Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 4

(Purushottam Maas Katha Adhyay 4)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 4

Purushottam Maas Katha Adhyay 4. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 219
श्री गणेशाय नमः ॥
जय अयोध्यावासी श्रीरामा ॥ चराचराच्या फलांकितद्रुमा ॥
सदासर्वदा तव नामी प्रेमा ॥ दे नाम महिमा पतिता पै ॥ १ ॥
तोडुनियां भवपाश बंधन ॥ अखंड घडो मज भजन ॥
हेंचि देई कृपादान ॥ वरदानें आपुलिया ॥ २ ॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ मलमहात्म आख्यान ॥
जें आचरलिया घडे पुण्य ॥ करा श्रवण भावार्थे ॥ ३ ॥
श्रवण केलिया सतत ॥ व्रताचें फळ होय प्राप्त ॥
दान पुण्य न घडे जरी तप ॥ तरीं घ्यावें माप श्रवणपंथी ॥ ४ ॥
या मलमासाचे ठायीं जाण ॥ करावें गोब्राह्मणसेवन ॥
म्हणोन लक्ष्मीप्रती नारायण ॥ करी कथन तेचि ऐका ॥ ५ ॥
यत्पुरा भवताप्रोक्त पूजनं ब्राह्मणस्यच ॥
मलमासे प्रकर्तव्यं नरैः स्वर्गेप्सुभिः सदा ॥ १ ॥
कीं दृशो ब्राह्मणः प्रोक्तः कथं पूजोमलिम्लुचे ॥
किं फलं लभते मर्त्यः पूजनाच्च द्विजन्मनः ॥ २ ॥
श्रीरुवाच ॥ लक्षणं ब्रूहि विप्राणां देवाधीनां सुरेश्वर ॥
कथं संज्ञायते नाथ एतदेवोच्यतां मम ॥ ३ ॥
जया इच्छा वाटे अंतःकरणीं ॥ पापाची झाली पाहिजे धुणी ॥
तरी पूजावें ब्राह्मणालागुनी ॥ अगत्य करूनि मलमास ॥ ६ ॥
तरीं ते ब्राह्मण असावे कैसे ॥ इहीं लक्षणीं जाण ऐसे ॥
ऐकतांची संशय निरसे ॥ मनीं ठसे प्रबोधु ॥ ७ ॥
मुख्य ब्राह्मणाचें लक्षण ॥ करावें षट्‍कर्माचरण ॥
अध्ययन अध्यापन ॥ उपासन अग्नीचें ॥ ८ ॥
तपश्चर्या करावी जाण ॥ सुशीळ वरी संध्यास्नान ॥
करूनि नसावें लोलुप्तपण ॥ संतुष्ट मन असावें ॥ ९ ॥
असंतुष्ट द्विजनष्ट ॥ असंतुष्ट असलिया वरिष्ठ ॥
तरि तो न म्हणावा श्रेष्ठ ॥ ऐसें स्पष्ट वेद बोले ॥ १० ॥
म्हणोनि लक्षणयुक्त ब्राह्मण ॥ तेचि श्रेष्ठ चहुंवर्णातें जाण ॥
आतां ऐका आणिक कथन ॥ वर्तती कैसेनी ब्राह्मणाते ॥ ११ ॥
जे करिती अश्वसेवन ॥ उपर्जिती इतरा लागुन ॥
युद्धहव्यास मनीं धरून ॥ करिती सेवन नृपाचें ॥ १२ ॥
तेथें कैचें संध्यास्नान ॥ न घडे षट्‍कर्माचरण ॥
तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण ॥ तोही संपूर्ण नसे पै ॥ १३ ॥
अश्व उपर्जिती निजांगें ॥ जे करिती संसार सांगें ॥
तेथेंही अश्वविक्रय आंगें ॥ न घडे सांग तयातें ॥ १४ ॥
म्हणोन क्षत्रिय धर्मी ब्राह्मण ॥ ते पूजना योग्य नव्हेती जाण ॥
आतां ऐका दुसरें लक्षण ॥ सांगतों जाण ब्राह्मणाचें ॥ १५ ॥
पशुसेवा निरंतर करून ॥ जे करिती वाणिज्य कर्माचरण ॥
धन मेळविती भाडें करून ॥ ते वैश्य जाण म्हणावे ॥ १६ ॥
त्याहीवरी रसविकय ॥ घृतमधुलवणादि पाहे ॥
घृतमधु संचय आहे ॥ तुळराशी अपार ॥ १७ ॥
नाना वस्तुजात संग्रह ॥ करून करी जो विक्रय ॥
तो वैश्यधर्मा ब्राह्मण पाहे ॥ न साहे प्रतिग्रहीं ॥ १८ ॥
ऐसें कर्म ब्राह्मण आचरतां ॥ तरि तो वैश्य बोलिजे तत्वता ॥
ब्राहणपणाची वार्ता ॥ बोलों नये जाण पां ॥ १९ ॥
पशुसेवा करून नित्य ॥ कृषिकर्मातें आचरत ॥
तेणेंच योगें संसारकृत्य ॥ चालविती निरंतर ॥ २० ॥
तेथे स्नान संध्यातें कैची ॥ अष्टौप्रहर चिंता कृषीची ॥
होय न होय तयाची ॥ करणें घडे तयातें ॥ २१ ॥
म्हणोनि ऐसे जे का ब्राह्मण ॥ ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण ॥
प्रतिग्रह तया लागून ॥ न द्यावा जाण धर्मिष्टें ॥ २२ ॥
आतां परघात कर्मे करी ॥ नीच यातीची संगती धरी ॥
वाट पाडोनि वस्तु हरी ॥ जीवें मारी प्राणिया ॥ २३ ॥
चौरकर्मे करूनि जाण ॥ उदरनिर्वाह चालवी आपण ॥
दुसर्‍याचे द्रव्य अभिलाषून ॥ उपार्जन चालवी जो ॥ २४ ॥
करितां अभिलाष द्रव्याला ॥ बहुत मनीं संतोषला ॥
म्हणे आज लाभ मोठा झाला ॥ पुढें तयाला सुटका कैची ॥ २५ ॥
ऐसा न करी जो विचारातें ॥ आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते ॥
भक्षाभक्षणेंचित्तें ॥ कृतघ्नता सदा वसे ॥ २६ ॥
नाहीं संध्या नाहीं स्नान ॥ नाहीं पितरांचें तर्पण ॥
तेथें कैचा धर्म आणि दान ॥ पर्वकाळ धर्म तोही नेणें ॥ २७ ॥
पापद्रव्य सांचलें साची ॥ सेवा करी नित्य कुटुंबाची ॥
परी नेणें स्वधर्माची ॥ नित्य पापाची वासना ॥ २८ ॥
नित्य अनित्य क्रिया पाहीं ॥ ठाऊकें नसे जया ह्रदयीं ॥
तरी तो ब्राह्मण ऐसा पाही ॥ द्विपाद पशु बोलिजें ॥ २९ ॥
जो ब्राह्मणांचें ऋण घेउनी ॥ पुनः न देत तया परतुनी ॥
मोठा लाभ झाला म्हणोनी ॥ निज मनीं हर्षित ॥ ३० ॥
तरी ब्रह्मस्वहरणा ऐसें पाहीं ॥ मारक विष दुसरें नाहीं ॥
नेऊन घाली अपायीं ॥ रवरव नरकांत पै ॥ ३१ ॥
आधींच ब्रह्मस्व मारक ॥ त्याहीवरी कृतघ्न मारक देख ॥
द्रव्यावरी जो सदा आसक्त ॥ पोट न खाय अन्नातें ॥ ३२ ॥
ऐशियाचें ऋण घेउनी ॥ जो न देई मागुत्यानीं ॥
तरी तो पचे नरकभुवनीं ॥ परी सुटका तया लागुनी असेना ॥ ३३ ॥
येचविषयीं इतिहास ॥ ऐक होऊनी सावकाश ॥
पुराणांतरीं संमतास ॥ पाहावें बरें आदरें ॥ ३४ ॥
ऋण वैर आणि हत्त्या ॥ हें तो न चुके सर्वथा ॥
म्हणोन दृष्टांतासी कथा ॥ आकर्णवूं बरी ॥ ३५ ॥
कोणे एके देशीचा ब्राह्मण ॥ क्षत्रियधर्मी परम निपुण ॥
अश्वावरी आरूढोन ॥ विदेशा लागुनी तो गेला ॥ ३६ ॥
घरीं कुटुंब असे सर्वही ॥ परी धनाशा धरून जीवीं ॥
वरी शूरत्वाची उर्मी पाहीं ॥ आंगीं बैसे तयाच्या ॥ ३७ ॥
म्हणोनि पातला विदेशा ॥ धनालागीं चालिली वयसा ॥
वर्षे क्रमिलीं द्वादशा ॥ द्रव्य आशा बहुतची ॥ ३८ ॥
धनाशा धरूनि बहुत ॥ उपार्जिता जाला नृपनाथ ॥
धन मेळविले बहुत ॥ ऐका गणती तयाची ॥ ३९ ॥
सुवर्णनाणें सातशत ॥ द्रव्य जालेंसे निभ्रांत ॥
मग मनीं उपजला हेत ॥ गृह आशा चित्तांत उद्भवली ॥ ४० ॥
निरोप घेऊन माघारी ॥ परतता जाला निजमंदिरीं ॥
तंव मार्गी काय झाली परी ॥ तेचि निर्धारीं ऐकिजे ॥ ४१ ॥
दूरदेशी विदेश पंथ ॥ मार्ग क्रमी दिवस बहुत ॥
येत येतां एका मार्गात ॥ स्नानातें उतरे मध्यान्हीं ॥ ४२ ॥
वारू उभा करून तेथ ॥ वस्त्रें फेडून समस्त ॥
एकझरा उपसोनि तेथ ॥ स्नान करीत बैसला ॥ ४३ ॥
स्नानसंध्या वरचेंवरी ॥ करून सोडिली सिदोरी ॥
तांबुल घेऊन वरचेवरी ॥ परीधान करी लगबगें ॥ ४४ ॥
लगबग झाली जाण्याची ॥ मनीं आस उद्‌भवली कुटुंबाची ॥
म्हणे आजच भेट घेऊं तयेची ॥ परी गाठोडी धनाची विसरला ॥ ४५ ॥
बैसोन अश्वावर पाहीं ॥ निघता झाला लवलाहीं ॥
द्रव्य आठवून तयाचे ह्रदयीं ॥ हर्षे पाही विसरला ॥ ४६ ॥
तंव तो गेलिया मागे जाण ॥ एक पांथिक बैसला येऊन ॥
तयाने निरखितां ठिकाण ॥ सांपडलें धन अनायासे ॥ ४७ ॥
मग उठोनि अति तांतडी ॥ निघता झाला लवडसवडी ॥
म्हणे पुढे करावी परवडी ॥ स्नान आणि उपहारु ॥ ४८ ॥
म्हणोन तो पंथ क्रमित ॥ तंव आणिक एक शूद्र तेथ ॥
येऊनियां बैसत ॥ सिदोरि सोडीत भक्षावया ॥ ४९ ॥
इकडे मार्गी जातां अश्वावरी ॥ स्मरण करितो अंतरी ॥
तंव द्रव्य न दिसे पदरीं ॥ विसर निर्धारी मज जाला ॥ ५० ॥
म्हणोन तैसाची अश्व पिटित ॥ येता झाला पूर्वस्थळाते ॥
जेथे केलें असे स्नानातें ॥ आला तेथे लगबगे ॥ ५१ ॥
तो तेथे शूद्र असे बैसला ॥ पाहून तयाते बोलता झाला ॥
तुम्हीं येथे केधवां आलां ॥ ते आम्हाला सांगिजे ॥ ५२ ॥
तंव शूद्र बोले ते समयीं ॥ क्षण एक अवकाश जाला पाहीं ॥
मग तो म्हणे या ठायीं ॥ धन तुज सापडलें पै माझें ॥ ५३ ॥
शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा ॥ तुझा द्रव्यार्थ केउता ॥
येरु वदे शत साता ॥ द्रव्यार्थ माझें सुवर्ण ॥ ५४ ॥
तें तुवां अभिलाषिलें ॥ माझें मज देतां भलें ॥
नाहीं तरी जासी वधिले ॥ मज हस्तें पापिष्टा ॥ ५५ ॥
येरु आण वाहे ते समयीं ॥ मग म्हणे माझा झाडा घेई ॥
महापुरुषा तूं कवणे ठायीं ॥ विसरलासी धनातें ॥ ५६ ॥
ऐसा कलह उभयतां ॥ होत असे हो तत्वतां ॥
शूद्राजवळी न देखे तत्वता ॥ मग प्रवर्तला घाता तयाचिये ॥ ५७ ॥
मग तयातें म्हणे ते वेळे ॥ बरें झालें तें बरें झालें ॥
परी मी स्वसंतोषें आपुलें ॥ अर्धभाग देतों तूंतें ॥ ५८ ॥
अरे माझी द्वादश वर्षाची कमाई ॥ तूं अभिलाषूं नको या ठायीं ॥
येरू आण वाहोनि म्हणे नाहीं ॥ नेत्रीं पाहीं देखिलीं म्यां ॥ ५९ ॥
मग सक्रोध होऊन अंतर ॥ वस्त्रें पुसूनि खड्‍गधार ॥
तात्काळ तयाचें शरीर ॥ छेदिता झाला पै ॥ ६० ॥
क्षतें क्षीण होऊनि अंतरी ॥ म्हणें आता केउता जावें घरीं ॥
मुख स्वकुटुंबातें केवी दाऊं तरी ॥ म्हणोन माघारीं मुरडला ॥ ६१ ॥
इतुका वृत्तांत येथें झाला ॥ पहा लाभ कवणाला कवण मेला ॥
ऐसी ते असे विचित्र लीळा ॥ पुढें कथेला अवधान द्यावें ॥ ६२ ॥
अंतरिक्ष जातां नारदमुनी ॥ इतुका वृत्तांत देखिला नयनीं ॥
मग तैसाच वैकुंठा लागुनी ॥ त्वरें करूनि पातला ॥ ६३ ॥
भावें नमिला देवराणा ॥ इहीं मस्तक ठेविला चरणा ॥
पुसते जाले आगमना ॥ कोठुनी येणें पै झालें ॥ ६४ ॥
नारद म्हणे हो घननीळा ॥ फिरत फिरत आलों भूतळा ॥
परी तेथें देखिजे लीळा ॥ ती दयाळा अवधारीं ॥ ६५ ॥
मग सविस्तर कथन ॥ जालें तें कथी ब्रह्मनंदन ॥
म्हणे लाभ कवणा लागुन ॥ आणि मरण कवण पावला ॥ ६६ ॥
ऐसि अन्यायाची परवडी ॥ तूं निरखिसी कीं आवडी ॥
हे जगामाजी तुझी प्रौढी ॥ बरी न दिसे गोविंदा ॥ ६७ ॥
तूं तव त्रैलोक्याचा नाथ ॥ हा अन्याय नसे अवगत ॥
ही तव करणी अद्‍भुत ॥ बरी न दिसे तुजलागीं ॥ ६८ ॥
ऐकूनिया मुनीचे वचना ॥ हांसें आलें जनार्दना ॥
म्हणे हा अपराध मातें जाणा ॥ न लावावा दयानिधे ॥ ६९ ॥
हे तो ज्याची करणी जैशी ॥ भोगिती जाण हो तैसी ॥
तें दूषण ठेवितां आम्हासी ॥ जाणून होसी अज्ञान ॥ ७० ॥
आतां ऐकिजे कथन ॥ ऋण आणि हत्त्या जाण ॥
न चुके कवणालागून तेंचि कारण अवधारीं ॥ ७१ ॥
जयातें प्राप्त झालें जें धन ॥ तो पूर्वी होता सधन ॥
तयापासूनी घेतलें धन ॥ मेला शूद्र तेणें पै ॥ ७२ ॥
जयानें मारिलें शूद्रासीं ॥ तो जामिन जाला होता त्यासीं ॥
वायदा भरतां दिवसादिवसीं ॥ नेदि द्रव्यासी मागतां ॥ ७३ ॥
मग त्या सावकारें तगादा ॥ जामिनामागें लाविला सदां ॥
येरू पेटलासें द्वंदा ॥ परी तो नुसधा नायके ॥ ७४ ॥
मग देण्याची काळजी भारी ॥ न सोसेची निधारी ॥
म्हणोन पोटीं घातली सुरी ॥ प्राण निर्धारी तेणें दिधला ॥ ७५॥
आतां जो होता सावकार ॥ तोची द्रव्य घेऊन गेला समग्र ॥
ज्याचें गेलें तो होता जामीन थोर ॥ म्हणोन प्रकार हा जाला ॥ ७६ ॥
आपली जामिनगत उगवून ॥ शेखीं त्याचाही घेतला प्राण ॥
पूर्वी त्याचे घरीं सुरी घेऊन ॥ दिधला होता प्राण पैं तेणें ॥ ७७ ॥
तोचि अंतरीं साधून वैर ॥ खड्‍गें तोडिलें तयाचें शीर ॥
हा तंव बोल कवणावर ॥ सांगा मुनि निर्धारें ॥ ७८ ॥
ऐकून विष्णुमुखीची वाणी ॥ तटस्थ जाला नारदमुनी ॥
मग नमस्कार करूनी ॥ ऊर्ध्वपंथें तो गेला ॥ ७९ ॥
ऐसी हे दृष्टांतीं कथा बरवी ॥ श्रोतियातें निवेदिली आघवी ॥
यालागीं जीवीं गोष्टी धरावी ॥ सरती करावी वचनीं हे ॥ ८० ॥
आदौ ब्राह्मणाचें घेऊं नये ऋण ॥ घेतलिया न ठेविजे जाण ॥
तें तो अपायाचें कारण ॥ होय निःसंतान पै तेणें ॥ ८१ ॥
असो आतां हें मागील कथन ॥ आठव देतों तुह्मांलागून ॥
मागें निवेदिला ब्राह्मणधर्म जान ॥ सर्व जनीं परिसिला ॥ ८२ ॥
तरि म्हणाल कैसें कथन ॥ परिसीजे व्यास वचन ॥
माझें पदरींचे न होती जाण ॥ श्लोकी जाण पुराणींचे ॥ ८३ ॥
अश्ववाहनतत्वज्ञः संग्रामे नचभीः क्वचित ॥
आरंभे नीतिमान् शूरःक्षत्रियोसौ प्रकीर्तितः ॥ ४ ॥
लोहकर्मणिः निष्णातः पशूनां परिपालकः ॥
कृषिवाणिज्यकर्ताच सविप्रो वैश्य उच्यते ॥ ५ ॥
स्नेहलाक्षातिलानीली क्षारंक्षीरघृतंमधु ॥
मद्यादि विक्रयीविप्रः सशूद्रः परिकीर्तितः ॥ ६ ॥
भक्ष्याभक्ष्य समोयस्तु समोदारान्ययोरपि ॥
कृत्याकृत्यं न जानाति कृतघ्नो ब्राह्मणः पशुः ॥ ७ ॥
ऐसिया श्लोकाधारें करून ॥ केलें ब्राह्मण धर्माचे निरोपण ॥
म्हणोनी न ठेवा जी दूषण ॥ मजलागूनी स्वामियां ॥ ८४ ॥
ग्रंथगर्भी असे भाव जैसा ॥ तरी वदावा लागे मग तैसा ॥
तरीं ब्राह्मण पाहिजे कैसा ॥ तेही दशा अवधारीं ॥ ८५ ॥
श्रीविष्णु रुवाच ॥
मिताश्यध्यापकश्चैव संतुष्टोविजितेंद्रियः ॥
वेदशास्त्रार्थतत्वज्ञो विप्रोदेवः प्रकीर्तितः ॥ ८ ॥
अकष्ट फलमूलाशी वनवासरतः सदा ॥
कुरुतेहरहः कर्म सविप्रऋषिरुच्यते ॥ ९ ॥
पुराणकथको विप्रो व्यासरूपीहरिः स्वयं ॥
तद्भक्तिं कुर्वतांनृणा गंगास्न नं दिने दिने ॥ १० ॥
इहीं लक्षणीं पाचारूनि ब्राह्मण ॥ तयाची पूजा अगत्य करून ॥
मग यथानुशक्त्या द्यावें दान ॥ अपूपान्नकृतेसी ॥ ८६ ॥
घृतशर्करायुक्त पाहीं ॥ तीन दशक वरी तीनही ॥
दक्षिणेसहीत बरवीं ॥ घृतयुक्त तै दीजे ॥ ८७ ॥
वापीकूप सरोवर जीवन ॥ तेथें करावया प्रातःस्नान ॥
ऐसें मासवरी करितां जाण ॥ घडे पुण्य तें ऐका ॥ ८८ ॥
एव ज्ञात्वानरैः सेव्यः पुराणज्ञो मलिम्लुचे ॥
प्रयागादधिकं पुण्यं तस्य विप्रस्य सेवनात् ॥ ११ ॥
गंगा-यमुना सरस्वती पाही ॥ तें प्रयाग स्नान घडे देहीं ॥
वरी ब्राह्मणपूजा बरवी ॥ स्नेहें करावी आदरें ॥ ८९ ॥
तेणें पुण्यें करूनि जाण ॥ होय पापमळाचें क्षाळण ॥
अपमृत्यु गंडातर दूर होऊन ॥ वैकुंठभुवन तो पावे ॥ ९० ॥
राजा हो अथवा रंक ॥ सर्वास लाभ समान देख ॥
यदर्थी संशय आणिक ॥ न धरावा देख मानसीं ॥ ९१ ।
काळें करूनि तीर्थाचें फळ ॥ शरीर शक्ति यात्रा सफळ ॥
द्रव्यशक्ति यज्ञाचें फळ ॥ सेवा फळ ब्राह्मणाची ॥ ९२ ॥
ब्राह्मण सेवा फळे तत्काळ ॥ आतृप्त भोजन घालितां सकळ ॥
आशीर्वाद देती सुफळ ॥ तोचि फळे भाविका ॥ ९३ ॥
म्हणोनि देवाचें मुख ॥ ते ब्राह्मण जाणिजे देख ॥
यालागीं सेवा अधिक ॥ मासामाजी निर्धारें ॥ ९४ ॥
क्वचित् वेदमंत्रोच्चारी ॥ क्वचित् पुराणज्ञ जरी ॥
तरीं घेतला शास्त्राधारीं ॥ दानाधिकारी असे तो ॥ ९५ ॥
ऐसा इतिहास बरवा ॥ निवेदिला तुम्हां सर्वा ॥
येथें संशयो न धरावा ॥ शास्त्रीं घ्यावा प्रत्ययो ॥ ९६ ॥
स्वस्तिश्री अधिक माहात्म्य ॥ ब्रह्मांड पुराण समंत ॥
मनोहरसुत विरचित ॥ चतुर्थोऽध्याय गोड हा ॥ ९७ ॥
॥ ओवी संख्या ९७ ॥ श्लोक ११ ॥
॥ इति चतुर्थोध्यायः ॥

Explore More