Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 13

(Purushottam Maas Katha Adhyay 13)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 13

Purushottam Maas Katha Adhyay 13. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 215
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
जयश्री सर्वोत्तम वासुदेवा ॥ दामोदरा अनंता केशवा ॥
क्षीराब्धिजामाता रमाधवा ॥ देवाधिदेवा दयानिधे ॥ १ ॥
तव चरणसरोजीं प्रेमा ॥ अखंड देई सर्वोत्तमा ॥
नाम वदायाची सीमा ॥ शेषातेंही गती नव्हे पै ॥ २ ॥
तेथें मी अल्पमती पामर ॥ वदेन म्हणतों स्तुतिउत्तर ॥
एक जिव्हेचा प्रसर ॥ केवि विस्तार साहों शके ॥ ३ ॥
परी आत्मसार्थक करावें कांहीं ॥ म्हणोन आरंभिलीसे नवाई ॥
कृपाळुत्वें शेवटास न्यावी ॥ हेची परिसावी विज्ञापना ॥ ४ ॥
मी नेणें जपतपसाधन कांहीं ॥ दानधर्म व्रतें उद्यापनें पाहीं ॥
करावयातें धनही नाहीं ॥ गृहीं संग्रहीं तूं जाणता ॥ ५ ॥
निशिदिनीं संसाराची हळ ॥ सदां चित्तीं वाटे तळमळ ॥
तेणें न गमेची काळवेळ ॥ म्हणोनिया खेळ आरंभिला ॥ ६ ॥
तरी कृपा करूनि रमारंगें ॥ न्यून तें पूर्ण करावें अंगें ॥
रसोत्पती रसवेगें ॥ जीवन घाली दयाळुवा ॥ ७ ॥
समर्थे मुक्ताफळाची लाखोली ॥ वाहतां हरुष ह्रदयकमळीं ॥
दरिद्रें तुळसीदळें समर्पिलीं ॥ तरी का न स्वीकारा स्वामियां ॥ ८ ॥
श्रीमानें नैवेद्य पक्वान्न ॥ अर्पिता तोषलें मन ॥
दरिद्रियाचें किंचित कदान्न ॥ काय अव्हेरून सांडावें ॥ ९ ॥
तैसे थोर थोरांनीं प्रबंध केले ॥ नानापरीं गीतीं आळविले ॥
तयाचे लळे पुरविले ॥ मज अव्हेरितां भलें नोहे कीं ॥ १० ॥
असो कृपा कराल श्रीहरी ॥ तरीच वदेल वैखरी ॥
सरस्वती बैसे जिव्हाग्रीं ॥ मनतुरंगीं आत्माराम ॥ ११ ॥
ऐकां संत श्रोते सज्जन ॥ पांचा पर्वाचा केला प्रश्न ॥
तया माजी चार संपूर्ण ॥ मागें निवेदन जालेंसे ॥ १२ ॥
व्यतीपात वैधृती पाहीं ॥ पूर्णिमा अमावास्याही ॥
ऐसीं पर्वे चार पाहीं ॥ केलें सर्वही कथन पै ॥ १३ ॥
आतां पांचवें पर्व तें कवण ॥ तयाचें ऐकावें निरोपण ॥
लक्ष्मीप्रती नारायण ॥ सांगता जाहलासे ॥ १४ ॥
लक्ष्मी रुवाच ॥
पुरुषोत्तम ह्रषीकेश ॥
भक्तिप्रिय दयानिधे द्वादश्याश्वैध ॥
माहात्म्यं वद लोकहितायच ॥ १ ॥
लक्ष्मी वदे जी पुरुषोत्तमा ॥ भक्तकामकल्प द्रुमा ॥
मागें निवेदिला महिमा ॥ पूर्णिमा अमावास्या ते ॥ १५ ॥
उपरी पर्व राहिलेंसे एक ॥ तेंही परिसावें नावेक ॥
व्रतामाजी श्रेष्ठता अनेक ॥ कैसेनि देख स्वामीयां ॥ १६ ॥
तरी कृपा करुनि समग्र ॥ लोकहितार्थ वदावें साचार ॥
जे ऐकतां जडमूढउद्धार ॥ तात्काळिक होय पै ॥ १७ ॥
श्रीकृष्ण उवाच॥
श्रृणु देवि प्रवक्ष्यामि द्वादशीफलमुत्तमं ॥
मलमासें विशेषेण मुनिभिर्भाषितं पुरा ॥ २ ॥
विष्णु बोलते झाले उत्तर ॥ एक क्षीराब्धिजे सादर ॥
पर्वामाजी पर्व थोर ॥ विशेष सत्कार द्वादशीं ॥ १८ ॥
तयामाजी मलमास ॥ पातल्या विशेषाविशेष ॥
आदरें आचरलिया व्रतास ॥ तुटें पाश यमाचा ॥ १९ ॥
हें ऐकतां महिमान ॥ पापें भस्म होती जाण ॥
यदर्थी नसे अनुमान ॥ सावधान परिसावें ॥ २० ॥
समग्र तीर्थांची गर्जना तोंवरी ॥ संपूर्ण यज्ञक्रिया बरी ॥
अवघीहीं पर्वे पृथ्वीवरी ॥ न पवतीसरी द्वादशीतें ॥ २१ ॥
संपूर्ण पर्वाचें फळ पाहीं ॥ न तुळे द्वादशीचें ठायीं ॥
काय सांगो तेथीची नव्हाई ॥ मी शेषशायी वदतसें ॥ २२ ॥
यज्ञ केलियाचें फळ ॥ अथवा प्रयागीं स्नान गंगाजळ ॥
तेथींचा कल्पवास प्रबळ ॥ सेविला सर्वकाळ आदरें ॥ २३ ॥
तरीं द्वादशीतें तुळणा नाहीं ॥ शास्त्र देती याची ग्वाही ॥
प्रत्ययो घेइजे स्वदेहीं ॥ केलिया पाहीं व्रताते ॥ २४ ॥
उपोषण एकादशी दिने ॥ द्वादशींत कीजे पारणें ॥
ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने ॥ आणीक दानें नानाविध ॥ २५ ॥
आणीक करावें पिंडदान ॥ श्राद्धतिथी असो नसो जाण ॥
परि अगत्य कीजे श्राद्धसाधन ॥ घडे पुण्य कोटीगुणें ॥ २६ ॥
हें तव त्रिरात्रीचें व्रत ॥ दशमीपासोन द्वादशीयुक्त ॥
तिन्ही देवता मूर्तिमंत ॥ वसताती तेथें निश्चयीं ॥ २७ ॥
दशमीते दैवत चतुरानन ॥ एकादशी गिरिजारमण ॥
द्वादशीतें विष्णु आपण ॥ वास्तव्य स्थान त्रिवर्गी ॥ २८ ॥
दशमीतें दृश्य दोष त्यागावे ॥ एकादशीं वर्जावे ॥
द्वादश द्वादशी तें बरवे ॥ आधीं त्यागावे शास्त्राधारे ॥ २९ ॥
परान्न गृहान्न उष्णोदक ॥ सर्व स्नेह खट्‌वांग देख ॥
लवण ताबूल स्त्रीसंग सुखदुःख ॥ एकभुक्त दशमीते ॥ ३० ॥
ऐसें एकादशी दिनीं ॥ एक अधिकतये स्थानीं ॥
अन्न न स्वीकारावे जनीं ॥ एकादशी म्हणून बोलिजे ॥ ३१ ॥
आता द्वादशीते वर्ज कीजे ॥ दिवा निद्रा न सेविजे ॥
शास्त्राधार बोलिजे ॥ ऐके क्षीराब्धीतनये ॥ ३२ ॥
ऐसे विधियुक्त एकादशी ॥ व्रत कीजे सायासेंसी ॥
वरी साधनद्वादशी ॥ ब्राह्मणेसी विधियुक्त ॥ ३३ ॥
त्याहीवरी केलिया पिंडदान ॥ ते तंव विशेषाहून विशेष जाण ॥
तेणे केले गयावर्जन ॥ पितृउद्धारण कुळाशी ॥ ३४ ॥
तुळसीपत्रासमान ॥ अर्पिला जरी पिंड जाण ॥
तरी ते मज मेरूसमान ॥ वदे नारायण स्वमुखे ॥ ३५ ॥
कृता यज्ञाखिलास्तेन गयायां पिंडपातनं ॥
अहो धन्याश्चते धन्या येषां बुद्धिर्हरेर्दिने ॥ ३ ॥
तुळशीपत्रमिश्रानं मक्षिकापादमात्रकं ॥
द्वादशां ब्राह्मणेदत्तं तदन्नं मेरुतां व्रजेत ॥ ४ ॥
मलमासाची द्वादशी ॥ जरी उपोषण घडे ते दिवशीं ॥
तया ऐसा पुण्यराशी ॥ दुजा आन असेना ॥ ३६ ॥
जन्मांतर सहस्रेन ॥ तयाने जिंकिलेसे जाण ॥
वरी ब्राह्मण संतर्पण ॥ पूजाविधान यथोचित ॥ ३७ ॥
ऐसें व्रत भावें आचरतां ॥ यमरावो वोढवी माथा ॥
तया दुरिताची वार्ता ॥ बोलो नयेचि राजसे ॥ ३८ ॥
तये दिनीं ब्राह्मणालागून ॥ जरी वस्त्र करविले परिधान ॥
तरी कल्पपर्यंत स्वर्गभोग जाण ॥ तयालागून प्राप्त होय ॥ ३९ ॥
विष्णुमाधवप्रीत्यर्थ ॥ जरीं आचरेल हे व्रत ॥
ब्राह्मणभोजन यथार्थ ॥ विष्णुप्रीत्यर्थ द्वादशीसी ॥ ४० ॥
सुवर्णदान सहस्रदान ॥ रौप्यदान उपानहदान ॥
छत्रासहीत पादुकादान ॥ पुरुषोत्तमा अर्पण कीजे ॥ ४१ ॥
घृतदान घृतपाचित पक्वान्न ॥ त्रयोदशगुणी तांबूल दान ॥
गंधपुष्प सुदान ॥ कीजे अर्पण यथाविधीं ॥ ४२ ॥
इतुके दान केलिया पाहीं ॥ वैकुंठवास तयातें होई ॥
मलमास द्वादशीठायीं ॥ शेषशायीं संतुष्टे ॥ ४३ ॥
यथाऋतुकाळे फळे ॥ कर्दळी फळें नारीकेळे ॥
खर्जूरी लवंगा पूगीफलें ॥ जायफळादी आदरें ॥ ४४ ॥
कपिला गोदानें नेमस्त ॥ महिदान अश्वासहित ॥
गजअजादी रथगणीत ॥ अर्पणकीजे द्विजातें ॥ ४५ ॥
इतुकीं दानें सांगितलीं देख ॥ परी घृतदानाचें महात्म अधिक ॥
मलमास पर्वणी आवश्यक ॥ कीजे देख यथाविधी ॥ ४६ ॥
कांस्यपात्रीं घालूनियां घृत ॥ सुवर्णप्रतिमासंयुक्त ॥
पूजा करूनि नेमस्त ॥ दीजे दान विप्रालागीं ॥ ४७ ॥
त्याही वरी घृतपाचिक पक्वान्न ॥ तेंही कांस्यपात्रीं घालून ॥
घृतासहीत पूजा करून ॥ ब्राह्मणाकरीं अर्पिजे ॥ ४८ ॥
संख्या तयाची त्रीणि दशक ॥ वरी त्रीणि अधीक देख ॥
ऐसें करूनियां आवश्यक ॥ दीजे सम्यक विप्रांतें ॥ ४९ ॥
साक्षर विप्रालागीं बरवें ॥ पूजा करूनि वस्त्र द्यावें ॥
वरी दक्षिणेसहीत दान अर्पावें ॥ तेणें पावे स्वर्गवासु ॥ ५० ॥
द्वादशी ऐसें दुजें पर्व ॥ काशी ऐसें क्षेत्र अपूर्व ॥
तीर्थामाजी विशेष गौरव ॥ प्रयागराज जाणिजे ॥ ५१ ॥
द्वादशीं केलिया अन्नदानें ॥ कोटिकुळें उद्धरलीं तयानें ॥
नरकीं तारिले पितृगण ॥ ऐक महिमान शुभानने ॥ ५२ ॥
सकळ दानामाजी वरिष्ठ ॥ अन्नदान अतिश्रेष्ठ ॥
म्हणोनि महिमा उत्कृष्ट ॥ वर्णिला श्रेष्ठ पुराणीं ॥ ५३ ॥
असाक्षी भोजन द्वादशी ॥ तया ऐसा न देखो दोषी ॥
अनकूल असे ज्या समयासी ॥ तेंचि ब्राह्मणासीं अर्पिजे ॥ ५४ ॥
चित्त आशेतें न धरावे ॥ भगवंतीं विन्मुख न व्हावें ॥
अतिथी विन्मुख नसावे ॥ वित्त असोनी जवळीक ॥ ५५ ॥
सर्वांचे अंतर ह्रद्गत ॥ स्वये जाणें त्रैलोक्यनाथ ॥
तयातें करितां वंचनार्थ ॥ पावे अघात रोकडा ॥ ५६ ॥
यालागीं उत्तम अथवा मध्यम ॥ सकळ श्रोतीं धरि जे नेम ॥
बहुतीं मार्ग हा सुगम ॥ निर्मून ठेविला अनंतें ॥ ५७ ॥
ये विषयीं इतिहास पुरातन ॥ होऊन ऐकिजे सावधान ॥
पूर्वी सूर्यवंशीं राजा पुण्यवान् ॥ अंबरीष जाण नाम तया ॥ ५८ ॥
सार्वभौम सर्वा वरिष्ठ ॥ तपोबळें अति उत्कृट ॥
अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ ॥ भक्‍ती एकनिष्ठ जयाची ॥ ५९ ॥
प्रजेलागी अति कनवाळु ॥ विप्रालागीं परम स्नेहाळु ॥
रिपुद्रुमालागीं जैसा काळु ॥ कृतांतवत तयाते ॥ ६० ॥
परम धर्मिष्ठ ह्रदयीं ॥ आडकाठी कवणातें नाहीं ॥
व्रत नेम उद्यापनें पाहीं ॥ सदांसर्वदांही चालवीत ॥ ६१ ॥
विन्मुख नव्हेची कवणातें ॥ मागितलें अर्पितसे त्यातें ॥
आपत्यापरी मागत्यातें ॥ लळे त्याचे पुरवीत ॥ ६२ ॥
ऐसें असतां वरिष्ठ ॥ द्वादशी नेम अचाट ॥
साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ ॥ नृपवरिष्ठ आचरतसें ॥ ६३ ॥
सहस्रावधी ब्राह्मणपंक्‍ती ॥ घेऊन साधी द्वादशी तिथी ॥
न उगवताची गभस्ती ॥ साधन रीती साधीतसे ॥ ६४ ॥
ऐसे लोटतां काळ बहुत ॥ पुण्य संग्रहो जाला अपरिमित ॥
इतुकेंही असुनि गर्वरहित ॥ नृपनाथ वेगळा तो ॥ ६५ ॥
तंव वासवा अंगी भय दारुण ॥ माझें पद घेईल हिरून ॥
चिंता करी रात्रंदिन ॥ तंव नवल पूर्ण वर्तलें ॥ ६६ ॥
अकस्मात ऋषी दुर्वास ॥ येता झाला इंद्रसभेस ॥
वासवें सन्मानोनि बहुवस ॥ षोडशोपचारें पूजिला ॥ ६७ ॥
बैसवूनियां निजासनीं ॥ स्वागत पुसिलें तये क्षणीं ॥
स्वस्ति क्षेम विप्र वदोनी ॥ पाहे नयनीं तयातें ॥ ६८ ॥
तंव परम कृश जालें शरीर ॥ शोकें उतरला मुखचंद्र ॥
देखूनी बोले मुनीश्वर ॥ दुःख अपार ह्रदयीं दिसे ॥ ६९ ॥
येरू म्हणे महाराजा ॥ उपाव न देखोंजी दुजा ॥
मग समग्र वृत्तांत वोजा ॥ ऋषिवर्या सांगतसे ॥ ७० ॥
म्हणें अंबरीष परम विख्यात ॥ तपोतेजें आगळा अमित ॥
द्वादशी व्रतातें आचरत ॥ न चाले तेथें उपावो ॥ ७१ ॥
ऐसियासी करूं मी काहीं ॥ ह्रद्रोग हा परम माझे जीवी ॥
म्हणोन पायीं ठेविली डोई ॥ सांगा काई मजलागीं ॥ ७२ ॥
जयातें ह्रद्रोग लागला ॥ तो रोगी दे नखो वांचला ॥
महद्रोग जयातें जाला ॥ तरी धन्वंतरी तयाला वांचविती ॥ ७३ ॥
परी ह्रद्रोगी प्राणियातें ॥ कवण वांचवूं शके तयातें ॥
एक सद्‍गुरु वांचून त्यातें ॥ उपाय अन्य असे ना ॥ ७४ ॥
तरीं तुम्ही सद्‍गुरु वरिष्ठ ॥ सकळ ऋषींमाजी श्रेष्ठ ॥
अमृतवचनीं स्पष्ट ॥ देऊनि रोग कुष्ट निवारा ॥ ७५ ॥
ऐकून वासवाची ग्लानी ॥ कोमलह्रदय दुर्वास मुनी ॥
अंतरीं परम कळवळोनी ॥ बोलतवाणी ते ऐका ॥ ७६ ॥
द्वादश्यां यत्कृतं सर्वमक्षय्यंतद्भवेदिह ॥
द्वादश्यामक्षयंदानं द्वादश्यामक्षयोजपः ॥ ५ ॥
दुर्वास वदे वासवा पाहीं ॥ द्वादशी ऐसें व्रत दुजें नाहीं ॥
जे आचरती सदां सर्वदाही ॥ त्या एवढा नाहीं पुण्यश्लोक ॥ ७७ ॥
अक्षयी स्वर्गवास तयातें ॥ प्राप्त होय जाण निरुतें ॥
द्वादशीये पुण्यव्रतातें ॥ साम्यता आन असेना ॥ ७८ ॥
अक्षयीतीर्थी स्नान केलें ॥ अथवा तपव्रत जरी केलें ॥
यज्ञयागादिही साधिलें ॥ उपासिलें ज्ञानयोग पै ॥ ७९ ॥
तरी नातुळे द्वादशी समता ॥ ऋषी देव गंधर्वादि तत्वता ॥
आचरलिया व्रता ॥ वंद्य सर्वथा ते जाले ॥ ८० ॥
स्वयें वासवा तूंतें पाहीं ॥ इंद्रपद लाधलें पूर्ण कमाई ॥
याचि व्रत प्रभावें पाहीं ॥ अधिप सुरगणातें ॥ ८२ ॥
यमधर्म आचरे व्रत ॥ ते पद जालें तरी प्राप्त ॥
साधन द्वादशी कैलासनाथ ॥ स्वयें आचरे व्रताते ॥ ८३ ॥
ऐसे हे व्रत अति श्रेष्ठ ॥ आचरतसे नृपराव वरिष्ठ ॥
तया अपाय करावयाचे कष्ट ॥ कवण नष्ट करूं शके ॥ ८४ ॥
जयाते पुण्यसामोग्री ॥ पूर्ण असे हो पदरीं ॥
तयातें साह्य श्रीहरी ॥ व्रत निरंतरी चालतसे ॥ ८५ ॥
यालागीं अमरनाथा ॥ न प्रवर्ते ऐसिया घाता ॥
येणें दुरिताचि वार्ता ॥ आंगी सर्वथा बाणेल पै ॥ ८६ ॥
ऐकता ऋषीचे उत्तर ॥ देवेंद्रे केला नमस्कार ॥
उपाव न सुचे अणुमात्र ॥ पद स्वतंत्र नरा हेची ॥ ८७ ॥
यालागीं गुरुवर्या पाहीं ॥ एक वेळ तेथवर जाई ॥
कळेल तैसी करा नवाई ॥ पद अक्षयी राहे जेणें ॥ ८८ ॥
ऐसें ऐकतां वचनातें ॥ ऋशी विचारी अंतरातें ॥
म्हणे जाउनि पाहू नृपाते ॥ पुण्य पुरुषाचे दर्शन ॥ ८९ ॥
दुर्वासा ऐसा सत्पुरुष ॥ परी मतीतें तात्काळ भ्रंश ॥
जया संगती संगदोष ॥ धरिला हव्यास मानसीं ॥ ९० ॥
धीरवान ज्ञानवान पाहीं ॥ सुशीळ जरी जाहला देहीं ॥
तरी संगती संगदोष पाहीं ॥ मती पालटे तयाची ॥ ९१ ॥
म्हणोनियां सत्संग धरावा ॥ दुर्जन संग तो त्यागावा ॥
जेणें विश्रांती पावे जीवा ॥ देवाधिदेवा प्रेमा चढे ॥ ९२ ॥
आतां दुर्वास ऋषीरावो ॥ घेऊन शिष्य समुदावो ॥
नमूनियां वासवो ॥ निघता जाला तात्काळीं ॥ ९३ ॥
घेईल अंबऋषीची भेटी ॥ तेथें होईल जे राहटी ॥
तें कथानक मराठी ॥ श्रोतियां कर्णपुटीं परिसवूं ॥ ९४ ॥
जें ऐकतां पाप झडे ॥ कलि कल्मष अवघें पळे ॥
श्रवण करितां रोकडें ॥ मलमहात्म समग्र हें ॥ ९५ ॥
पापकोटी सहस्राणि पापकोटि शतानिच ॥
विलयं यांति देवेशि मलामासे तिथौमम ॥ ६ ॥
श्लोकाधरें वदली वाचा ॥ प्रबंध नव्हे माझे पदरचा ॥
न्यून पूर्ण करणे याचा ॥ अधिकार साचा तुम्हांतें ॥ ९६ ॥
मी तंव रामसंप्रदायी ॥ भिक्षा मागतो गृहींगृहीं ॥
ती भिक्षा एकत्र एक ठायीं ॥ पचवून अर्पावी द्विजातें ॥ ९७ ॥
ऐसी हे तव कविता जाण ॥ कवीश्वराचें भिक्षान्न ॥
अर्थावबोध एकत्र करून ॥ श्रोतियां लागुन वाटिलें ॥ ९८ ॥
इति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ त्रयोदशोध्याय गोड हा ॥ १३ ॥
ओव्या ९८ ॥ श्लोक ६ ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः ॥

Explore More