Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 9

(Purushottam Maas Katha Adhyay 9)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 9

Purushottam Maas Katha Adhyay 9. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 171
श्री गणेशाय नमः ॥
जयजयाजी रामचंद्रा ॥ अयोध्यावासिया रघुवीरा ॥
दयावंता कृपासागरा ॥ नेई पैलतीरा पंथ हा ॥ १ ॥
तव कृपेची अखंड नौका ॥ परतीरा नेतसे भाविका ॥
येथींचा कर्णधार निका ॥ वाल्मिक देखा साचार ॥ २ ॥
हे धर्मनौका जनालागीं ॥ शिल्पिकार तोहा महाराज योगी ॥
निर्माण केलीसे जगालागीं ॥ वाढविला परमार्थ ॥ ३ ॥
ऐका श्रोते सज्जनहो ॥ मळमहात्म परिसाहो ॥
सांगतसे लक्ष्मीना हो ॥ सत्कारुनि आदरेसी ॥ ४ ॥
ऐकतां हो त्रिविधताप ॥ दूरी जाय भव संताप ॥
पापें जाताती आपेंआप ॥ घेतां नाम श्रवणग्रंथीं ॥ ५ ॥
श्रीरुवाच ॥ देवदेव दयासिंधो वद किंचिदथोद्‍भुतं ॥
मलमासे न चीर्णेन भवेत्सकलसत्कृतं ॥ १ ॥
श्रीविष्णु रुवाच ॥ श्रृणु क्षीरोदतनये सर्वदा नंददायिनी ॥
सर्वोपरि दयादृष्टे सर्वानुग्रहकारिणी ॥ २ ॥
लक्ष्मी वदे जी स्वामिनाथा ॥ देवदेव जगन्नाथा ॥
अवधान देइजे वचनार्था ॥ अनाथ नाथा दयासिंधो ॥ ६ ॥
या मलमासाचें उपोषण ॥ करावे काय कारण ॥
याचें निवेदावें कथन ॥ कवण तरोन गेलासे ॥ ७ ॥
मग वदे तेव्हां श्रीधर ॥ ऐका प्रश्नाचें उत्तर ॥
मुख्य दयावंत अंतर ॥ असोनि निर्भरेंसी हो ॥ ८ ॥
दया असे जयाचे ह्रदयीं ॥ तया तें घडे सर्व काहीं ॥
अन्नदाना ऐसें दुजें नाहीं ॥ साधन आणीक निर्धारें ॥ ९ ॥
भूतमात्री दया जयातें ॥ सर्व साधनें घडती तयातें ॥
तेणें जाती मोक्षपंथें ॥ तपसामर्थ्ये आगळा ॥ १० ॥
या विषयींचा इतिहास ॥ नावेक ऐका सावकाश ॥
तेंची कथन श्रवणास ॥ यथामती निवेदूं आतां ॥ ११ ॥
सर्व धर्मामाजी उत्तम धर्म ॥ अन्नदान अति उत्तम ॥
तयावरी दया आणि क्षेम ॥ विशेषाहूनि विशेष ॥ १२ ॥
उत्तरदेशीं नर्मदातीरीं ॥ महिस्मृती नामें असे नगरी ॥
तेथील एक ब्राह्मणाची नारी ॥ वैधव्य निर्धारी तियेतें ॥ १३ ॥
भ्रताराविरहित कामिनी ॥ आप्तवर्ग नसेची कोणी ॥
एकाकी विचरे ते स्थानीं ॥ भिक्षा मागुनी क्रमी काळ ॥ १४ ॥
तामसी परम कोपिष्ट ॥ विधवा असूनी रागीट ॥
तपश्चर्या करी श्रेष्ठ ॥ काया कष्टें कष्टवीतसे ॥ १५ ॥
तंव पातलिया मलमास ॥ नर्मदातीरीं जातसे स्नानास ॥
नक्‍त नेम करी उपवास ॥ भरतां मास एक पैं ॥ १६ ॥
ऐसें करितां एक मासवरी ॥ परम कृश झाली शरीरीं ॥
तंव तिची सखी एक अवधारीं ॥ मार्गी भेटली तियेतें ॥ १७ ॥
नाम तियेचें तुरिजया पाहीं ॥ परम पापिष्ठ दुरत्ययी ॥
दोषयुक्त सर्वदां ही ॥ अतित्याई चंडिका ते ॥ १८ ॥
मार्गी चालतां अकस्मात ॥ ब्राह्मणी भेटलीं तियेतें ॥
येरी उभी राहूनि तेथें ॥ पुसे स्वागत आदरेंसी ॥ १९ ॥
म्हणे कृश जालीस बाई ॥ व्रत आचरत असा देहीं ॥
मी तव अभीगी पाहीं ॥ न घडे कांही सार्थकता ॥ २० ॥
स्त्री देहाची बुद्धि पाहीं ॥ पापरूपी अमंगळ देहीं ॥
यासीं उपाव करूं काई ॥ सांगा बाई आदरें ॥ २१ ॥
ऐसें बोलून उत्तरातें ॥ करुणास्वरे गहिंवरें तेथें ॥
म्हणे नेणें कधीं दान-व्रतातें ॥ भगवंतातें अंतरलें ॥ २२ ॥
पाहा कर्माचें विंदान ॥ पोटीं न रिघे संतान ॥
पुढें परम कठीण जाण ॥ नरक दारुण सुटेना ॥ २३ ॥
निपुत्रिकातें नाहीं गति ॥ ऐसें बोले वेद श्रुति ॥
पापीयातें नाहीं गति ॥ तरों केउती पुढारी ॥ २४ ॥
ऐसें करुणा स्वरे गहिंवरोन ॥ करिती झाली ते रुदन ॥
ऐसे देखून ब्राह्मणीन ॥ कळवळली मानसी ॥ २५ ॥
भूतमात्रीं दया तिजलागीं ॥ म्हणोन कळवळली निजांगी ॥
मग विचारून स्वआंगीं ॥ काय करिती जाली पै ॥ २६ ॥
हातीं होते गंगाजळ ॥ सवेची होते कर्दळी फळ ॥
मग सुदलेहो तात्काळ ॥ करीं जाण तिचीया ॥ २७ ॥
म्हणें ऐकें सादर आतां ॥ करुणा देखून द्रवले चित्ता ॥
तरी स्वीकारीं हे उदक आतां ॥ फळासहीत निर्धारे ॥ २८ ॥
एका दिवसाचे व्रतपुण्य ॥ तुजलागीं केले अर्पण ॥
येणे हो तुज कल्याण ॥ जाले उत्तीर्ण सर्वस्वेसी ॥ २९ ॥
ऐसे वदोन ते अवसरीं ॥ फळासहीत उदक करीं ॥
घालितांची ते नमस्कारी ॥ कृतकृत जाहलें म्हणोनियां ॥ ३० ॥
ऐसें वर्तता ते समयीं ॥ नवल वर्तलेंसे पाहीं ॥
तात्काळ जाली दिव्यदेही ॥ केवढी नव्हाळी व्रताची ॥ ३१ ॥
मनीं चमत्कारी ब्राह्मणीन ॥ वरतें पाहे जो विलोकून ॥
तो तात्काळ पावलें विमान ॥ स्वर्गाहून तात्काळीं ॥ ३२ ॥
तत्‌क्षणीं तये शूद्रीतें ॥ वाहोनि नेते जाले विमानातें ॥
येरी नमस्कारी बद्धहस्तें ॥ न विसरें मातें उपकार ॥ ३३ ॥
धन्यधन्य तूं पर उपकारी ॥ तपस्विनी माजी तूं खरी ॥
प्रचीत आली आज खरी ॥ सद्गद अंतरीं होतसे ॥ ३४ ॥
त्रिवार करून नमनातें ॥ विमान गेलें स्वर्गपंथें ॥
पुढें काय वर्तलें तें ॥ सावधान चित्तें परिसावें ॥ ३५ ॥
कौतुक पाहून नयनीं ॥ आश्चर्य करितसे मनीं ॥
म्हणे देखत देखत पापिणी ॥ गेली उद्धरोनि तात्काळ ॥ ३६ ॥
काय माझें अदुष्ट खोटें ॥ म्हणोनि दुःख मोठें ॥
पुढें तरी अवघड वाटे ॥ कैसेनि वोहटे जन्म प्रवाहो ॥ ३७ ॥
अहो जगदीशा काय केलें ॥ वृथा जन्मातें सारिलें ॥
कांहीं सार्थक नाहीं जालें ॥ वृथा आल्ये जन्मासी ॥ ३८ ॥
भगवान कृपेची माऊली ॥ एवढी पापीण उद्धरली ॥
देखत देखतच नेली ॥ वाहोनियां विमानीं ॥ ३९ ॥
आतां कवण करावा उपाहो ॥ कैसेनि लागेल माझी सोय ॥
ऐसें उकलवीं ह्रदय ॥ मुमुक्षु पाहे या नावें ॥ ४० ॥
येथें उद्भवली असे शंका ॥ येवढी पापीण उद्धरली देखा ॥
देतां एक दिन पुण्योदका ॥ तरली देखा निर्धारें ॥ ४१ ॥
मग ते ब्राह्मणी पाहीं ॥ केवीं न तरे ते तो देहीं ॥
कैसेनि पडेल अपायीं हे तो नवलाई अनुपम्य ॥ ४२ ॥
तात्काळ गेली पापीण ॥ मागें राहिले पुण्यवान ॥
तरी ये विषयींचे कारण ॥ सावधान परिसीजे ॥ ४३ ॥
समूळ पापी असलिया पाहीं ॥ पुण्यलेश नेणेची कांहीं ॥
उपरती होतां ह्रदयीं ॥ उद्धरोन जाई तात्काळ ॥ ४४ ॥
समूळ पापाचा ठेवा ॥ अर्धलेश पुण्यवट बरवा ॥
तो कैसेनि तरों पाहे जीवा ॥ करूं नये हेवा दुजियाचा ॥ ४५ ॥
समूळ पाप जेव्हा झडे ॥ तेव्हां पुण्यलेश आंगीं जडे ॥
उद्धरा गतीसी मग रोकडे ॥ जातां विलंब न लागेची ॥ ४६ ॥
असो ते ब्राह्मणी पाहे ॥ सखेदयुक्त गृहा जाय ॥
म्हणे अहो देवा करूं काय ॥ केउता होय परिणाम ॥ ४७ ॥
येरीकडे तो शूद्री जाणा ॥ पावती जाली स्वर्ग भुवना ॥
परि कर्मभोग चुकेना ॥ पावली जनना मागुती ॥ ४८ ॥
पदरीं पुण्याचा संचयो ॥ म्हणोनि प्राप्त झाला मानव देहो ॥
वाराणसी माजी जन्म होय ॥ ब्राह्मण वर्ण लाधला ॥ ४९ ॥
पुण्य सामग्री पदरीं ॥ एका ब्राह्मणाचिया घरीं ॥
भागीरथीचीये तीरीं ॥ जन्म निर्धारी पावला ॥ ५० ॥
काशीनाथ नामाभिधान ॥ तयाचें ठेविले असे जाण ॥
दिवसेंदिवस जाला तरुण ॥ वयसा जाण अष्टवरुषी ॥ ५१ ॥
काळांतरीं ब्राह्मणी पाहे ॥ पाहोनि यात्रेचा समुदाय ॥
वाराणसी यात्रा जात आहे ॥ पातली लवलाहे काशीपुरीं ॥ ५२ ॥
करूनि तीर्थाविधि स्नान ॥ घेतलें श्रीविश्वनाथ दर्शन ॥
मग करिती जाली परिभ्रमण ॥ देवदर्शन सकळांही ॥ ५३ ॥
तव अकस्मात मार्गावरी ॥ काशिनाथ ब्रह्मचारी ॥
भेटता जाला ते अवसरी ॥ दुरोन करी नमनातें ॥ ५४ ॥
परी पूर्वओळखी कैंची इयेतें ॥ जरी पूर्वपुण्यें सामग्री त्यातें ॥
म्हणोनी स्मरता जाला ह्रदयातें ॥ उपकार तेचिया ॥ ५५ ॥
म्हणोनि येता जाला निकटीं ॥ भेटता जाला उठाउठी ॥
म्हणे सखये पडली सदृष्टी ॥ पूर्वपुण्यें करोनियां ॥ ५६ ॥
ऐसें ऐकतांची वचन ॥ येरी म्हणे तूं आहेस कवण ॥
केउती तुझी ओळखण ॥ आलासी कोठून या ठायां ॥ ५७ ॥
मग बोले ब्रह्मचारी ॥ मी तुझी सखी निर्धारी ॥
पूर्ववोळखी पूर्ण धरी ॥ घातलें करीं पुण्योदक ॥ ५८ ॥
ऐसी आठवण देतां तियेतें ॥ येरी भेटती जाली तयातें ॥
मग समूळ वृत्तांताते ॥ पुसे आदरें भामिनी ॥ ५९ ॥
येणें जालें तेची कथिलें ॥ ऐकतां मन संतोषलें ॥
म्हणे एका दिवसाचें दिधलें ॥ पुण्य वाहिलें इजलागीं ॥ ६० ॥
तितुकियानें ही तरली ॥ विमानीं वाहोनियां नेली ॥
देखत देखत उद्धरली ॥ कलह कल्लोळी पापिणी हे ॥ ६१ ॥
पुनः नरदेह लाधला ॥ वरी ब्राह्मण वर्ण चांगला ॥
तोहि गंगातटाकीं निपजला ॥ विश्वनाथ जाला कृपाळू ॥ ६२ ॥
अहो देवा काय केलें ॥ माझें सार्थक नाहीं झालें ॥
वय माझें व्यर्थची गेलें ॥ नाहीं घडलें सार्थक ॥ ६३ ॥
एका दिवसाचें उदक करीं ॥ घालितां उद्धरली नारी ॥
मी तंव आचरलें मासवरी ॥ मळमास निर्धारी व्रताते ॥ ६४ ॥
कवण पापाचा भोगवटा ॥ भोगितां न सरोचि वांटा ॥
म्हणोन पिटीतसे लल्लाटा ॥ गहिंवर मोठा दाटला ॥ ६५ ॥
अट्टहास्यें तेव्हा रडत ॥ उरशीर असे बडवित ॥
जनसमुदाय सभोंवते ॥ मिळाला तेथें पाहावया ॥ ६६ ॥
जे येती ते पुसती काय झालें ॥ येरी उत्तर नेदी बोले ॥
जन म्हणती वेड लागलें ॥ किंवा घेतलें पिशाचीं ॥ ६७ ॥
भूत केवी झडपी तयेतें ॥ ही तव झडपिली महद्‌भूतें ॥
ऐसें वर्ततां तेथें नवल ॥ अद्‍भुत वर्तलें ॥ ६८ ॥
इचा पापलेश सरला ॥ पुण्यवाटा उभा राहिला ॥
तेणें योगें अंतरीं द्रवला ॥ नाथ भोळा दिनाचा ॥ ६९ ॥
तात्काळ आणविलें विमान ॥ तीतें दिव्य देह करून ॥
देखत देखत सर्व जन ॥ नेली वाहून विमानीं ॥ ७० ॥
मग तो काशीनाथ ब्रह्मचारी ॥ सखेदयुक्त झाला अंतरीं ॥
दृढ तपश्चर्या तो करी ॥ पावला निर्धारी शिवपदा ॥ ७१ ॥
चंद्रेश्वर नामें लिंग ॥ तयानें स्थापिलें अभंग ॥
देखताती सर्वही जग ॥ वाराणसी माझी अद्यापी ॥ ७२ ॥
ऐसें हें मलमासाचे कथन ॥ त्रिवर्ग गेले उद्धरून ॥
एकी जाले जन्म दोन ॥ एकी स्वदेहानें उद्धरली ॥ ७३ ॥
ऐसें हें महिमानातें ॥ आकर्णविले श्रोतियातें ॥
यदर्थी असे संमतातें ॥ श्लोकाधार पुराणींचा ॥ ७४ ॥
विमान महदायातं दिव्यभोगसमन्वितं ॥
बहुकालं महाभोगान् भुत्तवा चैव भुवस्तले ॥ ३ ॥
काशीनाथ सुतात्वंच लब्ध्वा तत्रापिशं बहु ॥
भुक्वा देहविसृष्टौतु पुनः शंकरलोकगा ॥ ४ ॥
मलमासदिनैकस्य फलं प्राप्ता सखीकरात् ॥
काश्यांस्थास्यति सा शूद्री यावदाचंद्रतारकं ॥ ५ ॥
श्लोकभावार्थ आणुनी मनीं ॥ कथा वर्णिली महाराष्ट्र वाणी ॥
न्यूनतें पूर्ण कीजे सज्जनीं ॥ नव्हे वाणी पदरची ॥ ७५ ॥
विना आधारें सर्वथा ॥ न चालेचहो कविता ॥
केवळ नव्हे ही दंतकथा ॥ पाहावें ग्रंथार्था आदरें ॥ ७६ ॥
व्युत्पन्नता नाहीं माझें आंगीं ॥ नव्हे कुशळ कवितामार्गी ॥
काळकर्मणेस्तव जगीं ॥ वाढविला प्रसर पैं हा ॥ ७७ ॥
मानेल तरी स्वीकारी जे ॥ न माने तरी त्यागिजे ॥
पुढें कथेतें अवधान दीजे ॥ म्हणे दासानुदास संतांचा ॥ ७८ ॥
स्वस्ति श्रीमलमास माहात्म्य ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ नवमोध्याय गोड हा ॥
ओव्या ॥ ७८ ॥ श्लोक ५ ॥
॥ इति नवमोध्यायः ॥

Explore More