Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 18

(Purushottam Maas Katha Adhyay 18)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 18

Purushottam Maas Katha Adhyay 18. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 175
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
जयजयाजी मंगलधामा ॥ मंगलनाम तुझें आत्मयारामा ॥
चराचर फलांकितद्रुमा ॥ नामाअनामातीत तूं ॥ १ ॥
अमंगळ हे माझी काया ॥ मंगलनाम तुझें हे रघुराया ॥
मंगल जननी दुहिता प्रिया ॥ करी छाया कृपेची ॥ २ ॥
तंव कृपाबळें समस्त ॥ वदेन म्हणतों समग्र ग्रंथ ॥
तो सिद्धि पाववीं समस्त ॥ ठेवीं वरदहस्त शिरीं माझ्या ॥ ३ ॥
ऐका श्रोते जन सादर ॥ मलमहात्म परिकर ॥
लक्ष्मीनारायण संवाद थोर ॥ भावें साचार परिसीजे ॥ ४ ॥
पूर्वी मेरुगिरीचे दक्षिणपारीं ॥ विंध्याद्री पर्वत निर्धारी ॥
नर्मदा वाहे अमृतमय नीरीं ॥ वृक्षतीरीं शोभती ॥ ५ ॥
नानावृक्ष सुशोभित ॥ नारीकेळीं फळभारें लवत ॥
ताडमाड खर्जुरी शोभत ॥ वृक्ष शोभती नानापरी ॥ ६ ॥
तेथें हंस कारंडव चक्रवाकें ॥ मयोर चातक बदकें ॥
मूषक नकुळ बिडाळकें ॥ आनंदें देखें खेळती ॥ ७ ॥
तेथें ऋषिसमुदावो बरवा ॥ स्नानसंध्यें आराधिती उमाधवा ॥
यक्षगण गंधर्वातें तेधवा ॥ आराम रमवी सर्वातें ॥ ८ ॥
तेथें भवानी सहित शूळपाणी ॥ क्रीडार्थ येताती तये वनीं ॥
ऐसी ते परम शोभीत स्थानीं ॥ अनुपम्य न वदवे ॥ ९ ॥
तेथें भृगुनामे एकनगरी ॥ परम रमणीय परी ॥
सदां वास्तव्य अमरपुरीं ॥ तप आदरें करिताती ॥ १० ॥
तंव तया नगरीं एक ब्राह्मण ॥ भृगुवंशज सकुलीन ॥
वेदाध्यायी परम निपुण ॥ ज्योतिषी पूर्णसिद्धांतीं ॥ ११ ॥
नामतया कुळशर्मा ॥ जाणे सर्व धर्म अधर्मा ॥
तयाची भार्या उपरमा ॥ कुशावती नाम तियेचें ॥ १२ ॥
तिच्या उदरीं कन्यारत्‍न ॥ प्रसवली ते गुणनिधान ॥
रूपें परम लावण्य ॥ नाम जाण मेधावती ॥ १३ ॥
एकुलती एक वंशस्थळीं ॥ अतिसुंदर रूपागळी ॥
उणी तिजपुढे नैषधबाळी ॥ बहु आगळी चतुरपणें ॥ १४ ॥
ओठ जिचें अति आरक्त ॥ गौरांगीं शोभिवंत ॥
सिंहाकृति कटि शोभत ॥ मृगनेत्री गजगामिनी ॥ १५ ॥
प्राप्त होतां षौडशवर्षे ॥ कुच चमकती जंबीरा ऐसें ॥
पीतवर्ण साजिरे सरसे ॥ देखतां मानस संतोषे ॥ १६ ॥
तपीये विसरले तपा ॥ जपीये विसरले जपा ॥
पाहतां जियेचे स्वरूपा ॥ वीर्य ढळे क्षणार्धे ॥ १७ ॥
ऐसी ते लावण्याची ज्योती ॥ पहातां नेत्र तटस्थ होती ॥
पिता अवलोकितां तये प्रती ॥ जाली उपरती मृगांक ॥ १८ ॥
मग पितयानें वर विचार ॥ करितां जाला साचार ॥
पद्मनाभ एक द्विजकुमर ॥ अतिसुंदर सुलक्षणी ॥ १९ ॥
वेद्शास्त्रसंपन्न होती ॥ मान्यता विशेष सर्वाठायीं ॥
घटितार्थ पाहून ते समयीं ॥ तिथिनिश्चयो पैं केला ॥ २० ॥
सालंकृत कन्यादान ॥ करून अर्पिलें कन्यारत्‍न ॥
चारी दिवस सोहळा संपूर्ण ॥ ब्राह्मण भोजन यथाविधी ॥ २१ ॥
कांहीं एक दिवस श्वशुरमंदिरी ॥ राहिलीसे ते सुंदरी ॥
उभयतां प्रीति पडिभारी ॥ न सोडिती एकमेकां ॥ २२ ॥
क्षण एक वियोगे व्यथा ॥ सहन होईना उभयतां ॥
तंव दैवयोग विचित्रता ॥ न सोडी सर्वथा कवणातें ॥ २३ ॥
एकदां नर्मदा तीरीं विप्रकुमर ॥ जलक्रीडा करितां निर्भर ॥
सन्निध पातला एक मगर ॥ नेला ओढूनी पाताळा ॥ २४ ॥
तीरीं होता जो समुदाव ॥ हाहाःकार करिती जों सर्व ॥
ग्रामवासियांनी घेतली धांव ॥ मात जाणविली पितयातें ॥ २५ ॥
वक्षस्थळ ताडिती मातापिता ॥ श्वशुरासहीत धांवली कांता ॥
शोक करिती मातापिता ॥ हा हा जगन्नाथा केलें काय ॥ २६ ॥
मृत्तिका घेऊन वदनीं ॥ घालीतसे ते कामिनी ॥
शोकवर्णितां उलों पाहे धरणी ॥ कवीची वाणी कुंठित ॥ २७ ॥
म्हणें आहा देवा जगन्नाथा ॥ कोठवरी भोगूं वैधव्यव्यथा ॥
जन म्हणती हे ललना आतां ॥ करिल काई नेणवे ॥ २८ ॥
म्हणे बुडालें माझें जहाज ॥ वोस पडली माझी सेज ॥
सौभाग्य दग्ध झालें आज ॥ बोलूं गुज कवणातें ॥ २९ ॥
ऐसा विलाप करितां ते कांता ॥ पिता सांवरी तियेतें तत्वतां ॥
परि न सोसवे दुःख अवस्था ॥ सांवरून पिता धरी बळें ॥ ३० ॥
पाहा नाहीं कोणी कोणाची ॥ अवघीं सांगाती सुखाची ॥
वेळ येतां मृत्युकाळींचीं ॥ अंती एकलाची जातसे ॥ ३१ ॥
यालागीं सज्ञान जनीं ॥ प्रवर्तावें आत्मसाधनीं ॥
सुटे काळ भयापासूनी ॥ ऐसें जनीं वर्तावें ॥ ३२ ॥
कवणाची माता कवणाचा पिता ॥ कवणाची कांता कवण दुहिता ॥
बंधु भगिनी हे तत्वता ॥ आप्त सोयरे समग्र ॥ ३३ ॥
कवण नाहीं कोणाचे ॥ अंतीं जाणें लागें नेमाचें ॥
यालागीं सार्थक जन्माचें ॥ करा साचें बापानो ॥ ३४ ॥
पहा प्रवाहीं बुडाला विप्रकुमर ॥ तया तें टाकून परिवार ॥
परत ते जाले येरायेर ॥ लहान थोर सर्वही ॥ ३५ ॥
ऐसे लोटतां बहुत दिवस ॥ वैधव्य दशा सतीस ॥
जिताचि मृत्यु स्त्रियेस ॥ भोगितां वैधव्यास जाण पां ॥ ३६ ॥
दिवस न लोटेची सर्वथा ॥ न सरे वैधव्याची व्यथा ॥
आयुष्यही न सरेचि तत्वता ॥ मरणावस्था सतीतें ॥ ३७ ॥
तंव एके काळीं ते सुंदरी ॥ स्नानार्थ पातली नर्मदातीरीं ॥
तेथें पुराणश्रवणीं क्षणभरी ॥ अवकाशें बैसली असे ॥ ३८ ॥
तेथें निरोपण निघालें ॥ मळमाहात्म पुण्यागळे ॥
स्नान दान करितां एक वेळें ॥ प्राप्त सोहळे वैकुंठीं ॥ ३९ ॥
ऐसा विश्वास धरून अंतरीं ॥ गृही पातली ते सुंदरी ॥
मग मृदुवचने प्रार्थना करी ॥ ते अवसरीं पितयाची ॥ ४० ॥
म्हणे ताता ऐक वचन ॥ वैधव्य व्यथा न लोटे जाण ॥
तरी उपाव करूं कवण ॥ सांगा मज लागून स्वामियां ॥ ४१ ॥
तिये तें पाहून दुःखभरित ॥ पितानेत्री अश्रु स्रवत ॥
म्हणे बाई एक मात ॥ करी व्रत मलमाहात्म ॥ ४२ ॥
परी संपूर्ण भरत आला मास ॥ उर्वरित राहिला एक दिवस ॥
तरी तूं आचरें स्नानदानास ॥ मौन नक्तास आचरावे ॥ ४३ ॥
उपरी करूं उद्यापन ॥ यथाविधि ब्राह्मण संतर्पण ॥
केलिया घडे महापुण्य ॥ सत्य जाण शुभानने ॥ ४४ ॥
जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकतां ॥ शेवटील अध्याय ऐकतां ॥
फळ लाधे हो तत्वता ॥ संपूर्णता प्राप्त होय ॥ ४५ ॥
तैसेंचि हेंही व्रत जाण ॥ करीं तूं एकची दिन ॥
मनोरथ पुरविता भगवान् ॥ श्रीजनार्दन दयाळु ॥ ४६ ॥
ऐसी ऐकता पितयाची वार्ता ॥ बहुत हर्षभरित ते दुहिता ॥
प्रातःकाळीं स्नानार्थ तत्वता ॥ नर्मदा तीरीं पातली ॥ ४७ ॥
संकल्पयुक्त स्नान सारुनी ॥ परतली स्वगृहा कामिनी ॥
मग सत्पात्र विप्र बोलावूनी ॥ बैसे भामिनी पूजेतें ॥ ४८ ॥
त्रयत्रीणिदशक देख ॥ अपूप केले सुरेख ॥
घृतसहीत शर्करामिश्रित ॥ कांस्यपात्रीं संपादी ॥ ४९ ॥
कुंभघट स्थापूनियां ॥ पूजन करीं लवलाह्या ॥
चित्ती भावार्थ धरूनियां ॥ विप्रवर्या अर्पितसे ॥ ५० ॥
दक्षिणेसहीत वस्त्र अलंकार ॥ द्विजा पूजीते सुंदरा ॥
मग मौन्य करूनि नक्‍त विचारा ॥ सर्वेश्वरा भजतसे ॥ ५१ ॥
स्वपंक्‍ती विप्र भोजना ॥ सारिती जाली ते ललना ॥
प्रातःकाळी उद्यापना ॥ पिता जाण करवीतसे ॥ ५२ ॥
षड्रस अन्नें निपजवूनीं ॥ घृतपाचित पायसान्नीं ॥
द्विजा बैसवून भोजनीं ॥ दक्षिणादानीं विधियुक्त ॥ ५३ ॥
यथाकाळें फळें आणुनी ॥ ब्राह्मणातें अर्पी दक्षिणादानीं ॥
ओंटी भरून सुवासिनी ॥ नमस्कारूनि बोळवीत ॥ ५४ ॥
ऐसें उद्यापन करूनी ॥ भावार्थबळें प्रसन्न शूळपाणी ॥
विमान आले स्वर्गीहूनी ॥ शिवगणीं मंडित पैं ॥ ५५ ॥
घंटारव होता अपार ॥ माजी शिवगण आणि किन्नर ॥
वाद्यें वाजती अपार ॥ सुरवर तटस्थ ठेले ॥ ५६ ॥
ऐसें विमान उतरतां भूतळीं ॥ दिव्यरूप केली ते बाळी ॥
सर्वां देखता उद्धरोन गेली ॥ आश्चर्य सकळीं पै केलें ॥ ५७ ॥
म्हणती एक दिनीचा व्रत प्रभावो ॥ तात्काळ उद्धरली पहाहो ॥
ऐसा कृपाळू लक्ष्मीनाहो ॥ लीला लाघवो दाखवीतसे ॥ ५८ ॥
असो ते विप्रसुता ॥ शिवाजवळी नेली तत्वतां ॥
येरी चरणी ठेवून माथा ॥ विश्वनाथा नमियेलें ॥ ५९ ॥
नमस्कारून पार्वतीतें ॥ स्तुतिवादें प्रवर्ते स्तवनातें ॥
जोडूनियां बद्धहस्तें ॥ मुखीं गर्जे नामघोष ॥ ६० ॥
जय शंकर सदाशिवा ॥ कर्पूरगौरा उमाधवा ॥
भक्‍तवरदायक प्रियमाधवा ॥ सोडविले भवापासुनी ॥ ६१ ॥
म्हणे उदारा त्रिनयना ॥ खट्‌वांगधरा व्याळभूषणा ॥
वृषभध्वजा भक्तपाळणा ॥ दानवनिक्रंदना दयानिधे ॥ ६२ ॥
मी तंव मतिमंद अपराधी ॥ कृपासागर तूं दयानिधी ॥
देऊन पूर्ण कृपा औषधी ॥ भवभयव्याधी निवारिली ॥ ६३ ॥
ऐसा स्तुतिवाद करूनी ॥ मस्तक ठेविला शिवचरणीं ॥
संतोषयुक्त झाली भवानी ॥ देखून नयनीं तियेतें ॥ ६४ ॥
निरखून पाहे भवानी ॥ तंव कुंकुमही न वदनीं ॥
म्हणे धवरहित हे कामिनी ॥ जाणवलें मनीं जगन्मातें ॥ ६५ ॥
मग आश्वासुनी तियेतें ॥ सन्निध बैसविली निरुतें ॥
नाना उपभोग सयोचितें ॥ पुरवी तियेतें भवानी ॥ ६६ ॥
ऐसे लोटले कित्येक दिवस ॥ तंव एके दिवशीं श्रीनिवास ॥
शिवभेटीस अनयास ॥ कैलासा पैं आले ॥ ६७ ॥
नमूनियां कैलासराणा ॥ येरायेर करूनि हास्यवदना ॥
देऊनियां अभ्युत्थाना ॥ रमारमणा बैसविलें ॥ ६८ ॥
स्वागत पुसोनि सकळ ॥ वाराणशी चालले तात्काळ ॥
विमानरूढ ते वेळे ॥ भवानीसहित निघाले ॥ ६९ ॥
सवें घेतली मेधावती ॥ काशीपुरा पावली त्वरित गती ॥
अनुपम्य रचना तये स्थिती ॥ देखून मनीं आनंद ॥ ७० ॥
म्हणोन आनंदवन म्हणती ॥ अमृतवाहिनी भागीरथी ॥
जे त्रिपथगामिनी विख्याती ॥ जन तरती बिंदुमात्रें ॥ ७१ ॥
तेथें वास्तव्य नीलकंठ ॥ करिता जाला वरिष्ठ ॥
केशवराज दैवत श्रेष्ठ ॥ स्थापी नीलकंठ आदरें ॥ ७२ ॥
तंव तेथें अकस्मात मेधावती ॥ देखती जाली पार्वती ॥
खेद खिन्न वैधव्य सती ॥ म्लान वदनें देखिली ॥ ७३ ॥
मग प्रार्थूनि विश्वनाथा ॥ म्हणे हे सती वैधव्यव्यथा ॥
न साहेची सर्वथा ॥ निवारीं कृपावंता हे ॥ ७४ ॥
भोळा उदार कर्पूरगौर ॥ देता झाला अक्षई वर ॥
अक्षई सौभाग्य अपार ॥ होऊं शंकर बोलिला ॥ ७५ ॥
तैं पासुनी नाम जाण ॥ मंगळागौरी ठेवी त्रिनयन ॥
दिधलें अक्षई भुवन ॥ स्थापिली जाण वारणशीये ॥ ७६ ॥
तैं पासूनी नाम विख्यात ॥ म्हणती मंगळागौरी सत्य ॥
जनयात्रेसी जाती नित्य ॥ घेती दर्शन आदरें ॥ ७७ ॥
इतर देशींचे यात्रेकरी ॥ जाती ते नमिती मंगळागौरी ॥
हे प्रचीती अद्याप वरी ॥ सर्वत्र नेत्रीं देखती ॥ ७८ ॥
ऐसीते मेधावती विप्रदुहिता ॥ एक दिनी व्रत आचरतां ॥
वैधव्याची निवारूनि व्यथा ॥ अक्षयी सौभाग्यता ते जाली ॥ ७९ ॥
ऐसें हें मलमाहात्म जाण ॥ लक्ष्मीतें सांगे जनार्दन ॥
तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन ॥ करोत श्रवण आदरें ॥ ८० ॥
शास्त्र प्रचीती साक्षीभूत ॥ मनीं धरूनि शुद्ध भावार्थ ॥
भावें आचरावे हे व्रत ॥ सर्व आघात न सोहे ॥ ८१ ॥
शिव पुराणींची हे कथा ॥ पद्यपुराणीं असे तत्वता ॥
तेची प्राकृत भाषे तुम्हां आतां ॥ श्रवण पंथा निवेदिली ॥ ८२ ॥
तया मंगळागौरीचे दर्शन ॥ मंगळ होती सर्वही जन ॥
शंकरगौरी तुष्टमान ॥ होय कल्याण सर्वां ठायीं ॥ ८३ ॥
तरी नर अथवा नारी ॥ बाळ अथवा वृद्ध सुंदरी ॥
लाभ सारिखा सर्वां परी ॥ व्रत निर्धारीं आचरतां ॥ ८४ ॥
इति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ अष्टादशोऽध्याय गोड हा ॥ १८ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्या ॥ ८४ ॥
॥ इति अष्टादशोऽध्यायः ॥

Explore More