कायावाचामनेकरून । तुझी ललना झाले पूर्ण ।
यावरी धर्मगुप्त वचन । काय बोलता जाहला ॥ 89 ॥
मी जनकजननीविरहित । राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत ।
तव पित्यासी कळता मात । घडे कैसे वरानने ॥ 90 ॥
यावरी म्हणे अंशुमती । तीन दिवसा येईन या स्थळाप्रती ।
तुम्ही यावे शीघ्रगती । लग्नसिद्धि साधावया ॥ 91 ॥
ऐसे बोलून ते चातुर्यराशी । वेगे आली पितयापाशी ।
झाले वर्तमान सांगे त्यासी । तो परम मानसी संतोषला ॥ 92 ॥
राजपुत्र गेला परतोन । बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान ।
शांडिल्यगुरूचे वचन स्मरून । म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥ 93 ॥
गुरुचरणी ज्याचे मन । त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून ।
काळमृत्यूभयापासून । सर्वदा रक्षी देशिक तो ॥ 94 ॥
यावरी ते दोघे बंधु येऊन । मातेसी सांगती वर्तमान ।
येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन । फळ देत चालिले ॥ 95 ॥
यावरी तिसरे दिवशी । दोघेही गेले त्या वनासी ।
गंधर्वराज सहपरिवारेसी । सर्व सामग्री घेऊन आला ॥ 96 ॥
दृष्टी देखता जामात । गंधर्व आनंदसमुद्री पोहत ।
छत्र सेना सुखासन त्वरित । धाडूनि उमा आणविली ॥ 97 ॥
यावरी यथासांग लग्न । चारी दिवस झाले पूर्ण ।
काही एक पदार्थ न्यून । पडिला नाही तेधवा ॥ 98 ॥
स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज । विहिणीस देत गंधर्वराज ।
लक्ष रथ दहा सहस्र गज । तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥ 99 ॥
एक लक्ष दासदासी । अक्षय कोश रत्नराशी ।
अक्षय भाते देत शक्तीसी । दिव्य चाप बहुसाल ॥ 100 ॥
अपार सेना संगे देत । एक सेनापति गंधर्व बळिवंत ।
उमा दोघा पुत्रांसमवेत । मान देवोनि बोळविली ॥ 101 ॥
सुखासनारूढ अंशुमती । पतीसवे चालिली शीघ्रगती ।
कनकवेत्रपाणी पुढे धावती । वाहनासवे जियेच्या ॥ 102 ॥
चतुर्विध वाद्यांचे गजर । चतुरंग चालिला दळभार ।
येऊन वेढिले विदर्भनगर । सत्यरथपितयाचे ॥ 103 ॥
नगरदुर्गावरून अपार । उल्हाटयंत्रांचा होत भडिमार ।
परी गंधर्वांचे बळ फार । घेतले नगर क्षणार्धे ॥ 104 ॥
जेणे पूर्वी पिता मारिला जाण । त्याचे नाम दुर्मर्षण ।
तो जिताचि धरूनि जाण । आपला करून सोडिला ॥ 105 ॥
देशोदेशीचे प्रजाजन । धावती करभार घेऊन ।
उत्तम मुहूर्त पाहून । सिंहासनारूढ जाहला ॥ 106 ॥
माता उमा बंधु शुचिव्रत । त्यासमवेत राज्य करीत ।
दहा सहस्र वर्षेपर्यंत । यशवंत राज्य केले ॥ 107 ॥
शांडिल्य गुरु आणून । शतपद्म अर्पिले धन ।
रत्नाभिषेक करून । अलंकार वस्त्र दीधली ॥ 108 ॥
दौर्भिक्ष जळशोष अवर्षण । आधि व्याधि वैधव्य मरण ।
दुःख शोक कलह विघ्न । राज्यातून पळाली ॥ 109 ॥
प्रजा भूदेव दायाद । देती रायासी आशीर्वाद ।
कोणासही नाही खेद । सदा आनंद घरोघरी ॥ 110 ॥
ऐसा अंशुमतीसमवेत । धर्मगुप्त राज्य करीत ।
यौवराज्य शुचिव्रताते देत । पारिपत्य सर्व करी ॥ 111 ॥
ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करून । सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ।
चिंतिता मनी उमाधवचरण । दिव्य विमान धाडिले ॥ 112 ॥
दिव्य देह पावोनि नृपती । माता-बंधूंसमवेत अंशुमती ।
शिवविमानी बैसती । करीत स्तुति शिवाची ॥ 113 ॥
कैलासपदासी जाऊन । जगदात्मा शिव विलोकून ।
जयजयकार करून । लोटांगणे घालिती ॥ 114 ॥
दीनबंधु जगन्नाथ । पतित पावन कृपावंत ।
हृदयी धरूनि समस्त । अक्षयपदी स्थापिली ॥ 115 ॥
हे धर्मगुप्ताचे आख्यान । करिती जे श्रवण पठण ।
लेखन रक्षण अनुमोदन । तरी पंचवदन रक्षी तया ॥ 116 ॥
सकळ पापांचा होय क्षय । जेथे जाय तेथे विजय ।
धनधान्यवृद्धि होय । ऋण जाय निरसूनी ॥ 117 ॥
प्रदोषमहिमा अद्भुत । जे आचरती ऐकूनि ग्रंथ ।
तेथे कैचे दारिद्रय मृत्य । सत्य सत्य त्रिवाचा ॥ 118 ॥
ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ । त्याची शिव पाठी राखीत ।
सदा हिंडे उमाकांत । अंती शिवपद प्राप्त तया ॥ 119 ॥
हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस । पद्यरचनाफळे आली पाडास ।
कुतर्कवादी जे वायस । मुखरोग त्यास नावडे ॥ 120 ॥
जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा । श्रीधरवरदा सर्वसाक्षा ।
दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा । न येसी लक्षा निगमागमां ॥ 121 ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । पंचमाध्याय गोड हा ॥ 122 ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Explore More