Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 12

(Purushottam Maas Katha Adhyay 12)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 12

Purushottam Maas Katha Adhyay 12. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 172
श्रीगणेशाय नमः ॥
जय सद्‍गुरु समर्था ॥ अनाथनाथा कृपावंता ॥
मुमुक्षु शरणांगत होता ॥ जन्मवार्ता तया नाहीं ॥ १ ॥
ऐसे देतसां कृपादानासीं ॥ म्हणोनि शरणांगत पायासीं ॥
भावार्थ धरून मानसीं ॥ शरण चरणांसी आलों असें ॥ २ ॥
मी तंव अनंत अपराधी ॥ अगणित पापाची वृद्धी ॥
परी कृपाळू तूं दयानिधी ॥ नेई सिद्धी परमार्थ ॥ ३ ॥
ऐका श्रोते हो सावधान ॥ मलमास परम आख्यान ॥
मागील अध्यायीं कथन ॥ व्यतीपात वैधृती महिमा वर्णिला ॥ ४ ॥
पांच पर्वे यांचा प्रश्न ॥ लक्ष्मीनें केलासे आपण ॥
तयामाजी सांगितले दोन ॥ पुढें अवधान देइजे ॥ ५ ॥
शताच्छतं च संक्रांतौ ॥ शतोत्थं विषुवेषुच ॥
युगादौ तच्छतगुणमयनेतच्छताधिकं ॥ १ ॥
सोमग्रहे शतगुणं तच्छतं तुरविग्रहे ॥
असंख्यत्वं व्यतीपाते दानंदानविदोविदुः ॥ २ ॥
उत्पातौ लक्षगुणितं भ्रमणे कोटिरुच्यते ॥
अर्बुदं पतने प्रोक्तमक्षय्यं पतिते फलं ॥ ३ ॥
शुभेव्यतीपातदिनेवहन् स पंचगव्येन महानदीजले ॥
उपासते यो यमुनानदीजलं जप्येच शुद्धो व्यती पात ते नमः ॥ ४ ॥
श्रीविष्णु वदतसे निकें ॥ ऐक क्षीराब्धिकन्यके ॥
मागें कथिलें पर्व देखें ॥ पुढें ऐकें अति आदरें ॥ ६ ॥
व्यतीपात वैधृती वर्णन ॥ तुज म्यां केलें निरोपण ॥
तयाहि परी शतगुण ॥ ऐकें महिमान पुढारी ॥ ७ ॥
शत संक्रांतीचें फळ एके ठायीं ॥ तयावरी शतपर्वणी अधीक पाहीं ॥
युगायुगीं मासादि आयनेंही ॥ होत असे विशेष ॥ ८ ॥
तया शतगुणें अधिक ॥ चंद्रग्रहण असे देख ॥
तयाते शतगुणें एक ॥ सूर्यग्रहण बोलिलें असे ॥ ९ ॥
असंख्य व्यतीपात केले दान ॥ कोटितीर्थी केलेंसे भ्रमण ॥
किंवा पंचगव्यादि प्रायश्चित्ते जाण ॥ व्यतीपातस्नान गंगोदका ॥ १० ॥
कोटि पुरश्चरणें जप पाहीं ॥ चंद्रसूर्यग्रहण होई ॥
तया वरिष्ट अधिक पाहीं ॥ ऐकें नवाई शुभानने ॥ ११ ॥
अहोहे पूर्णिमा महिमा ॥ वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा ॥
तेथें बोलावयाची मीसा ॥ बोलतां बोले न बोलवे ॥ १२ ॥
पूर्णिमा दिनीं प्रातःस्नान ॥ जो नर करी आपण ॥
तया ऐसा पुण्यवान ॥ दुजा आन असेना ॥ १३ ॥
किंचित सुवर्ण अथवा कांहीं ॥ दान दीजे ब्राह्मणाते पाहीं ॥
विप्रभोजन माध्यान्ह समयीं ॥ त्या एवढा नाहीं पुण्यवान ॥ १४ ॥
षड्रस मिष्टान्न पाहीं ॥ वाढी ब्राह्मणातें स्वगृहीं ॥
वरी दक्षिणेसहीत वस्त्र तेंही ॥ अर्पी भावें आदरें ॥ १५ ॥
वैशाखी कार्तिकी माघी रौद्री ब्राह्मीच वैष्णवी ॥
विशेष फलदास्तिस्त्रः पिंडदानेऽक्षयंफलं ॥ ५ ॥
वैशाखीं कार्तिकीं माघीं ॥ श्रेष्ठता जाणिजे तिघीं ॥
फाल्गुनीं चैत्रीं नवविधी ॥ पौषी त्रिशुद्धि जाणिजे ॥ १६ ॥
या इतुकियां पूर्णिमेतें ॥ वेगळालीं असे दैवतें ॥
तेहीं परिसावूं तूंतें ॥ ऐक निरुते भामिनी ॥ १६ ॥
ज्येष्ठ पूर्णिमाते पाहीं ॥ ब्रह्म सर्वत्रीं दैवत राहीं ॥
आषाढी ते नारायणरूपेही ॥ असे तेही जाणिजे ॥ १८ ॥
म्हणोन करावे व्यासपूजन ॥ व्यासरूपे साक्षात नारायण ॥
यालागीं करावे पूजन ॥ भाव धरूनि मानसीं ॥ १९ ॥
नादिसिद्ध हे आषाढी ॥ पूर्वी हंसरूपी श्रीयागुढी ॥
म्हणोनि परम हंस प्रौढी ॥ परंपरा पुढी चालतसे ॥ २० ॥
परमहंसरूपे नारायण ॥ म्हणोनि व्यासरूपे नारायण ॥
यालागीं अगत्य कीजे पूजन ॥ हंसरूपे नारायण म्हणोनी ॥ २१ ॥
माघमासी माधव देवता ॥ फाल्गुनीं रुद्रतत्वता ॥
चैत्र दैवत अनंता ॥ असे तत्वता निर्धारे ॥ २२ ॥
वैशाखीं पितृदैवत जाण ॥ मार्गशीर्षी यक्षकिन्नर जाण ॥
देवी भवानी ते जाण ॥ पौषी पौर्णिमा बोलिजे ॥ २३ ॥
ऐसिया पर्वकाळीं जाण ॥ प्रतिमासीं कीजे पिंडदान ॥
तेणे समग्र देवता तुष्टमान ॥ आशिर्वचन पै देती ॥ २४ ॥
स्नानविधी दान पुण्य ॥ जे आचरती भावे जाण ॥
तयाचे ऋण जाय निरसून ॥ नसे अनुमान यदर्थी ॥ २५ ॥
पंचमहा यज्ञ पितृतर्पण ॥ यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन ॥
प्रतिमासीं जे करिती आचरण ॥ तया नारायण संतुष्टे ॥ २६ ॥
मासामासाचे ठायीं जाण ॥ येतसे तिथी पर्व लक्षून ॥
तरी कां करावे अनमान ॥ बहुत धन लागेना ॥ २७ ॥
अल्पवेचे पुण्यविशेष ॥ परी कोणी न धरिती सायास ॥
येर्‍हवीं पिशुन येता गृहास ॥ करिती सायास आदरे ॥ २८ ॥
तेथे खर्च करिती भलतैसा ॥ व्यर्थ वेचिती वयसा ॥
परी सत्कारणीं न वेचिती पैसा ॥ गर्जतसे ठसा पुराणीं ॥ २९ ॥
पुराणिक सांगतचि गेले ॥ व्यासादिकीहीं काव्य केले ॥
पुराणे विस्तारून ठेविले ॥ परि जन न चाले या वाटे ॥ ३० ॥
फुकट स्वल्पाचेही स्वल्प ॥ ते कोणीही न नेणती ॥
अल्प वृथा जल्पताती जल्प ॥ अभिमाने कल्प भोगिती ॥ ३१ ॥
शिश्नोदर पारंगत ॥ जगामाजी रूढी बहुत ॥
नेणोनियां हिताहित ॥ भगवंती देख अंतरले ॥ ३२ ॥
वीट न मानावा बोलण्याचा ॥ पुढे मागुता नरदेह कैचा ॥
क्षणेक संग रतिसुखाचा ॥ नये कामाचा बापानों ॥ ३३ ॥
जाय पाहतां सोन्याची घटी ॥ मागुती नये लक्षितां लक्षकोटी ॥
करितां संसाराची आटाटी ॥ जन्म शेवटी निर्फळ ॥ ३४ ॥
उदरालागीं करावे नीचसेवन ॥ तेथे पापपुण्य न विचारितां धन ॥
मेळवावे संसारालागून ॥ शेवटीं कणव सांगाती ॥ ३५ ॥
हे तो जगाची जगप्रौढी ॥ प्रचीत पाहाताती रोकडी ॥
परी कोणीही न करिती तातडी ॥ प्रपंच सांकडी उगवावया ॥ ३६ ॥
असो जे करतिल जैसे ॥ ते तंव भोगितिल तैसे ॥
क्रोध येऊं नये मानसे ॥ वदलो फारसे म्हणवूनी ॥ ३७ ॥
कथाभाग राहिला मागे ॥ सांप्रत तो वदावा लागे ॥
पूर्णिमा महिमा रमारंगे ॥ सांगितला निजांगे रमेलागीं ॥ ३८ ॥
यावज्जीवं मर्त्यलोके स्नानदानादिभिः कृतैः ॥
स्नानेनैकेन पूर्णायां दिनं भवति सार्थकं ॥ ६ ॥
क्षणेक जाणूनि संसार ॥ दयाळू तो जगदीश्वर ॥
मृत्युलोका केला प्रसर ॥ तरणोपाय मानवाते ॥ ३९ ॥
बहुत सुगम सुलभ उपावो सांगितलासे देवाधिदेवो ॥
पूर्णिमादिनीं स्नानदानातपावो ॥ कीजे निर्वाहो जन्माचा ॥ ४० ॥
आपुला जन्म सार्थक करून ॥ कीजे पूर्वजांचे उद्धरण ॥
येविषयींचें कथन ॥ स्वयें जनार्दन वदतसे ॥ ४१ ॥
ऐकेंहो क्षीराब्धिबाळी ॥ अमावास्येची नव्हाळी ॥
श्रवण केलिया सकळी ॥ होय होळी पापाची ॥ ४२ ॥
मासा मासाचिया अंतीं ॥ येतसे अमावास्या तिथी ॥
तरी स्नान दान यथापद्धती ॥ करावें निगुती आदरें ॥ ४३ ॥
सारूनि स्नान संध्या देवतार्चन ॥ करूनियां महाहवन ॥
मग कीजे तिळतर्पण ॥ ब्राह्मण भोजन यथाविधी ॥ ४४ ॥
श्राद्ध कीजे यथास्थित ॥ पिंडदान करून युक्त ॥
तेणें पितृगण संतोषत ॥ आशीर्वाद देत कुळातें ॥ ४५ ॥
ऐसे प्रत्यही अमावास्येसीं ॥ आचरावें निश्चयेसी ॥
तये दिनीं पितृलोकासी ॥ पितरासीं संतोष ॥ ४६ ॥
तये दिनीं पितरांलागून ॥ पितृलोकीं करिता सन्मान ॥
देऊनि मिष्टान्न भोजन ॥ तेणें पितृगण आनंदती ॥ ४७ ॥
मग संतोषून देती आशीर्वचन ॥ तेणें वंशवृद्धि होतसे जाण ॥
जयातें वाटे व्हावें कल्याण ॥ पावे सदन वैकुंठीं ॥ ४८ ॥
तेणें अवश्य करावें पिंडदान ॥ न केलिया अपाय दारुण ॥
आणि मोक्षरूप कल्याण ॥ सावधान परिसावें ॥ ४९ ॥
एकमासवरी उपोषण ॥ पितरांतें होतसे जाण ॥
मग तयातें करावें लागे वायुभक्षण ॥ तंव ते कोपून शापिती ॥ ५० ॥
त्याचिया शापास्तव पाहीं ॥ संसारपुरीं न पडेचि कांहीं ॥
कष्टी होती सर्वदांही ॥ म्हणती आमुचें दैव हेंचि पैं ॥ ५१ ॥
आदौ आचरण करिती सरस ॥ मग बोल ठेविती प्रारब्धास ॥
कुसमुसोन साधिती संसारास ॥ धरूनि हव्यास निजमनीं ॥ ५२ ॥
जिता धड न बोलती वचन ॥ मग कोठून करतील पिंडदान ॥
जळो ऐसियाचें पुत्रपण ॥ काय वांचून संसारी ॥ ५३ ॥
धन्यधन्य ते पितृभक्त ॥ अमान्य न करिती वचनाते ॥
सदांसर्वदां पुरविती हेत ॥ मागीतला पदार्थ देताती ॥ ५४ ॥
जिवंत असतां सन्मान ॥ मेलिया करिती गयावर्जन ॥
प्रतिमासें अमावास्येसी जाण ॥ ब्राह्मणभोजन श्राद्धयुक्त ॥ ५५ ॥
सुफळ तयाचा संसार ॥ सदां तुष्टमान श्रीधर ॥
आशीर्वाद देती अमर ॥ हो कल्याण म्हणोनी ॥ ५६ ॥
ऐसे जे कां पितृभक्त पाहीं ॥ माझें नमन तयांचें पायीं ॥
हेचि बुद्धि सर्वकाळ ह्रदयीं ॥ देवो शेषशायी परमात्मा ॥ ५७ ॥
सांप्रत कलीमाजी पुत्रपण ॥ किंचित् ऐकावें वर्णन ॥
क्रोधें न भरावें पूर्ण ॥ नसा अमान्य वचनासी ॥ ५८ ॥
आपुलिया सुखस्वार्था ॥ पिता सांचवी द्रव्यार्था ॥
नेणोनि पापपुण्य पंथा ॥ धन सर्वथा सांचवीतसे ॥ ५९ ॥
म्हणे मुलें माझीं अज्ञान ॥ माझेंहि झालें वृद्धपण ॥
कामा येई शेवटी धन ॥ पुत्रालागून माझिया ॥ ६० ॥
मग ते पुत्र होती तरुण ॥ पितयातें आलें वृद्धपण ॥
सदां हेळसिती दारुण ॥ मागता धन न देती ॥ ६१ ॥
पिता आपुले धन मागे ॥ तयावरीं डोळे फिरविती रागें ॥
म्हणे मी याचें काय ऋण लागें ॥ वडिलोपार्जित पहिलें ॥ ६२ ॥
बालत्वा पासुनि पाळिला ॥ तोंडीचा घांस चारिला ॥
शेवटीं पुत्र कामा न आला ॥ वृद्धपणी पितयातें ॥ ६३ ॥
ऐसेही पुत्र असती ॥ नको देवा ऐशियाची संगती ॥
जिता नाही नाहीं गती ॥ मेलिया सद्गती केवी होय ॥ ६४ ॥
म्हणोनि एकची पुत्र भला ॥ जेणें कुळाचा उद्धार केला ॥
येही परत्रसाधनीं भला ॥ वंशा केला उद्धारु ॥ ६५ ॥
ऐसे जे का सुपुत्र पाहीं ॥ तेची आचरती अमावास्याही व्रताही ॥
आणीक पुण्यकर्म पाहीं ॥ परलोक पाही साधिती जे ॥ ६६ ॥
जे नर करिती पिंड दानाते ॥ वरी आचरती व्रताते ॥
तयाहीवरी मलमासातें ॥ विशेष पर्वणी अमावास्या ॥ ६७ ॥
वर्धते प्रत्यहं सत्यंनात्र कार्या विचारणा ॥
मासिमासित्वमावास्या दिनेप्राप्ते नराधमाः ॥ ७ ॥
ऐसींहीं पर्वे दोन पाहीं ॥ पूर्णिमा अमावास्या तेही ॥
तुम्हां निवेदिलें सर्वही ॥ शेषशायी वदला असे ॥ ६८ ॥
जे नर ऐकूनि नाचरती ॥ पुराण श्रवणीं न बैसती ॥
तयाची न चुके यातायाती ॥ पुनरावृत्ती चुकेना ॥ ७९ ॥
पितरातें न करिती तोष ॥ तयाची संतती होय नाश ॥
यालागीं श्लोकाधार विशेष ॥ श्रवण कीजे आदर ॥ ७० ॥
तंमासं पितरस्तस्य कुर्वतो वायु भोजनं ॥
तस्य विघ्नं प्रयच्छंति क्षुधितास्तृषितास्तथा ॥ ८ ॥
ते संततिं नाशयंति संपदो भवनानिच ॥
तस्मादमायां कर्तव्यं स्नानदानजपादिकं ॥ ९ ॥
यालागीं श्रोतेजनहो ॥ मलमासातें पाहाहो ॥
अगत्य व्रतातें आचराहो करालाहो परमार्थाचा ॥ ७१ ॥
जैसा लाहो घेता संसारीं ॥ तैसाच कीजे परमार्थावरी ॥
तेणें चुकेल येरझारी ॥ जन्मवरी खंडेल ॥ ७२ ॥
हा नरदेह परम सांग ॥ येथे धरावा सत्संग ॥
सत्संगाविण साधनमार्ग ॥ हाता न लागे सर्वथा ॥ ७३ ॥
म्हणोन मलमास अवधी ॥ साधाहो हेची संधी आधी ॥
गांठ घाला मूळ पदीं ॥ भजा गोविंदीं आदरें ॥ ७४ ॥
स्वस्ति श्री अधिक माहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ द्वादशोध्याय गोड हा ॥ १२ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्या ७४ ॥ श्लोक ९ ॥
॥ इति द्वादशोध्यायः ॥

Explore More