Sai Baba of Shirdi

शिर्डी साई बाबा रात्रिकाल आरति - शेज् आरति

(Shirdi Sai Baba Shej Arati)

Traditional

Also known as ratri vajatam

The Shej Arati, or night prayer, is the final devotional offering performed at the Shirdi Sai Baba Temple before the deity is put to rest. Composed in Marathi, this soul-stirring hymn invites devotees to seek the blessings of the Sadguru as the day concludes. It symbolizes the surrender of one's ego and worldly worries at the feet of the master. Chanting or listening to this arati brings deep mental peace, spiritual tranquility, and a profound sense of protection, helping the devotee transition into a restful state under the divine grace of Sai Baba.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

॥ शेजारती ॥
रात्री १० वाजतां
(१) आरती

ओवाळूं आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या साईनाथा ॥
पाचाही तत्त्वांचा दीप लाविला आतां ॥

निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली ॥
सर्वां घटीं भरूनि उरली साई माऊली ॥ ओवाळूं० ॥

रज तम सत्व तिघे माया प्रसवली ॥
मायेचिये पोटीं कैसी माया उद्भवली ॥ ओवाळूं० ॥

सप्तसागरीं कैसा खेळ मांडिला ॥
खेळूनिया खेळ अवघा विस्तार केला ॥ ओवाळूं० ॥

ब्रह्मांडींची रचना कैसी दाखविली डोळां ॥
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ॥ ओवाळूं० ॥
(२) आरती ज्ञानराजाची

आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥ धृ० ॥

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ॥ १ ॥

कनकाचे ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ॥ २ ॥

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केलें ।
रामजनार्दनीं । पायीं मस्तक ठेविलें ॥ ३ ॥
(३) आरती तुकारामाची

आरती तुकारामा । स्वामी सद्गुरूधामा ।
सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवीं आम्हां ॥ धृ० ॥

राघवें सागरांत । जैसे पाषाण तारिलें ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिलें ॥ १ ॥

तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥ २ ॥
(४) शेजारती

(उदो बोला उदो अंबा० या चालीवर)

जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरीं हो ।
आळवितो सप्रेमें तुजला आरति घेऊनि करीं हो ॥
जय० ॥ धृ० ॥

रंजविसी तू मधुर बोलुनि माय जशी निज मुला हो ।
भोगिसि व्याधी तूंच हरूनियां निजसेवकदुःखाला हो ॥
धांवुनि भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ॥
जय० ॥ १ ॥

क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।
घ्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो ॥
ओवाळितों पंचप्राण, ज्योति सुमती करीं हो ।
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ॥
जय० ॥ २ ॥

सोडुनि जाया दुःख वाटतें देवा त्वच्चरणांसी हो ॥
आज्ञेस्तव हा आशीर्प्रसाद घेऊनि निजसदनासी हो ।
जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो ।
उठवूं तुजला साईमाउले निजहित साधायासी हो ॥
जय० ॥ ३ ॥
(५) शेजारती

आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । करा साईनाथा ॥
चिन्मय हें सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ० ॥

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला ।
बाबा चौक झाडीला ।
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां० ॥ १ ॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती ।
बाबा नवविधा भक्ती ।
ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या ज्योती ॥ आतां० ॥ २ ॥

भावार्थाचा मंचक हृदयाकाशीं टांगिला ।
हृदयाकाशीं टांगिला ॥
मनाची सुमने करूनि केलें शेजेला ॥ आतां० ॥ ३ ॥

द्वैतांचे कपाट लावुनि एकत्र केलें ।
बाबा एकत्र केलें ॥
दुर्बुद्धीच्या गांठी सोडूनि पडदे सोडिले ॥ आतां० ॥ ४ ॥

आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला ।
बाबा सांडुनि गलबला ॥
दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ॥ आतां० ॥ ५ ॥

अलक्ष्य उन्मनी घेउनी बाबा नाजुक दुशाला ।
बाबा नाजुक दुशाला ॥
निरंजन सद्गुरू स्वामी निजे शेजेला ॥ आतां० ॥ ६ ॥
प्रसाद मिळण्याकरितां

(६) अभंग

पाहें प्रसादाची वाट । द्यावें धुवोनिया ताट ॥ १ ॥
शेष घेउनी जाईन । तुमचें झालिया भोजन ॥ २ ॥
झालों एकसवा । तुम्हां आळवोनीया देवा ॥ ३ ॥
तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निवांत ॥ ४ ॥ शेष० ॥
प्रसाद मिळाल्यावर

(७) पद

पावला प्रसाद आतां विठों निजावें,
बाबा आतां निजावे ।
आपुला तो श्रम कळों येतसे भावें ॥ १ ॥

आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा,
बाबा साई दयाळा ।
पुरले मनोरथ जातो आपुले स्थळा ॥ २ ॥

तुम्हांसी जागवूं आम्ही आपुल्या चाडा,
बाबा आपुल्या चाडा ।
शुभाशुभ कर्मेंदोष हरावया पीडा ॥ ३ ॥

तुका म्हणे दिधलें उच्छिष्टांचे भोजन,
उच्छिष्टांचे भोजन ।
नाहीं निवडिलें आम्हां आपुल्या भिन्न ॥ ४ ॥

Explore More