Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 16

(Purushottam Maas Katha Adhyay 16)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 16

Purushottam Maas Katha Adhyay 16. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 211
श्री गणेशाय नमः ॥
जयजयाजी रुक्मिणीरंगा ॥ भक्तमानसप्रियह्रदयभृंगा ॥
मुनिजन ध्याई ह्रदयरंगा ॥ ये अंतरंगा श्रीविठ्ठला ॥ १ ॥
सगुण स्वरूपा मेघश्यामा ॥ दीनबंधु आत्मयारामा ॥
सदांसर्वदां नामीं प्रेमा ॥ मनोभिरामा असों दे ॥ २ ॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ मलमहात्म कथानुसंधान ॥
संवाद लक्ष्मी नारायण ॥ पुण्यपावन कथा हे ॥ ३ ॥
मागें द्वादशीमहिमा वर्णिला ॥ पुनः मागुतां लक्ष्मीनें प्रश्न केला ॥
तोचि श्लोकार्थ पाहिजे परिसिला ॥ भावार्थ भला असो द्या ॥ ४ ॥
श्रीरुवाच ॥ भगवन् देवदेवेश भक्तानुग्रहकारक ॥
आश्चर्यकारिकथितमाख्यानं पुरुषोत्तम ॥ १ ॥
मासे मलिम्लुचे स्नानव्रतस्य फलमीदृशं ॥
विशेषेण पुनर्ब्रूहि स्नानस्य फलमीश्वर ॥ २ ॥
क्षीराब्धिजा वदे तेव्हां ॥ ऐकिजे देवाधिदेवा ॥
अभिनव कथेचा ठेवा ॥ परिसिलाजी स्वामियां ॥ ५ ॥
परि स्नान आणि जप ॥ महिमा वर्णिला अमूप ॥
तरी स्नान केलियानें निष्पाप ॥ पूर्वी कवण झालासे ॥ ६ ॥
कवण स्नानाचें तप ॥ कवण पुण्य जपला जप ॥
येविषयीं होऊन सकृप ॥ निवेदावें स्वामियां ॥ ७ ॥
मग बोले शेषशयन ॥ ऐक प्रिये प्रियवचन ॥
जें आकर्णितां जाण ॥ होय क्षाळण महापापा ॥ ८ ॥
श्रीकृष्ण उवाच॥
श्रृणु सुंदरि वक्ष्यामि मलिम्लुच कृतस्यच ॥
स्नानस्य फलमत्युग्रं पापपंजरभेदकं ॥ ३ ॥
यमलोकं न पश्यंति स्नातामासिमलिम्लुचे ॥
सर्वकार्याणि सिद्धयंति परिपूर्णमनोरथाः ॥ ४ ॥
स्नान दान जप होम ॥ चालविता नेमानेम ॥
तरी पाय वंदी यम ॥ देती क्षेम रोग सर्व ॥ ९ ॥
सर्वारिष्टें ते शमती ॥ संसारी न घडे विपत्ती ॥
सर्व मनोरथ पुरती ॥ उद्धरागती तो पावे ॥ १० ॥
सर्व तीर्थी केलिया स्नान ॥ तयातें घडे तेंची पुण्य ॥
यदर्थी संशय नसे जाण ॥ सत्य जाण शुभानने ॥ ११ ॥
कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध ॥ कोटि गोदानें प्रसिद्ध ॥
पुरश्चरण एकविध ॥ घडलें जरी प्राणियां ॥ १२ ॥
तरी समता नाहीं जाण ॥ मलमासीं केलिया स्नान ॥
परी भावार्थ परिपूर्ण ॥ धरि संपूर्ण मासवरी ॥ १३ ॥
सहस्र विप्रा इच्छित भोजन ॥ तरी घडे एक द्विज पूजन ॥
तो पावे सदां यश-कल्याण ॥ नेम जाण मासवरी ॥ १४ ॥
जन्म दारभ्य जें पाप केलें ॥ जाणोनि नेणुनि जे कां घडलें ॥
तें सर्व नासे एकचि वेळें ॥ जरीं घडलें स्नान एक ॥ १५ ॥
येच विषयीं इतिहास परम ॥ ऐकें होऊनि उत्तमोत्तम ॥
श्रवण केलिया सुगम ॥ उपरति तात्काळीके ॥ १६ ॥
इंद्रलोकीची अप्सरा कामिनी ॥ नाम तियेचें स्मृतिविलासिनी ॥
त्याहीमाजी ती प्रियमोहिनी ॥ कुबेरा घरीं सदां वसे ॥ १७ ॥
परम प्रीती पात्र ते धनदा ते ॥ स्वगुणें मोहिलें हो तया तें ॥
नृत्य गायनें देखता तयातें ॥ क्षणभरी तें न सोडी ॥ १८ ॥
स्वरूप परम लावण्य ॥ पाहतां होय वीर्य पतन ॥
कंठ जीचा कोकिळे समान ॥ ऐकतां सुरगण भुलती ॥ १९ ॥
असो ती देवलोकींची अप्सरा ॥ स्वरूप वर्णिता अपरंपार ॥
तुच्छ जियेपुढें शंकरदारा ॥ इतर सुंदरा त्या किती ॥ २० ॥
चतुर्दश लोकपाळ प्रार्थितां ॥ परी तेथें न जायची तत्वतां ॥
ऐसी हे लावण्यलता ॥ पुढें वृतांता परिसीजें॥ २१ ॥
एकदां वनविहारार्थ ॥ सखिया घेऊन त्वरित ॥
निघती झाली क्रीडनार्थ ॥ लक्षुनी पंथ कुरुक्षेत्रीं ॥ २२ ॥
तंव तो पुरुषोत्तम मास ॥ हें तों नेंणें विशेष उद्देश ॥
सहज पातली तया स्थानास ॥ समुदायास तें काळीं ॥ २३ ॥
पांचजण अंध बोलिजेती ॥ ऐका ते कोणकोणती ॥
नेत्र असूनी अंध होती ॥ ऐका प्रचीती तयांची ॥ २४ ॥
एक तो विषयांध जाण ॥ दुजा तो द्रव्यांध पूर्ण ॥
मदिरांध तोची तिसरा जाण ॥ बळांध तोची चौथा पैं ॥ २५ ॥
पांचवा तो दुर्जन पाहे ॥ तंव तो गर्भांधची होय ॥
तयातें उपमाची न साहे ॥ ऐसे हे पांच अंध जाणिजे ॥ २६ ॥
इतुकियांचे वेगळे प्रकार ॥ ते किंचित परिसवूं साचार ॥
विषयांध जाला जो नर ॥ ऐका प्रकार तयाचा ॥ २७ ॥
चित्तीं काम उद्भवतां ॥ मग तो वोळखी न धरी तत्वतां ॥
तयासी धक्का देऊनि जातां ॥ देहावरुता तो नये ॥ २८ ॥
तैसाची मदिरा प्राशिला ॥ नेत्र असतांची अंध झाला ॥
श्रीमुखें जरी ताडिला ॥ परी ओळखिला न पुरे ॥ २९ ॥
आतां तिसरा तो धनांध ॥ द्रव्य मदें उन्माद ॥
स्वकीय येतां सन्निध ॥ ओळखीं न पुसें तयातें ॥ ३० ॥
एखादा तयाचा कोणी आप्त ॥ दरिद्रें गांजिला बहुत ॥
तो जरी भेटावया येत ॥ तयातें पुसत तुम्हीं कोण ॥ ३१ ॥
आतां बलोन्मत्त असती ॥ गजा ऐसें सदां डुल्लती ॥
तयांचे शेजारी हो येती जाती ॥ तरी ते न पाहाती तयातें ॥ ३२ ॥
पांचवा अंध तो दुर्जन ॥ सदां दुजियातें चिंती अकल्याण ॥
घातप्रयुक्त ज्याचें मन ॥ म्हणोनि जाण अंध तो ॥ ३३ ॥
म्हणोनिया पांच अंध ॥ श्रोतियातें केलें विशद ॥
पुढे ऐकिजे संवाद ॥ तया देवांगनेचा ॥ ३४ ॥
ऐसी ते विषयांध पाहीं ॥ सखिया समवेत पातली ठायीं ॥
पर्वकाळ धर्म नेणे कांहीं ॥ जळप्रवाहीं स्वइच्छा गमे ॥ ३५ ॥
संपूर्ण जळक्रीडा करून ॥ केलें नूतन वस्त्र परिधान ॥
तीरा समीप येऊन ॥ केलें अवलोकन चहूंदिशे ॥ ३६ ॥
तंव एकाएकीं नयनीं ॥ कुंजवना ऐसें ते क्षणीं ॥
वन देखती जाली कामिनी ॥ देखूनि मनीं संतोषें ॥ ३७ ॥
नानापरी पुष्पयाती ॥ सुवासे सुशोभती ॥
द्राक्षें फलभारें डोलती ॥ चंपक सेंवती ठायीं ठायीं ॥ ३८ ॥
जाईजुई आणि मालती ॥ बकुळ पुन्ना गरजती ॥
मांदार गुलाब केतकी ॥ कर्दळी डोलती फळभारें ॥ ३९ ॥
ऐसें अनुपम्य तें वन ॥ छाया सुशीतळ सघन ॥
पाहता आनंदली कामिन ॥ तोषलें मन सतीचें ॥ ४० ॥
मग सुवासिक पुष्पें तोडूनी ॥ माळा करीते चतुरकामिनी ॥
स्वकरें छेदितां ते क्षणीं ॥ कामोद्भव मनीं दाटला ॥ ४१ ॥
मग सकळ सखियातें बोले ॥ जरी पुरुष असतां ये वेळे ॥
तरी अरुवार पुष्यसेजे लीळे ॥ भोगित्यें सोहळे विषयाचे ॥ ४२ ॥
वयसा सुंदर सगुण ॥ वरी एकांत क्रीडावन ॥
नानापरी सुवास सुमन ॥ परी भ्रताराविण निर्फळ ते ॥ ४३ ॥
ऐसीं नानापरी कामचेष्टा ॥ करितसे ती वरिष्ठा ॥
तंव तिचें फिरलें अदृष्टा ॥ पातला श्रेष्ठ दुर्वासमुनी ॥ ४४ ॥
सवें शिष्य मेळा अपार ॥ लक्षुनि सरोवर तीर ॥
माध्यानीं आला दिनकर ॥ म्हणोनि समग्र उतरलें ॥ ४५ ॥
कोणी स्नानातें आदरिलें ॥ कोणी बहिर्दिशेसी गेलें ॥
कोणी स्वकर्मीं गुंतलें ॥ एकलें देखिलें दुर्वासा ॥ ४६ ॥
तंव हे देवांगना वहिली ॥ कामज्वरें ऋषीतें न्याहाळी ॥
एकाकीं धावून आली ॥ कंठीं सुदली पुष्पमाळा ॥ ४७ ॥
करीं होती पुष्पमाळा ॥ तेची घातली ऋषीचे गळा ॥
ऐसें देखता ते वेळा ॥ ऋषी आला कोपातें ॥ ४८ ॥
म्हणे नष्टे पापिष्टे पाही ॥ हें त्वा कर्म केलें काई ॥
हें तो आम्हां योग्य नाहीं ॥ आतां घेई शापातें ॥ ४९ ॥
कंठीं घातली माळा ॥ तो भ्रतारची केवळा ॥
तूं तव मदांध अबळा ॥ पिशाच तात्काळ होई का ॥ ५० ॥
ऐसें ऐकतां शापवचन ॥ येरी कंपित दीन वदन ॥
काममद गेला उतरून ॥ करुणा वचन बोलतसे ॥ ५१ ॥
उवाचदीनया वाचा कृतमेतत्क्षमस्व मे ॥
अजानंत्या कृतमिदं कुरुष्वानुग्रहं मयि ॥ ५ ॥
ऐके स्वामी ऋषिराया ॥ अज्ञानत्वें घडे क्रिया ॥
ते क्षमा कीजे स्वामिया ॥ म्हणोनिया पायां लागतसे ॥ ५२ ॥
चरण न सोडी सर्वथा ॥ चरणांवरी ठेविला माथा ॥
कृपाळुवा ऋषिनाथा ॥ शापव्यथा निवारी हे ॥ ५३ ॥
ब्राह्मण ह्रदय कोमळ ॥ कृपेनें द्रवला तात्काळ ॥
म्हणे माझें वाक्य असत्य केवळ ॥ नव्हे अबळे सर्वथा ॥ ५४ ॥
परी चतुर्युग प्रमाण ॥ सहस्र वेळ होय गणन ॥
तोंवरी पिशाचत्व पावोन ॥ उपरी स्वस्थान पावसी ॥ ५५ ॥
पाहा तरी अन्याय केतुला ॥ पर्वतप्राय दंड तेथे जाला ॥
यालागीं सूज्ञानि ब्रह्मवृंदाला ॥ भिवोन त्याला वंदावें ॥ ५६ ॥
ब्राह्मण असो कैसा तरी ॥ परी चहूंवर्णीचा अधिकारी ॥
मुख्य गायत्री मंत्राधिकारी ॥ म्हणोन चतुरीं नमावें ॥ ५७ ॥
असो उश्शाप पावोनि सुंदरी ॥ ऋषि निघोन गेले ते अवसरी ॥
तात्काळ पिशाचते नारी ॥ पावली निर्धारी ऋषिशापें ॥ ५८ ॥
दुर्घट वना माझारी ॥ कंटक वृक्ष परोपरी ॥
उदक न मिळे निर्धारी ॥ हिंडे सुंदरी पै तेथें ॥ ५९ ॥
आळेपिळे वृक्षासी घेत ॥ श्वापदें नाठवें जीवघात ॥
सदां तळमळे क्षुधित ॥ ऐसे लोटत बहुकाळ ॥ ६० ॥
तंव अकस्मात एके काळीं ॥ याज्ञवल्कीची कन्या सुमेळीं ॥
कांची तपस्विनी नामें बाळी ॥ सखियामेळी पातलीसे ॥ ६१ ॥
तंव तो मलमास विशेष ॥ लक्षुनी तीर्थ यात्रा प्रदोष ॥
चाललीसे कुरुक्षेत्रास ॥ भेटी अनयासें पैं झाली ॥ ६२ ॥
येरी जाऊन लवलाह्या ॥ धरिती जाली तिचे पाया ॥
म्हणे तपस्विनी माया ॥ परिसे सये वृत्तांतु ॥ ६३ ॥
मग मुळापासून वृत्तांत समग्र ॥ कथिला तिये समाचार ॥
शापभय परम दुस्तर ॥ कर्म अघोर सुटेना ॥ ६४ ॥
माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी ॥ मुक्त करीं शापभयापासुनी ॥
ऐसें मधुर वचनें करूनी ॥ ऋषिकुमारी प्रार्थिली ॥ ६५ ॥
नम्र वचनें कार्यसिद्धी ॥ नम्र वचनें साधे नवविधी ॥
ते अपाय न पावे कधी ॥ क्रूरवचनीं अनर्थ पैं ॥ ६६ ॥
जयाची वाणी मधुर असे ॥ त्याचें कार्य कधींच न नासे ॥
जो सदां क्रूर बोलतसे ॥ कल्पांती नसे यश तया ॥ ६७ ॥
असो तैसी नव्हे याज्ञवल्की ॥ चतुर भामिनी परम निकी ॥
पिशाचनिचे बोल ऐकोनि की ॥ ह्रदय विवेकी अनुसरली ॥ ६८ ॥
मग बोले ऋषिकन्यका ॥ कीं पिता माझा याज्ञवल्की देखा ॥
त्याणें मातें निवेदिलें व्रत एका ॥ अधिकमास निर्धारें ॥ ६९ ॥
पुरुषोत्तम मास विशेष ॥ म्हणोन जातसों सागरसंगमास ॥
तेथें करूनि स्नानदानास ॥ तप विशेष जाणोनी ॥ ७० ॥
मासमात्र करून स्नान ॥ नक्त भोजन मौन्य धरून ॥
त्याहीवरी दीप दान जाण ॥ वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी ॥ ७१ ॥
ऐसें तूं तें पुण्य घडलें जरी ॥ कदाचित मुक्त होशी शरीरीं ॥
पिशाचत्व जाऊन निर्धारी ॥ स्वपदीं जाशील तूं ॥ ७२ ॥
ऐकोन तयेचें वचन ॥ येरी बोले दीनवदन ॥
माझा देह पिशाच जाण ॥ केवीं स्नान दान घडें पै ॥ ७३ ॥
तरीं माउलिये तूं माझी माता ॥ मी तंव तुझी धर्मदुहिता ॥
इतुका उपकार करीं आतां ॥ देहव्यथा निवारी हे ॥ ७४ ॥
कांहीं पुण्य तुवां आपुलें ॥ मदर्पण जरी माये केलें ॥
तरी कोटिगुणें आगळें ॥ पुण्य घडे जाणिजे ॥ ७५ ॥
परोपकारा ऐसें पुण्य ॥ दुजें नसेचि सखे जाण ॥
यालागीं माये कृपाकरून ॥ करीं कृपादान येवढें ॥ ७६ ॥
तरी एका दिवसाचें पुण्य ॥ मातें करशिल जरी अर्पण ॥
तरी मी उद्धरागती पावेन ॥ स्थान पावेन आपुलें ॥ ७७ ॥
चतुर्युग केधवां जाती ॥ तोंवरी भोगूं पिशाचगती ॥
यालागीं परिसें विनंती ॥ लागे पुढती पायांतें ॥ ७८ ॥
येरी ऐकून करुणा वचन ॥ कृपेनें द्रवलें अंतःकरण ॥
तियेतें अवश्य म्हणवून ॥ दिधलें भाषदान त्रिवाचा ॥ ७९ ॥
म्हणे मी परतो येई तोंवरी पाहीं ॥ तूं येथेंचि राही ये ठाई ॥
चिंता न करीं ह्रदयीं कांहीं ॥ मासान्तीं लवलाहीं येतसें ॥ ८० ॥
ऐसें वदोनि ऋषिअबळा ॥ घेऊन सखियांचा मेळा ॥
सत्वर पावली सागर संगमाला ॥ करी सोहळा मन इच्छा ॥ ८१ ॥
स्नानदानादी यथविधी ॥ मासमास अवघे साधी ॥
पूर्ण करून व्रतविधी ॥ ब्राह्मणविधी परिपूर्ण ॥ ८२ ॥
ऐसी करूनि पुण्य क्रिया ॥ परतूनि आली तया ठायां ॥
तंव ती पिशाची ऊर्ध्व दृष्टी करूनियां ॥ निरखितसे मार्गातें ॥ ८३ ॥
तंव एकाएकीं स्त्रियांचा मेळा ॥ देखून आनंदली वेल्हाळा ॥
धावून धरी चरणकमळा ॥ केला आपुला साच बोला ॥ ८४ ॥
मग ते ऋषिकन्या पाही ॥ करीं उदक घेतलें लवलाहीं ॥
एके दिनीचें पुण्य पाहीं ॥ उदक करीं घातलेंसें ॥ ८५ ॥
पुण्यतोय पडतांच हस्तकीं ॥ तात्काळ देहें जाली निकी ॥
पूर्ववत पुण्यलोकी ॥ अप्सरादेही पावली ॥ ८६ ॥
मुखें करून जयजयकार ॥ करिती जाली नमस्कार ॥
म्हणे माये उपकार थोर ॥ केला माते मजवरी ॥ ८७ ॥
ऐसें वदोनि ते अवसरी ॥ स्वधामा पावली ते नारी ॥
एवढी पिशाची निर्धारी ॥ उद्धरागती पावली ॥ ८८ ॥
म्हणोन मलमासाचें महिमान ॥ स्वयें कथितसे जनार्दन ॥
यालागीं श्रोते सज्जन ॥ कीजे स्नानदान यथाविधीं ॥ ८९ ॥
आपुले स्वकुळीचें वंशी ॥ कवण पावले पिशाच्यत्वासी ॥
अथवा पूर्वीचे वंशोवंशी ॥ हे तो नेणवे आपणासी ॥ ९० ॥
किंवा आपण स्वदेहासी ॥ प्राप्त होऊं कवण ठायासी ॥
हे तो नेणवे आपणासी ॥ म्हणोन व्रतासीं आचरावें ॥ ९१ ॥
म्हणाल काय होतें ये दानें ॥ झणीं न म्हणा ऎसें वचन ॥
येथें लक्ष्मीनारायण संवाद जाण ॥ तरी अप्रमाण कवण म्हणें ॥ ९२ ॥
परि भावार्थ पाहिजे निका ॥ म्हणजे प्राप्तीं तात्काळ देखा ॥
यालागीं करून विवेका ॥ आचरा निका व्रत भावो ॥ ९३ ॥
पुरुषोत्तम मासा ऐसा दुजामास ॥ नाही नाही हो निःशेष ॥
साक्षात पुरुषोत्तमाचा अंश ॥ जाणा निःशेष भाविकहो ॥ ९४ ॥
जैसा पर्वतामाजी मेरु थोर ॥ ग्रहगणीं भानु अपार ॥
गंगेमाजी सरस्वती अपार ॥ बोले श्रीवर आदरें ॥ ९५ ॥
नक्षत्रांमाजी जैसा चंद्रमा ॥ चतुःपादामाजी कामधेनू उत्तमा ॥
तैसा मासामाजी पुरुषोत्तम ॥ द्विपाद ब्राह्मण हा असे ॥ ९६ ॥
म्हणोन अति आदरें करून ॥ अगत्य कीजे स्नानदान ॥
म्हणोनि बोले जनार्दन ॥ तेंची कथन केले असे ॥ ९७ ॥
स्वस्ति श्रीमलमास माहात्म ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ षोडशोऽध्याय गोड हा ॥ १६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्या ९७ ॥ श्लोक ५ ॥
॥ इति षोडशोऽध्यायः ॥

Explore More