Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 5

(Purushottam Maas Katha Adhyay 5)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 5

Purushottam Maas Katha Adhyay 5. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 158
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥
जयजयाजी गुरुराया ॥ मोरेश्वरमहाराजया ॥
नमन तुमचियां पायां ॥ करा छाया कृपेची ॥ १ ॥
तुमचिया कृपेची नौका ॥ परतीरा न्यावें बालका ॥
मनीं धरिला जो आवंका तो ॥ तो सिद्धि नेई का दयानिधी ॥ २ ॥
ऐका आतां श्रोतेजन ॥ कथा हे पुण्यपावन ॥
जे ऐकतां वैकुंठभुवन ॥ लक्ष्मीनारायण संवाद हा ॥ ३ ॥
श्रीविष्णुरुवाच ॥ एकदोपवनं देविजग्मुर्यदुकुमारकाः ॥
विहर्तुं सांब प्रद्युम्न चारुभानु गदादयः ॥ १ ॥
क्रीडित्वा सुचिरं कालं विचरंतः पिपासिताः ॥
जलंनिरुदके कूपे ददृशुः सत्वमद्‍भुतं ॥ २ ॥
कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः ॥
तस्यचोद्धरणे यत्‍नं चक्रुस्ते कृपयान्विताः ॥ ३ ॥
ऐका हो श्रोते सर्व ॥ ब्राह्मणाचें माहात्म्य अपूर्व ॥
मागें कथिलें तुम्हातें सर्व ॥ आतांही अपूर्व आकर्पिजे ॥ ४ ॥
श्री विष्णु स्वयें आपण ॥ लक्ष्मीप्रती करीतसे श्रवण ॥
तेंची ऐका सावधान ॥ करूनि मन एकाग्र पै ॥ ५ ॥
एकदां मिळोन सर्व कृष्णकुमर ॥ खेळत होते तेव्हां अपार ॥
खेळत खेळत प्रवेशले दूर ॥ एका अरण्यामाजी ते ॥ ६ ॥
तंव तेथें खेळतां चेंडू उसळला ॥ तो जाऊन एका कूपामाजी पडला ॥
तंव तेथें पातला अर्भकमेळा ॥ पाहती कूपालागीतें ॥ ७ ॥
तेथें आश्चर्य देखिले नयनीं । तया कूपामाजी तक्षणीं ॥
कृकलास देखिला तयांनीं ॥ कृकलाश म्हणजे सरड तो ॥ ८ ॥
तो सरड पर्वता ऐसा ॥ कांती सुवर्णमय सहसा ॥
म्हणती आजवरी सरड ऐसा ॥ न देखों निजदृष्टीं ॥ ९ ॥
मग समग्र मिळोन एके ठायीं ॥ प्रवर्तक जाले त्याचि डोई ॥
सर्व मिळोन ते समयीं ॥ कर्षिते झाले तयातें ॥ १० ॥
चर्मबंधनीं बांधिला दृढ ॥ तंव बोलता जाला तो सरड ॥
हे मूलहो सर्वही मूढ ॥ तुम्हांमाजी प्रौढ तो कवण ॥ ११ ॥
मनुष्यवाणी तो बोले पाही ॥ आश्चर्य करूं लागले सर्वही ॥
मग सांब-प्रद्युम्न ते समयी ॥ बोलते जाले तयातें ॥ १२ ॥
म्हणती चतुरपणें बोलशी भाषा ॥ तरी तूं आहेस कवण महापुरुषा ॥
तुझी तंव व्हावया ऐशीदशा ॥ कारण काय निवेदीं ॥ १३ ॥
मग तो सरड ते काळीं पाहीं ॥ वदता जाला तयाते देहीं ॥
म्हणे मूलहो ऐका सर्वही ॥ पूर्वकथन माझें हें ॥ १४ ॥
पूर्वी मी नृग राजेंद्र देख ॥ इक्ष्वाकुवंशीं असे एक ॥
राज्यभार चालविं विवेक ॥ धर्मन्याय प्रतापी ॥ १५ ॥
दान करितसें अपार ॥ अमित माझा कारभार ॥
वयसा सुवर्णमय साचार ॥ देखुनि सुरवर मानवती ॥ १६ ॥
ऐसें असतां एकेकाळीं ॥ मलमासाचिया पर्वकाळीं ॥
पाचारून विप्रमंडळी ॥ गोदानें तोषवितसें ॥ १७ ॥
सलक्षणीं सालंकारयुक्त ॥ सहस्र गोदानें देतसे नित्य॥
पुढें परिसिजे वृत्तांत ॥ वर्तला तो अवधारा ॥ १८ ॥
एका ब्राह्मणातें धेनु दिधली दान ॥ तंव ते कळपांत आली पळून ॥
दुसरे दिनी सेवकीं धरून ॥ उभी केली दानार्थ ॥ १९ ॥
मी संकल्पयुक्त पाहीं ॥ दान दिधलें ते समयीं ॥
ब्राह्मण घेऊन जातां स्वगृहीं ॥ पूर्व दिवशींचा भेटला द्विजवर ॥ २० ॥
तयानें ते धेनु ओळखिली ॥ म्हणें मज हे काल दान आली ॥
येरू म्हणे रायें आतांचि दिधली ॥ मजलागुनी स्वामियां ॥ २१ ॥
मी तो न देई तुम्हातें ॥ येरू जाऊं न देई तयातें ॥
कलह मांडिला उभयतांतें ॥ आले धांवत मजलागीं ॥ २२ ॥
मग मी समजावीं दोघांतें ॥ नेणोनि अपराध घडला मातें ॥
म्हणे हिचेनि पालटे तुम्हातें ॥ धेनु देतों दुसरी मी ॥ २३ ॥
ऐसें तयातें समजावितां ॥ तंव ते नायकती उभयंता ॥
मग सहस्र गोदानें तत्वतां ॥ द्यावया सिद्ध जाहालों ॥ २४ ॥
एका धेनूचे पालटें ॥ सहस्र द्यावया नेटें ॥
सिद्ध जहालोसे हटें ॥ परी नायकती उभयतां ॥ २५ ॥
मज ते सांगती शास्त्राधार ॥ संकल्पें बद्ध झाला तो द्विजवर ॥
तया पालटें अन्य विचार ॥ तरी पाप अघोर तें असे ॥ २६ ॥
गोविक्रया समान जाण ॥ पाप घडे हो तेणें दारुण ॥
म्हणोन शापिलें मजलागून ॥ कृकलास होईं पापिष्ठा ॥ २७ ॥
विनाकारण हा शाप त्याणीं ॥ दिधला हो मजलागुनी ॥
मग प्रार्थिता जालों मधुरवाणी ॥ मग उश्शाप वाणी बोलिले ॥ २८ ।
कृष्णकुमाराची दृष्टी पडतां ॥ तैं उद्धार होय तुझा नृपनाथा ॥
तोची प्रसंग जाण आतां ॥ सिद्धनिरुता पातलासे ॥ २९ ॥
पुढें कालांतरें करून ॥ देह झाला विसर्जन ॥
यमदूत येऊनि जाण ॥ नेले मज लागून यमलोका ॥ ३० ॥
यमानें माझा सत्कार ॥ केला तेथें अति आदर ॥
विप्रशाप परम दुर्धर ॥ गांठींस असें माझें पैं ॥ ३१ ॥
तयायोगें करूनि जाण ॥ मज बोले सूर्यनंदन ॥
तूं नृपपुण्य पावन ॥ परी विप्रवचन न चुके ॥ ३२ ॥
यालागी नृपवर्या पाहीं ॥ मज भोगणे लागे सरड देहीं ॥
म्हणोन प्राप्त झालें तिये समयीं ॥ तेंची पाहीं भोगूं आतां ॥ ३३ ॥
तरी तुम्हीं आतां ऐकावें ॥ कृष्णदर्शन मज करवावे ॥
जाऊन तयातें निवेदावें ॥ वृत्तांत माझा हा ॥ ३४ ॥
ऐकून तयाचें उत्तर ॥ धांवत गेले कृष्णकुमर ॥
करून देवातें नमस्कार ॥ समाचार सांगितला ॥ ३५ ॥
वृत्तांत ऐकतांच देवें ॥ धांव घेतली यदुपुंगवें ॥
दर्शन होतांची रमाधवें ॥ उद्धार केला तात्काळीं ॥ ३६ ॥
पाहूनियां स्वदेहासी ॥ नृगराज प्रवर्तला स्तुतीसी ॥
हे जनार्दन ऋषीकेशी ॥ तोडीं भवपाशासी माझिया ॥ ३७ ॥
हे केशव मधुमुरसंहरणा ॥ हे कृष्ण विष्णुजनार्दना ॥
जगपाळका दीनोद्धारणा ॥ नारायणा दयानिधे ॥ ३८ ॥
अवलोकितां कृपानयनीं ॥ पूर्वदेह आठवला मनीं ॥
दर्शन जालें मजलागूनीं ॥ पूर्वपुण्यें करूनि स्वामियां ॥ ३९ ॥
देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम ॥
नारायण ह्रषीकेश पुण्यश्लोकाच्युताव्यय ॥ ४ ॥
ऐसी स्तुती करितां रावो ॥ संतोषें बोले रमाधवो ॥
तुवां आचरलासी व्रत प्रभावो ॥ म्हणोनि पाहावो देव भेटी ॥ ४० ॥
यालागीं केलें कर्म जे तें वायां ॥ जाईनाजी नृपवर्या ॥
आणि ब्राह्मण पूजनाची चर्या ॥ ती या समया फळलीसे ॥ ४१ ॥
मग पाचारून समग्र कुमर ॥ तयाप्रती बोले शारङ्‌धर ॥
म्हणे अन्याय केउता नृपवर ॥ कहर केवढा जाहला ॥ ४२ ॥
यालागीं ब्राह्मणातें जे भिवोन ॥ करिती तयाचें पूजनस्तवन ॥
सद्भावें घालिती जे भोजन ॥ तरी मी जनार्दन संतुष्टें ॥ ४३ ॥
रणउत्साह क्षत्रियांसी ॥ तृणउत्साह धेनूसीं ॥
आमंत्रणउत्साह ब्राह्मणासी ॥ कृपणासी धनउत्साह ॥ ४४ ॥
म्हणोन ब्राह्मणभोजना ऐसें ॥ साधन तों आणीक नसे ॥
म्हणोनी पूजावें सायासें ॥ समयीं अनयासें अभ्यागत ॥ ४५ ॥
जरी शक्‍तिही नाहीं द्यावयासीं । आणि शक्तिही नाहीं दानासीं ॥
तरी नमन कीजे सद्भावेंसी ॥ तेणें द्विजासीं संतोष ॥ ४६ ॥
इतुकेंही न घडे जरी ॥ अभ्यंग स्नान सत्कारीं ॥
यासी तो वेंचावें न लागे पदरीं ॥ असलिया मुष्टीभरी अर्पावें ॥ ४७ ॥
अहो या ब्राह्मणासाठीं ॥ अवतार घे मी जगजेठी ॥
स्वयें सोसी आटाआटी ॥ ब्राह्मणासाठीं केवढी ॥ ४८ ॥
ब्राह्मणाचें लांछन पाहीं ॥ स्वयें मी मिरवीत ह्रदयीं ॥
ब्राह्मणा ऐसें दैवत नाहीं ॥ भूमंडळा माझारी ॥ ४९ ॥
ऐसियापरी शिकवण ॥ कुमारा सांगे श्रीकृष्ण ॥
याउपरी कथा अवलोकुन ॥ श्रोतेजन परिसोत कां ॥ ५० ॥
मग तो नृग राजशिरोमणी ॥ दिव्य देह पावोन तेच क्षणीं ॥
आरूढ जाला विमानीं ॥ नमस्कारूनी हरीतें ॥ ५१ ॥
इत्युक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्ट्‍वा स्वमौलिना ॥
अनुज्ञा तो विमानागर्‍यमारोहत्पश्यतां नृणां ॥ ५ ॥
सद्भिः समागमो राजन् कदाचिन्नाफलो भवेत् ॥
विमुक्‍तो नरकाद्राजानृगः साधुसमागमात् ॥ ६ ॥
या प्रकारे नृगनृपवर ॥ पावता जाला उद्धार ॥
म्हणोनियां धरामर ॥ अगोदर पूजावे ॥ ५२ ॥
पाहा केवढा ग्‍र्यान भगवंतें ॥ दिधलासे ब्राह्मणातें ॥
ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवतें ॥ ब्राह्मणाधीनते मंत्र ॥ ५३ ॥
पाहाया भूमंडळीं विख्याती ॥ भगीरथें आणिली भागीरथी ॥
तें जगातें पूर्ण करिती ॥ परी साधु उद्धरिती तयातें ॥ ५४ ॥
एकदा भागीरथी तटाकीं ॥ स्नान कीजे समग्र लोकीं ॥
तंव नारद तेथे दुरोन अवलोकीं ॥ परि न स्पर्श सलीला ॥ ५५ ॥
तव गंगा म्हणे मुनिवर्या ॥ दुरूनीच अवलोकुनियां ॥
कां स्पर्शोनद्याजी पायां ॥ करा छाया कृपेची ॥ ५६ ॥
सर्वेलोकानिमज्जांतिसाधुः किन्ननिमज्जति ॥
मातः त्वद्दर्शनान्मुक्तिः पुनर्जन्मन विद्यते ॥ ७ ॥
तंव नारद म्हणे ते समयीं ॥ तुज ऐसें पवित्र नाहीं ॥
तव दर्शनेंचि पाहीं ॥ मुक्‍ती होई प्राणियां ॥ ५७ ॥
मग स्नान केलिया सकळ ॥ क्षाळण होय अंगाचे मळ ॥
पाप न उरे तिळभर ॥ राहें अचळ ब्रह्मभुवनीं ॥ ५८ ॥
तंव गंगा बोले मुनिराया ॥ जैं मी आलें हो या ठायां ॥
तैंचा नेम वचन आठव ह्रदया ॥ माझिया असे कीं ॥ ५९ ॥
जगाचे पापाचें क्षाळण ॥ ते तव होतसे माझे न ॥
परी माझे पापमोचन ॥ तुमचेंनि जाण होतसे ॥ ६० ॥
मग हास्य करून देवऋषी ॥ मार्जन मज्जन केलें तिसीं ॥
प्रवेशता जाला भुवनासी ॥ ब्रह्मलोकासी मुनिरावो ॥ ६१ ॥
ऐसें साधूचें महिमान ॥ गंगा वर्णीतसे आपण ॥
म्हणोन प्रार्थितो तुम्हांलागून ॥ पूजा साधुजन आदरें ॥ ६२ ॥
साधूनां दर्शनं स्पर्शःकीर्तनं स्मरण तथा ॥
ब्रह्मस्व नच हर्तव्यं यदिच्छसि परांगतिं ॥ ८ ॥
सामर्थ्य असोनि आंगीं ॥ शक्तिनुसार न पूजिती जगी ॥
तरी तया ऐसा अभागी ॥ भुवन त्रयीं नसेची ॥ ६३ ॥
संसार तरी माईक ॥ आयुष्य जाण क्षणैक ॥
येथें कीजे पूर्ण विवेक ॥ करा सार्थक देहाचें ॥ ६४ ॥
धन असलिया अपरमित ॥ कांहीं नयेचि पै सांगत ॥
म्हणोनि कीजे हिताहित ॥ ह्रदयीं श्रीअनंत आठवूनी ॥ ६५ ॥
कृष्णः परिजनं गृह्य भगवान् देवकीसुतः ।
ब्रह्मण्यदेवो धर्मात्मा राजानमनुशिक्षयन् ॥ ९ ॥
एवं विभाव्य भगवान् मुकुंदो द्वारशोकसः ॥
पावनः सर्वलोकानां विवेश निजमंदिरं ॥ १० ॥
ऐसा कथाभाग रमाधवें ॥ कथिला जो स्वभावें ॥
जग हे पावन करावें ॥ म्हणोनि स्वभावें निवेदित ॥ ६६ ॥
तोची अर्थांतर बरवा ॥ तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वां ॥
चित्ती संशय न धरावा ॥ पुराणीं पाहावा प्रत्ययो ॥ ६७ ॥
इति श्रीअधिकमास माहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ पंचमोऽध्याय गोड हा ॥ ६८ ॥
ओंव्या ॥ 68॥ श्लोक ॥ 10॥
॥ इति पंचमोऽध्यायः ॥

Explore More