Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 15

(Purushottam Maas Katha Adhyay 15)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 15

Purushottam Maas Katha Adhyay 15. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 297
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी सद्‍गुरुनाथा ॥ अरूपरूपा गुणातीता ॥
तुमच्या चरणीं माझा माथा ॥ नमन समर्था तुम्हांतें ॥ १ ॥
तव कृपेची नौका थोर ॥ उतरसी जडमूढ पामर ॥
तेथें मी एक अर्भक किंकर ॥ उतरींपा दयाळुवा ॥ २ ॥
भाविक भोळे अज्ञान जन ॥ परपारातें नेशी तयालागून ॥
तरी मी एक अभाविक अज्ञान ॥ ठेवितां दूषण समर्था ॥ ३ ॥
मी तंव नेणें जपतप साधन कांहीं ॥ मतिमंद आळशी सदा सर्वदांही ॥
पीडिलों असें प्रपंचाचे ठायीं ॥ सोडवी आई माउलिये ॥ ४ ॥
व्यर्थ वेंचिले वयसा ॥ केधवां काळ घालील फासा ॥
नाहीं क्षणाचा भरवसा ॥ नसे धीवसा अंतरीं ॥ ५ ॥
संचय नसे धनासीं कांहीं ॥ करावीं दानव्रतें कांहीं ॥
हें तूं जाणसीं सर्वही ॥ ह्रदयगत माझें कृपाळा ॥ ६ ॥
असो आतां हा स्तुतिवाद ॥ परिसा कथानुसंवाद ॥
मगिले अध्यायीं विशद ॥ द्वादशी महिमा वर्णिला ॥ ७ ॥
तोची आतां पुढत पुढती ॥ परिसवूं श्रोतियांप्रती ॥
जेणें आंगीं बाणे विरक्ति ॥ धर्मरीती ठसावे पैं ॥ ८ ॥
जैसा कोणी एक कीर्तनीं जात ॥ तो दुजियातें भावार्थ सांगत ॥
मग तयाचा बैसे हेत ॥ जाय नित्य कीर्तनीं ॥ ९ ॥
तैसीच हेही गोष्ट असे ॥ ऐकतां परम जीव संतोषे ॥
भावार्थे प्रचीत अनयासें ॥ कळों येई आचरलिया ॥ १० ॥
स्मरणात्कीर्तनाद्यत्र प्राप्नोति पदमव्ययं ॥
स्त्रीराजबालघातीच यति विश्वासघातकः ॥ १ ॥
स्त्री बाळ अथवा प्रौढ ॥ किंवा अज्ञान जडमूढ ॥
पापी असलिया द्वाड ॥ ऐकतां सदृढ उद्धरे ॥ ११ ॥
पूर्वी पंच महापापें घडलीं ॥ तीं काय आपणा स्मरती ये वेळीं ॥
काय झालें कवणे काळीं ॥ केवीं नव्हाळी सांगवे ॥ १२ ॥
या लागीं पूर्व पापाचा क्षय व्हावा ॥ म्हणोनि कथाभाग ऐकावा ॥
तदनुसारेंची दानधर्म करावा ॥ सुटका करावी नरदेहाची ॥ १३ ॥
इतर असती जन्मयाती ॥ परी तेथें न घडे धर्मरीती ॥
यालागीं हातोहातीं श्रीपती ॥ यथानिगुती भजावें ॥ १४ ॥
म्हणोनि ऐकिजे सादर ॥ कथालाघव परम अपार ॥
मलमाहात्म अतिसुंदर ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ १५ ॥
सूर्यवंशीं श्रीरामचंद्र ॥ आचरे द्वादशीपर्वथोर ॥
साधवा विधी प्रकार ॥ यथानिगुती संवादी ॥ १६ ॥
अवतार पुरुष तो दाशरथी ॥ सहकुळ निर्दाळिला लंकापती ॥
कुंभकर्णादि बळकीर्ती ॥ निवटिले पराक्रमें ॥ १७ ॥
परी त्या कुंभकर्णाची स्नुषा ॥ कुंभनिकुंभाची योषा ॥
शतमुखी रावणाची पीयूषा ॥ कन्या जाणा प्रीतिपात्र ॥ १८ ॥
तियेतें असे एक सुत ॥ नामे पुढरीक विख्यात ॥
लंकेशाची होतां वाताहत ॥ गेली धांवत पितया पैं ॥ १९ ॥
करूनियां साष्टांग नमन ॥ निवेदिलें सकळ वर्तमान ॥
येरू ऐकता खेदखिन्न ॥ म्हणे मूर्ख रावण केवढा ॥ २० ॥
आम्हां कळूं नेदीतां मात ॥ केला सकळ कुळाचा घात ॥
मी तंव एक क्षणात रघुनाथ ॥ सेनेसहित ग्रासितो ॥ २१ ॥
परी होणार तें न चुके सर्वथा ॥ होऊन गेलें ते जालें आतां ॥
सांप्रत लंकाधीप तत्वता ॥ बिभीषण केला श्रीरामें ॥ २२ ॥
तरी तया बिभीषणाची वार्ता ॥ मी जाऊन पाहीन आतां ॥
दवडूनिया आपुल्या नाता ॥ आपण स्वस्थता राज्य भोगी ॥ २३ ॥
ऐसें बोलोनिया वचन ॥ हांकारिलें सकळ सैन्य ॥
घाव निशाणी घालून ॥ केलें धावणें लंकेवरी ॥ २४ ॥
निशीमाजी एकाएकीं समग्र ॥ येऊन वेढिलें लंकानगर ॥
कळला बिभीषणा समाचार ॥ तोही सत्वर बाहेर निघे ॥ २५ ॥
दोन्ही सैन्या जाला मेळु ॥ घाई उठिला हलकल्लोळु ॥
परी दळे बळें प्रबळु ॥ आहे शतमुखी तो ॥ २६ ॥
बिभीषणातें पराभविले ॥ लंकेबाहेर घातलें ॥
पुंढरीकातें राज्यीं स्थापिलें ॥ गंतव्य केलें माघारी ॥ २७ ॥
इतुकें कृत्य करून देख ॥ परतला तो शतमुख ॥
येरीकडे तो भक्तनायक ॥ विचार करी निजमनीं ॥ २८ ॥
म्हणे आतां कवण उपाय करावा ॥ हानी झाली माझिया गौरवा ॥
केवीं मुख दाखवावें राघवा ॥ अपकीर्ती सर्व जगांत ॥ २९ ॥
परी होणार तें होऊन गेलें ॥ राज्य बुडलियाचें दुःख आगळें ॥
जगामाजी तोंड काळें ॥ जालें सर्वांपरी माझें ॥ ३० ॥
आतां होणार तें सुखें हो कां ॥ शरण जावें श्रीरघुनायका ॥
जेणें दिधली हे लंका ॥ करूनि विवेका निघाला ॥ ३१ ॥
कांहीं सेवक आणि प्रधान ॥ घेऊन निघाला बिभीषण ॥
त्वरें पावला अयोध्या पट्टण ॥ रघुनंदन जेथें असें ॥ ३२ ॥
दंडप्राय लोटांगण ॥ करूनि नमिला रघुनंदन ॥
रामें दिधलें आलिंगन ॥ परम भक्‍त जाणोनी ॥ ३३ ॥
स्वागत पुसोनि परस्परें ॥ सन्निध बैसविला आदरें ॥
मुखारविंद पाहतां रघुवीरें ॥ तंव वदनेंदु कोमाइला ॥ ३४ ॥
म्हणे बिभीषणा प्राणसखया ॥ शोकाकुलीत दिसे ह्रदया ॥
तरी निवेदीं महत्कार्या ॥ जें हरविधातिया अलोट ॥ ३५ ॥
ऐसें रघुपतीचें वचन ॥ ऐकोनि बोलें बिभीषण ॥
मग स्तुतिवादें रघुनंदन ॥ पूजिता जाला आदरेंसी ॥ ३६ ॥
जयजयाजी रघुनंदना ॥ कृपासागरा पतितपावना ॥
भक्‍तरक्षका दीनोद्धारणा ॥ कृपानिधाना रघुपती ॥ ३७ ॥
भक्‍तकैवारी रघुराया ॥ तव दर्शनें हरें सकळ माया ॥
नाम स्मरणें पापक्षया ॥ जाय विलया रघुपती ॥ ३८ ॥
तूं तव एकवचनीं एक बाण ॥ हा तव तुझा नेम रघुनंदन ॥
ऐसें असतां असत्यपण ॥ आलें दिसोन ये काळीं ॥ ३९ ॥
तरी तुवा निज कृपेंकरून ॥ लंकाराज्य दिधलें दान ॥
तेथें झालें महाविघ्न ॥ ऐकें कथन रघुराया ॥ ४० ॥
शतमुखीं रावण पाहीं ॥ तो तंव आमुचा असें व्याही ॥
तयाची कन्या स्नुषा होई ॥ भार्या पाहीं निकुंभाची ॥ ४१ ॥
तियेतें असे पुत्र एक ॥ नाम तयाचें पुंडरीक तयातें घेऊनियां देख ॥
स्नुषा गेली पितयां पैं ॥ ४२ ॥
लंकेचें आद्यंत वर्तमान ॥ तियेनें पितयातें केलें श्रवण ॥
मग तो सकळ सैन्य घेऊन ॥ आला चालून लंकेसी ॥ ४३ ॥
मातें समरीं पराभवून ॥ लंका राज्य घेतलें हिरून ॥
पुंडरीकातें राज्यीं स्थापून ॥ गेला निघोन मागुता ॥ ४४ ॥
म्हणोनिया रघुनंदना ॥ शरण आलों तंव चरणा ॥
सांगोनिया वर्तमाना ॥ निवांत स्थाना बैसला ॥ ४५ ॥
ऐकून बिभीषणाचें उत्तर ॥ निवांत बैसला रघुवीर ॥
आरक्त करूनि नेत्रे ॥ काय बोले ते समयीं ॥ ४६ ॥
म्हणे माझिया भक्‍तालागून ॥ कोण छळिता दुर्जन ॥
तयातें समूळीं निर्दाळीन ॥ मी रघुनंदन स्वयें कर्ता ॥ ४७ ॥
मी भक्‍तालागीं अवतार ॥ युगायुगीं घेतले साचार ॥
ऐसा कोण असे पामर ॥ दे तिरस्कार माझिया भक्‍ता ॥ ४८ ॥
तरी ऐक माझिया वचनासी ॥ आजी असे एकादशी ॥
मारूनिया शतमुखासी ॥ राज्यीं तुजसी स्थापीन ॥ ४९ ॥
इतुकें करूनियां कारण ॥ द्वादशीचें अयोध्येशी पारण ॥
करीन साधनीं व्रतपूर्ण ॥ तरीच रघुनंदन नाम माझें ॥ ५० ॥
ऐसें प्रतिज्ञा वचन ॥ श्रीरामाचें ऐकून जाण ॥
बोलता जाला बिभीषण ॥ अघटित वचन केवी घडे ॥ ५१ ॥
दधी समुद्राचे मध्य बेटीं ॥ तया असुराचें स्थान जगजेठी ॥
आदौ ऐकिजे ते गोष्टी ॥ सविस्तर सांगेन ॥ ५२ ॥
येथून पांच कोटी योजने दूर ॥ असे तो दधि सागर ॥
तेथील मध्य बेटाचा विस्तार ॥ लक्ष योजनें लांबी रुंदी ॥ ५३ ॥
तेथें वास्तव्य असुरातें ॥ संख्या नसेची सैन्यातें ॥
निवटून तया दुष्टातें ॥ केवी अयोध्ये घडे द्वादशी ॥ ५४ ॥
ऐसें मनोमानसाचें वाक्यें ॥ आकर्णोनि अयोध्यानायकें ॥
स्तब्ध घटिका मुहूर्त एक ॥ न सुचे आणीक उपावो ॥ ५५ ॥
म्हणे हें तो अलोट कार्य दिसे ॥ आमचें नेमोत्तर घडे कैसे ॥
भक्‍त मनोरथ पुरतां न दिसे ॥ रविवंशीं दिसे दूषण ॥ ५६ ॥
मी तव भक्तकामकल्पद्रुम ॥ हें मिथ्यत्व दिसे परम ॥
भक्तमनोभिराम हें नाम ॥ साच न दिसे आमुतें ॥ ५७ ॥
राजाधिराज रघुनायक ॥ तो संकटीं पडला देख ॥
मग इतरांचा केउता लेख ॥ संकटार्थ विचारा ॥ ५८ ॥
परी भक्‍तालागीं संकटीं ॥ पडला असे रवीकिरिटी ॥
इतर जनाची राहटी ॥ होती कष्टी प्रपंचीं ॥ ५९ ॥
प्रपंचीं कष्टी होतां फार ॥ मग आठविती परमेश्वर ॥
तेवीं संकटीं पडतां रघुवीर ॥ स्मरे कुमरवायूचा ॥ ६० ॥
देव भक्‍तपण वेगळें न दिसे ॥ ते तंव एकमय वर्तती ऐसें ॥
जेवी परिमळ पुष्पीं वसे ॥ तैसे देव भक्त एकरूप ॥ ६१ ॥
त्याहीवरी सांब आणि रघुनाथ ॥ वेगळेपण नाहीं उभयतांत ॥
तोचि अंश वायुसुत ॥ साक्षात अवतार शिवाचा ॥ ६२ ॥
म्हणोनि स्मरतां रघुनाथ ॥ तात्काळ उभा ठेला हनुमंत ॥
जोडूनियां दोन्ही हस्त ॥ विनवीत रघुराया ॥ ६३ ॥
म्हणे केउता संकटार्णव अपार ॥ मी तव सन्निध असतां वीर ॥
पडतीया आकाशा देऊं धीर ॥ तेथें तो असुर कायसा ॥ ६४ ॥
ऐसा उभयतांचा संवाद ॥ होतां तेथें प्रगटला नारद ॥
अर्पूनि पूजा प्रकार सद्य ॥ निजासनीं बैसविला ॥ ६५ ॥
मग नारद म्हणेजी रघुराया ॥ केवि खिन्न दिसती हे चर्या ॥
अवघा वृत्तांत रघुराया ॥ निवेदित ऋषीतें ॥ ६६ ॥
नारद म्हणे जी श्रीरामा ॥ अचाट वदलेती नेमा ॥
तो दैत्य नावरे जी तुम्हां ॥ दुर्धर संग्रामा ये काळीं ॥ ६७ ॥
परी मारुती ऐसा वीर जेठी ॥ हा तव साह्य राखील पाठी ॥
तरी सैन्य करा सिद्ध उठाउठी ॥ घ्यावी भेटी दैत्याची ॥ ६८ ॥
परी पंचाशत कोटी दूर ॥ ऐसें तया दैत्याचें नगर ॥
केवी साह्य हा तव प्रकार ॥ न कळे निर्धार राघवा ॥ ६९ ॥
ऐसें ऐकतां मुनिवचन ॥ आवेशला वायुनंदन ॥
सकळ सैन्य सिद्ध करून ॥ रघुनंदन उभा ठेला ॥ ७० ॥
मग काय करी अंजनीसुत ॥ रूप धरिले अति अद्‍भुत ॥
आकाशीं मुख पाद पाताळांत ॥ देखता रघुनाथ हर्षला ॥ ७१ ॥
मग पिंजारून रोमावळी ॥ वरी बैसविली सैन्य मंडळी ॥
राम लक्ष्मण स्कंध मौळीं ॥ कक्षेतळीं बिभीषण ॥ ७२ ॥
तंव नारद म्हणे जी स्वामी ॥ समागमें येतसों आम्हीं ॥
पाहू संग्रामाची उर्मी ॥ दैत्यधाम अवलोकूं ॥ ७३ ॥
अवश्य म्हणे जानकीवर ॥ तंव काय करी वायुकुमर ॥
दक्षण चरण उचलून सत्वर ॥ दैत्य नगर आक्रमिलें ॥ ७४ ॥
एक चरण अयोध्ये आंत ॥ दुजा ठेविला दैत्य नगरांत ॥
मग बोलें वायुसुत ॥ उतरा त्वरित पैं आतां ॥ ७५ ॥
शतमुखाची हेची नगरी ॥ वेढा घाला जी सत्वरी ॥
देखूनियां आश्चर्य करि ॥ मुनीसहीत राघव ॥ ७६ ॥
म्हणे निमिष्य न लोटतां जाण ॥ अठरा पद्में वानर सैन्य ॥
त्याहीवरी अयोध्येचे वीरगण ॥ संस्था जाण नसेची ॥ ७७ ॥
इतुकिया सहीत सत्वरी ॥ घेऊन आला कपीकेसरी ॥
म्हणूनि हर्ष न माय अंबरीं ॥ वेढिली नगरी दैत्याची ॥ ७८ ॥
सर्वत्रांचा एकचि कल्होळ ॥ ऐकूनियां दैत्यपाळ ॥
समाचार आणवीत सकळ ॥ कळलें ते वेळीं तयातें ॥ ७९ ॥
बिभीषणाच्या कैवारें ॥ धांवणें केलेंसे रघुवीरें ॥
म्हणूनियां आवेशें थोरें ॥ निघे बाहेर स्वसैन्येसीं ॥ ८० ॥
अचाट बळी दैत्य राणा ॥ वर्षता जाला अभितबाणा ॥
घाई जर्जर केली सकळसेना ॥ रघुनंदन देख तसे ॥ ८१ ॥
मग मारुतीस्कंदी रघुवीर ॥ वर्षत झाला बाणाचा पूर ॥
परी नाटोपे तो दैत्येश्वर ॥ वर्षे अपार बाणातें ॥ ८२ ॥
ऐसें युद्ध होता ते वेळीं ॥ तीन प्रहर रात्र होऊं आली ॥
श्रीरामें चिंताअनळीं ॥ वस्ती केली तेधवां ॥ ८३ ॥
म्हणें या दैत्यातें पराभवून ॥ बिभीषणातें राज्य देऊन ॥
न घडे अयोध्येसी गमन ॥ द्वादशी पूर्ण न घडे ते ॥ ८४ ॥
ऐशा विचारें मनांत ॥ तटस्थ ठेला रघुनाथ ॥
हें देखोनि नारद हसत ॥ केवी हे मात घडू शके ॥ ८५ ॥
तरी परिसीजे चापपाणी ॥ हा दैत्य शिववरदायिनी ॥
कदां नाटोपे तुम्हांलागुनी ॥ वृथा कहाणी मनाची ॥ ८६ ॥
तरी या विषयीचा उपाय एक असें ॥ मायाधीन हें जगत वसे ॥
तुम्ही तो सगुणत्व मायावेषें ॥ अकार आपैसें जालेती ॥ ८७ ॥
तरी ते माया आलियाविन ॥ हा दैत्य नाटोपें कवणालागून ॥
यालागीं जानकीते प्रार्थून ॥ आणी रघुनंदन कंदनानें ॥ ८८ ॥
मागुती पाहे रामराणा ॥ ऐकून मुनीच्या वचना ॥
तंव तो पुढें अंजनीसूता ॥ काय रघुनंदन बोलत ॥ ८९ ॥
म्हणे सखया संकटकाळीं ॥ आतां संभाळावें ये वेळीं ॥
सीतेतें आणून संकट टाळीं ॥ करी नव्हाळी इतुकीहे ॥ ९० ॥
ऐकून स्वामी वचनार्था ॥ थोर आवेश आला हनुमंता ॥
म्हणे चिंता न करीजे रघुनाथा ॥ जानकी आतां आणितों ॥ ९१ ॥
मग पुढील चरण मागे केला ॥ तो अयोध्येमाजी उभा ठेला ॥
अंतर मंदिरी प्रवेशला ॥ तंव देखतां झाला अपूर्व ॥ ९२ ॥
भूमीशायी जनकबाळा ॥ भोगी निद्रेचा सोहळा ॥
मारुती विचारी ते वेळां ॥ निद्रा भंगिता झगटे दोष ॥ ९३ ॥
मग पुच्छें गुंडाळून मंदीर ॥ उपटून घेतलें समग्र ॥
मागुता दक्षण चरण आवग्र ॥ रणभूमीं ठेविलासे ॥ ९४ ॥
क्षण न लागतां पैं तेथें ॥ न लवतां डोळियाचें पातें ॥
घेऊन आला जानकीते ॥ मंदिरासहित रणभूमी ॥ ९५ ॥
मग म्हणजे रघुराया ॥ नमन माझें तुझीया पायां ॥
घेऊन आलों जनकतनया ॥ आदिमाया प्रणवरूपी ॥ ९६ ॥
ऐकून तयाचें उत्तर ॥ परमहर्षयुक्त रघुवीर ॥
मागें पाहे तंव समग्र मंदीर ॥ सीताचिद्रत्‍न भूमीशायी ॥ ९७ ॥
परम आश्चर्यातें पाहून ॥ म्हणे धन्य माऊली अंजनी निधान ॥
जी प्रसवली ऐसें रत्‍न ॥ बळिया निधान मारुती ॥ ९८ ॥
मग अंतर्गृहीं प्रवेशून ॥ खुणें जागृत करी सीतेलागून ॥
येरी उठली दचकून ॥ तंव रघुनंदन देखिला ॥ ९९ ॥
मनीं दचकली जनकबाळी ॥ म्हणे मी काय स्वप्न देखिलें येवेळीं ॥
श्रीराम गेले युद्धमेळीं ॥ हे तो नव्हाळी अनुपम्य ॥ १०० ॥
जाणूनि सीतेचें ह्रद्गत ॥ बोलत जाला रघुनाथ ॥
म्हणे स्वप्न नव्हे हे सत्यमात ॥ होईं जागृत शुभानने ॥ १01 ॥
आम्हातें दैत्य नाटोपे युद्धीं ॥ म्हणोनि आणिलेंयें संधी ॥
आतां न लावीं अवधी ॥ त्वरें वधीं दैत्य अधमा ॥ 10२ ॥
निशी उरली किंचित ॥ पुढें जाणें आहे अयोध्येत ॥
दादशी साधन असे तेथ ॥ त्वरित उठें ये काळीं ॥ 10३ ॥
ऐसें ऐकतां वचनार्था ॥ चरणावरी ठेवीला माथा ॥
म्हणे द्याजी बाण भाता ॥ धनुष्यलता समवेत ॥ 10४ ॥
थोर आवेशें ते काळीं ॥ बाणभाता पृष्ठमौळीं ॥
धनुष्य घेऊन करकमळीं ॥ दिधली आरोळी अटाहास्यें ॥ 10५ ॥
ते साक्षात आदिशक्ति ॥ हांकें त्रिभुवन आंदोलती ॥
दैत्य परम दचकला चित्तीं ॥ म्हणे हे चिच्छक्ति प्रगटली ॥ 10६ ॥
परी धैर्य मेंढा वाहन ॥ दैत्य आला चालून ॥
वर्षताजाला अमितबाण ॥ जेणें त्रिभुवन कोंदलें ॥ 10७ ॥
मग म्हणेजी श्रीरामा ॥ अगाध तुझा महिमा ॥
स्त्रिये लाविलें संग्रामा ॥ अगाध महिमा देखिला ॥ 10८ ॥
मी तंव दुर्धर वीर पाहें ॥ स्त्रियेतें संग्राम केवीं लाहे ॥
स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे ॥ कवण लाहे पुरुषार्था ॥ 10९ ॥
परी मी भीत नाहीं मरणातें ॥ अंतकाळीं देखिलें रघोत्तमातें ॥
तेणें सुखावलों अंतरातें ॥ पुढें होणार तें सुखें हो कां ॥ १1० ॥
कालची असे हरिदिनी ॥ आतां उदेली द्वादशी साधनी ॥
ऐसें बोलून तेक्षणीं ॥ अमित बाणी वर्षत ॥ १1१ ॥
येरीकडे त्रिभुवनजननी ॥ धनुष्यातें बाण लावुनी ॥
विंधिती झाली तत्क्षणीं ॥ निर्वाण बाणें विंधित ॥ १1२ ॥
पातें लवतां अर्धघटी ॥ बाण मारिले लक्षकोटी ॥
परी तो दैत्येंद्र महाहट्टी ॥ तितुकेही निवटी बाणजाळ ॥ १1३ ॥
हें देखून जनकतनया ॥ विचारून बाण घेतला लवलाह्या ॥
झांपडी पडली दैत्य डोळियां ॥ येऊन ह्रदया आदळत ॥ १1४ ॥
एकाचि बाणें केला पूर्ण ॥ कांहीं न सुचे तया लागून ॥
जेवीं वृक्ष पडे उन्मळोन ॥ तेवी असुर पडियेला ॥ १1५ ॥
धूड पडतांची मदिनी ॥ वितुळली असुरवाहिनी ॥
जयजयकाराची उठली ध्वनी ॥ वानरसेने आनंद ॥ १1६ ॥
सेना विखुरली चहूंकडे ॥ नगर लुटविलें निवाटें ॥
बिभीषण हर्ष कोडें ॥ रामाकडे पाहत ॥ १1७ ॥
यापरि निवटूनि असूर ॥ निशी उरली घटका चार ॥
मग युद्ध करूनियां स्थिर ॥ स्तवी रघुवीर जानकीतें ॥ १1८ ॥
मागुती हनुमंतातें बोलत ॥ सखया बिभीषणा राज्यीं स्थापीं त्वरिंत ॥
अवश्य म्हणोनि वायुसुत ॥ पुच्छाग्रीं बैसवीत सैन्यातें ॥ १1९ ॥
दक्षिण चरण उचलूनियां ॥ लंकेमाजी ठेविला लवलाह्या ॥
मग म्हणेजे रघुराया ॥ उतरावें या लंकेसीं ॥ 1२० ॥
राज्य द्यावें बिभीषणातें ॥ अयोध्यें चलावें त्वरित ॥
ऐसी ऐकतांची मात ॥ थोर हरुष रामचंद्रा ॥ 1२१ ॥
मग लंकेमाजी वाद्यघोष ॥ होता झाला परम उल्हास ॥
राज्यीं स्थापून बिभीषणास ॥ अयोध्याधीश आज्ञा मागे ॥ 1२२ ॥
मग बिभीषणें दंडप्राय नमस्कार ॥ करूनि स्तविला रघुवीर ॥
म्हणे भक्तपालना ब्रीद थोर ॥ केलें साचार स्वामीयां ॥ 1२३ ॥
तरीं साधन द्वादशी ॥ जाली पाहिजे लंकेसी ॥
सहपरिवारें स्वसैन्यासी ॥ विधियुक्त पै कीजे ॥ 1२४ ॥
मग बोले श्रीरघुवीर ॥ हातो येथें न घडे विचार ॥
वाट पाहत असे भरतवीर ॥ तयावीण प्रकार न घडे हा ॥ 1२५ ॥
धन्य तयाचें बंधुपण ॥ उभयतां ऐक्यत्व पूर्ण ॥
नाहीं तरी सापत्‍न जाण ॥ घेती प्राण एकमेकांचे ॥ 1२६ ॥
तैसा नव्हे श्रीरघुवीर ॥ भक्‍तपाळण समरंगधीर ॥
शांत करूनि लंकेश्वर ॥ निघे सत्वर तेथुनी ॥ 1२७ ॥
मागुता हनुमतातें ॥ स्तवूनि म्हणें तयातें ॥
सखया नेई त्वरें अयोध्येतें ॥ परिवारा तें काळीं ॥ 1२८ ॥
ऐकतां रघुवीर-वचन ॥ आवेषला वायुनंदन ॥
मागुता उचलून चरण ॥ अयोध्येमाजी ठेविला ॥ 1२९ ॥
परिवारासहीत ते वेळीं ॥ सकळसेना उतरली खालीं ॥
सकळ वाहिनी आनंदली ॥ जयजयकारें गर्जती ॥ 1३० ॥
तों पूर्वीच पाकसिद्ध होत ॥ स्नानें सारूनियां समस्त ॥
तंव अरुणोदय होतां प्राप्त ॥ पात्रें विस्तारीत समग्र ॥ 1३१ ॥
समस्तांसहीत सारूनि भोजनें ॥ द्वादशी साधिली रघुनंदनें ॥
ऐसें द्वादशीचें महिमान ॥ केलें कथन श्रोतियांतें ॥ 1३२ ॥
म्हणोनी तिथीमाजी उत्तम ॥ द्वादशी पर्व उत्तमोत्तम ॥
व्रत करिता हें निःसीम ॥ विजयी संग्राम तो पावे ॥ 1३३ ॥
आणि प्राप्त होय राजलक्ष्मी ॥ अंतीं पावे मोक्षधामीं ॥
हें अनुपम्य व्रतनेमीं ॥ प्रचीत नामीं असों द्या ॥ 1३४ ॥
पदच्युत बिभीषण ॥ तो पावला राज्यासन॥
ऐसें व्रताचें महिमान ॥ व्रत संपूर्ण द्वादशी ॥ 1३५ ॥
व्रत करितां शतमुखासी ॥ रामबाणें मुक्ती तयासी ॥
अंती गेला सायुज्यतेसी ॥ पुनरावृतीसी नागवे ॥ 1३६ ॥
व्रत करितां रघुनंदन ॥ रणीं विजयी झाला पूर्ण ॥
मर्दूनियां शतमुखी रावण ॥ व्रत संपूर्ण साधिलें ॥ 1३७ ॥
म्हणोनियां श्रोतें सज्जन ॥ हें व्रत करावें जाण ॥
जें आचरतां यशकल्याण ॥ मोक्षभुवन प्राप्त होय ॥ 1३८ ॥
हे कथा गोड ऐकिली ॥ म्हणोनियां दृष्टांतीं योजिली ॥
श्रोतीं श्रवण कीजे सकळीं ॥ बद्धांजली प्रार्धितों ॥ 1३९ ॥
कोणेही प्रकारें करून ॥ करावे भगवंत गुणवर्णन ॥
काळ सार्थक तेणें करून ॥ येत घडून आपैसा ॥ 1४० ॥
मग केलें कर्म वायां जाय ॥ हें तो न घडे कालत्रय ॥
म्हणोनियां अति लवलाह्य ॥ वर्णावे गुण हरीचे ॥ 1४१ ॥
ऐसें हें द्वादशी महिमान ॥ केलें अवघें कथन ॥
येथून पांच वर्षे संपूर्ण ॥ झाली पुढें अवधान असों द्या ॥ 1४२ ॥
किंबहूक्‍ते न देवेशि न तिथि द्वार्दशसिमा ॥
यस्य मासस्ययो देवो द्वादश्यांतं प्रपूजयेत् ॥ २ ॥
दुःख द्रारिद्र्य रोगाणामास्पदंसोभि जायते ॥
न द्वारका नोज्जयिनी न काशी-मथुरापिच ॥ ३ ॥
हें व्रत जे करिती नेमेसी ॥ दुःख दारिद्र नव्हे त्यासी ॥
नको तीर्था यात्रेसी ॥ काशी उज्जनी द्वारके ॥ 1४३ ॥
स्वस्ति श्रीअधिक माहात्म्य ग्रंथ ॥ नाटकाधार पद्मपुराणे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ पंचदशोऽध्याय गोड हा ॥ १५ ॥
ओव्या ॥ १४३ ॥ श्लोक ३ ॥
॥ इति पंचदशोऽध्यायः ॥

Explore More