Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 2

(Purushottam Maas Katha Adhyay 2)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 2

Purushottam Maas Katha Adhyay 2. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 205
श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय सद्‍गुरुनाथ समर्था । तुमचे चरणीं माझा माथा ॥
सदा सर्वदां राहो देई ताता ॥ ऐसा वर दाता देई कीं ॥ १ ॥
नमनीं नमन जरी करावें ॥ तरी नमनरूपी हें जग आघवें ॥
तेथें नमनाचिया नांवें ॥ शून्याकार ॥ २ ॥
शून्याकार जेथें जाला । तेथें भासची अवघा बुडाला ॥
तया भासापलीकडे ठाव स्वामिला ॥ म्हणोनि नमनाला मति नाहीं ॥ ३ ॥
तरी स्फूर्ती स्फुरे अंतरीं ॥ आणि मूर्ति ठसावी बरी ॥
जैसिया कृपेची लहरी ॥ मज दीनावरी असावी ॥ ४ ॥
चित्तीं धरिला जो नेम ॥ तो सिद्धि पावो सुगम ॥
अंतरीं वसूं दे प्रेम ॥ नेई नेम सिद्धी हा ॥ ५ ॥
असो आतां तो स्तुतिवाद ॥ वदू आतां कथानुवाद ॥
जेणें संतोषीय गोविंद ॥ स्तुतिवाद ऐकुनी ॥ ६ ॥
जैसे याचक भिकारी ॥ जाती श्रीमानाचिया द्वारीं ॥
त्याची स्तुती केलियावरी ॥ प्रसन्न अंतरीं तो होय ॥ ७ ॥
मग होऊनियां प्रसन्ना ॥ पुरवी तयाची मनकामना ॥
तेवी स्तुतिवाद्यें लक्ष्मीरमणा ॥ दासाप्रती पाळीत ॥ ८ ॥
मलमासेषु सर्वेषु स्वयंदेवो जनार्दनः ॥
तमुद्दिश्य कृतं यच्च स्वल्पं वा यदि वा बहु ॥ १ ॥
दानं होमं व्रतं स्नानं तपो ब्राह्मण भोजनं ॥
तेन लिप्तेन देहेन स याति नरकं चिरं ॥ २ ॥
मग म्हणे क्षीराब्धिशाई ॥ ऐकें हो कांचनदेही ॥
या मलमासाचे ठाई ॥ काय की जे हो लक्ष्मी ॥ ९ ॥
तरी अल्प अथवा स्वल्प ॥ कांहीं तरी कीजे दान तप ॥
होम अथवा ध्यान जप ॥ शक्तिनुसार पैं कीजे ॥ १० ॥
शक्ति असून जो न करी । तो रवरव भोगी अघोरीं ॥
यांत संदेह निर्धारी ॥ नसे सुंदरी जाण पां ॥ ११ ॥
ऐसें ऐकूनि उत्तर ॥ लक्ष्मी वदे प्रत्युत्तर ॥
हे नाथ दीनोद्धार ॥ प्रश्नाक्षर ऐकिजे ॥ १२ ॥
श्रीरुवाच ॥ निर्धनाश्चदुराचाराः परभाग्योपजीविनः ॥
नरा न किंचिञ्जानंति पशुवद्विचरांतिहि ॥ ३ ॥
विवेको नास्ति येषांवै किंकार्यतैर्मलिम्लुचे ॥
तत्सर्वं ब्रूहि मे देव यद्यहं तववल्ल्भा ॥ ४ ॥
हे स्वामी जगन्निवासा ॥ निर्धनातें उपाव कैसा ॥
दुराचारी पुण्यलेशा ॥ स्वप्नी नेणें कैसा तो ॥ १३ ॥
अविवेकी असती जे प्राणी ॥ पशुवत विचरति जनीं ॥
तया प्राणियाते कैसेनी ॥ मुक्ती घडे स्वामिराजा ॥ १४ ॥
यासीं उपाय केउता ॥ तो सांगिजे कृपावंता ॥
म्हणोन चरणीं ठेविला माथा ॥ मग अनंत बोलत ॥ १५ ॥
विष्णुरु० ॥ व्रते दाने तथा नक्ते याचिते कायशोषणे ॥
सर्वथा नास्तिसामर्थ्यं तैः कार्य द्विजसेवनं ॥ ५ ॥
साधूनां दर्शनंस्पर्शः ॥ कीर्तनं श्रवणं तथा ॥
कर्तव्यं शक्‍तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रदं ॥ ६ ॥
तरी ऐक हो सुंदरी ॥ द्रव्य नसे जरी पदरी ॥
तरीं कष्टवावें शरीरीं ॥ साधुदर्शनें महालाभु ॥ १६ ॥
देवदर्शनपुराणी ॥ काया कष्टवी जे गोसेवनीं ॥
तयातें न लगे कपर्दिक दानी ॥ तपें करूनि मी तोषें ॥ १७ ॥
येच विषयीं इतिहास ॥ ऐके हो स्वस्थ मानस ॥
जयाचेनि मज संतोष ॥ तोचि प्रकार अवधारीं ॥ १८ ॥
गावः पवित्रमतुलं गावो मंगलमुच्यते ॥
गावोभूमिश्च भूतानि स्थावराणि चराणिच ॥ ७ ॥
या भुवनत्रयाचे ठायीं ॥ गौतमी ऐसै दैवत नाहीं ॥
जीणें कष्टऊनियां देहीं ॥ क्षीरवृष्टी करी जगातें ॥ १९ ॥
तरि प्रत्यही करावें पूजन ॥ न घडे तरि मळमासीं जाण ॥
मासवरी करावें पूजन ॥ तें निरुपण अवधारी ॥ २० ॥
एकमास परियंत जाण ॥ स्वयें नक्‍त करावें आपण ॥
प्रातःकाळीं करून स्नान ॥ देवतार्चन पैं कीं जें ॥ २१ ॥
मग करावें गौतमी पूजन ॥ तया येवढें नसे पुण्य ॥
घालूनि तृणधान्य ॥ भावें चरण वंदावें ॥ २२ ॥
गौपूजे लाविजे भाळीं ॥ तेणें स्नान केलें यमुनाजळीं ॥
उठोनियां प्रातःकाळीं ॥ आधी गौतमी नमावी ॥ २३ ॥
मग गौतमपुत्रा करून वंदन ॥ गोमय सडा संमार्जन ॥
तया योगें पवित्र सदन ॥ होय जाण तयाचे ॥ २४ ॥
तया घरीं लक्ष्मीनिवास ॥ ठाव नसे रोग अपमृत्यास ॥
निरंतर करी निवास ॥ सदैव यश तो लाहे ॥ २५ ॥
ऐसें गौतमीचें पूजन करून ॥ मग सुशीळ सपत्‍नीक द्विज बोलावून ॥
तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून ॥ द्यावें दान तयाप्रती ॥ २६ ॥
सालंकारीं संयुक्‍त करून ॥ दोहनपात्र वस्त्र अलंकार जाण ॥
गळां पुष्पमाळा घालून ॥ घंटा बांधून दान द्यावें ॥ २७ ॥
तये घंटीचा होतां नाद ॥ स्वर्गी सुख पावे पितृवृंद ॥
उतरोनि वैतरणीचा कंद ॥ सुख संवाद तो करी ॥ २८ ॥
पुरुष अथवा हो का नारी ॥ उभयतां लाभाची समान परी ॥
गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी ॥ दैवत आन असे ना ॥ २९ ॥
गोभ्योयज्ञाः प्रवर्तते गोभ्योयज्ञाः समुत्थिताः ॥
गोभ्योवेदाः समुत्तीर्णाः स षडंगपदक्रमाः ॥ ८ ॥
तृणानिखादंतिवसंत्यरण्ये पिबंतितोयान्य परिगृहाणि ॥
दुह्यंतिवाह्यंतिपुनंति विश्वं गवांरसैर्जीवति जीवलोकः ॥ ९ ॥
स्पृष्टांश्चंगावः शमयंति पापं दत्ताश्च गावास्त्रिदिवंनयंति ॥
संरक्षिताश्चोपनयंति वित्तं गोभिर्नितुल्यं धनमस्ति किंचित् ॥ १० ॥
गौतमीवीण न होय यज्ञ ॥ गोक्षीरेंवीण न घडे हवन ॥
पंचामृतावीण न घडे पूजन ॥ श्रीविष्णु महाविष्णूचें ॥ ३० ॥
जया घरीं गौतमीचें पूजन ॥ पवित्र तयाचें सदन ॥
जेथें नसे सडासंमार्जन ॥ जाणावें सदन स्मशान तें ॥ ३१ ॥
पहा ते गौतमी परोपकारी ॥ तृण भक्षून अरण्यामाझारी ॥
स्वइच्छा जळातें प्राशन करी ॥ भार कवणावरी घालीना ॥ ३२ ॥
स्वसदनीं येऊन जाण ॥ क्षीरवृष्टी अमृत समान ॥
तेणें तृप्त होती अबलाजन ॥ ऐसी कृपाघन धेनू ती ॥ ३३ ॥
गोमयें पावन सदन ॥ अंगस्पर्शे पापक्षाळण ॥
गोमूत्रें पंचगव्यातें पवित्रपण ॥ शास्त्रीं जाण बोलिलेंसे ॥ ३४ ॥
प्रायश्चित्त घेतां जनाप्रती । देहाचे दोष दहन होती ॥
मग तें स्वसुखे नांदती ॥ प्रसादे धेनूचिया ॥ ३५ ॥
ऐसें धेनूचें करून पूजन ॥ मग ते ब्राह्मणा द्यावी दान ॥
तेणें पुनीत होती जन ॥ जगजीवन संतोषे ॥ ३६ ॥
कृपाकरून तयावरी ॥ प्राप्त करी निजपुरी ॥
न विसंबे क्षणभरी ॥ ऐसें मुरारी बोलिला ॥ ३७ ॥
ऐसें केलिया गोदान ॥ ते दिनी करावें ब्राह्मण भोजन ॥
षड्रस घृतासहित अन्न ॥ यथेष्ट भोजन पै द्यावें ॥ ३८ ॥
त्रयोदश गुणी तांबूल ॥ वेळा लवंगा सुपरिमळ ॥
चंदन अर्पिजे सुशीतळ ॥ द्विजकुळ तोषवावें ॥ ३९ ॥
मग वस्त्र अलंकार नाना ॥ शक्तिनुसार द्यावी दक्षिणा ॥
तुज प्रीत्यर्थ जनार्दना ॥ म्हणोन चरणां नमावें ॥ ४० ॥
परि येथें अवघड मोठें ॥ तात्काळ मनीं अहंकार उठे ॥
अहंकारें मी तव न भेटें ॥ नेटे पोटें पळे मी ॥ ४१ ॥
म्हणोनी यथासांग कर्म तें घडेना ॥ घडे कर्म तें पुण्यगाठीं पडेना ॥
ऐसें बोलिले साधूवचना ॥ तें अमान्य करवेना माझेनी ॥ ४२ ॥
अहो या साधु वचनासाठीं ॥ मी अवतार धरी कोटी ॥
परी तयाचीं वचनें गोमटीं ॥ पाववी शेवटीं सिद्धीतें ॥ ४३ ॥
यालागीं निरहंकार जाण ॥ करावें जप तप दान पुण्य ॥
तयातें मी जनार्दन ॥ न विसंबे क्षणभरी ॥ ४४ ॥
माझा मज अहंकार जाहला ॥ हयग्रीव जाहलों तये वेळां ॥
म्हणोनि सकल जगाला ॥ करून गलबला सांगतों ॥ ४५ ॥
थोडें करा अथवा फार ॥ परि मनीं न धरा अहंकार ॥
तेणें मी तुष्टें सर्वेश्वर ॥ वाहें भार तयाचा ॥ ४६ ॥
यदर्थी श्लोक गीतार्थाचा ॥ पार्था प्रति निरोपिला साचा ॥
तोचि अभिप्राय येथीचा ॥ मनीं आणा निर्धार ॥ ४७ ॥
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥
ततः कर्मफलत्यागस्त्यागाच्छातिरनंतरं ॥ ११ ॥
ऐसें फलाशारहित दान ॥ जे करिती मदर्पण ॥
ते प्रिय मज लागुन ॥ बहु बोलुन काय दाऊं ॥ ४८ ॥
जया आवडी मोक्षाची ॥ तेणें पूजा करावी नेमाची ॥
मलमास विशेषाची ॥ सामोग्री पुण्याची अपार ॥ ४९ ॥
यो गंतुं वांच्छति स्वर्ग गोपूजां सकरोति वै ॥
अधिमासे विशेषेण सुभक्त्त्या यवसादिना ॥ १२ ॥
ऐसें हें गो महिमान ॥ तुज म्यां केलें निवेदन ॥
म्हणोनि स्वये जनार्दन ॥ लक्ष्मीप्रति आपण सांगत ॥ ५० ॥
तोचि अभिप्राय आघवा ॥ तुम्हां श्रोतियां बरवा ॥
प्राकृत भाषेचिया गौरवा ॥ किंतु न धरावा मानसीं ॥ ५१ ॥
संमति साक्ष घ्यावी आदरें ॥ माझीं पद्मरचने होती अक्षरें ॥
स्फूर्तीदाता श्री रघुवीरें ॥ तया आधारें वदलों पैं ॥ ५२ ॥
ऐसिया गोपूजनाचें विधान ॥ भावें करिती पूजोनी दान ॥
तयाची यमयातना चुकोन ॥ पावे सदन मोक्षाचें ॥ ५३ ॥
यदर्थी संशय न धरावा ॥ साक्षेपें श्लोक परिसावा ॥
संमतेसीं प्रत्यय पाहावा ॥ पद्मपुराणीचा पै ॥ ५४ ॥
पूजनंसं प्रवक्ष्यामि गवामघनिवारणं ॥
दानं देयं विशेषेण स्वर्गदं सुखदं नृणां ॥ १३ ॥
मग लक्ष्मी म्हणेजी माधवा ॥ ऐसा महिमा सांगतां बरवा ॥
परी संदेह माझिया भावा ॥ तो निरसावा स्वामियां ॥ ५५ ॥
गौतमी देवी अवतारी ॥ आणि प्रचितीस परउपकारी ॥
देवी ती विष्ठाभक्षक निर्धारी ॥ काय म्हणोनिया ॥ ५६ ॥
मग बोले रमाधवो ॥ ऐक याचा अभिप्रावो ॥
शापास्तव पाहाहो ॥ विष्ठाभक्षक ते जाली ॥ ५७ ॥
तरी शाप तो कवणाचा ॥ परिसे भाव पैं येथींचा ॥
सदाशिवे दिधला साचा ॥ शाप साचा तियेतें ॥ ५८ ॥
एकदां आम्हीं आणि चतुरानन ॥ गेलों कैलासा लागुन ॥
परि चतुराननातें अभिमान ॥ सृष्टिकर्ता मी एक ॥ ५९ ॥
तें जाणोनि सदाशिवें ॥ ब्रह्मयातें निवेदिलें बरवें ॥
जे आमुचे मुगुटातें अवलोकावें ॥ आणि सत्त्वर यावें माघारें ॥ ६० ॥
तया देखतां आम्हालागी ॥ निरोपिता झाला महायोगी ॥
आमुचें पदतळ पाहून वेगीं ॥ परतून यावें माघारें ॥ ६१ ॥
ऐसी आज्ञा कैलासनाथें ॥ दिधली आम्हां उभयतातें ॥
अभिमानी जाणोनी ब्रह्मयातें ॥ मुगुट शोधातें तो गेला ॥ ६२ ॥
मग आम्हीं जाऊन पाताळा ॥ शोधिता जालों रसातळा ॥
अतळ वितळ सुतळा ॥ सप्त पाताळा शोधिलें ॥ ६३ ॥
परी ठाव न लागे चरणाचा ॥ खेदखिन्न होऊन तेथें साचा ॥
परतोन आलों न बोलवें वाचा ॥ शिवाजवळी ॥ ६४ ॥
अधोदृष्टी अधोमुख ॥ हें देखून कैलासनायक ॥
मातें आश्वासोनि नावेक ॥ बैस क्षण एक पै आतां ॥ ६५ ॥
तो इकडे ब्रह्मदेवें काय केलें ॥ एकवीस स्वर्ग धुंडाळिले ॥
परी मुगुटाचा अंत न कळे ॥ म्हणे परतोनि जाता भेद न दिसे मजलागीं ॥ ६६ ॥
तंव कुडीबुद्धी उपजली अंतरी ॥ तो धेनु आणि केतकीतें पाचारी ॥
साक्ष द्यावया शिवाजवळी ॥ चला समागमे माझिया ॥ ६७ ॥
ऐसी समागमें घेऊनी ॥ कमळासन आला कैलास भुवनीं ॥
रुद्राक्षातें नमूनी ॥ बोलता जाला पै ॥ ६८ ॥
परम आवेशे बोले तेव्हां ॥ मुगुट पाहुनी सदाशिवा ॥
साक्षी घेऊनि येधवां ॥ दर्शनातें पै आलों ॥ ६९ ॥
साक्ष पुसता चंद्रमौळी ॥ असत्य वदले ते वेळीं ॥
म्हणोनि क्रोधें शापिलीं ॥ दोघातें नीलकंठे ॥ ७० ॥
तैं पासुनी विष्ठाभक्षक ॥ धेनू झाली असे देख ॥
अपूज्य झाला तो केतक ॥ ऐसा कथानक पूर्वीचा ॥ ७१ ॥
तुझिया संशयाची निवृत्ती ॥ जाली की नसे चित्तीं ॥
धेनू सर्वांगी पवित्र म्हणतीं ॥ मुख जाण तें अपवित्र ॥ ७२ ॥
मागुती संशयातें धरून ॥ म्हणे माधवा लागून ॥
तरी सरस्वतीतें निवासस्थान ॥ जिव्हाग्रीं असे कीं ॥ ७३ ॥
ऐसिया कुश्चळस्थानीं ॥ सरस्वतीते निवास काय म्हणुनी ॥
मग बोले मोक्षदानी ॥ ऐक कथनीं तेंची पैं ॥ ७४ ॥
एके दिवशीं एकदां ॥ ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा ॥
कामबुद्धीनें पेटला मदा ॥ सरस्वतीसीं ॥ ७५ ॥
हें अंतरीं जाणविलें शिवातें ॥ मग शापिलें तियेतें ॥
अकुळीं घडे वास तूतें ॥ अपवित्र ते गर्वित ॥ ७६ ॥
ऐसा शाप सरस्वतीसी ॥ देता झाला कैलासवासी ॥
म्हणोनियां जिव्हाग्रेसी ॥ निवास तयेसीं पै जाला ॥ ७७ ॥
आतां कलियुगा माझारी ॥ कुपात्रीं ते निवास करी ॥
आणि कुळिवंताचे घरीं ॥ कुळीं उपजे मूर्खपुत्र ॥ ७८ ॥
तथापि विद्या असली किंचित ॥ तरीं गर्वे केला त्याचा निःपात ॥
तया गर्वानें वाताहत ॥ अकुळीं जन करिताती ॥ ७९ ॥
कुश्चित मनुष्याचे देहीं ॥ विद्याप्राप्त होतां पाहीं ॥
मग बोलों नेदी कवणासही ॥ मदबळें विद्येचेनि ॥ ८० ॥
असो आतां हें प्रस्तुत ॥ पुढें होणारें तें कथिलें निश्चित ॥
परी जे जन शुचिष्मंत ॥ तयानें आपुलें हित साधावें ॥ ८१ ॥
अकिंचन असलिया जाण ॥ पर्वकाळीं न घडे दानपुण्य ॥
ग्रहण आलियाही जाण ॥ नेदी भिजवून अडकारु का ॥ ८२ ॥
म्हणोनिया मलमासीं ॥ भावे सेवावें देवासीं ॥
पूजावें अति आदरेंसी ॥ गोब्राह्मणासीं आदरें ॥ ८३ ॥
ऐसी एक मास करितां पूजा ॥ मज अभार होय अधोक्षजा ॥
कृपाळू होऊनियां पूजा ॥ घालून निवारी पापातें ॥ ८४ ॥
पापे होतां निर्मुक्त ॥ मग सहजची मोक्षप्राप्त ॥
म्हणोनियां हें व्रत ॥ मलगासीं सेवावें ॥ ८५ ॥
इतुका इतिहास बरवा ॥ लक्ष्मीतें निवेदी माधवा ॥
तोचि अभिप्रावो आघवा ॥ तुम्हां पुढें विस्तारिलासे ॥ ८६ ॥
इति श्रीमलमास माहात्म ॥ पद्मपुराणीचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ द्वितीयोध्याय संपूर्ण ॥ ८७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ ओवी संख्या ॥ ८७ ॥ श्लोक १3 ॥
॥ इति द्वितीयोध्यायः ॥

Explore More